हिंदीप्रमाणेच इंग्रजी चित्रपट क्षितिजावर चमकलेल्या शशी कपूर यांची  आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील कारकीर्द हे पुस्तक उलगडते.. केवळ स्टार म्हणून नव्हे तर माणूस म्हणून, कलाकार/ अभिनेता / निर्माता/ रंगकर्मी म्हणून शशी कपूर यांची उंची काय, याचे स्पष्टीकरणही भरपूर संदर्भासह देते..

चित्रपटसृष्टीतील कलाकारांवर सामान्यजनांचे एका वेगळ्या पातळीवरचे प्रेम असते. पडद्यावरच्या भूमिकांना दाद देताना पडद्यामागच्या त्यांच्या आयुष्यातदेखील डोकावयाची त्यांची इच्छा असते. त्यातून अभिनेत्यांबद्दलची उत्सुकता जास्तच. चित्रपटसृष्टीच्या भाषेत ‘स्टार’पदाला पोहोचलेला अभिनेता असेल तर त्याच्या आयुष्यातील प्रत्येक छोटय़ामोठय़ा गोष्टी जाणून घेणे त्याच्या चाहत्यांना आवडते. म्हणूनच चित्रपट कलावंतांची चरित्रात्मक पुस्तकेही लोकप्रिय होतात. कलाकार म्हणून कारकीर्द सुरू असतानाच काही जण आत्मचरित्र लिहून मोकळे होतात, तर काही जण यशाच्या शिखरावर असताना यात हात घालतात. काही जण निवृत्तीनंतर हा अनुभव घेतात. १९७० आणि ८०चे दशक गाजविणाऱ्या शशी कपूर यांच्याबद्दल चरित्रात्मक पुस्तक आले ते मात्र तुलनेने पुष्कळच उशिरा. वर उल्लेखलेल्या ‘स्टार’पदापासून ते घराणेशाही, प्रतिष्ठा असा वारसा असण्यापर्यंतच्या सर्व ठोकताळ्यांत बसूनदेखील शशी कपूर हे व्यक्तिमत्त्व इतर स्टार मंडळींपेक्षा नेहमीच थोडे विलग राहिले. स्तंभलेखक आणि अमेरिकास्थित सिनेपत्रकार असीम छाब्रा यांचे ‘शशी कपूर – द हाऊसहोल्डर, द स्टार’ हे पुस्तक म्हणूनच महत्त्वाचे ठरते, कारण सामान्यांना परिचित कपूर घराण्यातील ‘स्टार’ची ही केवळ कहाणी नाही, तर शशी कपूर यांची फारशी परिचित नसलेली आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील कारकीर्द हे पुस्तक उलगडते. प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण किंवा इरफान खानच्या कित्येक वर्षे अगोदर हिंदी चित्रपटसृष्टीतील एक स्टार आंतरराष्ट्रीय चित्रपट क्षितिजावर चमकला होता, हे सामान्य हिंदी चित्ररसिकाच्या गावीही नसते. शशी कपूर यांचे चित्रपट निर्माता म्हणून केलेले मोठे कामही या पुस्तकाच्या निमित्ताने प्रकाशात येते. कलात्मक चित्रपटांना भक्कम आधार देणारा, प्रवाहाविरोधात पोहायची ताकद असणारा एक निर्माता म्हणून शशी कपूर यांची ओळख आणखी घट्ट करण्याचे काम हे पुस्तक करते. हे पुस्तक नेहमीच्या चरित्रग्रंथांपेक्षा काहीसे वेगळे आहे. अभिनेत्यांच्या चरित्रग्रंथात अभावाने दिसणाऱ्या तळटिपा, संदर्भसाहित्याची सूची आणि मुलाखतींचे तपशील यामध्ये आहेत. र्मचट- आयव्हरी प्रॉडक्शन्सच्या सौजन्याने शशी कपूर यांची काही वेगळी, न पाहिलेली छायाचित्रेही यामध्ये आहेत. शशी कपूर यांना जवळून ओळखणाऱ्या व्यक्तींशी बोलून आणि त्यांच्यासोबत काम केलेल्या सहकलाकारांबरोबरच्या मुलाखतींमधून लेखकाने कपूर यांच्याविषयी तपशील गोळा केला आहे. हा तपशील संगतवार आणि काळानुरूप संदर्भासह येत राहतो, तरीही पुस्तक म्हणजे केवळ संदर्भग्रंथ वाटत नाही, हे छाब्रा यांच्या लेखनशैलीचे विशेष.

actor pratik gandhi talks about experience working with vidya balan
‘चरित्रपटांचं आव्हान अधिक भावतं’
documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

शशी कपूर नाव घेतल्यावर आपल्या डोळ्यापुढे येतो तो देखणा चेहरा. घरंदाज, अदबशीर आणि अगदी सज्जन व्यक्तिमत्त्व. बहुतेक लोकप्रिय चित्रपटांमधून शशी कपूर असेच दिसले. प्रामाणिक, लाघवी, शांत, संयमी आणि बघता क्षणी नायिकेला प्रेमात पडायला लावणाऱ्या भूमिका त्यांच्या वाटय़ाला जास्त आल्या आणि त्याच लक्षात राहिल्या. शशी कपूर प्रत्यक्ष आयुष्यातही अगदी तितकेच सच्चे आणि दिलदार होते हे या पुस्तकातून आलेल्या त्यांच्या आप्तांच्या मुलाखतींमधून स्पष्ट होते. शशी कपूर म्हटल्यावर अनेकांना आठवतो तो त्यांचा बाणेदारपणा दाखवणारा ‘मेरे पास माँ है’ हा एका वाक्याचा संवाद. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रथितयश अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या कारकीर्दीला यशाचे वळण लावणाऱ्या ‘दीवार’ चित्रपटातील सर्वात गाजलेला हा एकावाक्याचा संवाद शशी कपूर यांच्या वाटय़ाला यावा, यामध्येच या कलाकाराच्या कारकीर्दीची खरी गोम आहे. त्यांना लोकप्रियता देणारे तद्दन व्यावसायिक असे कित्येक चित्रपट शशी कपूर यांनी केले, पण त्यांची ओळख तेवढय़ापुरती मर्यादित राहिली नाही. शशी कपूर यांचे समकालीन कलाकार व्यावसायिक चित्रपटांमध्येच अडकलेले असताना कपूर यांनी त्याबरोबरीने कलात्मकतेची कास धरत निर्माता होण्याचे धाडस दाखवले. फार कमी अभिनेते स्टार झाल्यानंतर पुन्हा नाटकाकडे वळण्याचे धारिष्टय़ दाखवतात. पृथ्वी थिएटरच्या माध्यमातून शशी कपूर यांनी तिथेही योगदान दिले. त्यांच्या या कलात्मकतेला सगळेच दाद देतात, तरीही त्यांच्याभोवतीच्या ‘स्टार’पदाच्या वलयात याला स्थान नसते.

untitled-14

केवळ स्टार म्हणून नव्हे तर माणूस म्हणून, कलाकार म्हणून, अभिनेता म्हणून, निर्माता म्हणून आणि रंगकर्मी म्हणून शशी कपूर यांची उंची मान्य करणारे समव्यावसायिक बरेच आहेत. पुस्तकात कपूर यांच्या मोठेपणाबद्दल त्यांची मुले (कुणाल, करण आणि संजना कपूर) आणि कुटुंबीय (ऋषी कपूर, नीतू सिंग कपूर) सांगतातच, पण अमिताभ बच्चन, शर्मिला टागोर, अपर्णा सेन, शबाना आझमी, श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, हनीफ कुरेशी, जेम्स आयव्हरी यांच्यासारखे जागतिक स्तरावर नावाजले गेलेले चित्रपट कलावंतही ते सांगतात, हे विशेष. शशी कपूर यांचे गाजलेले व्यावसायिक चित्रपट आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे त्यांनी केलेले चित्रपट हा प्रवास बरोबरीने चालू होता. ‘बॉम्बे टॉकी’, ‘सिद्धार्थ’, ‘जुनून’, ‘हिट अ‍ॅण्ड डस्ट’, ‘न्यू डेल्ही टाईम्स’ हे हिंदी, इंग्रजी चित्रपट त्यांनी इतर व्यावसायिक हिंदी चित्रपटांबरोबरीने केले. ‘‘केवळ नाटक करून आपली जीवनशैली जगता येणार नाही, म्हणून असे चित्रपट करावे लागतात,’’ असे वडील शशी कपूर यांच्या कामाचे विश्लेषण आई जेनिफरने सांगितल्याचा उल्लेख संजना कपूर यांच्या निवेदनात येऊन जातो, तेव्हा शशी कपूर यांनी कारकीर्दीचे उमजून केलेले कप्पे दिसू लागतात. व्यावसायिक आणि कलात्मक या दोन्ही स्तरांवरील त्यांच्या चित्रपटांच्या निर्मिती प्रक्रियेची तपशीलवार माहिती पुस्तकामध्ये येते. तद्दन व्यावसायिक चित्रपट करणारे शशी कपूर संधी मिळताच छोटी पण आशयघन भूमिका करण्यास प्राधान्य देत होते. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना केवळ कलात्मकतेच्या ओढीने काही नवोदित दिग्दर्शकांसोबत अत्यंत थोडक्या मोबदल्यात त्यांनी काम केले, हे त्या दिग्दर्शकांच्या निवेदनांतून स्पष्ट होते. चांगल्या चित्रपट प्रकल्पांना प्रसंगी आर्थिक हातभारही लावला. कलात्मक चित्रपटनिर्मितीमधून हाती फारसा पैसा लागत नाही, याची जाणीव असूनदेखील प्रसंगी आर्थिक नुकसान सोसूनही ते अशा चित्रपटांना पाठबळ देत राहिले हे या त्या काळच्या नवोदित आणि आत्ता प्रस्थापित असणाऱ्या अपर्णा सेन, श्याम बेनेगल यांच्यासारख्या कलाकारांच्या वक्तव्यांतून पुस्तकात प्रभावीपणे मांडले आहे.

शशी कपूर यांच्या वैयक्तिक आयुष्यातले अनेक संदर्भ, प्रसंग यातून एक कुटुंबवत्सल माणूस दिसतो. पत्नीवर मनापासून प्रेम करणारा, तिच्या अकाली जाण्याने कोलमडलेला शशी कपूर नावाचा माणूस ‘थिंग्स फॉल अपार्ट’ या शेवटच्या प्रकरणात ‘स्टार’ म्हणून नाही, तर मनस्वी व्यक्ती म्हणूनच भेटतो. जेनिफर केंडाल ही इंग्रजी रंगभूमीवरची अभिनेत्री शशी कपूर यांच्या आयुष्यात खूप लवकर आली. शशी-जेनिफर या दाम्पत्याची एकरूपता, जेनिफरचा कपूर यांच्या आयुष्यावर, कारकीर्दीवर असलेला प्रभाव अभिनेत्री सिमी गरेवाल खूप चांगल्या शब्दांत सांगून जातात. या दाम्पत्याचे जवळचे मित्र अनिल धारकर यांच्याकडून मिळालेली माहितीदेखील लेखक छाब्रा ‘शशी आफ्टर जेनिफर’ या प्रकरणात संगतवार मांडतात. या लग्नाला विरोध करणारे जेनिफर यांचे नाटय़कर्मी वडील आणि अभिनेत्री बहीण यांच्या आत्मचरित्रांतूनही लेखक ‘शशी-जेनिफर’ या दोघांच्या नात्यामधील नाजूक पदर अचूक शोधून मांडतात.

विशेष म्हणजे शशी कपूर यांच्याशी प्रत्यक्ष न बोलता लेखकाने त्यांचे हे चरित्र लिहिलेले असूनही एक व्यक्ती म्हणून त्यांचे अनेक पैलू दाखवण्याचे उद्दिष्ट लेखकाने साधले आहे. त्याबरोबरीने हिंदी चित्रपटसृष्टीचे बदलते पैलूही अप्रत्यक्षपणे टिपले आहेत. चरित्रग्रंथ म्हणजे निव्वळ स्मरणरंजन किंवा व्यक्तिवेध याच्या पलीकडे हे पुस्तक नेते ते यामुळे. शशी कपूर यांचे कुटुंबवत्सल, तरल व्यक्तिमत्त्व दाखवतानाच कलोपासक व्यावसायिक म्हणूनही व्यक्तिमत्त्व समोर येते. असा कलाकार सध्याच्या काळात जन्माला आला असता तर कदाचित त्याचे सोने व्हायला वेळ लागला नसता, असेही वाटून जाते. करण जोहर यांनी लिहिलेली प्रस्तावना शशी कपूर यांचे लोभस व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीवर नेमक्या शब्दांत प्रकाश टाकते.

एखाद्या प्रसिद्ध चित्रपट कलाकाराचे चरित्र असते, तसे झगमगीत, खासगी आयुष्यातील आत्तापर्यंत गुप्त राहिलेल्या गोष्टी उघड करणारे एवढेच या पुस्तकाचे अस्तित्व अजिबात नाही आणि ते चटपटीत तर अजिबात नाही. हिंदी चित्रपट क्षेत्राला आणि चित्रपट उद्योगाला आकार देणाऱ्यांपैकी एका कलाकाराची गाथा म्हणून हे पुस्तक महत्त्वाचे ठरते. एखाद्या सच्चा कलाकारामध्ये माणूस म्हणून काहीच खोट असू शकत नाही का, सगळेच या कलाकाराबद्दल एवढे चांगले बोलत असताना अपेक्षित मानसन्मान मिळायला या कलाकाराला एवढा वेळ का लागला असावा, याची उत्तरे मात्र मिळत नाहीत.

  • ‘शशी कपूर : द हाऊसहोल्डर, द स्टार’
  • लेखक : असीम छाब्रा,
  • प्रकाशक : रूपा पब्लिकेशन्स,
  • पृष्ठे : १९६, किंमत : ३९५ रु.

 

– अरुंधती जोशी

arundhati.joshi@expressindia.com