29 May 2020

News Flash

बुकबातमी : पुस्तकाचा न्यायालयीन विजय..

‘‘माझं संशोधन आणि काम यांमुळे अस्वस्थ झालेल्या काही व्यक्तींनी माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता

वास्तवाचं विवेचन करणारं एखादं पुस्तक आलं की, त्याभोवती चर्चेचं कोंडाळं आपोआप उभं राहत असतं. त्यातही पुस्तक एखाद्या वादग्रस्त विषयाशी संबंधित असेल तर त्याचा काथ्याकूट होणं स्वाभाविकच; पण त्याहीपुढे जाऊन काही गट, समूह वा व्यक्ती त्या पुस्तकावर बंदी घालण्यासाठी आक्रमक होतात. पुस्तकाच्या विरोधात न्यायालयात दावा ठोकून प्रकाशक व लेखक यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्नही होतात. अनेकदा अशा प्रकरणांत कोटय़वधींचे दावे ठोकण्यात येतात. असाच न्यायालयीन दावा एका पुस्तकाविरोधात करण्यात आला होता. पण त्यात पुस्तकाचे लेखक आणि प्रकाशक यांची सरशी झाली. त्याचीच ही बुकबातमी..

पुस्तक आहे- ‘शॅडो आर्मीज् : फ्रिंज ऑर्गनायझेशन्स अ‍ॅण्ड फूट सोल्जर्स ऑफ हिंदुत्व’! ज्येष्ठ राजकीय पत्रकार धीरेंद्र झा यांचं हे पुस्तक २०१८ साली ‘जगरनॉट बुक्स’ने प्रकाशित केलं. ‘हिंदूराष्ट्र’ स्थापनेच्या नावाखाली गेल्या तीन-चार दशकांपासून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होऊ  लागल्या आहेत. या संघटनांची छत्र संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अपत्य असलेला भारतीय जनता पक्ष केंद्रात आणि अनेक राज्यांत सत्तेवर असताना देशभक्ती आणि संस्कृतीरक्षणाच्या नावाखाली वाढत असलेला हिंसाचार हा केवळ योगायोग असू शकत नाही. अशा वेळी संघ परिवार व त्यातील संघटनांबद्दल जाणून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. ‘शॅडो आर्मीज्’ हे पुस्तक या संघटनांच्या अंतर्गत कार्यप्रणाली आणि एकंदर समाजावरील त्यांच्या प्रभावाचा लेखाजोखा मांडतं.

याच संघटनांपैकी एक असलेल्या सनातन संस्थेनं या पुस्तकाविरोधात गोव्यातील एका न्यायालयात मानहानी दावा ठोकला. पुस्तकात सनातन संस्थेची व तिच्या संस्थापकांची बदनामी करण्यात आली असल्याचं सांगत संघटनेनं लेखक आणि प्रकाशकावर  २०१८ मध्ये दहा कोटी रुपयांच्या भरपाईसाठी याचिका केली होती. मात्र, गोव्यातील फोंडा येथील प्रथमश्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांनी १५ फेब्रुवारी रोजी हा दावा रद्दबातल ठरवला.

सनातन संस्थेचा गोव्यातील रामनाथी येथे मुख्य आश्रम आहे. कट्टर हिंदुत्ववादी विचार आणि अन्य धर्मीयांविरोधातील तीव्र भूमिका यांमुळे ही संस्था नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर, ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे, कर्नाटकातील ज्येष्ठ साहित्यिक एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येच्या प्रकरणांमध्ये या संस्थेशी संलग्न असलेल्या कार्यकर्त्यांवर आरोपही झाले आहेत. झा यांनी आपल्या पुस्तकात सनातन संस्थेबाबत आजवर तुकडय़ातुकडय़ांत आलेल्या माहितीची अभ्यासपूर्ण मोळी बांधून या संघटनेचं एक चित्र उभं केलं आहे. मात्र, त्यामुळे संघटनेची बदनामी करण्यात आल्याचा आरोप करत संघटनेनं न्यायालयात धाव घेतली होती. परंतु गोव्यातील न्यायालयानं त्यांच्या विरोधाचा वारू तेथेच रोखला.

‘‘माझं संशोधन आणि काम यांमुळे अस्वस्थ झालेल्या काही व्यक्तींनी माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय माझ्यासाठी अत्यंत दिलासादायक आहे,’’ अशा शब्दांत झा यांनी या निर्णयाचं स्वागत केलं. तर ‘कोणतंही पुस्तक, लेखक वा कल्पना यांना दाबण्याचा किंवा त्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात ठामपणे उभं राहिलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे,’ अशी प्रतिक्रिया प्रकाशक ‘जगरनॉट बुक्स’नं दिली आहे. एकुणात, ‘शॅडो आर्मीज्’च्या लेखक-प्रकाशकांच्या ‘न्यायालयीन’ विजयाने कटू सत्य लिहू इच्छिणाऱ्यांना आणि ते वाचण्याची आस असणाऱ्यांना ऊर्जा मिळेल, हे मात्र नक्की!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2020 2:39 am

Web Title: shadow armies book author dhirendra k jha win case in court zws 70
Next Stories
1 सहचरीशी पत्रसंवाद..
2 एका कोंडीची कुंठित समीक्षा
3 अर्थविचारांचे भारतीय सूत्र
Just Now!
X