18 January 2019

News Flash

एका ‘कार्टी’चं आत्मकथन

लेखिका असणं आणि जगणं या दोन्हींबद्दल हे पुस्तक बरंच काही सांगून जातं..

लेखिका असणं आणि जगणं या दोन्हींबद्दल हे पुस्तक बरंच काही सांगून जातं..

किरण नगरकर एकदा तिला म्हणाले होते, ‘तू अगदी कार्टी आहेस.’ त्या एका शब्दाने तिला तिच्या साठ वर्षांपूर्वीच्या बालपणात नेलं, जेव्हा तिची आजीही तिला कार्टी म्हणायची. गेल्या साठ-सत्तर वर्षांत काहीच बदललं नव्हतं? नाही.. उलट ते ‘कार्टीपण’ जपणाऱ्या आणि आज सत्तरीतही ते जगणाऱ्या शोभा डे यांचं हे पुस्तक. त्यांचं ‘कार्टी’ असणं हेच त्यांच्या मते, या पुस्तकाचा ट्रिगरही आहे आणि टोनही. म्हणूनच त्याचं शीर्षकही आहे, ‘सेव्हन्टी.. अ‍ॅण्ड टू हेल विथ इट..’

हे पुस्तक एका अर्थी त्यांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या जगण्याचा कॅलिडोस्कोप आहे. त्याचं वैयक्तिक/ कौटुंबिक आयुष्य, सामाजिक आयुष्य आणि लेखक म्हणून भरभरून जगलेलं ५० वर्षांचं आयुष्य. यातल्या विविधतेमुळे आणि कधी याही वयात जपलेला खटय़ाळपणा, कधी आत्मटीका, कधी हळवेपण, कधी विश्लेषण तर कधी उपदेशवजा सल्ले यांतून हे पुस्तक त्यांच्या ७० वर्षांच्या जीवनप्रवासाइतकंच बदलत गेलेल्या समाजाचं (अर्थात विशिष्ट वर्गाचं) चित्रही उमटवत जातं.

पुस्तक जरी आत्मकथनपर असलं तरी ते आत्मचरित्र नाही त्यामुळे प्रसंगांची जंत्री नाही. विविधरंगी अनुभवांच्या या कॅनव्हासचा सर्वात मोठा भाग आहे तो त्यांच्या लेखन -कारकीर्दीचा. सुरुवातीच्या काळात तीन महत्त्वाच्या मासिकांचं संपादन केल्यानंतर, वृत्तपत्रांत लेख लिहिणं आणि त्याच दरम्यान २० पुस्तकं स्वत:च्या नावावर जमा करणं हे त्याचं योगदान. सध्या चार मुख्य इंग्रजी वर्तमानपत्रांत त्यांचं सदरलेखन सुरू आहे. इतकं लिहितं राहण्यासाठी संयम आणि सातत्य हवंच, पण त्यांच्या पुस्तकातून आणखी काही सूत्रं कळतात : त्या रोजच्या रोज किमान १५०० ते २००० शब्द लिहितातच, अगदी आजही, सत्तरीतही. आणि या लेखनासाठी ‘माझा कोपरा’ वगैरे त्यांना लागत नाही. अगदी मुलांमध्ये बसून त्यांच्या गडबड-गोंधळातही त्या लिहू शकतात. पण तो लिखाणाचा वेळ त्यांच्यासाठी अत्यंत ‘पवित्र’ असतो. त्या लिहितात, ‘माझं लिखाण मला शहाणं करतं, मला पुढे नेतं. म्हणून हा माझ्याबरोबरचा माझा वेळ माझ्यासाठी मौल्यवान आहे.’ अर्थात या लेखनाने त्यांना मान, पुरस्कार, प्रशंसा आणि मुख्य म्हणजे स्वत:ची एक ओळख दिली, तसंच लिखाणामुळेच टीका, कुचेष्टा यांनाही सामोरं जावं लागलं.. पोलीस संरक्षणही घ्यावं लागलं!

या पुस्तकात वय हा घटक प्रामुख्याने डोकावतोच. शोभा डे यांच्या मते, पन्नाशी आली तरी ‘वय झालं आमचं’ म्हणणाऱ्या माणसांचे बोलण्याचे विषयही आजारपण, दुखणी असेच असतात. वय महत्त्वाचं नसतं, हाच आशय असणाऱ्या ‘शोभा अ‍ॅट सिक्स्टी’, या त्यांच्या आधीच्या पुस्तकावर एक वाक्य आहे- ‘सिक्स्टी द न्यू फोर्टी’. मात्र ‘सेव्हन्टी’ या पुस्तकात त्या त्याच्याही पुढे जातात. सत्तरी स्वीकारत ‘खुशबू ऑफ लाइफ’ अनुभवणाऱ्या, टिपिकल म्हातारी होणं नाकारणाऱ्या शोभा डे इथं भेटतात.

याचं श्रेय त्या कुटुंबालाही देतात. वैवाहिक आयुष्यातील सुरक्षित जगण्यातलं स्थैर्य  दिलीप डेंशी लग्नाने दिलं, हे त्या मान्य करतात.  म्हणूनच सहा मुलांचं आईपण, आता पाच नातवंडांचं आजीपण त्या छान अनुभवतात. अर्थात त्या नात्यांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी कसरती त्यांनाही कराव्या लागल्याच.  मोबाइलमध्ये सतत डोकं घालून बसलेल्या मुलीला बोलतं करण्यासाठी आपणही स्मार्टफोनवरून काही ‘गोष्टी’ शिकणं किंवा रात्री पार्टीला जाताना मुलींनी घातलेले आधुनिक, आखूड कपडे त्यांच्यातल्या आईपणाला घाबरवत असले तरी स्वीकारणं, असे छोटे छोटे अनुभव त्यावरच्या मतांसह महत्त्वाचे ठरले आहेत, कारण पालक-मुलांमधील वाढती दरी सांधायचा तो प्रयत्न असतो. म्हणून मग काही वेळा हे पुस्तक गप्पा मारता मारता थोडा उपदेशवजा सल्लाही द्यायला लागतं. कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर जगताना तुमच्या आतल्या शांततेला तुम्हालाच कसं जागतं ठेवणं गरजेचं असतं, हे सत्य त्या सांगून जातात, त्यातून हे पुस्तक सार्वत्रिक होऊन जातं.

या पुस्तकातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो स्वत:ला ओळखण्याचा, स्वत:मधल्या बदलाचा. वय झालं की तुम्ही जरा जास्तच पोक्तपणे वागावं-बोलावं, अधिक प्रेमळपणे वागावं, अशा लोकांच्या अपेक्षा असतात. पण ‘मी माझ्यातली छोटी मुलगी कायम जपली आहे’ हे, आणि ‘माझं शारीरिक वय माझ्यात आता पूर्णत: मुरलंय मला सत्तरीची होण्यात आनंदच आहे’, हेही सहजपणे सांगून जातात.  मनाने निवृत्त व्हायचंच कशाला, हा त्यांचा स्वत:साठीचा मंत्र सर्वासाठी होऊन जातो.

मूळच्या शोभा राजाध्यक्ष असल्यानं शोभा डे यांना मराठीचा चांगलाच गंध आहे; तो त्यांच्या पुस्तकांतूनही दिसत राहतो.  अधूनमधून मराठी, हिंदी शब्द पेरणं, मान्यवरांची इंग्रजी अवतरणे, हिंदी चित्रपटगीतांचा स्वच्छंद वापर करत मुद्दा पटवणं, हे याही पुस्तकाचं एक वैशिष्टय़ – आपल्या प्रस्तावनेत व इतरत्रही त्यांनी ‘हरवले ते गवसले का, गवसले ते हरवले का’, ‘आज फिर जिने की तमन्ना है’, यांसारख्या ओळी त्यांच्या जगण्याचं सार सांगून जातात.

पाब्लो नेरुदाचं ‘केव्हा तरी कुठे तरी न चुकता तुम्ही तुम्हाला सापडणारच आहात. तो आणि फक्त तोच तुमच्या आयुष्यातला आनंदाचा वा कटुतेचा काळ असू शकतो.’ हे वाक्य त्यांच्या आयुष्यानेही सिद्ध केलंच आहे.  हा ७० वर्षांचा काळ, शोभा डेंसारख्या सतत बिझी व्यक्तीच्या आयुष्यात खूप काही देणारा, खूप काही घेणाराही आहे. हा सरकता काळ तुम्हाला तुमची खरी ओळख करून देतो का हे महत्त्वाचं असतं.  शोभा डे यांना ‘कार्टी’ या शब्दाने ती ओळख दिली, मात्र या पुस्तकातील त्यांचे अनुभव या कार्टीपणाला पुरून उरलेले जाणवतात.

 

‘सेव्हन्टी अ‍ॅण्ड टू हेल विथ इट!’

लेखिका : शोभा डे

प्रकाशक : पेंग्विन

पृष्ठे : ३०४, किंमत : ३९९ रुपये

 

– आरती कदम

arati.kadam@expressindia.com

First Published on March 24, 2018 4:10 am

Web Title: seventy and to hell with it