|| पंकज भोसले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मॅन बुकर’च्या यंदाच्या दीर्घ यादीत ‘सॅबरिना’ या निक डनासोच्या ग्राफिक नॉव्हेलने स्थान पटकाविले आणि जगभरातील ग्रंथोत्सुकांमध्ये ती हस्तगत करण्यासाठी चढाओढ सुरू झाली. गुरुवारी जाहीर झालेल्या लघु यादीतून ‘सॅबरिना’ वगळली गेली असली तरी, ती का वाचायची- पाहायची याची कारणं या याद्यांपल्याड आहेत. ‘सॅबरिना’ची गोष्ट अमेरिकेत घडते खरी, पण आज जगातील कुठल्याही भागातील समाजस्थितीचे लख्ख आरशातले प्रतिबिंब त्यात पाहायला मिळते..

‘बुकर’ पारितोषिकाच्या दीर्घ यादीत ‘सॅबरिना’ या ग्राफिक नॉव्हेलचा समावेश झाल्याच्या बातमीनंतर दोन गोष्टी स्पष्ट झाल्या. पहिली गोष्ट म्हणजे, ५० व्या वर्षांत पदार्पण केलेल्या या पुरस्काराने उदारमतवादी धोरणाचा यंदा आणखी एक पल्ला पार केला. दुसरी गोष्ट, या पुस्तकाला हस्तगत करण्यासाठी गेला महिनाभर जगभरातील ग्रंथोत्सुकांमध्ये सुरू असलेली चढाओढ प्रवाहपतित घटकाविषयी समाजात वाढत चाललेल्या आकर्षणाची झलक दाखवून गेली.

पुरस्काराच्या पन्नास वर्षांच्या लौकिकात कदापि निवड न झालेल्या कथाप्रकाराच्या या अर्वाचीन माध्यमाला बुकरच्या निवड मंडळाने पहिल्यांदाच वर्षांतील उत्तम कलाकृतीचा एक दावेदार म्हणून घोषित केले, आणि दुसऱ्या दिवसापासूनच देशोदेशी ‘सॅबरिना’चा दबदबा वाढत गेला. ‘सॅबरिना’ ही चित्रकथेऐवजी साधारण शब्दकादंबरी असती, तर तिच्या याच कथनाविषयी इतके कुतूहल निर्माण झाले असते का, हा प्रश्न आहे. या पुस्तकामुळे जगाचे लक्ष अधिक वेधून घेतलेला निक डनासो हा लेखक मात्र या पुस्तकचर्चेमुळे तणावाच्या गर्तेत गेला! या चित्रकादंबरीला साहित्यजगताने कमालीचे स्वीकारणे अवघड गेल्याचे त्याने मुलाखतींमध्ये स्पष्ट केले. पुस्तक लघुयादीत न येण्याची मनोकामना करणाऱ्या या चित्रकथीकर्त्यांने सामाजिक शतखंडित मानसिकतेची, विकृतीची आणि बिघडलेल्या व्यवस्थेची परिस्थिती ‘सॅबरिना’मधून मांडली आहे. ती आकर्षक, सुलभ, वाचकस्नेही किंवा आनंददायी नाही.

गंमत म्हणून आपल्या भवतालच्या सामाजिक परिस्थितीची सूक्ष्म चिकित्सा करायला घेतली तरी ‘सॅबरिना’तील कथाजगतात आपला सहज शिरकाव होऊ शकेल. दोन हजारोत्तर काळात आपल्या जगण्यात मोबाइल, इंटरनेट आणि समाज माध्यमांचा वाढता हस्तक्षेप आपल्या जाणिवा, विचारांवर छिन्नी-हातोडय़ासारखे घाव करीत त्यांना बदलू पाहत आहे. एकलपणा वाढत चालला आहे. कोणत्या ना कोणत्या व्यसनाने व्यक्तीचे खासगी आयुष्य मानसिक पंगुत्वाची परिसीमा गाठत आहे. विकृत बोलायला, पाहायला, ऐकायला आणि आचरणाला मुबलक पर्याय उपलब्ध आहेत. हिंसा-राग-द्वेष-लफडी-कुलंगडी यांचे विस्तारत चाललेले कुतूहल वृत्तवाहिन्या शमवत आहेत. खऱ्यांना खोटे आणि खोटय़ांचा उद्धार करणारे जल्पक (ट्रोलर्स) अधिकाधिक कल्पक बनत आहेत. स्वत:च्या आयुष्यातील खासगीपण जपण्याचा असोशीने प्रयत्न करणारा प्रत्येक समाजघटक दुसऱ्याचे खासगी आयुष्य टीव्हीवरील कार्यक्रमांतून वा समाजमाध्यमांतून चव्हाटय़ावर होताना चवीने पाहण्यात रमला आहे. अमेरिकेतील फर्नाडो व्हॅलीतून आयात झालेली पोर्नकलावती हिंदी सिनेमामध्ये अवतरून भारतीय प्रेक्षकांना अधिक संशोधनाची मोहिनी घालत आहे, तर कुणा म्हातारचळी भजनीबुवांचे आपल्याहून अर्धवयीन तरुणीसोबतचे प्रेम प्रकरण ‘ट्रेण्डिंग न्यूज’मध्ये पहिल्या स्थानी जात आहे.

आर्थिक सुबत्तेच्या तुलनेसह आपल्या सामाजिक दु:स्थितीलाही नामोहरम करणारी परिस्थिती अमेरिकेत याच कालावधीत तयार झाली असून कित्येक महत्त्वाच्या कथा-कादंबरीकारांनी, टीव्ही मालिकांनी याच घटकांच्या पायावर आपल्या कलाकृतीच्या इमारती उभ्या केल्या. ब्रेट एस्टन इलिस या लेखकाची ‘अमेरिकन सायको’, चक पाल्हानिकची ‘फाइट क्लब’ या कादंबऱ्या आणि व्हिन्स गिलिगन यांची ‘ब्रेकिंग बॅड’ ही तब्बल आठ सीझन चालणारी ६२ तासांची मालिका म्हणजे मानवी अध:पतनाच्या अवस्थेचा चालता-बोलता कोश आहे. या पंगतीत आता निक डनासोच्या ‘सॅबरिना’ या चित्रकादंबरीचाही समावेश करता येईल.

‘सॅबरिना’चा घटनाकाळ जरी २०१७ च्या आसपास घुटळमळत असला, तरी त्यात संदर्भ आहेत ते अमेरिकेवर झालेल्या ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यापासून आत्ताच्या ट्रम्पकालीन प्रशासनाच्या विक्षिप्त धोरणांपर्यंत! कादंबरी सुरू होते शिकागोमधील एका घरात दोन बहिणींच्या साधारण संवादातून.. अगदीच साध्या गप्पांतून. सॅण्ड्रा आणि तिची बहिणी सॅबरिना हिची शेवटची भेट दाखविणाऱ्या या चित्रचौकटी संपून कथानक कोलोरॅडोमधील कॅल्विनपाशी येते.

सॅबरिनाला कथानकाची मुख्य नायिका मानले, तरी कॅल्विन इथला नायक ठरत नाही. परंतु ही कादंबरी उलगडते त्याच्याद्वारेच. हवाई दलात गोपनीय माहितीच्या सुरक्षा यंत्रणेत काम करणारा कॅल्विन बायको आणि पत्नी सोडून गेल्यामुळे घरात एकटाच राहत असतो. शिकागोमध्ये राहणाऱ्या टेडी नावाच्या आपल्या लहानपणीच्या मित्राला घरी आणण्याची जबाबदारी त्याच्यावर अचानक येऊन पडते. या टेडीची मैत्रीण सॅबरिना महिनाभरापासून बेपत्ता असल्याने बिथरलेल्या टेडीला सावरण्याच्या हेतूने कॅल्विन त्याला कोलोरॅडोमध्ये घेऊन येतो. कॅल्विनला आपल्या कार्यालयातील आघाडीवर आणि कुटुंब जवळ नसल्याने स्वत:ची मानसिक दु:स्थिती यांच्याशी आधीपासून लढावे लागत असतानाही तो टेडीला आधार देण्यासाठी सज्ज असतो. मात्र, टेडीला कोणताही आधार देणे कुणाच्याच हातात राहत नाही. सॅबरिनाची तिच्याच घराजवळ राहणाऱ्या एका तरुणाने अपहरण करून हत्या केल्याचे उघड होते. अपहरणकर्त्यांने त्या हत्येचे चित्रीकरण सर्व वृत्तवाहिन्यांना पाठवून स्वत: आत्महत्या केलेली असते. अल्पावधीत सॅबरिनाच्या हत्येचा व्हिडीओ व्हायरल होतो आणि संपूर्ण समाजाचा या घटनेबाबतचा मत-मतांतराचा आलेख बदलत राहतो.

सॅबरिनाच्या हत्येचा व्हिडीओ डाऊनलोड करणारे काही लक्षावधी दर्शक इथे ‘परदु:ख शीतल’ अवस्थेतील भासू लागतात. यात समाजमाध्यमांवरच्या चर्चा चालतात.. सॅबरिनाच्या हत्येची घटना कशी ‘फेक न्यूज’ आहे याचे दावे होतात, ते खोडलेही जातात आणि नवनवे अक्कलतारे तोडले जातात. माध्यमांच्या प्रतिनिधींपासून स्वघोषित सत्यशोधकांपर्यंत सारेच कॅल्विन आणि सॅबरिनाच्या बहिणीला निरनिराळ्या धमक्या देतात. समाजमाध्यमांवर स्वत:चे चित्रीकरण करून हत्याकांड घडवणारी आणखी एक घटना घडते आणि समाजाच्या दुतोंडी चर्वणाची आवर्तने सुरूच राहतात.

निक डनासोला गुन्हा कुणी केला, का केला किंवा कसा केला, हे आपल्या कादंबरीमधून जराही सांगायचे नाहीये. किंबहुना त्याने नक्की काय झाले, याविषयीची उत्कंठा राखलेली नाही. जे झाले त्यानंतर त्या घटनेचे अभिसरण कशा प्रकारे झाले, याचा शोध त्याने लावला आहे. अन् हा शोध नक्कीच आनंददायी नाही. कॅल्विनचे अतिसाधारण कुटुंबपारखे आयुष्य, टेडीसमोर उभे ठाकलेले एकल भविष्य आणि सॅबरिनाची बहीण सॅण्ड्रावरचा मानसिक आघात या साऱ्यांचे एकत्रीकरण करताना अमेरिकी मूल्यव्यवस्थेची घसरण यातील पानापानांत हजर झालेली दिसते. येथील पात्रांना पडणाऱ्या दु:स्वप्नांची मालिकाही डनासोने करडय़ा रंगात उत्तमरीत्या रेखाटली आहे.

समाजाला आरसा दाखविणारे अनेक चित्रपट गेल्या काही दशकांमध्ये येऊन गेले आहेत. सॅबरिनाची गोष्ट अमेरिकेत घडत असली, तरी आज जगात कुठल्याही भागातील समाजस्थितीचे – चित्रपट दाखवतात त्याहून – लख्ख आरशातले प्रतिबिंब त्यात पाहायला मिळते. ‘परदु:ख शीतल’ अवस्थेत जगणारे आपण सारेच कसे आहोत, याचे भान ही चित्रकादंबरी देऊ शकते. म्हणून तिचा समावेश बुकरच्या दीर्घ यादीमध्ये होऊ शकला. अन् गुरुवारी जाहीर झालेल्या लघु यादीत शिरकाव झाला नसला, तरी तिच्या लोकप्रियतेला किंचितही बाधा येणार नाही, हे खरे!

‘सॅबरिना’

चित्रकथीकर्ता : निक डनासो

प्रकाशक : ग्रँटा बुक्स

पृष्ठे : २०४, किंमत : १६८० रुपये

pankaj.bhosale@expressindia.com

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sabrina book by nick drnaso
First published on: 22-09-2018 at 00:03 IST