03 June 2020

News Flash

कलेचा उभय जगांतील विलास

रेम्ब्रांच्या चित्रांचे एक प्रदर्शन अमेरिकेसोबतच मुंबईलाही अलीकडेच भरवण्यात आले होते

अवंती कुलकणी

सतराव्या शतकात आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे नेदरलँड्सची जी सर्वागीण भरभराट झाली, त्यात रेम्ब्रांसारखा अतुलनीय प्रज्ञेचा चित्रकार निपजला. युरोपेतर जगातील संस्कृतींचा रेम्ब्रांने घेतलेला सर्वात तपशीलवार परामर्श म्हणजे त्याने केलेली मुघल चित्राधारित रेखाटने. त्यातून भारतीय आणि डच या दोन्ही आमूलाग्र वेगळ्या कलासंस्कृतींचा संगम रेम्ब्रांने कसा साधला, याचा वेध घेणाऱ्या पुस्तकाविषयी..

र्रेम्ब्रां हार्मेन्सझोन फान राइन ऊर्फ रेम्ब्रां हे युरोपीय कलेच्या इतिहासातले एक अग्रगण्य नाव! रेम्ब्रांला डावलून युरोपीय आणि पर्यायाने जागतिक कलेचा विचार करताच येणार नाही. अभिजात युरोपीय कलेची मूलतत्त्वे अंगी बाणवून त्याने स्वत:ची एक वेगळी शैली तयार केली. चित्रांसोबत उत्कीर्ण शिल्पकलेतही त्याचे योगदान तितकेच मूलगामी आहे. स्वत:चे वेगळे वर्कशॉप असल्याने आणि अनेक शिष्यांना प्रशिक्षण दिल्याने त्याच्या शैलीचा प्रसार युरोपभर त्वरेने होण्यास मदत झाली. त्याच्या शैलीच्या अनेक पैलूंवरती- उदा. रेखाटन, रंगसंगती, चित्रविषय, आदींवर बरेच विश्लेषणही झालेले आहे. युरोपीय कलाविषयांसोबतच त्याने इ.स. १६५० च्या दशकात काही मुघल लघुचित्रांची नक्कलवजा रेखाटनेही केली, हे मात्र तुलनेने फार कुठे चर्चेस येत नाही. रेम्ब्रांविषयीच्या अभ्यासातील ही उणीव भरून काढलीय ती स्टेफनी श्रेडर, कॅथरीन ग्लीन, येल राइस आणि विलियम रॉबिन्सन या कला-इतिहासकारांच्या चमूने! त्यांनी संपादित केलेले ‘रेम्ब्रां अ‍ॅण्ड द इन्स्पिरेशन ऑफ इंडिया’ हे पुस्तक ही त्यांच्या याच दिशेतील प्रयत्नांची परिपक्व परिणती आहे. रेम्ब्रांच्या उर्वरित कलासंभारापेक्षा ही रेखाटने खूप वेगळी असल्याने त्यांचा अभ्यास स्वतंत्र परिप्रेक्ष्यातून करावा लागतो, असे लेखकांचे म्हणणे आहे. या दृष्टिकोनाचा फायदा पुस्तकात पदोपदी जाणवत राहतो. रेम्ब्रांच्या चित्रांचे एक प्रदर्शन अमेरिकेसोबतच मुंबईलाही अलीकडेच भरवण्यात आले होते, त्या पार्श्वभूमीवर त्यांचा अभ्यास करणे रोचक ठरेल.

पुस्तकातील एकूण चार शोधनिबंधांपैकी दोहोंत मुघलकालीन भारत, तत्कालीन नेदरलँड्स आणि एकूणच भारत व युरोपमधील कलात्मक देवाणघेवाणीची पार्श्वभूमी चर्चिली असून, उर्वरित दोहोंत रेम्ब्रांच्या कलेचे सखोल विवेचन आढळते. इ.स. १६५० पर्यंत भारतात पश्चिम युरोपीयांचा शिरकाव पुष्कळच खोलवर झाला होता. पोर्तुगीज आणि त्यानंतर हळूहळू इंग्रज व डच सत्तांनी भारतात अनेक ठिकाणी आपले बस्तान बसविले होते. तत्कालीन भारतातील सर्वात मोठी व्यापारी सत्ता होती डच (युनायटेड) ईस्ट इंडिया कंपनीची. तिच्यामार्फत कपडे, मसाले आदी अनेक भारतीय वस्तूंची निर्यात युरोपात नियमितपणे होत होती. परदेशी व्यापारातून आलेल्या समृद्धीमुळे नेदरलँड्समध्ये एका व्यापारी मध्यमवर्गाचाही उदय होत होता. या झपाटय़ाने वाढणाऱ्या आणि श्रीमंत होणाऱ्या मध्यमवर्गाच्या आर्थिक भुकेप्रमाणेच सांस्कृतिक भूकही मोठी होती. अजबखाना अर्थात अनेकविध वैचित्र्यपूर्ण गोष्टींचा संग्रह करणे हे तत्कालीन डच व्यापारी मध्यमवर्गात उत्तम अभिरुचीचे लक्षण मानले जात असे. या गोष्टी जितक्या विविध आणि वेगवेगळ्या ठिकाणांहून आणलेल्या असतील, तितके त्यांचे महत्त्व जास्त असे. यातच चित्रांचाही समावेश होता. अनेक डच चित्रकार या वर्गासाठी आपली कला जोपासत होते. रेम्ब्रांसारखा अष्टपैलू चित्रकारही त्याच भरभराटीच्या काळात असावा हा योगायोग खचितच नव्हे! मसाल्यांसोबतच भारतीय लघुचित्रेही तेव्हा नेदरलँड्समध्ये, विशेषत: अ‍ॅम्स्टरडॅममध्ये अनेकांच्या संग्रही असत. त्या चित्रांचा प्रभाव कैक युरोपीय आणि पर्यायाने डच चित्रकारांवर पडला. हा विषय पुस्तकात पुरेशा नेमकेपणे हाताळला आहे.

रेम्ब्रांचा अजबखाना

प्रस्तुत पुस्तकातील मुख्य वण्र्यविषय असलेली २३ मुघल चित्रांची रेखाटने करण्यामागील प्रेरणा ही त्या चित्रांचा एखादा ‘अल्बम’ असावा असे मानले जाते. खुद्द रेम्ब्रांकडे तत्कालीन अनेक डच उच्चवर्गीयांप्रमाणे अनेक पौर्वात्य वस्तूंचा मोठाच संग्रह होता. त्याच्या अजबखान्यात नुसती चित्रेच नसून चक्क भारतीय धनुष्यबाण, भाला आणि भारतीय स्त्री-पुरुषांचे नमुन्यादाखल काही कपडेही होते! या अनेक वस्तू सुरतेहून मिळवल्याचे त्यांच्या नोंदींवरून दिसतेच. त्यातच एक ‘सुरस आणि चमत्कारिक चित्रांचा अल्बम’देखील होता. तोच हा अल्बम असावा, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. प्रसिद्ध कलासंग्राहक आणि अ‍ॅम्स्टरडॅमचा महापौर निकोलास विट्सेनचा बाप कॉर्नेलिस विट्सेन, अब्राहम फान विल्मरडाँक्स आदींसारखे उच्चपदस्थ आणि डच ईस्ट इंडिया कंपनीतील अतिरथी व पौर्वात्य कलेचे मोठे भोक्ते रेम्ब्रांच्या संपर्कात असल्याने त्याला अशी चित्रे मिळवणे सोपे झाले. पुढे इ.स. १६५० च्या दशकात दिवाळखोरी जाहीर केल्याने रेम्ब्रांला हे सर्व विकावे लागले; त्यातच या अल्बमचीही वर्णी लागली असावी. हयातीतल्याप्रमाणेच पुढे मरणोत्तरही रेम्ब्रांची कीर्ती कायम राहिली, नव्हे वर्धिष्णू झाली. कलेचे अनेक भोक्ते युरोपभर रेम्ब्रांच्या चित्रांचा संग्रह करू लागले. त्यांपैकी इ.स. १७४७ मध्ये लंडनमध्ये झालेल्या एका लिलावात या रेखाटनांचा उल्लेख पहिल्यांदा येतो. या २३ रेखाटनांपैकी २१ वर रेम्ब्रांची सही आणि शिक्का असून उरलेल्या दोहोंवर नाही. त्यानंतरही अनेक स्थित्यंतरे होऊन ही सर्व चित्रे आज अमेरिकेतील लॉस अँजेलिसमधील गेटी म्युझियममध्ये आहेत. याखेरीज ऑस्ट्रियातील शोनब्रुन पॅलेससारख्या अन्य ठिकाणीही रेम्ब्रांकृत रेखाटने आणि त्यांवर उत्तरकालीन कलाकारांनी केलेले आपल्या कलेचे कलम दृष्टोत्पत्तीस येते.

रेम्ब्रां आणि मुघल चित्रे

रेम्ब्रांकृत रेखाटने गेटी म्युझियमसारख्या एका ठिकाणी उपलब्ध असली, तरी त्यांमागील प्रेरणा असलेली चित्रे एका जागी उपलब्ध नसल्याने ती शोधणे हे मुळात अफाट वेळखाऊ आणि किचकट काम होते. गेटी म्युझियमबरोबरच ब्रिटिश लायब्ररी, बिब्लिओथेक नॅशनाल, आर्थर सॅकलर गॅलरी, लुव्र, राइक्सम्युझियम, इत्यादी युरोप व अमेरिकेतील अनेक संस्थांमधील मुघल चित्रे पूर्ण धुंडाळून त्या रेखाटनांसोबत तुलना करण्याचे महत्कार्य या पुस्तकाच्या संपादकांनी केलेले आहे. पुस्तकाचा उत्तरार्ध त्याच आधारभूत चित्रांनी व्यापला आहे. एकेक छोटय़ा छोटय़ा मुद्दय़ासाठी प्रत्येक चित्रातील बारीक पैलू टिपण्याचे लेखकचतुष्टयाचे कसब खरेच वाखाणण्याजोगे आहे.

रेम्ब्रांने केलेल्या रेखाटनांमधील बारकावे उलगडून दाखवताना पुस्तकात एका महत्त्वाच्या पैलूकडे लक्ष वेधले आहे; ते म्हणजे- तत्कालीन भारतातून युरोपात ज्याप्रमाणे वस्तू आणल्या जात, त्याचप्रमाणे उलट दिशेनेही हा ओघ कायम होता. रेम्ब्रांच्या जन्माआधी (इ.स. १६०६) किमान २०-३० वर्षे अकबराच्या कारकीर्दीत जेसुईटपंथीय ख्रिश्चनांनी मुघल दरबारात प्रवेश मिळवून मुघलांना कैक युरोपीय छापील पुस्तके, तसबिरी, आदींचे नजराणे दिले होते. मुघल दरबारातील पहिला इंग्रज राजदूत थॉमस रो याच्या काळातही ही प्रक्रिया सुरूच राहिली. त्यामुळे कैक दरबारी चित्रकारांनी केलेल्या युरोपीय चित्रांच्या भारतीय नकलाही संपादकांच्या नजरेस आल्या असणे अशक्य नाही. रेम्ब्रांकृत मुघल रेखाटने हा त्याच प्रक्रियेचा दुसरा पैलू होय. युरोपीय कलाविश्वाच्या दृष्टिकोनातून त्याची रेखाटने महत्त्वाची आहेत, कारण रेम्ब्रांने केलेल्या नकलांपैकी बहुसंख्य चित्रे हीच असून, त्यांच्यासाठी स्वस्तातल्या युरोपीय कागदाऐवजी किमती जपानी ‘गम्पी’ नामक कागद वापरला आहे. त्यांचे महत्त्व अधोरेखित करण्याचाच हा एक प्रकार होता.

कलासंस्कृतींचा संगम

या रेखाटनांचे विषय प्रामुख्याने मुघल बादशहा आणि सरदार यांची चित्रे हा आहे. भारतीय आणि डच या दोन्ही आमूलाग्र वेगळ्या कलासंस्कृतींचा संगम रेम्ब्रांने कसा केला, हे पुस्तकात मोठय़ा खुबीने विशद केले आहे. तत्कालीन युरोपीय चित्रांत ‘पस्र्पेक्टिव्ह’ला आणि हुबेहूब चित्रणाला महत्त्व होते, तर भारतात ते तितके नव्हते. साधारणपणे युरोपीय चित्रांची ‘खोली’ जास्त असे, अर्थात मुख्य वण्र्यविषयाखेरीजही पार्श्वभूमी तपशीलवार चितारलेली असे; तर भारतीय चित्रांत त्यावर भर दिला जाईच असे नाही. भारतीय चित्रांत काही संकेत कटाक्षाने पाळले जात; उदा. व्यक्तिचित्रांमध्ये मुघल बादशहा असल्यास त्याच्या डोक्याभोवती सोनेरी वलय काढले जात असे. एकप्रकारे बादशहाच्या अलौकिक सामर्थ्यांकडे निर्देश करण्याचाच हा प्रकार होता. रेम्ब्रांने मूळ रंगीत चित्रांची रेखाटने करताना काही उल्लेखनीय बदल केले, ते म्हणजे मुळातल्यापेक्षा ‘लाइनवर्क’ थोडे अधिक मुक्त ठेवले. पार्श्वभूमीकरिता फिकट काळसर रंगाचा ‘वॉश’ देऊन, जरूर तिथे पगडी इत्यादींसाठी काही मोजके रंग वापरले. उदा. अश्वारूढ शाहजहान हातावर एक ससाणा घेऊन शिकारीला चालल्याच्या चित्रातील रेखाटनात त्याने शाहजहानची पगडी आणि दाढी यांकरिता सूचक रंग वापरले आहेत.

चेहऱ्यावरील हावभावांप्रमाणेच पौर्वात्य पोशाख आणि त्यातील बारकावे आपल्या रेखाटनात नीट चितारले जावेत, ही रेम्ब्रांची तळमळ या चित्रांतून स्पष्टच दिसून येते. विशेषत: चकदार जामा, पगडी आदींचे तपशीलवार चित्रण उठून दिसते. मुघल बादशहांच्या शिरस्त्राणाबद्दल एक रोचक गोष्ट म्हणजे, मुळातल्याप्रमाणे तो ते हुबेहूब रेखाटन न करता अंमळ उझबेकी-इराणी पद्धतीचे शिरस्त्राण चितारतो.

इतर काही चित्रांमध्ये- उदा. एकत्र बसून पुस्तकांच्या सान्निध्यात निवांत कॉफी आदीचा आस्वाद घेणाऱ्या चार मौलवींच्या चित्राचे रेखाटन करताना त्याने मुळात नसलेले झाड आणि सुरईही चितारली आहे! मुघली आणि दखनी उमरावांच्या पोशाखांतील फरकही त्याने रेखाटनांतून टिपला आहे. क्वचित कधी मूळ चित्रांमधील स्तब्ध भावाऐवजी गतिमान भाव चितारला आहे. या प्रत्येक सूक्ष्म बदलांमागील कारणे, त्यांचे एकूणच तत्कालीन युरोपीय कलाविश्वातील स्थान, इत्यादींची पुस्तकात सविस्तर चर्चा येते- ती मुळातूनच वाचण्यालायक आहे. कलेच्या इतिहासातील सूक्ष्म पैलू नवशिक्या वाचकांनाही कळेल अशा सुगम भाषेत इथे विवेचिले आहेत.

मुरक्क्यांचा प्रवास..

मुघलकालीन भारतीय कलेच्या देशांतर्गत आणि देशाबाहेरील प्रसारातील एक महत्त्वपूर्ण पैलू म्हणजे मुळात मुघलांचे या चित्रांबाबतचे धोरण हे त्यांचा प्रसार शक्य तितका व्हावा असेच होते. राजघराण्यासोबतच कैक सरदारांनीही काही चितारी पूर्णवेळ आपल्या पदरी ठेवले होते. मुघल चित्रांच्या अल्बमला ‘मुरक्का’ अशी संज्ञा असून त्याचा मुळात अर्थच ‘एकत्र जमवलेले’ असा आहे. कैक अल्बम पूर्णावस्थेत हस्तांतरित होत किंवा त्यांमधील चित्रे वेगळी केली जात. रेम्ब्रांकडील भारतीय चित्रे मुळात एकेकटी असून त्याने नंतर त्यांचा अल्बम केला की अख्खा अल्बमच त्याच्याकडे आहे/ कसा आला, हे प्रश्न आजमितीस अनुत्तरित आहेत. सुरुवातीला संशोधकांचे मत असे होते की, मुघल साम्राज्याच्या पडत्या काळात हे अल्बम इतस्तत: विखुरले. परंतु ही विखुरण्याची, पसरण्याची प्रक्रिया त्याच्या खूप आधीपासून चालू असल्याचे पुरावे आहेत. या प्रसारामुळे मूळ चित्रांच्या अनेक प्रतिकृती बनत. त्यामुळे रेम्ब्रांची प्रेरणा असलेली मुघल चित्रे मुळात नक्की कोणत्या अल्बममध्ये होती, हे ठरवणे अशक्यप्राय आहे.

१७ व्या शतकाचा पूर्वार्ध हा किमान उत्तरेतील मुघलशासित भारत आणि नेदरलँड्स या दोहोंसाठी भरभराटीचा काळ होता. दोन्हीकडील सौंदर्यशास्त्र परंपरेच्या जोखडात अडकून न घेता नवनवीन प्रयोग करण्यास अनुकूल होते. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे नेदरलँड्सची जी सर्वागीण भरभराट झाली, त्यात रेम्ब्रांसारखा अतुलनीय प्रज्ञेचा चित्रकार निपजला. युरोपेतर जगातील संस्कृतीचा त्याने घेतलेला सर्वात तपशीलवार परामर्श म्हणजे त्याने केलेली मुघल चित्राधारित रेखाटने. या चित्रांमधून त्याच्या प्रज्ञेची चुणूक जशी दिसते, तशीच भारतीय चित्रशैलीची अनेक उत्तमोत्तम वैशिष्टय़ेही दिसून येतात. रेम्ब्रांच्या भारतीय प्रेरणेचे काही अवशेष या रेखाटनांखेरीज काही चित्रांमध्येही दिसून येतात. हा कलेचा उभय जगांतील विलास हा जागतिक इतिहासाचा एक महत्त्वाचा ठेवा आहे. या पुस्तकाच्या संपादकांनी तो वाचकांना पचेल अशा सुबोध भाषेत मांडल्यामुळे त्याचे रसग्रहणही सोपे झाले आहे. दोन वेगळ्या संस्कृतींमधील संबंध हा तसाही मुळातच रोचक विषय. त्यातही रेम्ब्रांसारख्या महान चित्रकाराच्या कारकीर्दीतील हा दुर्लक्षित आणि बव्हंशी अज्ञात पैलू वाचकांसमोर आणल्याबद्दल या पुस्तककर्त्यांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत!

‘रेम्ब्रां अ‍ॅण्ड द इन्स्पिरेशन ऑफ इंडिया’

संपादन : स्टेफनी श्रेडर, कॅथरीन ग्लीन, येल राइस, विलियम रॉबिन्सन

प्रकाशक : गेटी पब्लिकेशन्स

पृष्ठे : १६०, किंमत : २,१४५ रुपये

avanti.3110@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 12:47 am

Web Title: rembrandt and the inspiration of india zws 70
Next Stories
1 इतिहासाचा गोष्टीरूप प्रवाह..
2 बुकबातमी : कोठडीतलं ‘फुलपाखरू’!
3 महत्त्वाकांक्षेच्या मार्गातील मर्यादा..
Just Now!
X