प्रेमचंद, बाबूराव बागूल, बिभुतिभूषण बंदोपाध्याय, सआदत हसन मंटो, कमला दास, कमलेश्वर, क्रिषन चंदर, नबेंदू घोष, सिद्दीक आलम, इंदिरा गोस्वामी,
अमृता प्रीतम.. अशा विविध काळांतल्या, विविध भाषांतल्या २१ लेखकांच्या या कथांना जोडणारं सूत्र म्हणजे त्या साऱ्या कथा देहविक्रयाच्या व्यवसायात ढकलल्या गेलेल्या स्त्रियांची वेदना मांडणाऱ्या आहेत. ‘काही स्त्रिया आपणहूनही हा व्यवसाय करतात’ या आरोपाचा समाचारही संपादिकेनं प्रस्तावनेत घेतलेला आहे..
हे म्हणजे काहीसं अल्बर्ट आइनस्टाइनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतासारखं (थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी) आहे. संदर्भचौकट (फ्रेम ऑफ रेफरन्स) बदलली, की सगळं चित्र आणि त्याचे आकलन बदलतं. मूळ जैविक कृती तीच, पण चौकटीच्या एका बाजूला तिला पावित्र्य, सौभाग्य आणि समाजमान्यतेचे कोंदण आहे आणि चौकट बदलली की तोच व्यभिचार ठरतो, सर्वात नीच कृती ठरते आणि समाजाकडून छी-थू केली जाते. एका चौकटीत पतिव्रता, देवी असते आणि दुसऱ्या चौकटीत वारांगना, वेश्या असते. तशी ही व्यवस्था सर्व संस्कृती (सिव्हिलायझेशन्स या अर्थाने) आणि काळांत अस्तित्वात होती. इतकी की त्याला जगातील सर्वात जुना व्यवसाय म्हटले जाते (त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो तो हेरगिरीचा). पण तो व्यवसाय असूच शकत नाही. ती एक स्त्रीला दुय्यम दर्जा देऊन, तिच्या अगतिकतेचा फायदा घेऊन, पिळवणूक-शोषण करणारी अन्यायकारक व्यवस्था असते. ती पुरुषी वर्चस्वाने कायम राखलेली असते. कोणत्याही स्त्रीला आपणहून या पहिल्या चौकटीतून दुसऱ्या चौकटीत यावेसे वाटत नाही. अखेरचा पर्याय म्हणूनच नाइलाजाने तिला हा मार्ग पत्करावा लागतो, अशी भूमिका रुचिरा गुप्ता यांनी संपादित केलेल्या ‘रिव्हर ऑफ फ्लेश अँड अदर स्टोरीज – द प्रॉस्टिटय़ुटेड वुमन इन इंडियन शॉर्ट फिक्शन’ या पुस्तकातून प्रभावीपणे मांडली आहे. भारतातील १२ प्रादेशिक भाषांमधील लेखकांच्या वेश्यांसंबंधी २१ कथांचा इंग्रजी अनुवाद या पुस्तकात आहे. त्यात बिभुतिभूषण बंदोपाध्याय, मुन्शी प्रेमचंद, बाबूराव बागूल, इस्मत चुगतई, कुर्रतुलऐन हैदर, सआदत हसन मंटो, जे. पी. दास, कमला दास, कमलेश्वर, क्रिषन चंदर, नबेंदू घोष, सिद्दीक आलम, इंदिरा गोस्वामी, अमृता प्रीतम यांसारख्या प्रख्यात साहित्यिकांच्या कथांचा समावेश आहे.
याकामी रुचिरा गुप्ता यांचा पत्रकारिता आणि समाजकार्याचा अनुभव खूपच उपयोगी ठरला आहे. गुप्ता पूर्वाश्रमीच्या पत्रकार. ‘द टेलिग्राफ’, ‘द संडे ऑब्झर्वर’, ‘बिझनेस इंडिया’ नियतकालिक आणि बीबीसी (ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन) यांसारख्या ख्यातनाम संस्थांसाठी काम केलेले. नेपाळमधून भारतात वेश्या व्यवसायासाठी आणल्या जाणाऱ्या मुलींसंबंधी त्यांनी तयार केलेल्या ‘द सेलिंग ऑफ इनोसंट्स’ या माहितीपटाला १९९६ साली उत्कृष्ट शोधपत्रकारितेचा एमी पुरस्कार मिळाला होता. पुढे त्यांनी ‘अपने आप वुमेन वर्ल्डवाइड’ ही स्वयंसेवी संस्था स्थापन करून वेश्या व्यवसायात अडकलेल्या २०,००० हून अधिक मुलींना मदतीचा हात दिला. ‘अ‍ॅज इफ वुमेन मॅटर’ या पुस्तकरूपात त्यांनी ग्लोरिया स्टिनेम यांनी लिहिलेल्या अनेक निबंधांचे संकलन आणि संपादन केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) ऑफिस फॉर ड्रग्ज अँड क्राइमसाठी त्यांनी मानवी व्यापारासंबंधी मॅन्युअल्स तयार केली आहेत. गुप्ता सध्या अमेरिकेतील न्यूयॉर्क विद्यापीठात प्राध्यापिका आहेत. त्यांना २००९ साली क्लिंटन ग्लोबल सिटिझन पुरस्कार आणि २०१२ साली सेरा बंगाली पुरस्कार मिळाला आहे.
साधारण पाच वर्षांपूर्वी त्यांची मैत्रीण रक्षंदा जलील यांच्याशी गप्पांच्या ओघात या पुस्तकाचा विषय सुचला, असे गुप्ता प्रस्तावनेत म्हणतात. कामानिमित्त त्यांचा वेश्या व्यवसायाच्या अनेक पैलूंशी संबंध आला. वेश्या व्यवसाय हे केवळ महिलांच्या बाबतीतील असमानतेचे लक्षण नसून त्याने महिलांच्या असमानतेत भरच पडत आहे, हा मुद्दा त्या लोकांना पटवून देऊ इच्छित होत्या. त्यात एक बाब त्यांना जाणवली. अनेकदा असे म्हटले जाते की, काही मुली किंवा महिला स्वेच्छेने वेश्या व्यवसायात येतात. पुरुषप्रधान समाजव्यवस्थेपासून स्वातंत्र्य मिळवण्याची त्यामागे भावना असते. ‘हल्ली कॉलेजच्या काही मुली आपल्या चैनीसाठी, मोबाइल, ब्रँडेड कपडे, गॅजेट्स खरेदी करण्यासाठी हौस म्हणून ‘अर्धवेळ’ वेश्या व्यवसाय करतात’ अशी ऐकीव उदाहरणेही दिली जातात. गरिबी, जिवाचं रान करायला लावणारी मेहनतीची कामे, विवाह संस्थेमधील जाच या सगळ्यांपासून वाचण्यासाठी काही जणी हा पर्याय आपखुशीने निवडतात, पण गुप्ता हा युक्तिवाद साफ नाकारतात. कामानिमित्त त्यांना सामोरे आलेले तथ्य याच्या अगदी विरोधी होते. महिलांच्या नाइलाजाचा पद्धतशीर फायदा घेऊन त्यांना या कामात आणणारे दलाल, प्रतिकार मोडून काढून, आत्मसन्मान चिरडून धंद्याला उभे राहायला भाग पाडणारे निर्दय गुंड, त्यांच्या जिवावर वारेमाप पैसा कमवून गबर होणारे कोठय़ांचे मालक आणि कोठेवाल्या मालकिणी, मुलींना सतत कर्जात, गरजेत ठेवण्याची खुबी, सतत नव्या आणि तरुण पाखरांच्या शोधात असलेली वखवखलेली गिऱ्हाईके आणि एकंदरच त्यांच्या शरीरांचा औद्योगिक पातळीवर वापर करून चावून चोथा झाल्यावर फेकून देणारी अमानुष व्यवस्था, हे सारे भयाण वास्तव त्यांच्यापुढे प्रकटले. स्त्रीच्या या सार्वकालिक वेदनेला अनेक साहित्यिकांनी आपल्या कलाकृतींतून अजरामर करून ठेवले आहे. अशा निवडक भारतीय कथांचे इंग्रजीत भाषांतर करून संग्रह करण्याची कल्पना पुढे आली आणि हे पुस्तक साकारले. म्हणूनच पुस्तकाच्या उपशीर्षकात ‘प्रॉस्टिटय़ुटेड’ असा शब्द वापरला आहे. त्यातून या व्यवस्थेतील पुरुषांची भूमिका अधोरेखित करायची आहे.
प्रस्तावनेत गुप्ता यांनी एक शब्द विविध अर्थानी वापरला आहे, तो या संदर्भात महत्त्वाचा आहे – एजन्सी. ‘‘एजन्सी’ (आपणहून घेतलेला निर्णय) या शब्दाला मी कायम विरोध केला.’ ‘त्यांच्या या जगण्यात मला ‘एजन्सी’ (कर्तेपणा, निर्णयक्षमता) अजिबात जाणवली नाही’ ‘एवंच, जोवर पुरुषजातीकडे शक्ती आणि सत्तालाभ आहेत, तोवर माझे तमाम मित्र स्त्रीजातीला शोषणाच्या सखोल व्यवस्थेतच असणाऱ्या ‘एजन्सी’त (निर्णयाभिमुखतेत) समाधान मानायला लावणार’ ‘या साऱ्या कथा ‘एजन्सी’च्या मर्यादा दाखवितात. स्त्रिया सत्ताशक्तीची बरोबरी करण्याचा प्रयत्न म्हणून त्यांची एकमेव ‘एजन्सी’ (इच्छाशक्ती) पणाला लावतात- स्वतला आणि स्वतसारख्यांना संपवून टाकण्याची शक्ती’ येथे एजन्सी या शब्दाचा वापर समाजशास्त्र आणि तत्त्वज्ञानात ज्या प्रकारे होतो, त्या अर्थाने करण्यात आला आहे.
या कथा देशाच्या सर्व प्रांतांसह फाळणीपूर्व अखंड भारतातीलही आहेत. संपूर्ण भारतीय उपखंड व्यापणाऱ्या या कथा आहेत. तसेच १२ भाषांतील लेखकांच्या आहेत. विविध जातीधर्माच्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून अगदी अलीकडच्या काळातील आहेत. इतक्या व्यापक पडद्यावर एक सूत्र समान राहिले आहे – असमानता आणि अगतिकतेतून वेश्या व्यवसायात ढकलल्या जाणाऱ्या स्त्रिया, त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांची जिवापाड धडपड, जगताना, तग धरून राहताना त्यांची अमानवी अवस्था आणि या सगळ्या नरकयातना भोगूनही त्यांनी दाखवलेले असीम धैर्य.
देहव्यापार करणाऱ्या स्त्रीची विविध रूपे या कथांतून सामोरी येतात. कमला दास यांच्या ‘अ डॉल फॉर द चाइल्ड प्रॉस्टिटय़ूट’ कथेतून खेळण्याच्या निरागस वयात या कामात आलेल्या आणि एका जून, राकट इन्स्पेक्टर गिऱ्हाईकाकडेही परदेशी बाहुलीच्या मिषाने जाणारी रुक्मणी ही मुलगी दिसते. अखेर तिच्या निरागसपणाने त्याचीही दृष्टी बदलते. त्याच कथेत सुंदर पण तरुण प्रियकराबरोबर संसार थाटण्याच्या अपेक्षेने पळून गेलेली आणि अखेर भ्रमनिरास होऊन परतलेली मीरा भेटते. निरंजन यांच्या ‘द लास्ट कस्टमर’ या कथेतून भुकेपायी शरीर विकायला लागलेली मुलगी आणि मरणाने भुकेपासून मुक्ती दिल्यानंतरही देहाचे लचके तोडण्यास सरसावलेली गिधाडे पाहून डोळे पाणावून जातात.
प्रेमचंद यांच्या ‘मर्डर ऑफ ऑनर’ कथेतील नायिका नवऱ्याने ठेवलेल्या बाईकडून झालेल्या अपमानाचा सूड उगवण्यास बाजारात जाऊन बसते, तर मंटो यांच्या ‘द हंड्रेड- कँडल-पॉवर बल्ब’ कथेची निनावी नायिका अनेक दिवस धड झोपूही न देता कामावर जुंपणाऱ्या दलालाचा डोक्यात वीट घालून खून करते. अशा प्रकारच्या विद्रोही, हिंसक नायिका हे मंटो यांच्या कथांचे वैशिष्टय़ मानले जाते. बिभुतिभूषण बंदोपाध्याय यांच्या ‘हिंग कोचुरी’ कथेत शेजारच्या गल्लीतून वेश्यांच्या गल्लीत जाऊन एका वेश्येकडून हिंग कचोरी खाणारा लहानगा ब्राह्मण मुलगा आहे आणि अनेक वर्षांनी तो मोठा झाल्यावर भेटल्यानंतर त्याच प्रेमाने त्याला हिंग कचोरी खिलवणारी, आता वयपरत्वे काम सोडलेली वेश्या आहे. ‘आपण खालच्या जातीतल्या- ब्राह्मणाला खाऊपिऊ घालणे हे आपल्यासाठी पापच’ अशा जातिमूलक कल्पना दृढ असलेल्या काळात घडणारी ही कथा, माणुसकीला थेट सामोरी जाते.
पण मग माझी पुरुषी, ‘पत्रकारी’, छिद्रान्वेषी वृत्ती म्हणा हवं तर, जागी झाली आणि वाटलं, छय़ा, छय़ा. हे फारच फेमिनिस्ट, एकांगी होतंय. कोणी तरी हौसेखातर येतंच असेल की. पैशाला हपापलेली, चैनीला चटावलेली एखादी तरी ‘आगाऊ पोरगी’ सापडेलच की, पण नाही. पुस्तकाने निराशाच केली या बाबतीत. आता जन्माचं वाटोळं, मातेरं झालंच आहे ना, मग निदान कमवून तरी घ्या. ही बेफिकीर, बेदरकार आणि वास्तववादी भूमिका अंगी बाणवतही असेल, पण ते झालं नंतरचं. मुळात या व्यवस्थेत येणं हे अन्याय्य पद्धतीनेच होत असलं पाहिजे, हे पटलं आणि त्यातच पुस्तकाचं यश आहे.
आणखी एक गोष्ट. हे सगळं कथन वर्षांनुर्वष आपल्या भोवताली होतंच. ते आता फक्त निवडक संकलन करून आणि इंग्रजीत भाषांतर करून आपल्यापुढे येत आहे. अनेकदा भाषांतरात मूळ लेखनाचा आत्मा, पोत किंवा गंमत हरवून जाते, पण इथे तसे होत नाही. मूळ कथांचे इंग्रजी रूपांतरही खूपच चांगले झाले आहे. बाबूराव बागूल यांच्या कथेचा शांता गोखले यांनी केलेला अनुवाद, प्रेमचंद यांच्या कथेचे अनिता संकारिया यांनी केले भाषांतर, बिभुतिभूषण बंदोपाध्यायांच्या कथेचा अरुनवा सिन्हा यांनी केलेला तर्जुमा, मंटोंच्या कथेचे रक्षंदा जलील यांनी केले भाषांतर सुंदर आहे आणि अन्य सर्वच कथा इंग्रजी रूपात तितक्याच प्रभावीपणे उतरल्या आहेत. हे या पुस्तकाचे मोठे बलस्थान आहे. भारतीय साहित्याची संपन्नता यानिमित्ताने जागतिक व्यासपीठावर मांडली गेली आहे.
स्त्री आणि समाज यांच्याबद्दलचे १२ भाषांतले, विविध काळांतले दृष्टिकोन मांडणाऱ्या या इंग्रजी अनुवादित कथा वाचल्यानंतर हे सगळे लेखक मुळातून आणि समग्र वाचून काढावेसे वाटतात.. अगदी ‘मी काही कथाकादंबऱ्या वाचत नाही’ असा पवित्रा घेणारे (माझ्यासह) असतील, त्यांनाही हेच वाटेल.. यातच पुस्तकाचे वेगळेपण सामावले आहे.
ज्याचं जळतं त्याला कळतं म्हणतात. स्त्रीच्या वेदना अशा करुण पद्धतीने मांडल्या जातात, तेव्हा ‘साहित्यमूल्यां’चे वगैरे कौतुक होते. ती ‘कलावादी’ मानसिकता बदलणे, किमानपक्षी संवेदना जाग्या करणे हेही या पुस्तकाचे उद्दिष्ट आहे. प्रस्तावनेतून ते पुरेसे स्पष्ट झालेले आहेच.

रिव्हर ऑफ फ्लेश अँड अदर स्टोरीज – द प्रॉस्टिटय़ुटेड वुमन इन इंडियन शॉर्ट फिक्शन
संपादन : रुचिरा गुप्ता
प्रकाशक : स्पीकिंग टायगर
पृष्ठे : २५६ किंमत : ३५० रुपये

 

सचिन दिवाण
sachin.diwan@expressindia.com