जेरी पिंटो

अनुवादक या नात्यानं ‘वाचना’चा अनुभव कसा असतो? भारतात, महाराष्ट्रात, मुंबईत आणि आत्ताच्या काळात राहिल्यानं तो बदलतो का? अनुवादामध्ये ‘मूळ अर्थाची हानी’ होते, याची जाणीव नसते का अनुवादकाला?… अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ‘बुकमार्क’च्या वाचकांसाठी स्वत:मधून शोधणारा लेख…

सुविचारांवर चटकन विश्वास बसण्याच्या भाबड्या वयातही, वाचनाची आवड असल्यामुळेच फ्रान्सिस बेकनचं एक वाक्य मला हुरूप देणारं वाटायचं : ‘रीडिंग मेक्स अ फुल मॅन’- ‘वाचनाने(च) मनुष्यास परिपूर्णता येते’! ही अशी वाक्यं इतरांना ऐकवून भाव मारणं किंवा वक्तृत्व स्पर्धा गाजवणं-बिजवणं याचंही एक वय असतं. पण ते वय सरल्यानंतर सुविचार खरंच कितपत खरे, याचाही विचार सुरू होतो तेव्हा उमगतं, वाचनानं उलट आपल्याला आपल्या अपूर्णतेची जाणीव दिलीय.

ही जी वाचनानंतरची अपूर्णता आहे, तिची जाणीव होण्यासाठी भारतात तर केवढ्या भाषांचे पर्याय आहेत! वाचन करायचं तर लिपीओळख हवी. आमच्या वेळी शाळेत दोन लिप्या शिकवायचे : रोमन आणि नागरी (‘आमच्या वेळी’ म्हणालो, पण तो काही फार जुना काळ नव्हे. त्याआधी मोडी लिपीसुद्धा शिकवायचे. १९५० च्या दशकात कधीतरी बंद झालं ते, हे काही बरं नाही झालं. कदाचित अजूनही, मोडीचा समावेश ऐच्छिक लिपी म्हणून करायला काय हरकत आहे? किमान महाविद्यालयीन पातळीवर तरी? असो). मग पुढे गुजराती शाळेतल्या मुलांना गणित शिकवू लागलो तेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी गुजराती लिपीसुद्धा शिकून घेतली. त्याहीनंतर बाबरी मशीद पडल्यावर उर्दू लिहाय-वाचायला शिकलो.

लिखाण/अनुवाद यांबरोबरच सोफिया पॉलिटेक्निकमध्ये ‘सामाजिक संज्ञापन विभागा’त (सोशल कम्युनिकेशन्स डिपार्टमेंट) मी शिकवतोसुद्धा. हे डिपार्टमेंट देशातल्या पदव्युत्तर माध्यम-अभ्यास विभागांमध्ये ‘अव्वल दहां’पैकी आहे. इथल्या मुलांना दरवर्षी मी एक स्वाध्याय

देतोच : तुम्ही तुमच्या भाषेतल्या एखाद्या कवितेचा इंग्रजीत अनुवाद करायचा. हे अनुवाद हाती आल्यावर वाटतं की, इंग्रजीखेरीज मराठी, हिंदी, गुजराती अशा कितीएक भाषांमधून भारताचा आत्मा अभिव्यक्त होत असतो, त्याला आमची ही मानवंदनाच.

हा स्वाध्याय देण्यापूर्वी विद्यार्थ्यांशी बोलताना एकदा म्हणालो, ‘‘कल्पना करा की, एखाद्या माणसापुढे इच्छाभोजनाची जंगी मेजवानी मांडलीय… शेकडो चवीपरींच्या पदार्थांमधून काहीही खाऊ शकतोय हा माणूस, पण तो म्हणतो- मी बटर चिकनच खाणार. दिवसेंदिवस हा आपला मेजवानीला जातोय आणि बटर चिकनच खातोय. का, तर त्याला ते आवडतं म्हणे. पण समोर आमट्यांपासून ‘पसंदा’पर्यंत आणि डोशांपासून पास्त्यापर्यंत जिभेचे नि पोटोबाचे सारे चोचले पुरवणारं इतकं कायकाय आहे, ते याला नकोय… काय म्हणाल तुम्ही अशा माणसाला?’’

अख्ख्या वर्गानं पटकन उत्तर दिलं : बहुतेकजण म्हणाले ‘मूर्ख!’, काहीजण म्हणाले, ‘झापडबंद!’

त्या दिवशी रोजच्यासारखं बसनं माहीमकडे येताना मला वाटू लागलं : मीच तर नसेन ना तो माणूस?

होय. मीच तो.

हिंदी, मराठी, उर्दू, गुजराती, इंग्रजी आणि फ्रेंचही येतंय वाचता मला, पण घरच्या बुकशेल्फावर बहुतेक सगळी पुस्तकं इंग्रजीच. नाही म्हणायला मोनिएर विल्यम्सचा संस्कृत-इंग्रजी, मोल्सवर्थचा मराठी-इंग्रजी, फ्रेंचसाठी ‘लारूश’ आणि ऑक्सफर्ड-ड्युडेनचा ‘चित्रमय’ शब्दकोश, एवढ्या कोशांचेच अपवाद. आपण आपल्या सवयी बदलायलाच पाहिजेत; जितक्या भाषा-लिप्या मला वाचता येतात त्या सगळ्या भाषांमधलं साहित्य वाचलंच पाहिजे, असं मी ठरवलं. कवितेपासनं सुरुवात केली; कारण कविता हा सर्वांत कमी आकाराचा, पण वाचून उमजायला तसा जड साहित्यप्रकार. हिंदी, मराठी, उर्दू भाषांतले काही शे कवितासंग्रह विकत घेतले. प्रत्येक भाषेतलं एकेक पुस्तक रोज उशाशी ठेवायचं. दररोज झोपण्यापूर्वी एक तरी कविता वाचायचीच, आणि तुकारामांचा किमान एक अभंगही वाचायचा. (‘कवितावाचन निजण्यापूर्वी, शुभस्वप्नांची हौस पुरवी’ – जेरी पिंटो यांचा सल्ला!)

पाल्हाळ न लावता सांगायचं तर, वाचलेल्या कवितांच्या ओळींचं स्वत:पुरतं स्पष्टीकरण शोधता-शोधता मी अनुवादक झालो. हो, अगदी मलाही माहितेय की कवितेतून अर्थ नसतो काढायचा, कविता ‘असते’- तिला असू द्यायचं असतं. पण परिचित नादानं गुंजणाऱ्या व अपरिचित वासांनी मोहवणाऱ्या एखाद्या भाषेतले नुसते शब्दच तुमच्यापुढं आले तर कविता ‘असू’ तरी कशी शकेल? ती काय सांगते आहे ते तुम्ही ऐकू लागता, तिचे वास कशाचे याचा विचार करू लागता. यात काहीतरी नक्कीच हरवणार असतं, अगदी पहिल्यापासनंच अर्थाच्या गर्तेकडे वाचकाची घसरण सुरू होते आणि कवी मात्र ‘कवितेच्या असतेपणा’चे डोंगर सहज ओलांडत राहतो. कवीकडची ही जी कविता ‘असते’, ती कुठल्या एखाद्या भाषेनं बांधलेली नसतेच, ती मेंदूच्या कुठकुठल्या भागांत असते- ‘मना’त असते. ती संगीताचा नाद असते, वासामागला स्वाद असते, एखादी आस असते… ही आसही पुन्हा एखाद्या सांगीतिक धुनेची असेल किंवा घमघमत्या वासाची असेल. यातलं काहीच नसू शकतं, किंवा सारंच असू शकतं. झपूर्झाच अवस्था ती! एका भाषेतला वाचक जर दुसऱ्या भाषेतला कवी असेल, तर मग वाचलेल्या भाषेतल्या झपूर्झेला तो बरोब्बर पकडतो… आणि मग काय करतो? तर तिला आपल्या भाषेत आणता-आणता, शब्दांचे सपासप वारही करतोे!

नाहीतरी, एकदा लिहून झाल्यावर जे काही उरतं ते कलेवरच असतं शब्दांचं.

वाचक कवितेच्या कलेवरात प्राण फुंकतो.

पण जेव्हा कवितेत प्राण फुंकण्याचं, तिला नवा श्वास देण्याचं काम वाचक करत असतो, तेव्हा कवितेचा आत्माही नवाच होत असतो. अशी, वाचकाकडली कविता आता पुन्हा हिंडूफिरू शकते खरी; पण अखेर ती ‘भटकती आत्मा’ असते… भाषेच्या कपाटातून, शब्दांच्या सांगाड्यातून जिवंत झालेलं अर्थाचं भूत. पण या भुतांचाही सदुपयोग केला जाऊ शकतो. ते निराळ्याच ठिणग्या चेतवील, ‘वी शॅल ओव्हरकम’ऐवजी ‘होंगे कामयाब’ म्हणत क्रांतीची मशालसुद्धा धरील.

तेव्हा यापुढे कधीही, एखाद्या अनुवादकापुढं ‘‘पण किती नुकसान होतं नाही, अनुवाद करताना…’’ ही तुमची लाडकी तक्रार मांडण्याआधी याद राखा… म्हणजे खरंच, ध्यानात राहूदे तुमच्या… की, नुकसान कितीकिती आणि कुठेकुठे होतं ते त्या अनुवादकालाच सर्वांपेक्षा जास्त माहीत असतं.

कारण अनुवादकाचं वाचन हे नेहमी भीतीच्या सावटाखाली आणि आनंदाच्या छत्रछायेखाली होत असतं. या सावल्या इतक्या मिसळून गेलेल्या असतात एकमेकींमध्ये की, त्या वेगळ्या नाहीच काढता येत. अशानं वाचण्याची क्रियाच बदलते, तोल सांभाळण्याच्या जीवघेण्या कसरतीसारखी होऊन जाते. एका बाजूला असतात अर्थ- शाब्दिक, मृतवत् अर्थ. या वाच्यार्थाच्या दुसऱ्या बाजूला असते ती लक्ष्यार्थाची, रूपकांची, त्यामागल्या संस्कृतीची विशाल भूमी. या भूमीवर कुठल्याही शब्दाला ‘एक आणि एकच’ अर्थछटा असत नाही कधीच. या छटांमधले अर्थरंग अगणित असतात आणि त्यांपैकी काही तर भयंकर वैयक्तिक असतात. मला इथं शान्ता गोखलेंची तगमग आठवते… प्रभाकर बरवेंच्या ‘कोरा कॅनव्हास’चा अनुवाद करताना बरवेंचा शब्द होता ‘चटणीचा हिरवा रंग’!

तर वाचकहो, हे असे शब्द तुम्ही वाचत असता.

ही चटणी हिरवी असणारच, पण नेमकी कशी आणि किती हिरवी? कुठल्या चटणीचा रंग की हो हिरवा? आमची गोव्याकडली चटणी मिरच्या-कोथिंबिरीमुळे हिरवीच असते, पण त्यात आत्ता खवलेलं ओलं खोबरं असतं भरपूर, म्हणून पांढरट असते ती… आणि चवीला चिंच असते, म्हणून मध्येच तपकिरी दिसते ती! आता खोबऱ्याऐवजी डाळं असेल तर वेगळी दिसेल ती… म्हणून प्रश्न पडतोय, कुठल्या चटणीचा रंग की हो हिरवा? चित्रकार बरवे… त्यांच्या चटणीचे रूप कोणते हिरवे? नेमक्याच छटेबद्दल बोलत होते ते; पण ती त्यांच्या चटणीची छटा.

आपल्याला नाहीब्वॉ माहिती… कसं माहीत होणार? फार तर अंदाज करू शकतो आपण. किंवा चित्रकार ललिता लाजमींना विचारू या, बरवेंच्या घरी कधी गेलात आणि चटणी खाल्ली – किमान पाहिली तरी- असं झालंय का? किंवा मग अंदाजच बांधू या, बरवे कोकणातले… तिथे किती हिरवी असते चटणी?

एवढं केलं, तरी अंदाजच हो हे सगळे!

वाचनाची क्रिया ही अशीच असते. अंदाज बांधत-बांधत आपण आपले रस्ते शोधत असतो. आपल्याला वाटत असतं आपण समोरचा मजकूर वाचतोय, पण आपल्याला कल्पनाही येणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात आपण आपल्यालाच त्या मजकुरात आणतो. हे प्रत्येक वाचक करतोच. होतंच ते. मजकुराचं मूळचं आतलं काय आणि वाचकानं वाचताना मिसळलेलं बाहेरचं कायकाय, हे नाही सांगता येत. पण अनुवादकाला या आतलेपणा-बाहेरचेपणाची निराळी पातळी गाठावी लागते. अनुवादकांनी स्वत:च्या वाचनक्रियेला करडेपणानं वाचायचं आणि समोरच्या पुस्तकाच्या, मजकुराच्या प्रेमातही पडायचं. कारण भारतात तरी, एखादं पुस्तक आवडलं- त्याच्या प्रेमात पडलात, म्हणूनच तुम्ही त्याचा अनुवाद हाती घेता. त्यावर कामबीम करता- करावंच लागतं- आणि मगच तुमच्या प्रेमाचं फळ तुम्हाला मिळतं. अशा वेळी तुम्ही ते पुस्तक इतक्यांदा वाचलेलं असतं व त्या पुस्तकाच्या इतके जवळ तुम्ही गेलेले असता की, कंटाळाच येतो जवळपास. तुम्ही काम करत असता, कधी एखादा क्षण असा येतो की, बास झाला हा काच आणि आता नवं, निराळं वाचावं काहीतरी, असं होऊन जातं तुम्हाला. तरीही तुम्ही पुन्हा त्याच कामाला लागता, कारण तुम्ही एक निष्ठावंत अनुवादक असताच आणि  घेतलेलं काम आहे म्हणून तुम्ही पूर्ण करताच, पण तुमची काहीएक कर्तव्यभावनाही असते त्यामागे. शिवाय अनुवाद करत राहणं, ही आत्ताच्यासारख्या काळात आपल्यासारख्या देशाचीही गरज असते.

अनुवादक वाचतो, कारण वाचण्यामधून अपूर्णतेची होणारी जाणीव अनुवादकाला कोणाहीपेक्षा जास्त असते. वाचण्यामुळे ही अपूर्णता भरून नाही निघत; उलट वाचनानं ती आणखीच उंचनीच होते, आणखीच खुलू लागते, त्यात भीतीची धाकधूक असतेच, पण आनंदी धडधडही असते.

बालसाहित्याचे एक प्रकाशक एकदा मला सांगत होते, ‘‘मुलांनी एखादं पुस्तक वाचून संपवल्यावर, तशीच आणखीही खूप पुस्तकं असल्याचं त्यांना कळलं तर त्यांना आवडतं… म्हणून तर एनिड ब्लायटन किंवा भा. रा. भागवतांची पुस्तकं त्यांना आवडतात, कारण खूप असतात ती! आणखीही असंच आपण वाचू शकतो, ही भावना मुलांना सुखावते.’’

आता प्रश्न पडतो, अनुवादकसुद्धा न वाढलेली मुलंच की काय? कारण त्यांनाही वाचायला आवडतं, मग आवडलेल्यासारखं आणखीही खूप खूप वाचायला आहे, हेही अनुवादकांना हवंच असतं?

लेखक इंग्रजीतले कवी, बालकथाकार असून ‘बलुतं’, ‘रणांगण’, ‘कोबाल्ट ब्लू’, ‘मला उद्ध्वस्त व्हायचंय्’ आदी मराठी पुस्तकांचे इंग्रजी अनुवाद त्यांनी केले आहेत.

assignments.for.jerry@gmail.com