रोलिंग स्टोनहे इंग्रजीतील पाच दशकांपूर्वी सुरू झालेलं आणि आजही प्रकाशित होत असलेलं नियतकालिक. मुख्यत: संगीतविषयक लेखनाला प्राधान्य देणारं नियतकालिक अशी त्याची ख्याती. सॅन फ्रॅन्सिस्को येथे १९६७ मध्ये ते सुरू झालं. यंदा त्याला पन्नास र्वष पूर्ण होत आहेत. रोलिंग स्टोनचा हा पाच दशकीय प्रवास उलगडणारं फिफ्टी इयर्स ऑफ रोलिंग स्टोनहे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे.

साठचं दशक हा अमेरिकेत बीटल्स, स्टोन्स यांचं गारूड निर्माण होण्याचा काळ होता. त्याच प्रभावाखाली जॅन वेनर या २१ वर्षीय तरुणाने ‘रोलिंग स्टोन’ हे (बॉब डीलनच्या एका प्रसिद्ध गाण्यातील शब्द घेऊन) पाक्षिक सुरू केलं. ९ नोव्हेंबर १९६७ रोजी त्याचा पहिला अंक प्रकाशित झाला. सुरुवातीपासूनच वेनरला प्रसिद्ध संगीतसमीक्षक राल्फ जे. ग्लीअसन याने नियतकालिकाच्या कामात सहकार्य केलं. या दोघांच्या प्रयत्नांतून रोलिंग स्टोनला आकार येत गेला. सुरुवातीला केवळ संगीतविषयक मजकूरच यातून प्रसिद्ध होत असे. परंतु पुढील काळात हंटर थॉम्पसनसारखा तिकडम पत्रकार त्यांना येऊन मिळाला आणि रोलिंग स्टोनमधून राजकीय विषयांवरील लेखही प्रकाशित होऊ लागले. पुढे ऐंशी-नव्वदच्या दशकांत रोलिंग स्टोनने मनोरंजन हेच मूल्य मानून तशा प्रकारच्या लेखनाला यात प्राधान्य दिलं. अलीकडच्या वर्षांतील काही अंक चाळले तर यातून राजकीय विषयांवरील खळबळजनक लिखाणही प्रसिद्ध झाल्याचं दिसून येईल. असं असलं तरी रोलिंग स्टोनचा गाभ्याचा विषय मात्र सुरुवातीपासून आजतागायत संगीत हाच राहिला आहे. गेल्या पन्नास वर्षांत रोलिंग स्टोनच्या रचनेतही काही प्रयोग केले गेले. आधी टॅब्लॉइड स्वरूपात व नंतर वेगवेगळ्या आकारांमध्ये ते छापलं जाऊ लागलं, तर गेल्या काही वर्षांपासून ते इतर मासिकांप्रमाणेच नियमित आकारात प्रकाशित होत आहे.

रोलिंग स्टोनचा हा सारा इतिहास, त्यातले लेख, त्यांचे लेखक, बॉब डीलन- मिक जॅगर- कर्ट कोबेन आदींच्या मुलाखती, गेल्या पन्नास वर्षांत यात आलेली महत्त्वाची छायाचित्रं असा सारा समृद्ध  ऐवज हे पुस्तक आपल्यासमोर ठेवतं.