|| रेश्मा भुजबळ

स्त्रियांनी बोलूच नये, फक्त ऐकावे- अशी पुरुषप्रधान मानसिकता. पण त्यास न जुमानता जगभर स्त्रिया बोलत राहिल्या, आवाज उठवत राहिल्या, विचार मांडत राहिल्या.. आणि त्यातून बदल घडले, पुढच्यांना प्रेरणाही मिळाली. त्यांपैकी काहींची ओळख करून देणाऱ्या पुस्तकाचा हा परिचय..

२०२० साल आले तेच कोविड-१९ चे आव्हान घेऊन. संपूर्ण जगाला हादरवून टाकणाऱ्या या विषाणूने दीर्घकाळच्या टाळेबंदीची ओळख करून दिली. कधी नव्हे ते शाळा, कार्यालये, वाहतूक, धार्मिक-राजकीय कार्यक्रम, लग्नसमारंभ, क्रीडा स्पर्धा सगळेच ठप्प झाले. विज्ञान, तंत्रज्ञानाने वेगवान झालेल्या जगाची गती करोनाने क्षीण केली. या आव्हानाचा सामना करण्यासाठी सर्वच देशांतील राज्यकर्त्यांचा कस लागला हे खरे; मात्र या संकटकाळात जगाला महिलांच्या नेतृत्वाची, त्यांच्या ध्येयधोरणांची, व्यापक दृष्टिकोनाबरोबरच संवादकौशल्य आणि त्यांच्या प्रेरक शब्दांची, कर्तृत्वाची नव्याने ओळख झाली. उदा. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न आणि जर्मनीच्या चान्सलर अँगेला मर्केल. या दोघींचा या करोना संकटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यांनी या आपत्तीचा सामना करण्यासाठी उचललेली पावले, त्यासाठी आपल्या देशवासीयांशी साधलेला संवाद, त्या संवादातून या संकटाशी लढण्याचा दिलेला विश्वास याचे कौतुक सर्वत्र झाले. राजकीय नेत्यांव्यतिरिक्त संशोधन क्षेत्रातील स्त्रियांनीही या काळात महत्त्वाचे काम केले, वेळोवेळी मते मांडून समाजमनात शहाणीव पेरली.

स्त्रीप्रश्नांविषयी सदैव जागरूक अशा ब्रिटिश राजकारणी इव्हेट कूपर यांनी स्त्रियांच्या वक्तृत्वाचा पाठ समोर ठेवला आहे. ‘शी स्पीक्स’ या पुस्तकातून त्यांनी जगभरातल्या ४० स्त्रियांची भाषणे, त्यांची मते, त्यांचा दृष्टिकोन आणि त्यामुळे बदललेली स्थिती यांचा ऊहापोह केला आहे.

स्त्रियांनी जेव्हा जेव्हा आवाज उठवला तेव्हा तेव्हा काही क्रांतिकारक घटना घडल्या. मात्र अनेकदा त्यांचे आवाज दडपण्यात आल्याचाच इतिहास आहे. स्त्रियांनी बोलू नये यासाठी त्यांना धमकावले जाते, प्रसंगी त्यांच्यावर हल्लेही होतात, कधी अत्याचार होतो किंवा अगदी त्यांना संपवण्याचाही प्रयत्न केला जातो. जे आजही होत आहे. पाकिस्तानी नेत्या बेनझीर भुत्तो ते मलाला युसुफझाई अशी स्त्रीअभिव्यक्तीच्या दडपशाहीची कित्येक उदाहरणे देता येतील.

पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना त्यांच्या हक्कांसाठी, कधी त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी आवाज उठवावा लागलाच, परंतु कधी संपूर्ण मानवजातीला ऱ्हासातून वाचवण्यासाठीही बोलते व्हावे लागले. ‘शी स्पीक्स’मध्ये दोन हजार वर्षांपूर्वी बाउडिका या ब्रिटिश राणीने सैनिकांना उद्देशून केलेल्या भाषणापासून ते जागतिक तापमानवाढीबाबत ग्रेटा थुनबर्गने केलेल्या भाष्यापर्यंत, असा भूत-वर्तमानकालीन स्त्रीशहाणीव वाचायला मिळते. राजकीय, क्रीडा, मनोरंजन, समाजकारण अशा विविध क्षेत्रांतल्या स्त्रियांची भाषणे यात आहेत. या स्त्रियांचे शब्द महत्त्वाचे आहेत, त्यांची भाषणे महत्त्वाची आहेतच, शिवाय त्यांचे मार्गही प्रेरक आहेत. स्त्रियांना अधिक बळ देणारे आहेत. आजच्या स्थितीत अधिक समर्पक आहेत.

अगदीच अलीकडची घटना म्हणजे अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीयाची वंशविद्वेषातून झालेली पोलिसी हत्या. अमेरिकेतच १९७७ मध्ये शिकागो येथे नागरी हक्क कार्यकर्त्यां आणि कवयित्री ऑड्रे लॉर्ड यांनी वंशभेदावर बोलताना म्हटले होते : ‘‘तुमचे मौन तुमचे रक्षण करणार नाही.’’ यातून प्रेरणा घेऊन फ्लॉयडच्या हत्येचा निषेध करण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले. हेच वाक्य वंशभेदाविरोधात लढणाऱ्या ‘ब्लॅक लाइव्हज् मॅटर’ चळवळीच्या फलकांवरही आता दिसून येते. म्हणजेच आजच्या वंशभेदाविरोधातल्या निदर्शनांची, हक्कांसाठी लढण्याची पाळेमुळे आधीच्या स्त्रीसंघर्षांतही मुरलेली आहेत. हा संघर्ष गुलमागिरीविरुद्ध लढणाऱ्या, स्त्री म्हणून हक्क मागणाऱ्या सोजर्नर ट्रथ यांच्यासह स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून लढणाऱ्या जोसेफाइन बटलर यांच्यापासून सुरू होतो. ऑस्कर विजेच्या ल्युपिता न्योंग’ओ याही वर्णभेदामुळे खचलेल्या आजच्या पिढीतल्या मुलींना सौंदर्याची व्याख्या सांगतात, तिथेही तो सुरूच असतो.

वर्णभेदाप्रमाणेच स्त्रियांची परवड होते आहे ती कामाच्या ठिकाणी. एकाच कामासाठी, तेवढय़ाच तासांसाठी आजही स्त्री आणि पुरुषांच्या वेतनांमध्ये फरक केला जातो. स्त्रियांनाच वेतनकपात आणि मुलांच्या संगोपनाच्या दडपणाचा सामना करावा लागतो. त्याविरोधात ब्रिटनमधील कामगार संघटनेच्या सदस्य जोन ओ’कॉनेल यांना १९६८ मध्ये आणि कामगार नेत्या बार्बरा कॅसल यांना २००० साली समान वेतन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आवाज उठवावा लागला, त्यांची धोरणे इथे स्पष्ट होतात. कदाचित करोनोत्तर काळात समान वेतन कायद्यासाठी अधिक कठोर संघर्षांची गरज भासू शकते.
समलैंगिक महिलांवरील हिंसाचाराबद्दल लिलिट मार्टिरोस्यान यांनी २०१९ मध्ये आर्मेनियन संसदेत दिलेली माहिती केवळ आर्मेनियातीलच नव्हे, तर संपूर्ण जगभरात समलैंगिकांवर होणारे अत्याचार, हिंसा दर्शवते. प्रगत देशांमधल्या स्त्रियांना वेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागले आहे, लागत आहे; तर मागास आणि कट्टर इस्लामी देशांतील समस्या वेगळ्या आहेत. मागास देशांमध्ये आरोग्य, मूलभूत हक्क, शिक्षण यांसाठी स्त्रियांना संघर्ष करावा लागत आहे.

शिक्षण म्हणजे नक्की काय, त्याने काय परिवर्तन घडू शकते हे माहीत नसलेल्यांनी शिक्षण घेणाऱ्या चिमुरडय़ांवर गोळीबार करण्याची क्रूर चेष्टा पाकिस्तानातल्या स्वात खोऱ्यात केली जाते. अशा हल्ल्यातून बचावलेली मलाला युसूफझाई २०१३ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत- या हल्ल्यानंतरही शिक्षण घेण्याचा निर्धार कायम असल्याचे सांगते. यासाठी लेखणी उचलण्याची प्रेरणा देतानाच दहशतवाद्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठीही प्रयत्नशील असल्याचे ती सांगते. त्यांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार असल्याची जाणीव करून देते.

सौदी अरेबियामध्ये स्त्रियांच्या वाहन चालविण्याच्या हक्कासाठी मानल अल-शरीफ यांनी चळवळ उभारली. मात्र या चळवळीतील अनेक स्त्रिया आज तुरुंगवासात आहेत. जागतिक हवामान बदलाबाबत ग्रेटा थुनबर्ग हिने पृथ्वी आणि पर्यावरण वाचवण्यासाठी जगाला साद घातली, तर नोबेल पारितोषिक विजेत्या वांगारी मथाई यांनी जंगल वाचविण्यासाठी अनेक अत्याचार सहन केले. दुर्दैवाने, हिंसाचार आणि धमक्यांचा अनुभव आणि स्त्रियांचा आवाज शांत करण्याचा प्रयत्न आजही सुरूच आहे. म्हणूच इटली आणि ऑस्ट्रियामधील महिला मंत्र्यांना धमक्या मिळाल्याने गेल्या वर्षी पोलीस संरक्षण घ्यावे लागले. या सगळ्यांची भाषणे, त्यांची मते पुस्तकात दिली आहेत. भारतातील कविता कृष्णन यांचे दिल्लीतील ‘निर्भया’ला न्याय मिळवून देण्यासाठी आवाहन करणारे भाषणही पुस्तकात वाचायला मिळते.

‘हे शक्तिशाली शब्दांचे संकलन आहे. या शब्दांनी मला प्रभावित केले आणि प्रेरणा दिली. बदल घडवून आणण्यास याच शब्दांचे साहाय्य झाले आहे,’ असे या पुस्तकाच्या संपादक इव्हेट कूपर म्हणतात. इव्हेट या ब्रिटनमधील मजूर पक्षाच्या नेत्या आहेत. त्यांचे वडील कामगार नेते होते आणि त्यांच्याकडूनच त्यांना वक्तृत्वाचे पाठ आणि बोलण्यासाठी, मत मांडण्यासाठीचा आत्मविश्वास मिळाला. खासदार झाल्यानंतर कूपर यांनाही अनेक धमक्यांना सामोरे जावे लागले. तसेच जगभरातील स्त्रियांबाबतच्या अनेक घटनांनी त्यांना व्यथित केले. अत्याचारांच्या घटनांना घाबरून गप्प राहण्याऐवजी त्यांनी पुस्तकाच्या माध्यमातून स्त्रियांना बोलते करण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी संघर्षांच्या कहाण्या त्या-त्या स्त्रियांच्या प्रभावी भाष्यांतून मांडल्या आहेत.

‘शी स्पीक्स’
लेखिका : इव्हेट कूपर
प्रकाशक : अटलांटिक बुक्स
पृष्ठे : २८२, किंमत : ३९९ रुपये
pradnya.talegaonkar@expressindia.com