माणसाचा इतिहास सांगणारे ‘सेपियन्स’ व माणसाचा भविष्यकाळ कसा असेल, यावर भाष्य करणारे ‘होमो डीउस’ ही युव्हाल नोह हरारी यांची पुस्तके हिब्रूतून इंग्रजीत आली आणि जगभरच्या वाचकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. त्यानंतर गतवर्षी प्रसिद्ध झालेले त्यांचे ‘२१ लेसन्स फॉर ट्वेन्टी-फर्स्ट सेंच्युरी’ हे वर्तमानाचे विश्लेषण करणारे पुस्तकही गाजले. त्यांच्या आधीच्या दोन्ही पुस्तकांप्रमाणे, याही पुस्तकाच्या भाषांतरित आवृत्त्या निघू लागल्या आहेत. अलीकडेच ते रशियन भाषेत भाषांतरित झाले. मात्र, या रशियन आवृत्तीत मूळ पुस्तकातील रशिया व पुतिन यांच्याबद्दलचे तपशील गाळण्यात आले असल्याची बातमी आठवडय़ाभरापासून चर्चेत आहे. मुख्य म्हणजे, ‘तसे दोन तपशील गाळण्यास मी संमती दिली असून पुस्तकातला मूळ विचार सर्व देशांतल्या वाचकांपर्यंत पोहोचवायचा, तर अशा तडजोडी कराव्या लागतील,’ असे त्यानंतरच्या मुलाखतीत हरारी यांनी म्हटले आहे. पुस्तकातील, सत्योत्तरी (पोस्ट-ट्रथ) जग आणि ‘फेक न्यूज’चा ऐतिहासिक शोध घेणाऱ्या एका प्रकरणात हरारी यांनी रशिया व पुतिन यांची उदाहरणे दिली होती. रशियाने २०१४ साली क्रिमियात आक्रमण करून त्या द्वीपकल्पाचा ताबा घेतला; परंतु रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी ते नाकारत खोटा प्रचार केल्याची आणि आपण धादांत खोटे बोलत आहोत याची पुतिन व त्यांच्या सहकाऱ्यांना पुरती जाणीव असूनही ते तेच बोलत राहिले, याची आठवण हरारी यांनी करून दिली होती. मात्र, रशियन आवृत्तीत हा तपशील गाळून, त्या जागी डोनाल्ड ट्रम्प यांच्या खोटारडेपणाची उदाहरणे पेरली आहेत. हा तपशील गाळण्यास हरारी यांनी होकार दिला असला, तरी आणखीही काही तपशील गाळल्याचे, सोयीस्कर फिरवल्याचे आठवडय़ाभरातील झाडाझडतीत समोर आले आहे आणि या बदलांची हरारी यांना कल्पनाच नव्हती! हरारी हे ‘गे’ आहेत आणि त्यांनी हे पुस्तक आपल्या सहजीवीला अर्पण केले आहे. पण रशियन अनुवादकाला ते जड गेले व त्यामुळे अर्पणपत्रिकेतही बदल करण्यात आला. याव्यतिरिक्तही काही बदल या आवृत्तीत परस्पर केले आहेत, त्याबद्दल आता हरारी प्रकाशकांशी संपर्क करणार आहेत. एकुणात, वर्तमानाचा आरसा दाखवून २१ व्या शतकासाठी २१ धडे सांगणाऱ्या प्रतिभावंत हरारींना या प्रकरणी आलेला अनुभव २२ वा धडा लिहिण्यास उद्युक्त करेल असाच!