21 March 2019

News Flash

छोटेच, पण ठाम स्वातंत्र्य!

गुरमेहरने तिच्या स्वतंत्र व निर्भीड विचारसणीची चुणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये अभावितपणे दाखवून दिली.

‘स्मॉल अ‍ॅक्ट्स ऑफ फ्रीडम’

युद्धविरोधी भूमिकेमुळे गतवर्षी चर्चेत आलेल्या दिल्ली विद्यापीठातील गुरमेहर कौरच्या आत्मकथनाविषयी..

एकवीस वर्षीय गुरमेहर कौर दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. १९९९ च्या कारगिल युद्धात शहीद झालेले कॅप्टन मनदीप सिंग आणि त्यांची पत्नी राजविंदर कौर यांची ती थोरली मुलगी. मनदीप  आणि राजविंदर (‘राजी’) यांच्या लग्नानंतर दोन वर्षांनी २४ सप्टेंबर १९९६ रोजी जालंधरच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये गुरमेहरचा जन्म झाला. अपत्यप्राप्ती व्हावी म्हणून आई-वडिलांनी अनेक मंदिरे, दग्रे आणि गुरुद्वाऱ्यांना भेटी दिल्या होत्या. ईश्वराच्या मेहेरबानीने मुलगी झाली म्हणून तिचे नाव ‘गुरमेहर’ ठेवले गेले.

मनदीप युद्धात शहीद झाले तेव्हा गुरमेहरचे वय तीन वर्षांहून कमीच होते. तिची धाकटी बहीण बानी ही जेमतेम चार महिन्यांची होती. दोन्ही मुलींना त्यांच्या आईने- राजीने- स्वत:च्या बळावर वाढवले, सुशिक्षित केले. सुजाण झाल्यावर गुरमेहरच्या लक्षात आले की, आपल्या आईनेच नव्हे तर नानीने (आईच्या आईने) देखील अशाच आपत्तीला धर्याने तोंड दिले होते. नाना (आजोबा) अभियंते होते, सरकारी सेवेत होते. कामावर असताना हाताखालच्या कामगारांना वाचवण्याच्या प्रयत्नात दुर्दैवाने स्वत:च तरुण वयात अपघाताला बळी पडले. नानीने तिच्या दोन मुलींना प्रतिकूल परिस्थितीत उत्तम प्रकारे वाढवले. त्यातली एक अर्थातच राजी- गुरमेहरची आई. अशा प्रकारे कर्तव्यनिष्ठ वडिलांचा व खंबीर आई-आजीचा वारसा प्राप्त झालेल्या गुरमेहरने मागील दोन पिढय़ांची परंपरा अधोरेखित करण्यासाठी ‘स्मॉल अ‍ॅक्टस् ऑफ फ्रीडम’ हे पुस्तक लिहिले आहे. त्या अनुषंगाने गेल्या सात दशकांतील उल्लेखनीय घटनांचा तिने मागोवा घेतलेला असल्याने या आत्मकथनाचा कॅनव्हास व्यापक झाला आहे. आई-आजी यांनी वेळोवेळी स्वतंत्रपणे घेतलेले सांसारिक निर्णय, त्यांच्यापासून गुरमेहरला मिळालेले संस्कार, वडिलांचे आचारविचार व खुद्द गुरमेहरचे स्वत:चे विचार अशा विविध बाबींमध्ये मूलभूत स्वातंत्र्याची संकल्पना अंतर्भूत आहे, असे मानल्यास पुस्तकाचे शीर्षक यथोचित ठरते.

गुरमेहरने तिच्या स्वतंत्र व निर्भीड विचारसणीची चुणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये अभावितपणे दाखवून दिली. दिल्लीच्या रामजस महाविद्यालयामध्ये आयोजित एका चर्चासत्राच्या निमित्ताने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप)चे कार्यकत्रे आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी यांच्यातील संघर्षांत हिंसाचार उफाळले होते. विद्यार्थ्यांवर अत्याचार झाले होते. गुरमेहर लेडी श्रीराम महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती; परंतु अभाविपच्या दंडेलशाहीचा निषेध करणाऱ्या विद्यापीठाच्या समस्त विद्यार्थ्यांना गुरमेहरचा पाठिंबा होता. त्या वेळी तिने फेसबुकवर दिलेले निषेध-विधान सर्वत्र गाजले. त्या आधी २०१६ सालीदेखील शांतता चळवळीच्या एका व्हिडीओत ‘माझ्या वडिलांना पाकिस्तानने नव्हे, तर युद्धाने मारले’ असे मत तिने व्यक्त केले होते. साहजिकच ती कट्टरवादी िहसक शक्तींच्या रडारवर आली. तिला ‘राष्ट्रविरोधी’ म्हणण्यात आले. तिचे ट्रोलिंग होऊ लागले, धमक्या येऊ लागल्या. आपल्या (व सर्वाच्याच) मतस्वातंत्र्याचे महत्त्व गुरमेहर तीव्रतेने मानते. तसेच युद्ध हे निष्ठुर व अनावश्यक असते, असेही तिचे ठाम मत आहे. तिने प्रेमळ वडील युद्धात गमावले आहेत. युद्धाने किती प्रचंड नुकसान होते ते सनिकाच्या कुटुंबापेक्षा कोण अधिक जाणू शकेल, असा तिचा परखड सवाल आहे. सैनिक शत्रूंना मारतात. ते त्यांचे कर्तव्यच असते. परंतु आपण सामान्य लोकांनी शत्रूला नव्हे तर शत्रुत्वाला नष्ट करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. सर्वाना आपल्याविषयी भय नव्हे तर प्रेम वाटले पाहिजे, अशी शांततेची उदात्त शिकवण गुरमेहरला तिच्या आईकडूनही मिळाली आहे.

परंतु या पुस्तकात गुरमेहरने सामाजिक/ राजकीय विषयांवर चर्चा केलेली नाही. तो पुस्तकाचा उद्देश नाही. रामजस महाविद्यालय- संबंधित घटनांचे विवरण केवळ प्रस्तावनेत केलेले आहे. त्यानंतर संपूर्ण पुस्तकात गुरमेहरने जाणून घेतलेले वा अनुभवलेले अनेक प्रसंग ओघवत्या शैलीत मांडले आहेत. वडिलांच्या मृत्यूने गोंधळून गेलेल्या लहान गुरमेहरला वारंवार वडिलांचा अभाव जाणवत राहतो, हे अनेक प्रसंगांमधून जाणवते. काही काळ शिक्षणाकरिता नानी त्यांच्या दोन्ही मुलींना त्यांच्या मामाच्या घरी पाठवते. त्या घरी मुलग्यांना व मुलींना मिळणारी विषम वर्तणूक, वैधव्य आलेल्या नानीला व तिच्या मुलींना नातेवाईकांनी कलुषित दृष्टीने पाहणे असे प्रसंग ज्याप्रमाणे गुरमेहर चित्रित करते, त्याचप्रमाणे तिचे व्यक्तिगत अनुभवही ती समर्थपणे रेखाटते. शाळेमध्ये इतर मुलांचे आई-वडील येत असतात, मात्र आपल्याला एकटी आई आहे आणि तीसुद्धा नोकरी करत असल्याने नेहमी शाळेत येऊ शकत नाही याची बोचरी खंत, टेनिस मॅच हरल्यावर नराश्यावस्थेतल्या गुरमेहरला आईने धीर व संघर्षांची शिकवण देणे, नेटक्या मिलिटरी कॅण्टोन्मेंटमधील शिस्तबद्ध व सेक्युलर जीवन.. अशा विविध बाबी गुरमेहरने चित्रित केल्या आहेत. हे सारे तिच्या जडणघडणीला साहाय्यभूत ठरले आहे.

गुरमेहरची नानी इतकी आत्मनिर्भर आहे की, खेडय़ातील सासुरवाडीत मुलींना चांगले शिक्षण मिळणार नाही म्हणून शहरात येऊन, स्वत:चे घर उभारून मुलींना शिक्षण देते. नानीचा परिवार मूळचा पाकिस्तानातील वझीराबादचा. फाळणीनंतर त्यांना भारतात यावे लागले. एकदा कपाटातील चॉकलेट शोधण्याचा उपद्व्याप करीत असताना लहानग्या गुरमेहरच्या हाती अभावितपणे नानीचा पासपोर्ट लागतो. त्यावरून नानीचा जन्म पाकिस्तानात झाल्याचे कळून तिचा नानीविरुद्धचा त्वेष अनावर होतो- ‘आपल्या घरात एक पाकिस्तानी राहत आहे? ती मुसलमान आहे का?’ गुरमेहरची आई तिचा गैरसमज दूर करते, ‘तुझी नानी पाकिस्तानी नाही. मुसलमानही नाही. आणि समजा असती तरी काय झाले असते?’ मग आई तिला अठराव्या शतकातली एक गोष्ट सांगते : १७०४ साली गुरू गोविंद सिंग यांच्या शीख सन्याची मोगलांशी लढाई (आनंदपूर साहेबची लढाई) चालू होती. त्या वेळी दिवसभराची लढाई संपल्यावर भाई कन्हैया नावाचा एक सेवेकरी शीख सनिकांनाच नव्हे तर युद्धभूमीवर हिंडून जखमी मोगल सनिकांनाही प्यायचे पाणी द्यायचा. तो ‘गद्दार’ आहे, अशी तक्रार गुरू गोविंद सिंगांकडे गेली. त्यांनी भाई कन्हैयाकडून स्पष्टीकरण मागितले. भाई कन्हैया म्हणाला, ‘हे खरं आहे गुरुजी; पण मला युद्धभूमीवर कोणीच शीख किंवा मोगल दिसत नाहीत. मला फक्तमाणसं दिसतात. त्या सर्वामध्ये एकाच देवाचा निवास आहे आणि सर्वाना समान लेखावं अशीच शिकवण तुम्ही दिली आहे ना?’ गुरू गोविंद सिंगांनी त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले व म्हणाले, ‘गुरुबानीचा खरा संदेश तुला समजला आहे, कन्हैया. उद्यापासून सगळ्या सनिकांच्या जखमांनाही मलम लावत जा.’

या आत्मकथनातील घटना विविध ठिकाणी घडतात. जालंधर, सहरानपूर, विशाखापट्टणम, नंगल, पठाणकोट, लुधियाना, जोधपूर, इत्यादी. प्रत्येक प्रकरणातील घटना जेथे घडतात त्या शहराचे नाव व साल यांचा वापर प्रकरणाच्या शीर्षकासाठी केला आहे; पण प्रकरणे सालांनुसार क्रमवार नाहीत, मागे-पुढे आहेत. अर्थात मनुष्य जेव्हा एकांतात विचार करत बसतो तेव्हा त्याच्या मनात कालानुक्रमाचे भान न राखता अशाच काहीशा अनियमित प्रकारे आठवणी दाटू शकतात. मात्र या आत्मकथनात या तंत्राचा वापर प्रमाणाबाहेर झाल्याचे जाणवते. एक प्रकरण विशेष उल्लेखनीय आहे. या प्रकरणात गुरमेहरऐवजी तिची आई वाचकांशी संवाद साधते. त्याचा आशय असा :

लष्करी युनिटकडून कॅप्टन मनदीप सिंग आघाडीवर लढताना शहीद झाल्याचे वृत्त कुटुंबीयांना टेलिफोनद्वारे कळवायचे आहे. फोन राजी घेते; परंतु तिला काहीही न सांगता मनदीपच्या वडिलांनाच ही दु:खद बातमी सांगण्याची लष्करी युनिटची इच्छा असते. मात्र ते स्नान करीत असतात. अखेर त्यांनाच फोनवर बोलावून हे दु:खद वृत्त दिले जाते, लष्कराच्या शिस्तमय पद्धतीनुसार! फोनवरचे बोलणे संपते. सगळ्या परिवारावर वज्राघात झालेला आहे आणि त्याच क्षणी लष्कराचे दोन अधिकारीही शोकग्रस्त परिवाराला प्रत्यक्ष भेटण्यासाठी घराच्या दरवाजावर येऊन पोहोचतात..

नेमक्या शब्दांत वर्णिलेला हा प्रसंग व गुरमेहरच्या आईचे आत्मचिंतन विलक्षण परिणामकारक झाले आहे. वास्तविक मनदीपला वेगळ्या ट्रेनिंग कोर्सला जाऊन आघाडीवरील डय़ुटीतून सूट घेणे शक्य असते; परंतु तसे न करता हा शूर शिपाई आघाडीवर लढणेच पसंत करतो. आपले कर्तव्य चोखपणे निभावतो व युद्धाचा बळी ठरतो. काश्मीर सीमेवरील ज्या ठिकाणी कॅप्टन मनदीपचे शेवटचे पोस्टिंग झाले होते त्या ठिकाणाला एके दिवशी सोळा वर्षीय गुरमेहर आपल्या आई-बहिणीसह भेट देते. आदल्याच रात्री श्रीनगरला असताना तिने लाडक्या पपांकरिता एक पत्र लिहून ठेवलेले असते. ते पत्र ती पपांच्या त्या अखेरच्या ठिकाणी जमिनीत पुरते. या आत्मकथनाच्या उपसंहारात ते पत्र समाविष्ट आहे.

आज गुरमेहर कौर विद्यार्थिदशेत असूनही ‘पोस्टकार्ड्स फॉर पीस’ या भेदभावाविरुद्ध कार्य करणाऱ्या संस्थेशी जोडलेली आहे. ‘सिटिझन्स फॉर पब्लिक लीडरशिप’ या उपक्रमाची ती सहसंस्थापक आहे. ‘टाइम’ मासिकाने २०१७ सालच्या ‘नेक्स्ट जनरेशन लीडर्स’च्या जागतिक यादीत गुरमेहरचा समावेश केला आहे. प्रस्तुत पुस्तक म्हणजे गुरमेहरच्या लेखनाचा आश्वासक आरंभ आहे. तिचा यापुढील लेखनप्रवास यथावकाश कळेलच!

‘स्मॉल अ‍ॅक्ट्स ऑफ फ्रीडम’

लेखक : गुरमेहर कौर

 प्रकाशक :  पेंग्विन रँडम हाऊस इंडिया प्रा. लि.

 पृष्ठे : १८८, किंमत : २९९ रुपये 

सुकुमार शिदोरे sukumarshidore@gmail.com

First Published on March 17, 2018 1:36 am

Web Title: regarding the autobiography of gurmehar kaur