23 January 2018

News Flash

अष्टदळाचे सावट!

भारतात सध्या प्रखर राष्ट्रवादाचे वारे जोरात वाहताहेत.

आसिफ बागवान | Updated: August 5, 2017 2:28 AM

स्वत:स हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या संघटनांचा गेल्या तीन-चार दशकांतील उदय, त्यांचा प्रसार आणि देशाचा सार्वजनिक अवकाश प्रभावित करण्यापर्यंत त्यांनी गाठलेली मजल या प्रवासाची कहाणी..

भारतात सध्या प्रखर राष्ट्रवादाचे वारे जोरात वाहताहेत. सिनेमागृहात राष्ट्रगीत म्हणण्यासाठी केली जाणारी सक्ती असो, की शाळांमध्ये योगासनांचे बंधन असो ‘देशी’ म्हणून ज्या काही गोष्टींचा उदो उदो केला जातो, त्या गोष्टींच्या वापर किंवा अंमलबजावणीचा आग्रह तीव्र होत चालला आहे. परंतु त्याही पुढे जात आता एका संस्कृतीची किंवा एका धर्माची आचारसंहिता सर्वच धर्मावर लादण्याची व त्याला ‘राष्ट्रवादा’चे कोंदण लावण्याची प्रवृत्तीही बोकाळत चालली आहे. ‘हिंदुत्व’ आणि ‘राष्ट्रवाद’ या दोन्ही गोष्टी एकच आहेत व हिंदुत्वाशी फारकत म्हणजे भारतीय मूल्यांशी व पर्यायाने देशभक्तीशी प्रतारणा, असा डांगोरा पिटत काही संघटनांनी देशात अराजक निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण केली आहे.

खरं तर हिंदुत्ववादी आणि धर्मनिरपेक्ष विचारप्रवाहांचा संघर्ष नवा नाही. आजवर या विचारधारा अनेकदा एकमेकांशी भिडत आल्या आहेत आणि तत्कालिन राजकीय परिस्थितीच्या बळावर या दोघांतील एका विचारधारेने तेवढय़ापुरती सरशी साधली. परंतु गेल्या काही वर्षांत हिंदुत्ववादाला देशाभिमानाचा मुखवटा चढवून समाजाला उजवीकडे वळवण्याचा प्रयत्न बऱ्यापैकी यशस्वी होताना दिसतो. आपल्याला हवे ते विचार समाजात रुजवण्याऐवजी समाजावर लादण्याची वृत्तीदेखील त्यामुळेच प्रबळ होऊ लागली आहे. गेल्या काही महिन्यांत देशात गोमांसबंदी, लव्ह जिहाद अशा कारणांखाली झालेले हिंसाचार त्याचेच द्योतक आहे. ‘हिंदू राष्ट्र’ स्थापनेच्या नावाखाली गेल्या तीन-चार दशकांपासून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होऊ लागल्या आहेत. या संघटनांची छत्र संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अपत्य असलेला भारतीय जनता पक्ष केंद्रात आणि अनेक राज्यांत सत्तेवर असताना फुटकळ राष्ट्रप्रेम, संस्कृतिरक्षणाच्या नावाखाली वाढत असलेला हिंसाचार हा केवळ योगायोग असू शकत नाही. अशा वेळी संघ परिवार व त्यातील संघटनांबद्दल जाणून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. धीरेंद्र के. झा यांचे ‘शॅडो आर्मीज : फ्रिंज ऑर्गनायझेशन्स अ‍ॅण्ड फूट सोल्जर्स ऑफ हिंदुत्व’ हे पुस्तक हीच गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करते.

धीरेंद्र झा हे ज्येष्ठ राजकीय पत्रकार असून हिंदुत्ववादी राजकारणाचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे. २२ डिसेंबर १९४९ च्या रात्री बाबरी मशिदीमध्ये श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आल्यानंतरच्या घडामोडींचा वेध घेणारे ‘अयोध्या : द डार्क नाइट’ हे त्यांचे पुस्तक प्रचंड गाजले होते. झा यांनी त्यानंतरही विविध प्रकारच्या लिखाणातून प्रखर भगव्या विचारांचा वाढता प्रभाव अधोरेखित केला आहे. ‘शॅडो आर्मीज’ हे याच पूर्वअभ्यासातून आणि विशेष संशोधनातून निर्माण झालेले पुस्तक आहे. बाबरी मशीद विध्वंस घटनेनंतर केवळ भाजपच नव्हे तर अन्य हिंदुत्ववादी संघटनांचे बळ कसे वाढत गेले, याचा आढावा झा यांनी या पुस्तकातून घेतला आहे. या सर्व संघटनांच्या मुळाशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असल्याचा झा यांचा दावा आहे. भाजपखेरीज अभाविप, अखिल भारतीय मजदूर संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या संघ परिवारातील संघटना आहेतच; पण या पलीकडेही देशातील विविध भागांत कार्यरत असलेल्या कट्टर उजव्या धार्मिक विचारांच्या संघटनांशी रा. स्व. संघाची नाळ कशी जोडली गेली आहे, हे सांगण्याचा प्रयत्न झा यांनी केला आहे. यापैकी भाजपचा अपवाद वगळता अन्य संघटनांवर संघाची अधिकृत छत्रछाया नाही. किंबहुना अशा संघटनांकडून कोणता नवीन वाद निर्माण झाला तर, संघ आणि भाजप नेहमीच त्यांना ‘परिघाबाहेरच्या संघटना’ म्हणून स्वत:ची जबाबदारी ढकलतात. यातील काही संघटनांचा प्रत्यक्षात संघ वा भाजपशी थेट संबंध नाही. परंतु समाजात तेढ निर्माण करून किंवा एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करून या संघटनांनी केलेल्या कारवायांचे राजकीय फळ नेहमीच भाजपच्या पदरात पडते, हे सत्य नाकारता येत नाही. या संघटना म्हणजे हिंदुत्ववादी विचारधारेचे छुपे व आक्रमक सैन्य आहे, असे झा सांगतात.

‘शॅडो आर्मीज’मध्ये झा यांनी पुढील आठ संघटनांवर प्रकाश पाडला आहे : सनातन संस्था, हिंदु युवा वाहिनी, बजरंग दल, श्रीराम सेना, हिंदु ऐक्य वेदी, अभिनव भारत, भोसला मिलिटरी स्कूल आणि राष्ट्रीय शीख संगत. या संघटनांच्या कारवाया अनेकदा उजेडात आल्या आहेत. परंतु त्यांची कार्यपद्धती, संघटनात्मक जाळे, व्याप्ती यांबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध आहे. पुस्तकातून ही माहिती मिळेल, असे झा प्रस्तावनेत सांगतात. त्यांचा हा दावा पूर्णत: खरा ठरत नसला तरी, काही संघटनांबाबतची अज्ञात अथवा अद्याप उजेडात न आलेली बरीचशी माहिती यातून समोर येते. त्यामुळे ‘शॅडो आर्मीज’चे विश्लेषण करताना त्यातून वाचकाचे नेमके किती प्रबोधन होते, हा दृष्टिकोन केंद्रस्थानी ठेवणे महत्त्वाचे आहे. एकीकडे सनातन संस्था, बजरंग दल, भोसला मिलिटरी स्कूल या संघटनांबद्दल लेखकाने मांडलेली माहिती बऱ्यापैकी अवगत आहे. गोव्यातील रामनाथी येथील सनातन संस्थेचा आश्रम, या संस्थेची स्थापना करणारे डॉ. जयंत आठवले यांच्या ईश्वरी अवताराचे दावे, ठाणे व नवी मुंबईतील नाटय़गृहांमध्ये स्फोट घडवल्याप्रकरणी या संस्थेवर झालेले आरोप, डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी या विचारवंतांच्या हत्येशी संबंधांबाबत या संस्थेवर केले जाणारे आरोप अशा अनेक गोष्टी वेळोवेळी समाजासमोर आल्या आहेत. त्यांचीच उजळणी ‘शॅडो आर्मीज’मधील या संस्थेवरील लेखात झाल्याचे दिसते. तोच प्रकार बजरंग दल आणि भोसला मिलिटरी स्कूलवरील लेखांबाबत घडला आहे. बजरंग दलाची निर्मिती, या संघटनेत होणारी बेरोजगार युवकांची भरती, ओरिसातील ऑस्ट्रेलियन ख्रिस्ती धर्मप्रसारकाच्या हत्येतील या संघटनेचा सहभाग आणि ‘लव्ह जिहाद’बाबतचा बजरंग दलाचा आक्रमक पवित्रा ही सर्व माहिती वाचल्यानंतर बजरंग दलाबद्दल नवी माहिती हाती लागत नाही. त्याच वेळी मंगलोरमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून स्थानिक मुस्लीम दुकानदारांना दिले जाणारे ‘संरक्षण’ आणि त्या मोबदल्यात केली जाणारी कमाई याचे पुस्तकात आलेले उदाहरण बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या मानसिकतेचे दर्शन घडवते.

‘शॅडो आर्मीज’मधील ‘हिंदू युवा वाहिनी’चे प्रकरण योगी आदित्यनाथ यांचा उदय आणि भरभराट यांचा अत्यंत सखोल लेखाजोखा मांडते. उत्तर प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर योगी आदित्यनाथ यांच्या गळय़ात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. तेव्हापासून ‘हिंदू युवा वाहिनी’ या त्यांच्या संघटनेची चर्चा देशभर सुरू झाली. परंतु या संघटनेची मुळे कशी खोलपर्यंत रुजलेली आहेत, हे झा यांनी अतिशय उत्तमपणे मांडले आहे. आदित्यनाथ यांची कार्यपद्धती, उत्तर प्रदेशच्या राजकारणातला त्यांचा उदय, पूर्वाचलमध्ये हिंदू युवा वाहिनीचा असलेला प्रभाव, गोरखपूरमध्ये हिंदू युवा वाहिनीने मांडलेला उच्छाद यांविषयी झा यांनी सखोल मांडणी केली आहे. ते लिहितात, ‘स्थापनेपासूनच हिंदू युवा वाहिनेने अल्पसंख्याकांना हिंदूंचे शत्रू दाखवून जातीय तेढ वाढवण्यासाठी आक्रमक मोहिमा राबवल्या. लव्ह जिहाद, मुस्लिमांची गोमांस भक्षण करण्याची आहारपद्धती, हिंदू रीतिरिवाजांबद्दलचा त्यांच्यातील अनादर, राष्ट्रीय मानचिन्हांबद्दलची त्यांची अनास्था, बहुसंख्य झाल्यास अधिकार गाजवण्याची वृत्ती या गोष्टींचा नकोइतका बाऊ करून वाहिनीने मुस्लीमांबद्दल हिंदूंमध्ये तिटकारा निर्माण करण्यावर भर दिला.’ हे सगळे होत असताना योगी आदित्यनाथ यांना त्या त्या वेळच्या राज्य सरकारकडून मिळत गेलेले ‘संरक्षण’ यावरही झा प्रकाशझोत टाकतात. केवळ मुलायम सिंह यांनी एकदाच आदित्यनाथ यांना अटक करण्याची धमक दाखवली. यामागे हिंदुत्वापेक्षाही ‘ठाकूर’ जमातीचे आदित्यनाथ यांना असलेले पाठबळ महत्त्वाचे ठरले, हेही ते नमूद करतात.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यातही बजरंग दलापासून दुरावलेल्यांनी एकत्रित होऊन निर्माण केलेल्या ‘श्रीराम सेने’वरील प्रकरण संघपरिवारातील जातीयवादावर भाष्य करते. संघ, भाजप या संघटनांतील ब्राह्मणी वर्चस्वाला कंटाळून प्रमोद मुतालिकसारख्यांनी संघाला सोडचिठ्ठी दिली व ‘श्रीराम सेने’ची स्थापना केली. संघाचा ब्राह्मणी चेहरा अशा बहुजन हिंदुत्ववादी संघटनांच्या निर्मितीला पोषक ठरला, असे झा सांगतात. रस्त्यावर उतरून आंदोलने वा हिंसाचार यांत सहभागी होणारे तरुण हे बहुजन समाजातले असतात. त्यांनी आपले उभे आयुष्य संघटनेसाठी वेचले तरी संघटनेतील प्रबळ ब्राह्मणी गट त्यांना कधीही वर येऊ देत नाही, हे अधोरेखित करण्याचा झा यांचा प्रयत्न आहे. ‘राष्ट्रीय शीख संगत’च्या माध्यमातून शीख हेदेखील हिंदूच आहेत, हा प्रचार करण्याचा व त्यांना हिंदुत्ववादी प्रवाहात सामील करण्याचा प्रयत्न कसा केला गेला, हे या संघटनेवरील प्रकरणातून उघड होते. ‘हिंदू राष्ट्र’ निर्माण करण्याच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ध्येयाच्या पूर्तीसाठी शीख समाजाचे हिंदू समाजात विलीनीकरण महत्त्वाचे मानले जाते, हेदेखील झा यांनी सांगितले आहे.

‘शॅडो आर्मीज’ वाचताना या हिंदुत्ववादी संघटनांच्या समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या कारवाया पानांपानांतून समोर येतात. अशा वेळी या संघटनांचा जन्म केवळ हिंसाचार व दडपशाहीसाठी झाला आहे का, असा विचारही मनात डोकावून जातो. तसे कदाचित नसेलही, परंतु झा यांनी जाणीवपूर्वक या संघटनांच्या उपद्रवमूल्यावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे. गोमांस नेत असल्याच्या संशयावरून एखाद्या तरुणाची हत्या करण्यात येते, ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली एखाद्याला मरेपर्यंत मारहाण केली जाते, ‘भारतमाता की जय’ न बोलणाऱ्यांवर हल्ले करण्यात येतात.. अशा वातावरणात या सर्व कारवायांमागे असणाऱ्या संघटनांचा खरा चेहरा समोर येणे आवश्यक आहे. तेच काम झा यांनी ‘शॅडो आर्मीज’द्वारे केले आहे.

  • ‘शॅडो आर्मीज’
  • लेखक : धीरेंद्र के. झा
  • प्रकाशक : जगरनॉट
  • पृष्ठे : २२८, किंमत : ४९९ रुपये

 

आसिफ बागवान

asif.bagwan@expressindia.com

First Published on August 5, 2017 2:28 am

Web Title: shadow armies fringe organizations and foot soldiers of hindutva
  1. No Comments.