रघू यांचा ५० वर्षांचा छायाचित्रप्रवास, हा भारताचा कालपटच आहे.. तो मांडणारं एक पुस्तक, रघू राय यांच्या अन्य छायाचित्रसंग्रहांपेक्षा अधिक ‘आपलं’ आहे, कारण त्यात छायाचित्रकारानं स्वत सांगितलेल्या गोष्टीही आहेत..
‘कालकुपी’ हा शब्द उच्चारताच, आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांनी लालकिल्ल्यात कालकुपी गाडल्याच्या बातम्यांवरून त्या वेळी उठलेल्या वादळाची आठवण होणारे आजही अनेकजण असतील! कालकुपी म्हणजे, भविष्यकालीन अभ्यासकांना सत्य माहिती पुरवू शकणाऱ्या दस्तऐवजांचा संग्रह. मात्र आणीबाणी जाहीर करून एकाधिकारी शैलीचा प्रत्यय देणाऱ्या नेतृत्वावर तीन दशकांपूर्वीच्या मध्यमवर्गीयांचा अविश्वास एवढा की, त्या कालकुपीत खोटी माहितीच ठासून भरलेली असणार असं साऱ्यांना वाटत होतं. रघू राय यांनी तो काळ, ते नेतृत्व पाहिलं आहे.. अगदी लालबहादुर शास्त्री यांच्या मृत्यूपासून अनेक घटना त्यांनी वृत्तछायाचित्रकार या नात्याने छायाचित्रांकित केलेल्या आहेत..
छायाचित्रणाचा विचार रघू राय यांनी व्यवसाय म्हणून केला तो १९६५ साली. तोवर स्थापत्य अभियांत्रिकीचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं होतं आणि वर्षभरापुरतंच का होईना, सरकारी कामही मिळालं होतं. त्यात मन लागेना, म्हणून कॅमेरा घेऊन फिरू लागले आणि मोठे बंधू एस. पॉल यांना (हे एस. पॉल पुढे इंडियन एक्स्प्रेसचे छायाचित्र-संपादक होते) भेटून फोटो दाखवले. मग ‘हिंदुस्तान टाइम्स’ मध्ये वृत्तछायाचित्रकार म्हणून लागले आणि पुढल्याच वर्षी ‘द स्टेट्समन’चे छायाचित्र विभागप्रमुख झाले, असा रघू राय यांचा व्यवसायप्रवेश.
तिथपासून पुढल्या सुमारे ५० वर्षांत त्यांनी छायाचित्रणात जे काही केलं, ते देशाला स्वतकडे पाहायला लावणारं होतं. वादग्रस्त ठरलेल्या व्यक्तिमत्वांकडे निराळय़ा नजरेनं आणि माणूस म्हणून पाहू शकणारं होतं.. श्रमिकांची गर्दी आणि कलावंताचं लोभस एकलेपण किंवा भोपाळच्या संहाराची तिडीक आणि मशीद पाडली जाण्यापूर्वीच्या अयोध्येची सहजरम्यता अशा कित्येक टोकांना रघू राय यांची छायाचित्रं नेमकेपणानं जणू चिमटीत पकडतात.. म्हणतात, ‘हे पाहा.. हे तुम्ही’!
राय यांचा हा विशेष, त्यांचा एकटय़ाचाच होता असं म्हणणं हे जरा उदात्तीकरण ठरेल. राय ज्या काळात घडले आणि वाढले तो काळही महत्त्वाचा आहेच. आंरी कार्तिए-ब्रेसाँसारखे फोटोग्राफर ‘विश्वाचे आर्त’ कॅमेऱ्यातून प्रकाशात आणत होते आणि भारतात येऊन, भारतीय छायाचित्रकारांच्या सुनील जाना, कुलवंत राय, एस. पॉल, अशा पिढीवर प्रभाव दाखवू लागले होते .. विचारपूर्वक केलेल्या छायाचित्रणाचं खरं काम ‘मानवी जीवनाचं दस्तावेजीकरण’ हे आहे, ही युरोपीय भूमिका प्रबळ होत होती आणि ‘पिक्टोरियल फोटोग्राफी’चा अमेरिकी तोरा भारतासाठी जणू, अमेरिकी ‘मिलो’ धान्याइतकाच न पचणारा होता. निमाई घोष किंवा रिचर्ड बाथरेलोम्यू हे कलाप्रांतात वावरणारे, किंवा मित्तर बेदींसारखे त्या वेळी ‘औद्योगिक छायाचित्रण’ करणारे लोकही आज महत्त्वाचे ठरतात ते त्यांनी केलेल्या दस्तावेजीकरणासाठी. या काळात रघू राय यांनी पदार्पण केलं खरं, पण त्यापुढला काळ आणखी आव्हानांचा असणार होता.. ‘इंडिया टुडे’सारखं वृत्तपाक्षिक निघणार होतं, त्यात रघू राय हे छायाचित्रसंपादक असणार होते, नव्या पिढीला ते घडवणार होते आणि मुख्य म्हणजे, कृष्णधवल छायाचित्रांच्या नाटय़मय छटांपासून ते रंगीत छायाचित्रणाच्या सर्वरंगीपणापर्यंत छायाचित्रणाचा प्रवास अटळ असणार होता.. तो कवेत घेण्यासाठी रघू राय यांच्यासारखा खमका कलावंतच हवा होता.
प्रतिभा आणि मेहनत यांचं गूळपीठ रघू राय यांनी जमवलं, हे त्यांचं खमकेपण. रंगीत छायाचित्रांमध्ये राय यांनी त्यांचे समकालीन (आता दिवंगत) छायाचित्रकार रघुबीर सिंग यांच्याइतकी लोभसवाणी उधळण केली नाही हे खरं.. पण ‘एका रंगाचं किंवा रंगांना व्यापून टाकणाऱ्या एकाच प्रकारच्या (वाराणसीची पहाट, गोव्यातली गदड सायंकाळ) प्रकाशाचं अस्तित्व हेही लोभस असतं, सौंदर्यनिर्मितीसाठी महत्त्वाचं असतं,’ हे राय यांच्या अनेक रंगीत छायाचित्रांतून शिकता येतं. म्हणजे राय यांनी, पिक्टोरिअल फोटोग्राफीची तत्त्वं पचवून दस्तावेजी (डॉक्युमेंटरी) फोटोग्राफीत काम करून दाखवलं, हे त्यांच्या छायाचित्रण प्रवासातून कळतं.
तब्बल ३० पुस्तकांतून – म्हणजे छायाचित्रांच्या छापील संग्रहांतून- रघू राय यांचं काम ग्रंथबद्ध झालेलं आहे. तरीही हे एकतिसाव्वं पुस्तक महत्त्वाचं आहे. यापूर्वीचं ‘रघू रायज् इंडिया’ हे जाडजूड भलंमोठं आणि महागमोलाचं पुस्तक ज्यांना इच्छा असूनही घेता आलं नव्हतं, त्यातली अनेक छायाचित्रं इथं आहेत. पुस्तकाची रचना रघू राय यांच्या निवेदनाला भरपूर वाव देणारी आहे. त्यामुळे वाचकाला, राय यांच्या प्रदर्शनातून आपण फिरतो आहोत आणि खुद्द रघू रायच आपल्याला एकेका छायाचित्रामागची गोष्ट सांगताहेत, असं समाधान मिळतं. या एका वैशिष्टय़ामुळे, हे पुस्तक आज छायाचित्रणात किंवा रघू राय यांच्यामध्ये अजिबात रस नसलेल्यांनीही पुढल्या पिढीसाठी घेऊन ठेवावं असं झालं आहे.
भारतातल्या वेगवान आर्थिक बदलांचा, शहरीकरणाचा, राजकीय व्यवस्थेतल्या वादळांचा काळ रघू राय यांनी पाहिलेला आहेच. पण अशा बदलांना पुरून उरणारी लोकजीवनाची लय भारतानं जपली आहे, तीही रघू राय अलगद टिपून तुमच्याहाती देतात. घाटावर आंघोळ करणारे वा कपडे सुकवणारे भारतीय असोत की चर्चगेटच्या बाकावर बसून गर्दीच्या मधोमध शांतपणे वर्तमानपत्रं वाचणारे इंडियन्स; रघू राय यांनी या दोघांमध्ये शोधलेली स्वमग्नता महत्त्वाची ठरते.
हा रूढार्थानं केवळ छायाचित्रसंग्रह नाही. केवळ एक कॉफीटेबल बुक नव्हे हे.. रघू राय यांच्याकडून छायाचित्रणाचा कोणता वारसा आपल्याला मिळाला आहे, कोणता काळ त्यांच्या छायाचित्रांमधून व्यक्त होतो आहे, याची ही कुपी आहे. ‘अलेफ’ हे प्रकाशनगृह एरवी उत्तम गद्यसाहित्याचे प्रकाशक म्हणून ओळखले जाते. रघू राय यांची अनेक छायाचित्रे गद्य आणि काव्याच्या सीमारेषेवरली आहेत.. त्यांचे निवेदन मात्र अगदी सरळसाधे आहे.. ‘जर्नैलसिंग भिंद्रनवाले यांना मी पा-जी (पंजाबी अर्थाने) म्हणायचो, तर एकदा त्यांचे काही कट्टर समर्थक येऊन, ‘तुम्ही त्यांना असं कसं संबोधता’ वगैरे दमदाटी करायला लागले. मी म्हणालो, त्यांनाही मी त्यांना तसं म्हटलेलं आवडतं.. ’ हा किस्सेवजा मजकूर किंवा ‘मदर तेरेसांचे हे छायाचित्र १९९५ सालचे.. त्या ८५ वर्षांच्या होत्या आणि हात जोडल्यावर त्या अधिक ‘जुळलेल्या’ वाटत होत्या’ असे गूढगुंजन भासणारे वाक्य, हे वैविध्य त्यांच्या लिखाणात येत असले तरी, त्या शब्दांचा खुलासा फोटोतून होतच असल्याने लिखाण कुठेही कठीण नाही.
एवंच, सवलतीत वगैरे दीडेक हजारांच्या आतबाहेर मिळू शकणारं हे पुस्तक तुमच्याकडे असण्यासाठी कुठलंही निमित्त पुरेल.. त्यासाठी रघू राय यांचे किंवा छायाचित्रणाचे चाहते असणं, ही पूर्वअट अजिबात नाही.

– अभिजीत ताम्हणे
abhijit.tamhane@expressindia.com