रमाकांत आचरेकर हे मुंबईच्या क्रिकेटविश्वाचे एक जिवंत पुराणपुरुष.. स्वत: सन्यस्त वृत्तीने राहून आपल्या शिष्यांना विद्येत पारंगत करण्याचा वसा घेणारे आचरेकर सर आता थकले असले, तरी त्यांच्या या आठवणी तल्लख आहेत..

सकाळची वेळ. मुलं शिवाजी पार्क मैदानात आली होती. त्यांनी मैदानाला धावत एक फेरी मारली. त्यानंतर व्यायामही सुरू केला. पण सरांचा काही पत्ता नव्हता. असे कधी घडले नव्हते. सर सर्वाच्या आधी येऊन मैदानाला पाणी देण्याचे काम करायचे. त्यानंतर मुलं यायला सुरुवात व्हायची. पण आजचा दिवस त्याला अपवाद होता. तेवढय़ात धावत-पळत सर मैदानात आले. त्यांनी क्रिकेटच्या साहित्यांचा पेटारा उघडला. एकेक साहित्य काढत त्यांनी मुलांना दिले. मुलांनी ते परिधान केले.

आणि पूर्वीसारखा दिवस सुरू झाला. त्या वेळी एका शिष्याने येऊन सरांना सांगितले, ‘सर, तुम्ही आज आला नसतात, तरी चालले असते.’ कारण त्या शिष्याला हे ठाऊक होते की, सरांना पुत्ररत्न झालं होतं. पण जन्मानंतर काही क्षणातच त्याने पृथ्वीलोक सोडले होते. त्यावर सर म्हणाले, ‘एक मुलगा गेला असला तरी बाकीच्या या माझ्या मुलांकडे कोण पाहणार?’

सारे काही थक्क करणारे. त्या सरांची मानसिकता काय असेल, याचा अंदाज या उदाहरणाने सुस्पष्ट होतो. ही गोष्ट रमाकांत आचरेकर सरांची. हे ऐकल्यावर अजूनच कोलमडायला होते. कारण त्यांची ही गोष्ट बऱ्याच जणांच्या गावीही नसेल.

कुणाल पुरंदरे लिखित ‘रमांकांत आचरेकर : मास्टर-ब्लास्टर्स मास्टर’ हे पुस्तक आपल्याला त्यांच्याबाबतच्या आतापर्यंत न ऐकलेल्या बऱ्याच गोष्टी सांगून जाते. पुरंदरे यांनी पुस्तकाची ही सुरुवातच एवढी सुंदर केली आहे की, ती गोष्ट ऐकल्यावर आपल्याला धक्का बसतो आणि आपण त्या पुस्तकाच्या डोहात शिरतो. एकामागून एक आचरेकरांच्या गोष्टी ऐकताना आपल्यामध्ये ते केव्हा भिनतात, याचा अंदाजही येत नाही आणि आपण त्यांचे होऊन जातो. एखाद-दुसरी प्रकरणे पुस्तकाचा वेग कमी करतात. तिथे तुम्ही थोडे रेंगाळता, पण त्यानंतर पुन्हा एकदा लेखक तुम्हाला पुस्तकामध्ये घेऊन जातो. काहीवेळा सुखद, काही वेळा दु:खद धक्के बसतात. पण आचरेकरांच्या या पुस्तकात कोणतेही नाटय़ जाणूनबुजून आणलेले नाही, हेदेखील एका बाजूला तुम्हाला समजत असते.

एखादा खेळाडू यशोशिखरे ओलांडत असतो. अनेक मैलाचे दगड पार करतो. क्रीडाविश्वाच्या क्षितिजावर आपले अढळ स्थान निर्माण करतो. त्यावर जगभरातून त्याच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षांव होत असतो. पण गगनभरारी घ्यायला फक्त गुणवत्ता असून चालत नाही. तर ती गुणवत्ता हेरणारा, पारखणारा, त्याला कोंदण देणारा नि:स्वार्थी, प्रामाणिक, समर्पित असा प्रशिक्षकच लागतो. काही वेळा खेळाडू घडवणाऱ्या त्या निर्लेप हातांचे विस्मरण होते किंवा त्या प्रशिक्षकाची ओळख फक्त त्याच खेळाडूपुरती मर्यादित राहते. आजच्या पिढीपुढे रमाकांत आचरेकर हे नाव घेतल्यावर सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण अमरे अशी काही नावं पुढे येतात आणि त्या वर्तुळापुरतेच आचरेकर मर्यादित राहतात. पण आचरेकर सरांचा क्रिकेटपरीघ हा केवढा विलक्षण आहे हे पुस्तक आपल्याला दाखवते.

कोकणातून मुंबईत आलेल्या आचरेकरांचा क्रिकेट जीव की प्राण. क्रिकेटशिवाय त्यांना जास्त काही सुचलेच नाही. लेदरपेक्षा टेनिस क्रिकेटवर त्यांचे भन्नाट प्रेम. फलंदाज म्हणून ‘दादा’च. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये त्यांना क्रिकेटमुळेच नोकरी लागलेली. त्यांच्या फलंदाजीतला बचाव एवढा अभेद्य होता की, काही नावाजलेले क्रिकेटपटू म्हणायचे की, आचरेकरांना बाद करायचे असेल तर क्षेत्ररक्षकाला मैदानात खड्डा करून उभे करावे लागेल. पण त्या वेळी असलेल्या तगडय़ा स्पर्धेमुळे आचरेकरांना मुंबईकडून रणजी क्रिकेटही खेळता आले नाही. भारताला ऐतिहासिक कसोटी मालिका विजय मिळवून देणाऱ्या अजित वाडेकरांनाही त्यांनी मार्गदर्शन केले होते. आणि जेव्हा ते नावारूपालाही आले नव्हते, तेव्हा त्यांनी हा भारताकडून खेळेल, अशी ग्वाहीदेखील दिली होती. आचरेकर खेळाडू म्हणून मोठे असले तरी त्यांचा कल हा प्रशिक्षण देण्याकडे जास्त होता. त्यांनी सुरुवातीला दयानंद बालक विद्यालयाला प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. त्या वेळी शाळेने आम्हाला तुमचे मानधन परवडणार नाही, असे सांगितले होते. त्यावर आचरेकरांनी मला फक्त या मुलांना घडवायचे आहे, पैशाचा मला लोभ नाही, असे स्पष्टपणे सांगितले. या शाळेचे प्रशिक्षक असतानाचा एक किस्सा. गाइल्स शिल्डमध्ये त्यांची शाळा चांगली कामगिरी करत होती. पण संदीप पाटील खेळत असलेल्या बालमोहन शाळेने त्यांना पराभूत केले. त्यानंतर सर आपल्याला ओरडतील, असे मुलांना वाटले. पण घडले वेगळेच. सामन्यानंतर संध्याकाळी आचरेकर मुलांना चर्चगेटच्या पुरोहित हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेले. चांदीच्या ताटात जेवण्याचा तो या मुलांचा पहिलाच अनुभव होता. त्या वेळी त्यांनी एकनाथ सोलकर यांना मार्गदर्शन करायला बोलावले होते. आचरेकरांच्या घरात सुबत्ता होती असे नाही, पण त्यांचे खेळावर आणि आपल्या मुलांवर नितांत प्रेम होते. दादरच्या कबुतरखान्याजवळ बारा बाय बाराच्या घरात ते राहायचे. त्यांच्या पत्नी सुवर्णलता यांना वेळप्रसंगी सोन्याचे दागिनेही विकायला लागले होते, पण त्यांनी श्रीमंत असलेल्या माहेरी कधी पैसे मागितले नाहीत.

आचरेकर जिथे शिकवायचे तिथे चांगली कामगिरी व्हायची. ते मुलांना जास्त सराव सामने खेळवायचे. सामन्याच्या वेळी एका झाडामागे बसून खेळ पाहायचे आणि छोटय़ा-छोटय़ा गोष्टी हेरायचे. याचाच एक किस्सा. एकदा धाव घेताना अमोल मुझुमदारने समोरच्या खेळाडूला हात वर करून खुणवले. सामन्यानंतर आचरेकरांनी त्याला सांगितले. धाव घेताना फक्त तीनच शब्द बोलले गेले पाहिजेत. हो, नाही किंवा थांब. यावरून आचरेकरांचे विचार किती स्पष्ट होते ते दिसते. त्यांनी मुलांना कडक शिस्त लावली होती. ती शिस्त पाहूनच अजित तेंडुलकर भारावला आणि सचिनला त्याने आचरेकर सरांकडे आणले.

हॅरिस शिल्डमध्ये अंजुमन इस्लाम शाळेला पराभूत करत जेतेपद पटकावल्याचा आनंद शारदाश्रमची मुलं साजरा करत होती. मात्र त्याच सामन्यानंतर, कर्णधाराला आचरेकर यांनी कानशिलात लगावली होती. प्रतिस्पर्धी फलंदाज बाद नसताना अपील केल्यामुळे आचरेकर रागावले होते. अशीच एक गोष्ट विनोद कांबळीबद्दलचीही. फलंदाजी करताना मैदानात एक पतंग आला आणि विनोदने त्या पतंगाचा मांजा पकडला आणि पतंग उडवायला लागला. त्या सामन्यानंतरही आचरेकरांनी विनोदला असाच प्रसाद दिला होता. एका सामन्यात तीनशे धावा केल्यानंतर विकेट बहाल केलेल्या चंद्रकांत पंडित यांच्यावरही आचरेकरांचा राग अनावर झाला होता. हीच गोष्ट अमोलच्या बाबतीतही. प्रथम श्रेणी क्रिकेट पदार्पणात सर्वाधिक धावांचा (२६०) विक्रम केल्यावर अमोल यष्टिचीत झाला. त्यानंतर आचरेकरांनी त्याला धारेवर घेतले होते. शतक झळकावल्यावर जितेंद्र ठाकरे जास्त काळ मैदानात न उभा राहिल्याने त्यालाही आचरेकरांचा क्रोध पाहावा लागला. दुसरीकडे मुलांची पोट भरण्याचीही व्यवस्था आचरेकर करत होते. कधी कधी तर दोन्ही शारदाश्रमचे संघ अंतिम फेरीत असले तर त्यांच्या घरातून जवळपास ७० डबे मैदानावर जायचे. सराव किंवा सामन्यानंतर आचरेकर मुलांना खाण्यासाठी स्वत:हून पैसे द्यायचे.

एकामागून एक विलक्षण गोष्टी समोर येत असतानाच सचिनचे प्रकरण येते आणि पुस्तकाचा आवेग थंडावतो.

हे प्रकरण वाचताना बऱ्याच वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या अक्षर प्रकाशनच्या ‘असा घडला सचिन’ या पुस्तकाचा भास होतो. त्याचबरोबर सचिनच्या काही ऐकून गुळगळीत झालेल्या गोष्टी वाचायला मिळतात आणि वाचक पुस्तकाच्या विश्वातून बाहेर – कदाचित पुन्हा ‘मीडिया’च्या विश्वात येऊ शकतो.

पण त्यानंतरची प्रकरणे पुन्हा एकदा तुम्हाला डोहात घेऊन जातात. खासकरून चंद्रकांत पंडित यांची गोष्ट. पंडित यांची परिस्थिती बेताचीच असताना आचरेकर सर त्यांच्या वडिलांकडे जातात. ते चंद्रकांत यांना खेळण्यासाठी आग्रही, तर चंद्रकांत यांच्या वडिलांचा या गोष्टीला विरोध. त्या वेळी आचरेकर सरांनी पाकिटातले हजार रुपये काढून त्यांच्या हातावर ठेवले आणि म्हणाले, आता समजा तुमचा मुलगा कमवायला लागला. ही गोष्ट जवळपास चाळीस वर्षांपूर्वीची. या गोष्टीतून आचरेकर आपल्या शिष्यांप्रति किती समर्पित असतात, याची जाणीव होते. विनोद कांबळीचे प्रकरण पुन्हा एकदा पुस्तकाचा आवेग कमी करते.

त्यानंतर सर्व प्रशिक्षकांची चांगली माहिती एका प्रकरणात देण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे, पण याविषयी स्वतंत्र पुस्तक काढता येऊ शकते. आचरेकरांच्या आजारपणाचीही लेखकाने सवितस्त माहिती दिली आहे. त्यांच्यावर झालेले शारीरिक मानसिक आघात लेखकाने टिपले आहेत.

या पुस्तकाच्या शेवटच्या काही प्रकरणांमध्ये लेखकाने चांगले प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे, ज्या आचरेकरांनी एवढे अद्भुत क्रिकेटपटू घडवले त्यांना त्यांच्या मुंबईने किंवा क्रिकेट संघटनेने काय दिले? आणि दुसरा त्यापेक्षाही महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, क्रिकेटला दुसरे रमाकांत आचरेकर सर भेटतील का? खरे सांगायचे तर आचरेकरांकडून शिकणाऱ्या काही जणांनी प्रशिक्षक म्हणून आपापल्या कारकीर्दीला सुरुवातही केली आहे, त्यामधील काही नावाजले गेलेही; पण काही जण मात्र गुणवत्तेचा विचार न करता फक्त पैशाचाच विचार करताना दिसतात, याचे वाईट वाटते. आचरेकरांच्या शरीरावर आघात झाला असला तरी त्यांच्या मनावर झालेला नाही. अजूनही व्हीलचेअरवरून ते शिवाजी पार्कमध्ये येतात. कदाचित तेच त्यांच्यासाठी औषध असावे. पण खरे बोलायचे झाल्यास आता दुसरे आचरेकर सर होणे नाही.

हे पुस्तक फार चांगली आणि सखोल माहिती आचरेकरांबद्दल देते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी सोप्या इंग्रजीमध्ये हे पुस्तक लिहिले गेले आहे. पुस्तकामध्ये कोणताही बडेजाव नाही. डोळ्यांना त्रास देणाऱ्या गोष्टी नाहीत. छायाचित्रेही अगदी निवडक आहेत. त्याचबरोबर पानांचा कागदही चांगला वापरला गेला आहे. आत्ताच्या पिढीने तर हे पुस्तक संग्रही ठेवण्यासारखे आहे, कारण त्यामधून शिकण्यासारखे बरेच आहे.

रमाकांत आचरेकरमास्टर ब्लास्टर्स मास्टर

लेखक : कुणाल पुरंदरे

प्रकाशक : रोली बुक्स,

पृष्ठे : १८४ ; किंमत : २२१ रु.

prasad.lad@expressindia.com