02 March 2021

News Flash

आंबेडकरांच्या संदर्भात गांधी..

अरुंधती रॉय यांनी या पुस्तकाला लिहिलेला परिचय त्या पुस्तकातील मांडणीची तशी काही ओळख करून देत नाही

सुरेश सावंत sawant.suresh@gmail.com

डॉ. आंबेडकरांच्या ‘अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट’ या पुस्तकाच्या २०१४ साली प्रकाशित आवृत्तीला अरुंधती रॉय यांनी लिहिलेल्या दीर्घ प्रस्तावनानिबंधाचे हे स्वतंत्र पुस्तक..  त्यातील महात्मा गांधींच्या विचार-भूमिकांची चिकित्सा स्वतंत्र नसून, डॉ. आंबेडकरांच्या संदर्भातच उरते.. 

‘द डॉक्टर अ‍ॅण्ड द सेंट’ हे पुस्तक म्हणजे, मूळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट’ या पुस्तकाच्या नवयान प्रकाशनाने २०१४ साली पुनप्र्रकाशित केलेल्या आवृत्तीला प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांनी लिहिलेला प्रदीर्घ परिचय. त्याचे हे स्वतंत्र पुस्तक पेंग्विन प्रकाशनसंस्थेने प्रसिद्ध केले आहे.

आर्य समाजाचा एक भाग असलेल्या ‘जातपात तोडक मंडळा’ने लाहोरला डॉ. आंबेडकरांना १९३६ साली त्यांच्या वार्षिक परिषदेत व्याख्यानासाठी निमंत्रित केले होते. व्याख्यानाच्या मसुद्यातील िहदू धर्मावर आघात करणारे काही उल्लेख गाळण्याची आयोजकांची विनंती बाबासाहेबांनी अमान्य केल्याने तो कार्यक्रमच रद्द करण्यात आला. हे न झालेले भाषण त्याच वर्षी- म्हणजे १९३६ साली ‘अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट’ या शीर्षकाने पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले. अपेक्षेप्रमाणे गदारोळ झाला. या पुस्तकावर प्रतिक्रिया देणारा लेख महात्मा गांधींनी लिहिला. गांधीजींचा हा लेख व त्याला उत्तर पुढच्या आवृत्तीत बाबासाहेबांनी समाविष्ट केले. तेव्हापासून आजपर्यंत या पुस्तकाच्या मूळ इंग्रजीत तसेच अनुवादित अनेक आवृत्त्या निघाल्या. हे पुस्तक बाबासाहेबांच्या जातिनिर्मूलनाच्या भूमिकेचा जाहीरनामा मानला जातो.

अरुंधती रॉय यांनी या पुस्तकाला लिहिलेला परिचय त्या पुस्तकातील मांडणीची तशी काही ओळख करून देत नाही. तो म. गांधी आणि डॉ. आंबेडकर यांच्या भूमिकांविषयीचा सविस्तर निबंध आहे. त्यातही डॉ. आंबेडकरांविषयी कमी आणि गांधीजींविषयी प्रामुख्याने लेखिका भाष्य करते. खरे म्हणजे, गांधीजींचे प्रतिमाभंजन करण्यासाठीचा हा सर्व खटाटोप आहे असे म्हणणे वस्तुस्थितीला धरून होईल. त्यासाठी गांधीजींच्या लेखनातील अनेक उतारे देत लेखिकेने हा खटाटोप सिद्ध केला आहे. अरुंधती रॉय त्यांच्या विविध भूमिकांमुळे बहुतेकदा वादाच्या घेऱ्यात राहिलेल्या आहेत. हे पुस्तक ‘परिचय’ म्हणून आधी आले, त्या वेळीही त्याने विवाद सुरू झाला. त्या वेळी रॉय यांनी- ‘हा परिचयच आहे हे बरे झाले, स्वतंत्र पुस्तक निघाले असते तर त्यावर बंदी आली असती,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. तथापि, आता पुस्तकच निघाले आहे. अशी काही बंदीची अवस्था येईल असे लेखिकेला बहुधा वाटत नसावे.

आपल्या मांडणीचा प्रारंभ करताना लेखिकेने- स्वतला जातीच्या प्रश्नाची तीव्रता कशी उशिरा कळली, हे नमूद करून वाचकांच्या जातजाणिवेला आव्हान दिले आहे. ती म्हणते- ‘मलाला युसूफजाईबद्दल तुम्ही ऐकले असेल, मात्र सुरेखा भोतमांगेबद्दल तुम्हाला काही ठाऊक नसेल, तर आंबेडकरांना जरूर वाचा.’

अतिरेक्यांशी प्राणांतिक झुंज देणारी मलाला जगात चर्चिली जाते. खैरलांजीतील सुरेखा भोतमांगे व तिच्या तीन तरुण मुलांना ज्या अमानुषपणे ठार केले जाते, त्याच्या चच्रेला त्या कुटुंबाचे दलितपण आडवे येते. आपल्या आतच एक अवरोध तयार होतो. त्यामुळे आपण या कुटुंबाच्या न्यायासाठी विविध मंचांवर आवाज उठवावा असे आपल्याला वाटत नाही. लेखिकेचा भारतीयांच्या जातजाणिवेच्या संकुचितपणावर हा आक्षेप आहे. मार्क्‍सच्या वर्गविश्लेषणाने जातीला दुर्लक्षिले. परंतु भारतीय डाव्या, पुरोगामी बुद्धिवंतांचे दुर्लक्ष ही सजग राजकीय कृती आहे, असा थेट आरोप लेखिका करते. पुढे एके ठिकाणी- ‘‘िहदू उजवे’ आणि ‘िहदू डावे’ यांत इतरांना वाटतो तसा खूप फरक दलित करत नाहीत,’ असाही अभिप्राय रॉय देतात.

परंतु मुख्य आरोपी आहेत ते महात्मा गांधी. त्यांना जगात प्रशंसिले जाते. अनेक मोठय़ा लोकांचे ते प्रेरणास्रोत आहेत. देशात तर ते राष्ट्रपिता म्हणून गणले जातात. त्यांच्या या महानतेच्या वलयामुळे दलितांवरील अन्यायाला, जातीच्या प्रश्नाला उतार पडायला अडथळा तयार झाला. डॉ. आंबेडकरांची मांडणी झाकोळली गेली. किंबहुना सवर्णामध्ये त्यांची प्रतिमा धर्मद्रोही झाली. गांधीजींचे महानतेचे वलय दूर सारून त्यांचे खरे स्वरूप समोर आले तर आंबेडकरांच्या भूमिकेला लोक नीट समजून घेतील, असा लेखिकेचा कयास आहे. त्यामुळेच पुस्तकाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अन्य विषय चर्चिले जात असतानाही गांधीजींच्या महानपणावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या घटना, उतारे येत राहतात. त्याच वेळी डॉ. आंबेडकरांची तुलनाही होत राहते.

जात ही अत्यंत अधपतित सामाजिक व्यवस्था आहे, असे डॉ. आंबेडकर मानतात. तर – ‘जातींमुळे गावांची अंतर्गत व्यवस्था चालते. ती राजकीय गरज भागवते. वंशपरंपरागत व्यवसाय हा जातीचा आत्मा आहे. रोज ब्राह्मण व शूद्र वरखाली करत राहण्याने गोंधळ माजेल..’ ही १९२१ सालची गांधीजींची भूमिका आहे. पुढे त्यांच्या काही भूमिका बदलल्या तरी त्यांनी कधीही चातुर्वण्र्याच्या विरोधात रोखठोक भूमिका घेतली नाही, असे लेखिकेचे म्हणणे आहे. गांधीजींच्या व्यक्तित्वाच्या विविध नैतिक आयामांचे वर्णन केले जाते. परंतु त्या सगळ्याचा जातीबाबतच्या त्यांच्या दृष्टिकोनाशी मेळ कसा घालायचा, असा प्रश्न तिला पडतो. ती म्हणते : ‘नैतिक सदाचाराच्या या ढाच्याचे काय करायचे, जो अत्यंत क्रूर, संस्थात्मक अन्यायाच्या पायावर आरामात उभा आहे?’

डॉ. आंबेडकरांची मुख्य ओळख घटनाकार म्हणून सीमित होते. त्यांचे राजकारण दुर्लक्षिले जाते. व्हाइसरॉयच्या मंत्रिमंडळात गेल्याने ते संधिसाधू, पहिल्या गोलमेज परिषदेला हजर राहिल्याने ब्रिटिशांचे हस्तक, स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीमुळे फुटपाडय़ा, जम्मू-काश्मीरच्या त्रिभाजनाच्या सूचनेमुळे राष्ट्रद्रोही अशा शेलक्या शिव्यांनी त्यांचा उद्धार होतो. मात्र, त्याच वेळी गांधीजींवर इतिहास मेहरबान होतो. ते ‘महात्मा’ बनतात. त्यांना देवत्व बहाल केले जाते. बराक ओबामा, नरेंद्र मोदी असोत की राहुल गांधी, सगळे त्यांच्यावर प्रेम करतात. गरीब करतात तसेच श्रीमंतही करतात, हे सांगून लेखिका पुढे कडवटपणे म्हणते : ‘ते आहेत यथास्थिती (जैसे थे)चे संत!’

लेखिकेने तिच्या विवेचनाचा मोठा भाग गांधीजींच्या दक्षिण आफ्रिकेतल्या लढय़ावर खर्च केला आहे. तिच्या मते, गांधीजींचा लढा तेथील भारतीय व स्थानिक काळ्या लोकांत भेद करणारा होता. १८९५ साली दर्बन डाक कार्यालयाची एक समस्या उभी राहिली. या कार्यालयाला दोन दरवाजे होते. एक काळ्यांना आणि दुसरा गोऱ्यांसाठी. ‘काफिर’ (म्हणजे स्थानिक काळे) वापरतात तो दरवाजा भारतीयांना वापरावा लागू नये म्हणून तिसऱ्या दरवाजाची मागणी गांधीजींनी केली. तेथील भारतीय लोकांतही व्यापारी, व्यावसायिक, िहदू-मुस्लीम उच्चवर्गीय हे प्रवासी भारतीय आणि ठेक्याने आणलेले मजूर असा फरक होता. मजुरांचे दुख अधिक मोठे होते. तरीही गांधीजी मात्र प्रवासी भारतीयांसाठी लढत होते. बोअर युद्धावेळी इंग्रजांना गांधीजींनी स्थानिक बंडखोरांच्या विरोधात साथ दिली. चार हजार झुलू मेले. हजारांना कैद झाली. लेखिका म्हणते, ‘युद्धाचा नियोजनकर्ता चर्चिल या िहसेने हलला; मात्र गांधीजींनी याबद्दल खेद व्यक्त केलेला नाही.’ पुढे गांधीजींना तुरुंगात जाण्याचा प्रसंग आला. डाक कार्यालयाचा एक दरवाजा सहन न होणाऱ्या गांधीजींना स्थानिक काळ्या ‘काफिर’ कैद्यांबरोबर ठेवण्यात आले. त्यावेळच्या प्रसंगाबद्दल गांधीजी लिहितात- ‘ते लोक त्रासदायक आहेत. अत्यंत घाणेरडे. अगदी जनावरांसारखे.’

इथे लेखिका मध्येच गांधीजींना समकालीन असणाऱ्या पंडिता रमाबाईंची थोरवी वर्णन करते. रमाबाई ब्राह्मण असून हिंदू धर्माचा त्यातील पितृसत्ताकता, जातीय आचरण यासाठी त्याग करतात व ख्रिस्ती धर्म स्वीकारतात. अमेरिकेत काळ्या गुलाम स्त्रीच्या भेटीचे त्यांनी केलेले आपुलकीचे वर्णन लेखिका नमूद करते. महात्मा फुलेंनी आपला ‘गुलामगिरी’ ग्रंथ निग्रो गुलामांना अर्पण करताना लिहिलेली अर्पणपत्रिका लेखिका इथे देते. यांच्या तुलनेत गांधीजी कुठे ते पाहा, असे लेखिका वाचकांना सुचवते.

‘गांधीजी द. आफ्रिकेतल्या गोऱ्यांशी मत्री साधू इच्छित होते. त्यांची सत्ता नष्ट करणे हा त्यांचा उद्देश नव्हता. ते तेथील भारतीय व्यापाऱ्यांचे हितसंबंध सांभाळत होते,’ असा लेखिकेचा निष्कर्ष आहे.

लेखिका म्हणते : ‘गांधीजी गरिबातल्या गरिबासारखे मला राहायचे आहे असे म्हणत. वास्तविक गरिबी म्हणजे केवळ पशाचा अभाव नसून गरिबी म्हणजे सत्ता नसणे होय. गांधीजींना गरिबीत राहण्यासाठी खूप सारी शेतजमीन आणि जैविक फळझाडे लागत होती. टॉलस्टॉय फार्ममधील कर्मकांड करताना त्यांनी कधीही भांडवलाच्या संचयाबद्दल आणि संपत्तीच्या विषम वाटणीबद्दल प्रश्न केला नाही.’

आफ्रिकेतले गांधीजी मग नायक कसे झाले, हा लेखिकेला गोंधळात टाकणारा प्रश्न वाटतो. त्याबद्दल ती म्हणते : ‘एक स्पष्टीकरण शक्य आहे. गांधीजींनी द. आफ्रिका सोडल्यावर भारतातील स्वातंत्र्यलढय़ातील एक चकाकता तारा म्हणून त्यांना फेरआयात केले गेले. एकाकी झालेल्या आणि वंशवादी राजवटीने सतावल्या गेलेल्या द. आफ्रिकेतल्या भारतीयांना गांधीजींमुळे मातृभूमीशी नाते जोडता आले.’

‘अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट’ हे पुस्तक जसे आंबेडकरांची भूमिका स्पष्ट करते, तसे १९०९ चे ‘हिंद स्वराज’ गांधीजींची भूमिका मांडते, हे सांगून लेखिका यात अस्पृश्यतेविषयी काहीही उल्लेख नाही, हे आवर्जून नमूद करते. लेखिका पुढे म्हणते- ‘हिंदू-मुस्लिमांनी स्वराज्यात परस्परांशी सहिष्णुतेने व सहभावाने वागावे हा त्यांनी दिलेला संदेश ‘भारतीयत्वा’च्या संकल्पनेसाठीची खरी, टिकाऊ आणि महत्त्वाची देणगी आहे.’ (गांधीजींविषयी बहुधा अगदी दुर्मीळ असलेल्या चांगल्या विधानांतले त्यांचे हे एक विधान आहे!)

भारतात परतल्यावरच्या गांधीजींच्या भूमिका व व्यवहार, त्यांतील विसंगती यावर लेखिकेने विस्तृतपणे लिहिले आहे. त्या सगळ्यांची इथे नोंद करणे शक्य नाही. या नोंदींमध्ये काही नोंदी अशाही आहेत, ज्यांतून होणारे अर्थसूचन त्यांचे कडवे विरोधकही मान्य करणार नाहीत. उदा. गांधीजींना भगवद्गीता प्रिय. तीच गीता नथुराम गोडसे व नारायण आपटेच्या हातात फासावर जाताना होती!

डॉ. आंबेडकरांचे जीवन आणि त्यांच्या लढय़ांबद्दल (विशेषत: महाड सत्याग्रहाबद्दल) या पुस्तकात तपशिलाने लिहिलेले आहे. पुणे करार व त्यातील डॉ. आंबेडकर-गांधीजींच्या भूमिका अर्थातच विस्ताराने आहेत. ‘डॉ. आंबेडकरसुद्धा आदिवासी प्रश्नावर अडखळले’ असा उल्लेख लेखिका करते. त्यांची समज वासाहतिक मिशनरी आणि उदारमतवादी विचारवंत यांच्याप्रमाणेच असलेली दिसते, असे लेखिकेचे निरीक्षण आहे. ती म्हणते : ‘त्यांच्या मताचा खूप गंभीर परिणाम आदिवासींवर झाला. १९५० साली भारतीय संविधानाने शासनाला आदिवासींच्या जन्मभूमीचे रक्षक-पालक बनवले. ब्रिटिश वासाहतिक धोरणालाच एक प्रकारे दुजोरा दिला गेला. त्यामुळे आदिवासींचे वनोपजांवरचे पारंपरिक अधिकार गेले. त्यांच्या जीवनशैलीलाच गुन्हेगार केले गेले.’

पुस्तकातील एक उल्लेख उद्बोधक आहे. फाळणीवेळी पाकिस्तानने नगरपालिकेच्या अस्पृश्य सफाई कामगारांना भारतात जाऊ देण्यास मनाई केली. हे काम कोण करणार, असा प्रश्न होता. आंबेडकरांनी नेहरूंना पत्र लिहून यातील काहींना भारतात आणण्यात यश मिळवले.

लेखिकेला भारतीय लोकशाही आणि संविधान यांबाबत प्रश्न आहेत. वर्णाश्रम धर्म लोकशाहीत कार्यरत आहे. तसेच ती जात आणि भांडवलशाहीचे मिश्रण आहे. आंबेडकरांच्या प्रतिमेत संविधान हातात दाखवतात. त्याऐवजी तिथे ‘अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट’ हे पुस्तक असणे अधिक उचित ठरेल, असे लेखिकेला वाटते. ‘‘संविधानवाद (कॉन्स्टिटय़ुशनॅलिझम)’ क्रांतीच्या आड येऊ शकतो. ‘दलित क्रांती’ अजून झालेली नाही. आपण तिची वाट पाहतो आहोत. तिच्याआधी दुसरी कोणतीही क्रांती भारतात संभवनीय नाही,’ असा लेखिकेचा निष्कर्ष आहे.

हे पुस्तक आता आले. पण हा संपूर्ण निबंध परिचय म्हणून चार वर्षे आधीच आला आहे. त्यामुळे सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे त्यावर बराच वादविवाद झालेला आहे. यात ऐतिहासिक दृष्टीचा व संदर्भात पाहण्याचा अभाव, गांधीजींचा वैचारिक विकासक्रम लक्षात न घेणे हे आरोप गांधीजींची बाजू मांडणाऱ्यांकडून झाले. तर आंबेडकरी वर्तुळातून आदिवासींविषयीच्या भूमिकेबाबत बाबासाहेबांवर टीका झाल्याबद्दलची अस्वस्थता व्यक्त झाली. या टीका, विवाद अजून होत राहतील. महान व्यक्तींच्या त्या त्या वेळच्या भूमिका, विधाने, संघर्ष यांचे सरसकट समर्थन करण्याची गरज नसते. त्यांचा तत्कालीन लोकजीवनावर झालेला परिणाम आणि आजच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी दिशा देण्याची त्यांची क्षमता मुख्यत: लक्षात घेऊन पुढे जायला हवे. हे भान असेल तर वस्तुस्थिती प्रामाणिक व निडरपणे मांडणारा लेखकही चिकित्सा करताना वस्तुस्थितीतल्या कोणत्या घटकांना महत्त्व द्यायचे, याचा विवेक नक्की करेल!

‘द डॉक्टर अ‍ॅण्ड द सेंट’

लेखिका : अरुंधती रॉय

प्रकाशक : पेंग्विन

पृष्ठे: १६५, किंमत : २९९ रुपये

लेखक विविध सामाजिक चळवळींशी संबंधित कार्यकर्ता आहेत. त्यांचा ईमेल : sawant.suresh@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2019 2:48 am

Web Title: review of book the doctor and the saint by arundhati roy zws 70
Next Stories
1 सेपियन्स आणि स्थितप्रज्ञ
2 बुकबातमी : बाविसावा धडा!
3 स्थलांतरितांचा जाहीरनामा.. 
Just Now!
X