26 November 2020

News Flash

सुरुवातीचे सावरकर..

कुठल्याही कर्तृत्ववान व्यक्तीच्या विचारांचे, आचारांचे, प्रतिभेचे काही पैलू वादग्रस्त असतात.

‘सावरकर : एकोज् फ्रॉम अ फरगॉटन पास्ट, १८८३-१९२४’ लेखक : विक्रम संपत प्रकाशक : पेंग्विन व्हायकिंग पृष्ठे : ६२४, किंमत : ९९९ रुपये

रवींद्र कुलकर्णी

अलीकडच्या काही दशकांत सावरकरांविषयीचे आक्षेप निरनिराळ्या पद्धतीने विविध स्तरांतून नोंदवले गेले. त्या आक्षेपांना तपशीलवार उत्तरे देत, नवी माहितीही सादर करणाऱ्या या इंग्रजीतील विस्तृत सावरकर चरित्राचा पहिला भाग नोंद घेण्याजोगा का ठरतो?

कुठल्याही कर्तृत्ववान व्यक्तीच्या विचारांचे, आचारांचे, प्रतिभेचे काही पैलू वादग्रस्त असतात. ती व्यक्ती गेल्यानंतर कालांतराने तिच्यासंबंधीचा धुरळा खाली बसावा आणि ती व्यक्ती तिच्या वर्तमान चरित्रकाराच्या नजरेतून स्वच्छ दिसावी अशी अपेक्षा असते. भारतात याला अपवाद विनायक दामोदर सावरकरांचा आहे. सावरकरांच्या जीवनाकडे पाहण्याचा पूर्वग्रहग्रस्त दृष्टिकोन व महाराष्ट्र सोडून इतर प्रांतांत असलेले त्यांच्याबद्दलचे अज्ञान या दोन्ही गोष्टींमुळे त्यांच्या भोवतालचे धुके आणखी गडद होते. आताच्या केंद्र सरकारचे तरुण व उच्चविद्याभूषित अर्थसल्लागार संजीव संन्याल यांनी काही महिन्यांपूर्वी सावरकरांवर बोलताना म्हटले, ‘‘शाळेत असताना मी त्यांच्याबद्दल पुसटसे ऐकले होते.’’ संन्याल यांचे घराणे क्रांतिकारकांचे आहे. त्यांच्या आजोबांच्या सख्ख्या बंधूंना- सचिंद्रनाथ संन्याल यांना दोन वेळा अंदमानात पाठवण्यात आले होते. त्या कुटुंबातल्या तरुण माणसाचे जर हे अज्ञान आहे, तर इतरांबद्दल काय बोलावे? खुद्द सावरकरांच्या महाराष्ट्रातही मराठीत भक्तिभावाने त्यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकांच्या पलीकडे काही नाही व त्यातील बरीच शंभरपेक्षा कमी पानांची आहेत. माहितीसाठी अर्धशतकापूर्वीचे धनंजय कीर लिखित सावरकर चरित्र हेच आधाराला घ्यावे लागते. आता विक्रम संपत लिखित ‘सावरकर : एकोज् फ्रॉम अ फरगॉटन पास्ट, १८८३-१९२४’ हे सावरकर चरित्र पेंग्विन प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. तीन खंडांत योजलेले चरित्र प्रकाशकांच्या आग्रहामुळे दोन खंडांत लिहावे लागल्याचे विक्रम संपत यांनी मुलाखतीत म्हटले आहे. यावरून त्याच्या विस्ताराची कल्पना यावी.

१९११ साली सर हेन्री कॉटन यांनी लंडनमधल्या भारतीय समुदायासमोर बोलताना सावरकरांसारखे तरुण, उमदे व बुद्धिमान व्यक्तिमत्त्व दयनीय अवस्थेला पोहोचल्याचे पाहून खेद व्यक्त केला. १९०४ साली सर कॉटन हे काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यामुळे काँग्रेसने लगेचच कॉटन यांचे हे वैयक्तिक मत असल्याचे सांगून आपले हात झाडले. ‘केसरी’नेदेखील काँग्रेसच्या मताला दुजोरा दिला. अशी उपेक्षा मरणापर्यंत व नंतरही चालू राहावी यासारखे दुर्दैव नाही. अशा व्यक्तीचे चरित्र कोरडेपणाने लिहिणे अवघड आहे.

सावरकरांकडे असलेल्या गुणांच्या वर्णनाने पुस्तकाची सुरुवात होते. त्यांच्याकडे असलेल्या गुणसंपदेबद्दल कोणाचेच दुमत नाही. त्यांना लंडनमध्ये शिकण्यासाठी शिष्यवृत्तीकरिता शिफारस केवळ लोकमान्य टिळकांनी केली नव्हती, तर विलायती कपडय़ांची होळी केल्यामुळे त्यांना फग्र्युसन कॉलेजच्या वसतिगृहामधून काढून टाकणाऱ्या रँगलर परांजपेंनीदेखील शिफारसपत्र दिले होते. ही माहिती नवीन आहे. अशी गुणसंपदा जास्त चांगल्या प्रकारे, जास्त परिणामकारकरीत्या वापरता आली नसती काय, हा प्रश्न सावरकरांचे चरित्र तटस्थपणे वाचताना राहून राहून मनात येतो. सावरकर लंडनमध्ये असताना एमिलीन पँखर्स्टची स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी चळवळ चालू होती. ती जहाल भाषणे करे. एकदा तिने हाइड पार्कमधल्या सभेत स्त्रियांच्या मतदानाच्या हक्कासाठी पुरुषांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. पुढे तिने म्हटले, ‘‘जर त्यांनी अधिकार दिला नाही तर तो आम्ही हिसकावून घेऊ. मनात आणले तर एका दिवसात आम्ही इंग्लंडला गुडघे टेकायला लावू शकतो.’’ ‘लंडनची बातमीपत्रे’मध्ये सावरकरांनी तिच्या या वक्तव्याचा उल्लेख केला आहे. ते लिहितात, ‘‘मित्रांनो, विचार करा- इंग्लंडमधील एक स्त्री हे म्हणत आहे आणि आपण स्वत:ला पुढारलेले पुरुष म्हणवून घेतो.’’ सावरकरांना पटलेले शक्तीचे महत्त्व व त्याचे असलेले आकर्षण कधी सुटले नाही.

सामायिक स्फूर्तिस्थानाची निवड

१८५७ च्या लढय़ाची मोठी दहशत ब्रिटिश सरकारला १९४७ पर्यंत होती. ब्रिटिश सैन्यातले भारतीय जवान हे ब्रिटिश सुसरीचे मऊ पोट आहे हे सावरकरांनी सर्वात आधी जाणले होते. १८५७ चा लढा ब्रिटिश सैन्यातल्या हिंदू व मुसलमान यांनी एकत्र दिला होता. त्यानंतरही राजकीय स्वार्थ असल्याशिवाय हिंदू व मुसलमान एक होत नाहीत असे ब्रिटिशांचेही निरीक्षण होते. रौलेट कायद्याच्या वेळेला याची जराशी चुणूक दिसताच सरकार खूप अस्वस्थ झाले व त्यातून जालियनवाला बागेची घटना घडली. नंतर चौकशीच्या वेळी जालियनवाला बागेच्या हत्याकांडाला जबाबदार असणाऱ्या मायकेल ओ’डवायरने त्या हत्याकांडाचे समर्थन करताना ‘पंजाबातील त्या वेळची परिस्थिती १८५७ सदृश झाली होती’ असा दावा केला. दोन्ही समाजांना राजकीय उद्दिष्टाकरिता एक करण्यासाठी हे सामायिक स्फूर्तिस्थान सावरकरांनी निवडले. त्यात धर्म आणण्याची गरज नव्हती व सावरकरांनी तो आणलाही नाही. १९०७ साली १८५७ च्या लढय़ाला ५० वर्षे होत असल्याने लंडनमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्याला उत्तर म्हणून सावरकरांनी आपला दृष्टिकोन मांडायचे ठरवले व तिथल्या इंडिया ऑफिसच्या वाचनालयातून अनेक संदर्भ गोळा केले. त्याप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजनही झाले. यातून जन्मलेले ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हे इंग्लंडमध्ये छापणे धोकादायक वाटल्याने ते फ्रान्स, जर्मनीत छापण्याचा विचार झाला. शेवटी ते हॉलंडमध्ये छापले गेले व नानाविध मार्गानी भारतात गुप्तपणे आले. त्याच्या प्रती असलेले एक खोके नंतर मुहम्मद अली जीनांबरोबर गेलेले सर सिकंदर हयात खान यांनी भारतात आणले होते. हा दृष्टिकोन सावरकरांनी मांडला नसता तर नेताजींच्या आझाद हिंद फौजेलादेखील बंडखोर म्हणून हिणवले गेले असते, असे लेखकाने म्हटले आहे.

सावधतेवर भावनेची मात

सावरकरांच्या जीवनातील एकही गोष्ट अशी नसेल, की ज्यात धैर्य हा गुण प्रकर्षांने दिसला नसेल. कर्झन वायलीच्या हत्येनंतर मदनलाल धिंग्रा यांचा निषेध करण्यासाठी लंडनच्या कॅक्स्टन सभागृहात जी सभा लगेच झाली, त्याला सावरकरांनी घेतलेला आक्षेप वकिली होता. न्यायालयाने अजून धिंग्रा यांना दोषी म्हणून जाहीर केले नसताना सभेने तो अधिकार स्वत:कडे घ्यावा याला सावरकरांनी हरकत घेतली. त्या सभेत दादासाहेब खापर्डे व बिपिनचंद्र पाल यांच्यासारखी नामांकित वकील व जहाल गटाची मंडळीही होती. पण ही तांत्रिक हरकतही कोणी घेतली नाही. ते राजकीयदृष्टय़ा शहाणपणाचेही नव्हते. पण धिंग्रा यांना त्यांच्या कुटुंबीयांनी व देशबांधवांनी वाऱ्यावर सोडले असता, सावरकर निर्भयतेने त्यांच्या बाजूने उभे राहिले. जॅक्सनच्या हत्येच्या घटनेत कान्हेरे, कर्वे व देशपांडे फासावर गेले हे समजताच पॅरिसमध्ये असलेले सावरकर अस्वस्थ झाले. आपल्या सहकाऱ्यांचा विरोध डावलून ते इंग्लंडला आले आणि लंडनच्या व्हिक्टोरिया स्थानकावर पकडले गेले. राजकीय शहाणपणावर व सावधतेवर त्यांच्यातल्या भावनेने मात केलेली स्वातंत्र्यवीरांच्या चरित्रात नेहमी दिसते. या घटनेनंतरच्या घडामोडींवरही लेखकाने सविस्तर लिहिले आहे. ‘त्रिखंडात गाजलेली उडी’ अशा वर्णनात वाहून न जाता लिहिलेली पुस्तकातील प्रकरणे वाचनीय आहेत. त्याला महायुद्धपूर्व आंतरराष्ट्रीय राजकारणाची किनार आहे. मोर्ले, सर एडवर्ड ग्रे, विन्स्टन चर्चिल अशा मंडळींनी यात लक्ष घातले. विशेषत: चर्चिल यांचे मत सावरकरांना फ्रान्सला परत सोपवावे असे होते.

सावरकरांनी अंदमानातून सुटण्यासाठी लिहिलेला अर्ज ३०-३५ वर्षांपूर्वी चर्चेतही नव्हता. राष्ट्रीय पातळीवर जसजसे उजव्या विचारधारेला यश मिळू लागले त्यानंतर सावरकरांचा हा अर्ज वा माफीपत्र जोमाने चर्चेत आले. १९१२ ते १९१४ दरम्यान सावरकरांना आठ वेळा कामाला नकार दिल्याबद्दल कठोर शिक्षा झाल्या. त्यानंतर मात्र सावरकरांनी आपल्या वर्तनात बदल केला. भिंतीवर डोके आपटण्यात अर्थ नाही हे त्यांच्या लक्षात आले असावे; कारण त्यांच्याच बरोबरचे, अरविंद घोषांचे धाकटे बंधू बारीन घोष, त्रलोक्यनाथ चक्रवर्ती व हेमचंद्र दास हे तीन बंगाली क्रांतिकारक १९१९ सालच्या माफी योजनेचा फायदा घेऊन, तंतोतंत सावरकरांसारखीच पत्रे देऊन सुटले होते. त्याच प्रकारात सावरकर बंधूंचे प्रकरण बसत होते, पण तीन बंगाली क्रांतिकारक बंदींनी तुरुंगवासात जसे प्रशासनाला सहकार्य केले तसे सावरकर बंधूंनी केले नाही असे सांगण्यात आले. मुंबई सरकारनेदेखील सावरकरांच्या सुटकेला हरकत घेतली.

पण १९२० च्या दरम्यान सावरकरांच्या सुटकेच्या प्रयत्नांनी वेग घेतला. बॉम्बे नॅशनल युनियनने ७५ हजार सह्य़ा गोळा केल्या. विठ्ठलभाई पटेलांनी कायदेमंडळात सावरकर बंधू व अंदमानातल्या इतर राजकीय बंद्यांच्या मुक्ततेचा ठराव आणला. दादासाहेब खापर्डे यांनीही सरकारचे लक्ष वेधले. सावरकरांचा किल्ला जोमाने लढवला तो मात्र रंगस्वामी अय्यंगार यांनी! त्यांनी सावरकरांच्या पत्राचा उल्लेख केला व त्यात ‘परिस्थिती बदलेल त्याप्रमाणे कामाच्या पद्धती व साधने बदलतात’ असे सावरकरांनी म्हटल्याचे सांगितले. या ठरावाला सर उमर हयात खान व बहराम खान यांनी विरोध केला. सर विल्यम विन्सेन्ट यांनी सावरकर बंधूंच्या प्रकृतीचा विचार करून- मद्रास, बॉम्बे वा युनायटेड प्रॉव्हिन्स या प्रांतांतल्या तुरुंगात त्यांना स्वीकारण्यात येत असेल तर त्यांना अंदमानातून परत आणावे, असे म्हटले. अखेर काही अटींवरती सावरकर बंधूंची अंदमानातून सुटका झाली व ज्या एसएस महाराजा या जहाजाने त्यांना अंदमानला नेले होते, त्याच जहाजाने त्यांना परत आणले.

द्विराष्ट्रवादाची मुळे

सावरकरांवरचा दुसरा आक्षेप द्विराष्ट्रवादाचा असतो. लेखकाने द्विराष्ट्रवादाचे माप अलिगढ विद्यापीठाचे संस्थापक सर सय्यद अहमद यांच्या पदरात घातले आहे. रहिमतउल्ला सयानी १८९६ सालच्या काँग्रेसच्या अध्यक्षीय भाषणातच मुसलमानांविषयी चिंता व्यक्त करताना म्हणाले, १८६७ पर्यंत भारतात जे ८८ लोक पदवीधर झाले होते ते सारे हिंदू आहेत. मुस्लीम लीगनेही- हिंदूंबरोबरच्या सामाजिक एकतेला काहीच हरकत नाही, पण जर इंग्लंड वा अमेरिकेप्रमाणे प्रातिनिधिक सरकार भविष्यात आले तर राजकीय एकतेत मुसलमान अल्पसंख्य असल्यामुळे मागे राहतील, ही भीती व्यक्त केली होती. तर्कदृष्टय़ा हे चूक नव्हते. मुस्लिमांची ही भीती दूर करणे काँग्रेसला अशक्य होते. ही भीती सतत जागी ठेवणे व वाढवत नेणे मुस्लीम नेत्यांना फायद्याचे होते.

लेखकाने म्हटल्याप्रमाणे, १८८५ पासून १९०५ पर्यंत काँग्रेस अधिवेशनातल्या मुस्लीम प्रतिनिधींची संख्या १५ टक्के होती व नंतरच्या २० वर्षांत ती घसरत पाच टक्केही राहिली नाही. या सगळ्याचा परिणाम खिलाफत आंदोलन, खुनी मोपल्यांना वीर मोपला व स्वामी श्रद्धानंदांच्या खुन्याला ‘मेरे भाई अब्दुल रशीद’ संबोधण्यात झाला. या संपूर्ण घडामोडीत सावरकर राजकीय पटलावरदेखील नव्हते. द्विराष्ट्रवादाच्या संदर्भात जे स्पष्ट दिसत होते ते म्हणण्यात सावरकर कचरले नाहीत. आणखी कुतूहल असलेल्या वाचकांनी माजी राजदूत व जेएनयूमधले प्राध्यापक बिमल प्रसाद यांचे ‘पाथवे टु इंडियाज् पार्टिशन’ किंवा डॉ. आंबेडकरांचे फाळणीवरचे पुस्तक डोळ्यांखालून घातले तर द्विराष्ट्रवादाची मुळे खूप खोल आहेत हे लक्षात येईल. हेतू कितीही उदात्त असले तरीही, त्यांच्या सोयीसाठी सत्याला काट मारता येत नाही. सावरकरांच्या ‘हिंदुत्व’ या १९२३ साली आलेल्या पुस्तकाची पार्श्वभूमी वरीलप्रमाणे आहे.

सावरकरांनी केलेले सर्व अर्ज पुस्तकाच्या शेवटी दिलेले आहेत. त्याच्या शेवटी सही करताना त्यांनी ‘युअर मोस्ट ओबिडियंट’ असे म्हटले आहे. ३०-३५ वर्षांपूर्वीपर्यंत नोकरीसाठी अर्ज करतानाही याच प्रकारे संबोधण्याची पद्धत होती. त्यामुळे असल्या गोष्टींवरून गदारोळ माजवणे हे कृतघ्नपणाचे आहे. भारतातल्या ‘लेफ्टोइस्लामिस्ट’ इतिहासकारांचा सावरकर हा द्वेषपूर्ण अभ्यासाचा विषय आहे. परंतु सावरकरांसंबंधी सहानुभूती बाळगत केलेले हे चरित्रलेखन म्हणजे एक प्रकारे त्याला उत्तर आहे. आपापल्या विचारधारेप्रमाणे जो तो गट सावरकरांचा स्वत:ला सोयीस्कर असलेला पैलू उचलून धरत असतो वा टीका करत असतो. हिंदुत्ववाद्यांना सावरकरांच्या विज्ञाननिष्ठतेचे वावडे असते, तर कम्युनिस्टांना त्यांच्या हिंदुत्वाचे! तर इतर मंडळी स्वत:च्या राजकीय सोयीप्रमाणे तळ्यात किंवा मळ्यात असतात.

दीर्घता हा गुण

या चरित्राने सावरकरांबद्दल प्रामाणिक कुतूहल असलेल्या इंग्रजी वाचकांची मोठी सोय झाली आहे. याचा दुसरा खंड पुढच्या वर्षी येईल असे लेखकाने म्हटले आहे. चरित्र दीर्घ असल्याने सावरकर व त्या कालखंडातल्या संपूर्ण घडामोडींचा वेध घेता आला आहे. त्यामुळे दीर्घता हा या पुस्तकाचा गुण ठरावा.

इंग्रजीतून शिकलेल्या वर्गाला महाराष्ट्राच्या राजकीय योगदानाशी परिचय करून द्यायचा असेल तर तो इंग्रजीतून येणे गरजेचे आहे. विक्रम संपत यांच्यासारख्या अर्धमराठी असलेल्या लेखकाने ही जबाबदारी घेतली याची नोंद घ्यायला हवी. २०१९ च्या ऑगस्टमध्ये हा ग्रंथ बाजारात आला. तेव्हापासून शशी थरूर यांनी सावरकर द्विराष्ट्रवादाचे जनक असल्याचे तुणतुणे लावले आहे. त्यांच्याच ऑक्सफर्ड युनियनमधल्या गाजावाजा झालेल्या भाषणातून जन्मलेल्या ‘अ‍ॅन एरा ऑफ डार्कनेस’ या त्यांच्या पुस्तकात लोकमान्य टिळकांचे नावही नसावे याचा महाराष्ट्राने विचार करण्याची गरज आहे.

kravindrar@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 12:02 am

Web Title: savarkar ikoj from forgotten past book review abn 97
Next Stories
1 प्रश्नांच्या प्रदेशातील उत्तरे..
2 बुकबातमी : ‘२६/११’ आणि नंतरची जिद्द..
3 स्त्री‘वाद’ नकोच..?
Just Now!
X