शहरातल्या स्त्रिया म्हटलं, की हमखास डोळ्यांसमोर येणाऱ्या प्रतिमा या टोकाच्या द्वैती असतात. एक तर दयनीय अबला माता किंवा कमनीय भुलवणाऱ्या तरुणी अशी दोन संपूर्णत: विरोधी अशी टोकं! त्यामुळे सिनेमा-नाटकांपासून सुप्रसिद्ध कादंबऱ्या-आत्मचरित्रांपर्यंत आपल्याला सार्वजनिक क्षेत्रात भेटतात त्या असामान्य स्त्रिया- बळी किंवा गौरवपूर्ण जीवन जगणाऱ्या नायिका. ‘सेल्फिंग द सिटी : सिंगल वुमेन मायग्रन्ट्स अ‍ॅण्ड देअर लाइव्हज् इन कोलकाता’ या इप्शिता चंदा यांच्या संशोधनावर आधारित वाचनीय ग्रंथात भेटणाऱ्या कोलकाता शहरातल्या स्त्रिया मात्र अशा साचेबद्ध प्रतिमांच्या पलीकडच्या जिवंत माणूसरूपात भेटतात. विविध वयांच्या, विविध थरांतल्या, वेगवेगळ्या सामाजिक जगातल्या या स्त्रियांनी स्वेच्छेनं आपला जगण्याचा पस निवडला आहे. एकूण तीनशे स्त्रियांचा हा अभ्यास सर्वेक्षण, गटचर्चा आणि निरीक्षणांवर आधारित आहे. या स्थलांतरित स्त्रियांपैकी केवळ चार जणी वगळता बाकी सगळ्या जणी एकल (एकटय़ाने राहणाऱ्या) स्त्रिया आहेत. शहरात येण्याची त्यांची कारणं आणि निमित्तं अक्षरश: व्यक्तिपरत्वे  भिन्न आहेत. कोणी शिक्षणाच्या निमित्ताने, कोणी व्यवसायाच्या कारणाने या शहराला आपलं मानलं आणि येथे स्थिरावल्या आहेत. जगण्याचा संघर्ष करता करता त्यांनीही हे शहर आपलंसं केलं, वाढवलं. शीर्षकातल्या ‘सेल्फिंग’ या संज्ञेचं हे प्रयोजन.

स्थलांतरितांच्या ‘स्वत्वा’चा हा शोध असला, तरी त्यातला ‘स्त्रीत्वा’चा भाग तेवढाच महत्त्वपूर्ण असल्यामुळे चित्राची चौकट मांडण्यात लेखिकेने बरीच पानं खर्ची घातली आहेत. एकीकडे प्रतीकात्मक आंतरक्रियावादाची सद्धांतिक मांडणी स्वीकारून दैनंदिन व्यवहारांवर भर दिला आहे. तर दुसरीकडे, मिशेल फूको-रोलॅण्ड बार्थ यांच्या मांडणीचाही वापर केला आहे. त्यासोबतच पुरुषप्रधान व्यवस्थेतल्या अपरिहार्य अवमूल्यनातून सुटकेसाठी शहर हाच मार्ग स्त्रियांना का वाटतो, हे चंदा स्वत:च्या उदाहरणावरून सप्रमाण मांडतात. शिवाय ‘आधुनिकतेचं द्वार’ ही शहराची ओळख आजही सरंजामी मानसिकतेच्या बेडय़ांचा सातत्यानं अनुभव घेणाऱ्या स्त्रियांना आकर्षित करते. स्थलांतरित स्त्री ही हळूहळू  स्थिरावलेली स्त्री कशी होते, त्याचाही एक पट या वेगवेगळ्या कहाण्यांतून उलगडत जातो. त्यांचे नेहमीचे मित्रमत्रिणी, जवळचे नातेवाईक यांचं एक वर्तुळ या शहरातली त्यांची नवी ओळख घडवतं.

सामाजिक अवकाशाच्या संदर्भात फ्रेंच समाजशास्त्रज्ञ हेन्री लफव्र (Henri Lefebvre) यांच्या ‘द सोशल प्रोडक्शन ऑफ स्पेस’ या आता काहीशा सर्वमान्य झालेल्या संकल्पनेचा वापर चंदा विश्लेषणासाठी करताना दिसतात. केवळ शहर  स्त्रियांना काही देतं इतकंच नाही, तर स्त्रियासुद्धा शहरांना अनेक गोष्टी देत असतात, ही अंतर्दृष्टी या मुलाखतींचा अर्थ लावताना सातत्याने उपयोजित केलेली आहे. या स्त्रिया एक वेगळं भविष्य घडवण्यासाठी धडपड करताना दिसतात. स्त्रियांचं हे कत्रेपण विविध उद्धृतांतून पुढे येतं.

सरस्वती राजू यांच्या भारतातील स्त्रिया आणि स्थलांतराविषयीच्या पूर्वप्रकाशित कल्पनांचा वापरही या पुस्तकात केलेला आढळतो. या विवाहामुळे स्थलांतरित झालेल्या स्त्रिया नाहीत, तर नवी ध्येयं संपादण्यासाठी कोलकात्यात आलेल्या आहेत. काही महाविद्यालयीन तरुणी प्रथमच घर सोडून बाहेर पडल्या आहेत, तर काहींनी आधी शिक्षण, मग नोकरी किंवा व्यवसायासाठी स्थलांतर केलेलं आहे.

निरनिराळ्या जीवनपद्धती अंगीकारलेल्या या दोनशेपेक्षा जास्त स्त्रिया एका अर्थाने व्यक्तिवादाच्या तटबंदीतल्या एकांडय़ा बेटांवर राहत आहेत. धनबाद, सिलिगुडी, अगरतळा, ग्रामीण पश्चिम बंगाल, बोकारो, पटना, भुवनेश्वर, गंगटोक, नबद्वीप, जलपगुडी, सुंदरबन ही मूळ गावं असणाऱ्या या स्त्रिया कोलकात्यात आपलं एक स्वतंत्र विश्व उभं करू पाहात आहेत. चंदा ही बाब सुयोग्यपणे नोंदवतात, की एकीकडे जुन्या कौटुंबिक पुरुषप्रधान बेडय़ातून सुटू पाहणाऱ्या या सर्व जणी कोलकात्यातल्या शैक्षणिक, व्यावसायिक, महानगरी जीवनातल्या बेडय़ा मात्र स्वीकारत तरी आहेत किंवा डोळ्याआड करत आहेत. बहुतेकींचा अनुभव कोलकाता हे तुलनेनं सुरक्षित शहर आहे, असा आहे.

एकीच्या मते, कोलकाता कौटुंबिक ओळख असणारं शहर आहे, त्यामुळे अधिक सुरक्षित वाटतं. परंतु अनेकींनी अपरात्री प्रवासातून परतल्यावर असुरक्षित वाटतं, असं नोंदवलं आहे. काहींनी लैंगिक छेडछाडीचे अनुभव आल्यावर वाटलेलं एकटेपण, कोणीच मदतीला उभं न राहणं सविस्तर सांगितलंय, तर काही जणींनी अशा वेळी गावरान भासणाऱ्या पोलिसांनी आणि सहकाऱ्यांनी, घरमालकांनी किती सहृदयतेनं मदत केली, ते सांगितलं आहे. परंतु त्यातही अधोरेखित झालंय ते नव्या रूपातल्या पुरुषप्रधान व्यवस्थेनं स्त्रियांना नव्या बेडय़ात अडकवणं. सलग सोळा-सोळा तास ताणाचं काम, सततची फिरती, स्वत:ला सिद्ध करण्यातली कुतरओढ, तरीही गृहीत धरावं असं कोणी मदतीला नसणं याचे उल्लेख पानोपानी सापडतात. त्यातही स्त्रियाच या पुरुषप्रधान व्यवस्थेच्या मध्यस्थ म्हणूनही या स्थलांतरित स्त्रियांच्या वर्तनावर कशी कडक रखवालदारी करतात, हेही एका व्यवसायानं डिझायनर असणाऱ्या स्त्रीनं सांगितलं आहे. दक्षिण कोलकात्यातल्या एका उच्चभ्रू वसाहतीत ती भाडय़ानं राहत असताना, तिने तिथल्या घरमालक स्त्रियांच्या शिळोप्याच्या गप्पांत आपल्या मुलांना ‘असल्या’ मुलींपासून जपून राहायला आपण कसं सांगतो, कारण या विनापाश स्त्रिया कशा बेलगाम असतात, त्या धोकादायक असतात, वगरे सांगताना ऐकलं आणि राहण्याच्या वस्तीवर तिथल्या रहिवाशांची मतं अवलंबून नसतात हे लख्खपणे कळलं, असं ती नोंदवते. काहींनी मात्र या शहरात आपण एकटय़ा दहा वर्षांहून अधिक काळ राहत आहोत, हे कळल्यावर अनेकांना आदर वाटल्याचं सांगितलं आहे.

एका शहराविषयी बोलताना स्थलांतरित अपरिहार्यपणे तुलनेच्या दृष्टीनं बोलतात. जसं, समलिंगी संबंधांबाबत बोलताना बहुतेक स्थलांतरित स्त्रियांनी असे संबंध त्यांना हॉस्टेलमध्ये क्वचित आढळले, असं म्हणतानाच, पण कोलकाता समलिंगी संबंधांविषयी कर्मठपणे, बुरसटलेल्या दृष्टीने पाहतं, असं मत दिलं आहे. या अनुषंगाने कोलकाता शहर हे पटणा, बोकारोपेक्षा उदार, पण मुंबईपेक्षा संकुचित अशी तुलनाही केली आहे. अर्थात, हाही आपल्या मनात विविध शहरांविषयी असणाऱ्या साचेबद्ध कल्पनांचाच परिणाम आहे. कारण या प्रतिसादींनी समलिंगी संबंध असणाऱ्या स्त्रियांचे अनुभव वा त्याविषयीच्या घटना ना बोकारोत अनुभवल्या आहेत, ना मुंबईत!

शहरांचे नकाशे, त्यातले विविध भाग आणि त्यातले ताणेबाणे ही जिवंत बाब असते. त्यासोबतच प्रत्येक शहरात प्रतीकांची एक विशिष्ट चिन्हरचना असते. व्यक्ती दैनंदिन व्यवहारांवर या विशिष्ट चिन्हांची मोहोर उमटवत असतात. त्यातून चितारली जाणारी नक्षी व्यक्ती आणि शहर यांचं नातं क्षणोक्षणी रेखाटत असते. कोलकात्यातलं सामाजिक विश्व पाडय़ाभोवती गुंफलेलं आहे. या प्रत्येक पाडय़ाची लय, रंग, भाषा वेगळी असली, तरी स्थलांतरित स्त्रियांच्या नजरेतून पाहिलं असता मात्र वेगळं चित्र दिसतं. कोलकाता एकाच वेळी भारतातलं जुनं मोठं महानगर आहे, आणि त्याच वेळी बंगाली भाषा, संस्कृती, त्या भाषा, आणि संस्कृतीचा विशिष्ट उच्चवर्णीय भद्रलोकांचा लहेजा सांभाळणारं अत्यंत जुनाट बुरसटलेलं गाव आहे. म्हणून सुंदरबनातल्या स्त्रियांनाही इथे उपरं वाटतं आणि गंगटोक, जलपायगुडीच्या स्त्रियांना पूर्ण परकं.

शहरातल्या रस्त्यांवरून चालणं हा कोणतंही शहर आपलंसं करण्यासाठीच्या प्रयत्नातला एक मोठा मनोज्ञ भाग असतो. अर्थात, मुळात स्त्री आणि त्यातही स्थलांतरित असेल, तर तिचं सार्वजनिक अवकाशातलं वावरणं शक्यतो सकारण आणि तेही समाजमान्य कारणाने नसेल, तर आजही ती लैंगिकदृष्टय़ा, नतिकदृष्टय़ा, सामाजिकदृष्टय़ा संशयितच ठरते. त्यामुळे रस्त्यांवरून मनमुराद भटकण्याचा अनुभव या स्त्रियांना पुरुषांइतका नसणार, हे गृहीत आहे. परंतु विविध व्यवसायांतल्या उच्चपदस्थ स्त्रिया शहराच्या सार्वजनिक जगाचा अनुभव पूर्वीपेक्षा मोकळेपणाने घेत आहेत, हे नि:संशय. मेट्रोचा प्रवास, अपरात्री विमानप्रवास करून परतल्यानंतरचा कोलकात्यातला प्रवास हे सर्व अनुभव नव्या स्वातंत्र्याची अनुभूती स्त्रियांना देत आहेत, परंतु त्याच वेळी त्या महानगरी स्वातंत्र्याच्या अनुभूतीला पुरुषप्रधानता, आर्थिक स्थिती यांची न तोडता येणारी बंधनं आहेत, हेही त्या मांडतात. कोलकात्यातल्या त्यांच्या घरी, प्रवासात, कामाच्या ठिकाणी सगळीकडे या त्रिशंकू अवस्थेत जगावं लागतं, हे त्या वारंवार मांडतात. तर फावला वेळ आणि करमणूक आज उच्च मध्यमवर्गीय स्त्रियांच्या वाटय़ाला येते आहे, असं निरीक्षणही मांडलेलं दिसतं.

एका अर्थाने, स्थलांतर हे ‘स्व’च्या विकासाला मोठी चालना देत राहतं. कोलकात्यातल्या स्थलांतरामुळे या स्त्रियांनी त्यांच्यातले बदल, मोठं होणं, सुटं होणं नोंदवलं असलं, तरी ‘स्व’विषयीची काही नवी मांडणी या कथनातून हाती लागत नाही. पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात ‘तुमच्या अपेक्षा काय?’ असं विचारल्यावर, बहुतेकींनी आमच्याविषयीचे ‘उपरे’ म्हणूनचे पूर्वग्रह कमी व्हावेत, पुरुषांचा पुरुषी अहंगंड कमी व्हावा, असं सांगितलं. त्याचबरोबर एका प्रतिसादीनं कोलकातासकट सर्व शहरांतल्या सोयीसुविधा, व्यवहार हे ‘कुटुंब हे केंद्र’ मानून त्या पद्धतीनं केले जातात, याकडे लक्ष वेधलं आहे. त्याऐवजी शिकल्यासवरलेल्या, व्यवसाय-नोकऱ्या यशस्वीपणे करणाऱ्या, स्वेच्छेनं एकटं आयुष्य आनंदानं, जबाबदारीनं जगणाऱ्या शेकडो स्त्रियांचं अस्तित्व मान्य का केलं जात नाही, असा योग्य सवाल त्या विचारतात. एक स्त्री प्रमुख असलेलं सरकार एकटय़ा स्त्रियांना तीन खोल्यांची अपार्टमेन्ट्स घेण्यासाठी स्वतंत्र कर्जयोजना का आणत नाही, असा सवालही केला आहे.

बऱ्याच स्त्रियांनी आता ‘न घर का, न घाट का’ अशी अवस्था झाल्याचं नोंदवलं आहे. अनेक जणींनी घरी गेल्यावर आपलं जुनं स्वत्व आणि आजचं स्वत्व यातलं द्वंद्व जाणवतं, असं महत्त्वपूर्ण निरीक्षण मांडलं आहे. त्यासोबतच मुळातच एकटी स्त्री हा आजही एक समाजमान्य नसणारा जगण्याचा प्रकार आहे, असं आम्हाला दाखवून दिलं जातं, हे निरीक्षण महत्त्वाचं आहे. काहीच कारण नसताना एक स्त्री एकटी का, असा प्रश्न भारतात महानगरात आजही सांस्कृतिकदृष्टय़ा समर्थनीय ठरतो, हे त्यामागचं सत्य आहे. एक विक्री क्षेत्रातली उच्चपदस्थ स्त्री आणि हॉटेल उद्योगातली उच्चपदस्थ स्त्री असं म्हणते, की ‘आमच्या नोकऱ्या इतक्या ताणाच्या, पण तितक्याच आनंद देणाऱ्या आहेत. कोणी तितकं मनासारखं भेटलं, अगदी नोकरी सोडण्याइतकं- तर करू वेगळा विचार, पण मुळातच आम्ही आज समाधानी, आनंदी आयुष्य जगतोय, हे केवळ समाजानं मान्य करावं, एवढंच.’

मुक्तीचा खरा अर्थ काय, या प्रश्नावर ‘स्त्रियांची केवळ पुरुषांशी बरोबरी म्हणजे उदारमतवादी स्त्रीवादातली समानतेची अपुरी कल्पना’ हे  यातील बहुतांश प्रतिसादींच्या उद्धृतातून पुढे येतं. यातून बऱ्याच जणींचा मुक्तीचा विचार पुरुषांप्रमाणेच आपलं व्यावसायिक यश, कुटुंबीयांच्या गरजा भागवणं, अधिक फ्लायओव्हरमुळे रोजचं जाणं-येणं सुखद होणं, स्वतंत्र घर घेणं इतपतच सीमित आहे. अर्थात, भारतासारख्या जगण्याची मारामार आणि संघर्ष तीव्र असणाऱ्या समाजात या खूप झगडून मिळवाव्या लागणाऱ्या गोष्टी आहेत, हे मान्य आहे.

हा आत्मभानाचा पस विस्तारित न झालेल्या मर्यादित शहरी स्वातंत्र्यात मग्न असणाऱ्या या कहाण्या त्यामुळेच वाचकाला एक प्रकारचं असमाधान देतात.

स्थलांतरित म्हणून स्त्रीनं राहणं म्हणजेच स्वत:ची नवी अस्मिता आकाराला आणणं. या बाबतीत लेखिकेनं स्व, स्वप्रतिमा, अस्मिता याविषयीचा मोठा संशोधनविषयक परीघ मांडला असला, तरी त्यातून परंपरा-आधुनिकता यांतील द्वंद्व, शहरी आणि ग्रामीण यांतील द्वंद्व किंवा कृतक् स्त्रीवादी आणि सोयीस्कर महत्त्वाकांक्षी व्यक्तिवाद यांतील भेद पुरेशा स्पष्टपणे हाताळलेले नाहीत.

भारतीय संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीवर आधारित पूर्वग्रहातून मुक्तता मिळवण्यासाठी ‘शहरांकडे जा!’ असा संदेश दिला होता. अलीकडच्या काळात सुखदेव थोरात, सुरिन्दर जोधका, अश्विनी देशपांडे या अभ्यासकांनी प्रत्यक्षात शहरी आयुष्यात वाटय़ाला येणाऱ्या स्वप्नभंगाच्या परी संशोधनातून नोंदवल्या आहेत. परंतु चंदा यांच्या विश्लेषणात ग्रामीण भागातल्या, गरीब घरातल्या, वेश्या म्हणून विकल्या गेलेल्या, प्रेमप्रकरणात घरून पळून आलेल्या पण लैंगिक क्रयवस्तू बनलेल्या किंवा जातीय दंगली, धार्मिक दंगलींमुळे शहरात पळून आलेल्यांपैकी कोणी स्त्रिया या पुस्तकात भेटत नाहीत. तसंच, सर्वच मोठय़ा शहरांत कचरावेचक, घरकामगार स्त्रिया या मोठय़ा प्रमाणात एकल स्थलांतरित आहेत. अगदी कनिष्ठ मध्यमवर्गीय व्यावसायिकांत ब्यूटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या तरुणी, मॉलमधल्या विक्रेत्या अशा अनेक घटकांचा समावेश होतो. त्या इथे पूर्णत: अदृश्य आहेत. प्रस्तुत पुस्तकात केवळ मध्यमवर्गीय सुशिक्षित तरुणींविषयीची माहिती मिळते.

शहरांकडे स्थलांतरित होणाऱ्या तरुण स्त्रियांच्या बाबतीत लिंगभावाधारित अस्मितेपासून सुटका करून घेता येते का, या प्रश्नाचं पुरेसं स्पष्ट उत्तर या ग्रंथात सापडत नाही. येत असेल तर कशी आणि नसेल तर का नाही, याचंही उत्तर मिळत नाही.

कोलकाता शहराला आपलं मानणाऱ्या, आपलंसं करणाऱ्या, इतकंच नव्हे तर हे शहर आपल्या प्रतिसादांनी, व्यवहारांनी बदलणाऱ्या-रचणाऱ्या या स्त्रिया आणि त्यांचं कत्रेपण हे पुस्तक मुखर करते, परंतु त्या पलीकडची सखोल उत्तरं देत नाही. बाईपणाचा चूलमूल हा पारंपरिक उंबरा ओलांडलेल्या स्थलांतरित स्त्रियांचं विश्व तर इथे दिसतं, पण त्यातले पेच, अरिष्टं आणि काळोख्या जागा तर दिसत नाहीत, असं हे पुस्तक वाचून वाटत राहतं.

  • ‘सेल्फिंग द सिटी : सिंगल वुमेन मायग्रन्ट्स अ‍ॅण्ड देअर लाइव्हज् इन कोलकाता’
  • लेखिका : इप्शिता चंदा
  • प्रकाशक : सेज/स्त्री, नवी दिल्ली
  • पृष्ठे : ३२२, किंमत : ९९५ रुपये

– श्रुती तांबे

shruti.tambe@gmail.com