समाजातल्या अंतर्विरोधांचे परिणाम संस्थांवर, कुटुंबांवर, व्यक्तींवर आणि व्यवस्थेवर होत राहतात, तोवर ‘माझा जन्म हा एक अपघात’ असं कुणी ना कुणी म्हणत राहणं अटळ आहे.. भारतीय समाजातले अंतर्विरोध तर कुटुंबाशिवाय फार कशाची फिकीर नसलेल्यांचेही आयुष्यक्रम बदलून टाकतात.. संघर्ष करावाच लागतो, पण त्यात ‘स्व-कल्पना’च पालटून जाते..
एका बहुचर्चित पुस्तकाची ही निराळी दखल, त्यातल्या दुर्लक्षित प्रकरणांवर भर देणारी!

‘हे मानवी हक्कवाले’ म्हणून ज्यांचा सहसा हिणवणीच्या सुरातच उल्लेख केला जातो, अशांपैकी एक म्हणजे हर्ष मँडर. भारतीय प्रशासकीय सेवेतली नोकरी सोडून २००२ मध्ये ते बिगरसरकारी किंवा ‘स्वयंसेवी’ संस्थांच्या विश्वात आले; पण संस्थाचालक म्हणून नव्हे, तर पत्रकार-लेखक म्हणून त्यांची ओळख अधिक सुस्थिर आहे. ते माणसांकडे पाहातात, माणसांबद्दलच्या लिखाणातून व्यवस्थेवर भाष्य करतात. ‘फॅटल अ‍ॅक्सिडेंट्स ऑफ बर्थ’ हे त्यांचं नवं पुस्तक २०१६ च्या नोव्हेंबरपासून मिळू लागलं होतं, त्याची चर्चा मात्र जानेवारी २०१७ पासून होऊ लागली, ती आजही सुरू आहे. ऊनातील दलितांना गोरक्षकांनी विनाकारण अमानुष मारहाण केल्याच्या घटनेची वर्षपूर्ती होत असताना ‘फ्रॉम गोध्रा टु ऊना’ हा या पुस्तकातला लेख पुन्हा कुणा वृत्त-संकेतस्थळानं प्रकाशित केला  किंवा दोन महिन्यांपूर्वीपर्यंत या पुस्तकाची इंग्रजी परीक्षणं येत राहिली.. पण त्या सर्वाचा भर ऊना, रोहित वेमुला, इशरत जहाँ, किंवा दिल्ली (‘शिखांचे काँग्रेसी शिरकाण’ म्हणून ओळखली जाणारी शीखविरोधी दंगल) अथवा मुजफ्फरपूर (लोकसभा निवडणूकपूर्व दंगल) यांविषयीच्या प्रकरणांवर होता. त्या बहुचर्चित घटनांच्या आणि त्या घटनांनी पोळलेल्या माणसांच्या पलीकडेही हर्ष मँडर यांची दृष्टी जाते, ते लेख वाचल्यास हा लेखक काय सांगतो आहे आणि कसं सांगतो आहे, हे अधिक कळेल!

ही प्रकरणं साध्यासुध्या आणि ‘परिस्थितीनं पोळलेल्या’ माणसांबद्दल आहेत. ‘इन्साइड अ बेगर्स होम’ या प्रकरणातला मरिअप्पन हा लहानपणीच पोलिओ झाल्यामुळे अपंग आहे. तो लेखकाला भेटला भिकाऱ्यांना डांबून ठेवणाऱ्या एका अभिक्षण-गृहात. इथं तो कसा आला? किशोरवयात असताना चहाच्या ठेल्यावर काम करून मिळणाऱ्या रोजंदारीचे पैसे ‘घरी न देता उडवलेस,’ असा आरोप आईनं केल्यामुळे स्वाभिमान दुखावला जाऊन आईशी कडाक्याचं भांडण करणारा, अखेर त्या रात्री घर सोडून रेल्वे स्थानकावर झोपणारा आणि तिथं ‘भिकारी’ म्हणून पकडला गेलेला मरिअप्पन कोठडीतून सुटून पुन्हा कामावर जाऊन ‘आजारी होतो’ असं सांगून काम तर करू लागला, पण घरी न जाण्याच्या हट्टापायी पुन्हा स्टेशनवरच झोपू लागला आणि पुन्हा पकडला गेला. मग पोलिसांनीच त्याला ‘मदुरैला जा’ सांगितलं. गाडीत भेटलेल्या एका भिकाऱ्यानं त्याला, ‘अपंग आहेस, चांगले पैसे मिळतील..’ असा भिकेचा गुरुमंत्र दिला आणि तेव्हापासून मरिअप्पननं काम कधीच केलं नाही. पलानी, वेलंकनी, रामेश्वरम अशा विविध ठिकाणी तो ‘चांगल्या संधीच्या शोधात’ फिरत राहिला, पण रामेश्वरम इथं पकडला जाऊन वर्षभराची ‘शिक्षा’ त्याला झाली. चेन्नईच्या त्या अभिक्षण-गृहात वॉर्ड होते, पण १९५४ सालच्या त्या इमारतीची पडझड इतकी झाली आहे, की ६६ हून अधिक जण एकाच हॉलमध्ये (एकाच वॉर्डात) राहतात. खाद्य-वाटपाची रांग दिवसातून तीनदा, प्रत्येकी पंधरा-वीस मिनिटांपुरती लागते तेवढाच वेळ या हॉलमध्ये कोंडलेल्या अवस्थेतून हे सारे जण बाहेर येतात. अशा अवस्थेत दिवस काढावे लागल्यामुळे असेल, पण मरिअप्पन सांगतो की, तो यापुढे भीक मागणार नाही.. पुढे तोच म्हणतो- ‘पण मला काम मिळेलच याची खात्री नाही.. पोलीस पकडणारच नाहीत, याचीही नाही!’

शहनाज ही माजी सेक्सवर्कर, आपल्या ‘सेरेब्रल पाल्सी’ग्रस्त मुलासाठी जगते आहे. ती या धंद्यात आली कशी याची कहाणी अनेक वळणांची आहे. आई, शहनाज आणि तीन भाऊ असे चेन्नईच्या गरीबवस्तीत राहात. वडील कधीकधी येत. शहनाजची आई ही तिच्या वडिलांची दुसरी बायको की ठेवलेली बाई, हे शहनाजला आजही माहीत नाही. आई पाणी भरून, पाच रुपये एक कॅन या दरानं विकून पैसा कमवे. वडलांकडून छदामही मिळत नसे. शहनाजलाही शाळा सोडून लहानपणापासून, इतरांकडे घरकामं करावी लागली. ‘शांती’ या नावानं ती ही कामं करत असे.. का? तर मालकवर्गानं आपल्यावर मुसलमान म्हणून संशय घेऊ नये. शहनाज/ शांती मोठी होत असताना वडील दारू पिऊन यायचे. आईनं त्यांचं येणं बंद केलं. तो अध्याय संपलाच. पण तेव्हाच, आई जास्त वेळ बाहेर राहाते आताशा, हे शहनाजला कळू लागलं. शहनाजला लग्नानंतर, नवऱ्याकडून कळलं की आई ‘धंदा’ करत होती! हा नवरा म्हणजे त्याच झोपडपट्टीतला एक मुलगा. नव्हाळीच्या वयातल्या शहनाजला त्यानं मागणी घातली. लग्न त्याच्या घरच्यांना अमान्य, म्हणून तोच शहनाजच्या माहेरी राहू लागला. खजुराच्या धंद्यासाठी भांडवल हवं, म्हणून त्याचा डोळा सासूच्या पैशावर होता. ते मिळत नाहीत म्हणून आधी तिला घर सोडायला लावून, हे दोघं आणखी खबदाडात राहू लागले. मग हिलाच ‘धंदा कर आईसारखा.. मला पैसे हवेत’ असं त्यानं सुनावलं, तेव्हा शहनाज त्याला सोडून माहेरी आली. कालांतरानं आईने, तिच्याच एका ‘गिऱ्हाईका’शी शहनाजचा निकाह लावण्याचं ठरवलं. त्यानं तिच्यासाठी खोलीही घेतली, पण त्याच्या पहिल्या पत्नीनं आकांडतांडव केल्यामुळे, रीतसर निकाह न करताच त्याच्यापासून तिला दोन मुलंही झाली. त्यापैकी दुसरा सलीम. त्याची वाढ नेहमीसारखी का नाही, म्हणून शहनाजची घालमेल, डॉक्टरी चाचण्यांसाठी वाढता खर्च.. आणि नेमका याच काळात या मुलांचा बाप फिरकेनासा. शहनाजच्या या दुसऱ्या अनौपचारिक पतीनं, पुन्हा तिच्या आईशीच घरोबा केला. अखेर शहनाज एका गारमेंट फॅक्टरीत लागली, तिथल्या काही मुलींच्या नादानं तिनं ‘धंदा’ही सुरू केला. तिच्या ‘मॅडम’नं तिला त्याचसाठी गोव्यालाही पाठवलं आणि तिथं केवळ पैशांसाठी स्वत:वर भरपूर अतिप्रसंग निमूट सहन करून, या अशा पैशांतून शहनाजनं घरच्या चारही (तीन भाऊ आणि मोठा मुलगा सादिक) पुरुषांचे खर्च भागवले. ‘धाकटय़ानंच जगण्याचं बळ दिलं. त्याचं अलीकडेच एका हिंदू मुलीशी लग्नही लावून दिलं.. ती एपिलेप्सीग्रस्त आहे,’ असं शहनाज सांगते. या एका कहाणीतून ‘मुसलमानांना चारचार बायका’ या कल्पनेच्या पलीकडची गरिबी, अशिक्षितता वाचकाला स्वच्छ दिसू लागते.

पहिल्याच प्रकरणातली नसीबबहन मोहम्मद शेख (३१ वर्षे) २ मार्च २००२ रोजी तिच्या कुटुंबावर हल्ला झाला. बलात्कार, जिवंत जाळणे यांसारखे प्रकार झाले. ती बेशुद्ध पडली आणि शुद्धीवर आली तेव्हा ती एका स्त्रीरोग व प्रसूती रुग्णालयात होती, असं ती सांगते. हसमुख माछी या वयोवृद्ध डॉक्टरांनी २० दिवस आश्रय दिला. काम करून पैसे मिळवणं गरजेचं असल्यानं नवरा गेल्यानंतरचा ४० दिवसांचा शोक-काळ (इद्दत) माहेरीच राहून पाळणं हे तिनं नाकारलं. या निर्णयात भावानंही साथ दिली, त्यापायी या भावंडांनी मौलानांचा विरोध पत्करला. पुढे हे मौलाना खंदे नसीबविरोधक झाले. छप्परच नसल्यानं भावाच्या घरी ती काही दिवस राहिली, पण भावजयीनं डॉक्टर माछी यांच्यावरून नसीबवर संशय घेतल्यानं नसीब तिथूनही निघाली. गचाळ निर्वासित छावणीत राहताना तिनं महिलांना एकत्र आणलं, स्वयंरोजगार शोधताना तिची गाठ ‘अमन बिरादरी’ या (लेखकाचाही सहभाग असलेल्या) स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांशी झाली आणि शांतता-कार्यकर्ती म्हणून नसीबदेखील सहा खेडय़ांत स्वतंत्रपणे काम करू लागली; पण पुढे, एका पुरुष सहकाऱ्यानं आपल्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप तिनं केला आणि तेव्हा, या संस्थेच्या कार्यकर्त्यांत दोन तट पडले- कारण काही जणांना ती कांगावा करते आहे आणि संबंधित पुरुष निदरेष आहे असं वाटत होतं. आजही नसीबचं काम गोध्रा परिसरात सुरू आहे, तर तो सहकारी अहमदाबाद इथं उत्तम कार्य करतो आहे.

यातली नसीबबहन टोकाची स्वाभिमानी असावी, शहनाज ही भांबावलेपणातून ठामपणाकडे वाटचाल करताना नैतिक दडपणं वागवणारी नसावी, मरिअप्पन अद्याप अस्थिरच असावा, एवढी अनुमानं कुणालाही काढता येतात; पण मँडर चुकूनही तसं लिहीत नाहीत. ते फक्त ‘त्या’ माणसांचं म्हणणं मांडतात. वाचकांना थोडेफार संदर्भ देतात. त्यामुळे हे लेखन पत्रकारितेचे गुण असलेलं. शहनाज/नसीबबहनच्या ‘कहाण्यां’तून वाचकाच्या मुस्लीम स्त्रीविषयीच्या कल्पना थोडय़ाफार बदलल्या, तर बरंच; पण अनेकदा गरिबांच्या जीवनसंघर्षांचं स्वरूप हे व्यवस्थेशी संघर्ष असं नसतं, तो आपल्याच माणसांशी किंवा ‘स्व-कल्पने’शी संघर्ष असतो, हे या तीन (आणि आणखीही काही) प्रकरणांतून अधोरेखित होतं. समाजात अंतर्विरोध जोवर आहेत, तोवर अशा संघर्षांत अडकवणारे ‘जन्माचे  अपघात’ होतच राहणार, हेही दिसू लागतं.

फॅटल अ‍ॅक्सिडेंट्स ऑफ बर्थ

लेखक : हर्ष मँडर

प्रकाशक : स्पीकिंग टायगर

पृष्ठे : २०३, किंमत : ४९९ रुपये

अभिजीत ताम्हणे abhijit.tamhane@expressindia.com