रशियात आणखी एका लेखकाचा खून झाला. बातमी धक्कादायक आहे आणि तेवढीच अ-विशेषही. याचे कारण लेखकांचे खून होणे यात काही नावीन्य नाही. रशियासाठी तर नाहीच नाही. तेथे या आधीही लेखकांना, पत्रकारांना मारून टाकण्यात आले होते. त्यात आता व्लादिमीर प्रिबिलोवस्की या नावाची भर पडली एवढेच. प्रिबिलोवस्की हे राजकीय विश्लेषक आणि लेखक. त्यांच्या नावावर चाळीसेक पुस्तके आहेत. त्यातील एकाचे नाव आहे – ‘द एज ऑफ असॅसिन्स :  द राइज अँड राइजऑफ व्लादिमीर पुतिन – हाऊ स्केअरी आर रशियाज न्यू रुलर्स?’ रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या रक्तरंजित हुकूमशाहीची लक्तरे जगापुढे मांडणारे हे पुस्तक. ते २००८ चे. आता पुतिन सत्तेवर असताना हे पुस्तक प्रकाशित झाले याचा अर्थ रशियात हुकूमशाही नाही, असा कोणी लावू शकते. पुतिन यांच्यासारखा प्रखर राष्ट्रवादी नेता, ज्याने चेचेन्याला नमविले, क्रायमियाचा प्रश्न कायमचा मिटविला, त्यांच्यावर एवढी भयंकर टीका करूनही माणूस सुमारे सहा वर्षे जिवंत राहू शकतो याचा अर्थ तोच, असे मानणारा वर्ग रशियात आहेच. त्यामुळे हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर प्रिबिलोवस्की यांच्यावर राष्ट्रीय गुपिते फोडल्याचा आरोप ठेवण्यात आला, रशियाच्या इंटरनेट सेन्सॉरशिप संस्थेने २०१३ मध्ये त्यांचा ब्लॉग बंद करून टाकला, अशा बाबी किरकोळीतच काढण्यात आल्या. पण अशा छळवादाने संपून जाणारातले ते नव्हते. जॉर्ज ऑर्वेलच्या ‘अ‍ॅनिमल फार्म’चे भाषांतर केल्यानंतर आपण कोणत्या व्यवस्थेत राहात आहोत आणि ती व्यवस्था आपली कशी ‘व्यवस्था’ लावू शकते याची जाणीव त्यांना नक्कीच असणार. ‘ओपन डेमोक्रॅसी’च्या डिसेंबर २०१४च्या अंकातला त्यांचा ‘पॉवर स्ट्रगल्स इन्साइड क्रेमलिन’ या लेखात ‘पुतिन यांच्या सत्ताकालात स्वातंत्र्यांची संख्या आणि त्यांची गुणवत्ता येल्स्तिन कालाच्या तुलनेत कमी झाली’ असल्याचे लिहिणाऱ्या लेखकाला स्वातंत्र्य कमी झाल्यानंतर जे परिणाम होतात त्याची जाणीव नव्हती असे म्हणता येणार नाही. पण तरीही राजकीय लेखकाचे कर्तव्य ते पार पाडत होते. पण एखादा हुकूमशाही समाज कितीही सहिष्णू झाला तरी तो किती काळ अशा लेखकाला सहन करणार?

अ‍ॅना स्टेपानोव्हना पोलिट्कोवस्काया ही रशियातील पत्रकार, लेखिका आणि मानवाधिकार कार्यकर्ती अशीच सरकारच्या सहनशीलतेची परीक्षा पाहात होती. चेचेन्यातील अत्याचारांवर लिहिण्याचे राष्ट्रद्रोही काम करीत होती. ‘ए स्मॉल कॉर्नर ऑफ हेल, डिस्पॅचेस फ्रॉम चेचेन्या’, ‘पुतिन्स रशिया’ ही तिची पुस्तके. ‘भला वा बुरा, माझा देश’ हे राष्ट्रवाद्यांचे वचन. ही पत्रकार बाई मात्र चेचेन्यात आपला देश आक्रमक आहे असे म्हणत होती. ‘आपल्याला काय वाटतं हे मोठय़ाने बोलल्याची किंमत कधी कधी लोकांना आपले प्राण देऊन चुकवावी लागते,’ असे जाहीर भाषणांतून सांगून सरकारला खिजवत होती. २००६ मध्ये मॉस्कोतील तिच्या इमारतीच्या उद्वाहनात तिचा मृतदेह सापडला.

प्रिबिलोवस्की यांना कसे मारण्यात आले हे मात्र अद्याप गूढ आहे. ते त्यांच्या घरात मृतावस्थेत सापडले. त्यांच्या सहकाऱ्यांच्या मते हा खूनच आहे. पण त्याचे पुरावे नाहीत. ‘ब्लोईंग अप रशिया’ या पुस्तकाचे लेखक आणि केजीबीचे माजी गुप्तहेर अलेक्झँडर विट्विनेन्को यांना रेडिओअ‍ॅक्टिव्ह पोलोनियमची बाधा कशी झाली, त्यांच्या मृत्यूबद्दल माध्यमांतून प्रश्न उपस्थित करणारे टाइम्स ऑफ लंडनचे पत्रकार डॅनियल मॅकग्रेगरी यांची कोणी गोळ्या घालून हत्या केली याचे पुरावे तरी कुठे मिळाले आहेत. असे पुरावे मिळत नसतात. शाही कोणतीही असो, त्यात राजकीय हत्या अशाच अनुत्तरित राहत असतात. तेव्हा रशियात एका लेखकाचा खून झाला ही अ-विशेषच बातमी म्हणायची.