15 August 2020

News Flash

आर्त हाकेला प्रतिसाद!

सोफी आणि तिची मैत्रीण ज्युलिआना यांनी त्यांच्या अन्य सवंगडय़ांना सोबत घेऊन हवामानबदलासाठी थेट त्यांच्या अमेरिकी सरकारलाच न्यायालयात खेचलं.

जागतिक तापमानवाढ आणि कर्ब उत्सर्जन कमी करण्यासाठी तब्बल तीन दशकं झगडणारे बुजुर्ग हवामानशास्त्रज्ञ डॉ. जेम्स हॅन्सेन यांनी दशकभरापूर्वी ‘स्टॉम्र्स ऑफ माय ग्रँड चिल्ड्रेन : द ट्रुथ अबाउट द कमिंग क्लायमेट कॅटास्ट्रोफ अ‍ॅण्ड अवर लास्ट चान्स टू सेव्ह ह्यमुमॅनिटी’ हे पुस्तक लिहिलं आणि त्यांची नात सोफी किव्हलीहॅन हीदेखील त्यांच्या संघर्षांत सहभागी झाली. सोफी आणि तिची मैत्रीण ज्युलिआना यांनी त्यांच्या अन्य सवंगडय़ांना सोबत घेऊन हवामानबदलासाठी थेट त्यांच्या अमेरिकी सरकारलाच न्यायालयात खेचलं. ही गोष्ट २०१५ सालची. त्याच वेळी तिकडं स्वीडनमध्ये ग्रेटा थनबर्ग या शाळकरी मुलीनं हवामानबदलाविषयी आपल्या घरच्यांची ‘शाळा’ घ्यायला सुरुवात केली.. त्यांना चंगळवादाकडून पर्यावरणस्नेही जीवनशैलीकडं वळायला तिनं भाग पाडलं. गतवर्षी ऑगस्टमध्ये तर, स्वीडनच्या संसदेचं अधिवेशन सुरू असताना ती संसदेबाहेर ठाण मांडून बसली होती. ‘कर्ब उत्सर्जन कमी करण्यासाठी कृतिशील बांधिलकीची अपेक्षा बाळगणारा पॅरिस करार आपल्या देशाने पाळायलाच हवा,’ असं तिचं म्हणणं होतं. तेव्हा स्वीडनमध्ये तोंडावर आलेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वातावरणात ग्रेटानं मांडलेल्या या विचाराला उचलून धरलं गेलं. याच काळात झालेल्या एका पर्यावरणविषयक जनयात्रेत तिनं केलेलं भाषण अनेकांना प्रभावित करून गेलं. निवडणुकीनंतरही ती ठामपणे आपलं म्हणणं मांडत राहिली. ‘फ्रायडे-फॉर-फ्यूचर’ म्हणत ती दर शुक्रवारी लोकांना पर्यावरणरक्षणासाठी कृतिशील होण्याचं आवाहन करू लागली. तिला पाठिंबाही मिळू लागला. तिचे विचार प्रसारमाध्यमांद्वारे देशाबाहेर पोहोचू लागले. अनेक ठिकाणांहून तिला व्याख्यानांची आमंत्रणं येऊ लागली. ब्रुसेल्समधील युरोपीय संसदेबाहेर झालेल्या निदर्शनातील तिचं भाषण असो वा ब्रिटनच्या संसदसदस्यांसमोर केलेलं भाषण असो, तिच्या निरागस, पण ठाम बोलण्यानं अनेकांना अंतर्मुख केलं. ब्रिटनच्या संसदसदस्यांना ती म्हणाली, ‘आपण कडेलोटाकडं जात आहोत; मी बोलतेय ते तुम्हाला ऐकू येतंय ना?’ गतवर्षी डिसेंबरमध्ये पोलंड येथे झालेल्या जागतिक हवामान परिषदेत तिनं हाच प्रश्न २०० राष्ट्रांच्या प्रमुखांना विचारला होता. यंदाच्या जानेवारीत दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेसाठी जमलेल्या जगभरच्या धोरणकर्त्यांना तिनं सुनावलं होतं :  ‘हवामानबदलाचे परिणाम पाहून तुम्ही अस्वस्थ व्हायला हवं, त्याची तुम्हाला भीती वाटायला हवी.’ तिचं हे म्हणणं अनेकांना पटतं आहे, मार्च आणि मे महिन्यात झालेल्या हवामानबदला विरोधात शाळाबंद आंदोलनात जगभरच्या लाखो विद्यार्थ्यांनी  सहभाग घेतला. ग्रेटानं दिलेल्या आर्त हाकेला प्रतिसाद मिळू लागल्याचीच ही लक्षणं!

पर्यावरणीय प्रश्नांविषयी सजगता आणण्याच्या ग्रेटाच्या पहिल्या सार्वजनिक प्रयत्नाला २० ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण झालं. तिच्या या वर्षभराच्या प्रयत्नांचा एक दृश्य परिणाम ग्रंथव्यवहारातही दिसू लागला आहे. ‘नेल्सन बुक रिसर्च’ या सर्वेक्षणसंस्थेनं केलेल्या अभ्यासानुसार, गेल्या वर्षभरात हवामानबदल आणि तापमानवाढ या मुद्दय़ांची ओळख करून देणाऱ्या पुस्तकांत दुपटीनं वाढ झाली असून त्यांचा खपही दुप्पट झाला आहे. प्रकाशनसंस्थांनी याचं ‘ग्रेटा थनबर्ग परिणाम’ असं वर्णन केलं आहे!

खुद्द ग्रेटाचं एक पुस्तक मे महिन्यात आलं होतं. ‘नो वन इज टू स्मॉल टू मेक अ डिफरन्स’ या शीर्षकाच्या या ८० पानी पुस्तकात ग्रेटानं ठिकठिकाणी केलेल्या भाषणांचं संकलन आहे. ‘टाइम’ या साप्ताहिकाच्या मुखपृष्ठावर ग्रेटा प्रकटली, तशीच प्रवास-पत्रकार लिली डीयू हिच्या ‘अर्थ हिरोज्’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरही! जूनमध्ये प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकात जगभरातल्या  २० संशोधक आणि पर्यावरणवाद्यांची ओळख करून दिली आहे. त्याआधी, फेब्रुवारीत प्रसिद्ध झालेलं ‘फॅन्टॅस्टिकली ग्रेट विमेन व्हू सेव्ह्ड द प्लॅनेट’ हे केट पॅन्खर्स्ट हिचं पुस्तकही पर्यावरणरक्षणासाठी झटणाऱ्या स्त्रियांच्या कामाचा परिचय करून देणारं आहे.

याशिवाय ‘प्लास्टिक’ या विषयाबद्दलचीही काही पुस्तके बाजारात आली आहेत. एम. जी. लिओनार्डचं ‘टेल ऑफ अ टूथब्रश’ आणि नील लेटन लिखित ‘अ प्लॅनेट फुल ऑफ प्लास्टिक’ ही त्यातली दोन! तर ‘द लास्ट बटरफ्लाइज्’ हे फुलपाखरांच्या सहा दुर्मीळ प्रजातींच्या जतनासाठी झालेल्या प्रयत्नांचे वर्णन करणारे पुस्तक असो वा ‘धिस इज नॉट अ ड्रिल’ हा बंडखोरांचा जाहीरनामा असो किंवा ‘द फेट ऑफ फूड’ हे अमान्डा लिट्ल लिखित पुस्तक असो, हवामानबदल, तापमानवाढ आणि त्याचा जीवसृष्टीवर होणारा परिणाम यांचा ऊहापोह करणारी अनेक पुस्तकं गेल्या वर्षभरात प्रसिद्ध झाली आहेत.

या ललितेतर पुस्तकांबरोबरच कथात्म पुस्तकांमध्येही पर्यावरण, हवामानबदल आदी विषय डोकावले आहेत. या महिन्यात प्रसिद्ध होणारी मॅट हेगची ‘एव्ही अ‍ॅण्ड द अनिमल्स’ ही चित्रमय कादंबरी आणि सिता ब्रह्मचारी यांची ‘व्हेअर द रिव्हर रन्स द गोल्ड’ ही भविष्याचं भयचित्र रेखाटणारी कादंबरी यांची नावं त्यात प्रामुख्यानं घेता येतील.

ग्रेटानं आणलेल्या पर्यावरणभानाचे तरंग हे असे उमटू लागले आहेत. नव्या पिढीचे ‘पर्यावरणयोद्धे’ त्यातूनच तयार होणार आहेत!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2019 2:49 am

Web Title: school strike for climate mpg 94
Next Stories
1 तुरुंगातले दिवस..
2 रॉकस्टार’ स्कॉलर!
3 भगवे झेंडे आणि गोल टोप्या
Just Now!
X