12 July 2020

News Flash

बुकबातमी : मराठी माणसाच्या कर्तेपणाचा इतिहास

देशातल्या इतर राज्यांना नुसता भूगोल आहे- महाराष्ट्राला भूगोलासहित इतिहासही आहे,

(संग्रहित छायाचित्र)

इतिहासकार जदुनाथ सरकारांनी शंभर वर्षांपूर्वी भाकित केले होते की, महाराष्ट्रीय पुढल्या शंभर वर्षांत जगज्जेते ठरतील. त्याच्या आसपासच वि. का. राजवाडेंनी महाराष्ट्रीय कर्त्यां पुरुषांची यादी केली होती. महाराष्ट्राचे हे कर्तेपण पाहूनच कदाचित जदुनाथ सरकारांनी तसे भाकित केले असावे. आज शंभर वर्षांनी त्यांच्या भाकिताचे काय झाले, हे सांगण्याची गरज नाही. पण ऐतिहासिक प्रक्रियांची, सामाजिक-राजकीय प्रवाहाच्या गतिमानतेची, अनिश्चिततेची जाण असलेल्या जदुनाथ सरकारांनी तसे भाकित केले असेल तर ते नक्कीच गंभीरपणे केले असेल. अर्थात, ते भाकित प्रत्यक्षात येण्या-न येण्याची जबाबदारी अखेर महाराष्ट्रीय जनांचीच. तेव्हा ते जदुनाथ सरकारांचे विधान महाराष्ट्रीयांनी का फिरवले, याची कारणमीमांसा काळाच्या या टप्प्यावर करावीच लागेल. विशेषत: काही वर्षांच्या झुंझार चळवळीनंतर मिळवलेल्या संयुक्त महाराष्ट्राला साठ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तर ते अधिकच सयुक्तिक ठरावे. ती  करताना, हाताशी असावे अशा पुस्तकाची घोषणा महाराष्ट्राच्या साठाव्या वर्धापन दिनादिवशीच झाली. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांचे आगामी ‘शिवाजी इन साऊथब्लॉक : द अनरिटन हिस्ट्री ऑफ प्राऊड पीपल’ हे ते पुस्तक! हार्पर कॉलिन्स या प्रकाशनसंस्थेकडून प्रसिद्ध होणाऱ्या या पुस्तकात मराठी माणसाच्या कर्तेपणाचा इतिहास वाचायला मिळणार आहे.

देशातल्या इतर राज्यांना नुसता भूगोल आहे- महाराष्ट्राला भूगोलासहित इतिहासही आहे, हे वाक्य कितीही रंजक वाटले, तरी महाराष्ट्रीय इतिहासाचे अवलोकन केल्यास त्यात तथ्यही जाणवू लागते.

मध्ययुगीन महाराष्ट्र असो वा आधुनिक महाराष्ट्राची वाटचाल असो, या राज्याने देशाला दिशा दिली. प्रबोधनाची पहाट याच राज्यात झाली. स्वातंत्र्य चळवळीला आकार देणारी राष्ट्रीय सभा (नंतरची काँग्रेस) इथेच जन्मली. कामगारकेंद्री आणि डाव्या चळवळी इथेच उदयास आल्या. रा. स्व. संघ असो वा उजवा विचार प्रवाह, त्यांची मुळे याच भूमीत आहेत. दलित चळवळी असो वा दलित साहित्य, इथेच वंचितांचे हुंकार पहिल्यांदा प्रभावीपणे मांडले गेले. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक इथलेच, आणि त्यांच्यानंतर स्वातंत्र्यलढय़ाची सूत्रे हाती आलेल्या गांधीजींचे गुरू गोपाळकृष्ण गोखले हेही महाराष्ट्राचेच. बहुजन संकल्पना पहिल्यांदा चर्चेत आली तीही महाराष्ट्रातच, अन् हिंदूत्व विचारही इथल्याच सुपुत्राने देशाला दिला. असे ही सर्वव्यापी अव्वलपण जणू महाराष्ट्राचा स्वभावधर्मच. असे अनेक संदर्भ या पुस्तकात मिळतीलच, आणि जदुनाथ सरकार यांचे भाकित खरे का ठरले नाही, याचेही उत्तर मिळेलच. पण त्यासाठी ऑक्टोबपर्यंत वाट पाहावी लागेल!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2020 12:15 am

Web Title: shivaji in south block the unwritten history of a proud people book history of maharashtra zws 70
Next Stories
1 आरपारदर्शक वाचनसंसार
2 किम फिल्बीच्या ग्रंथसंग्रहाची रहस्यकथा..
3 बुकबातमी : पुस्तकाचं काम काय असतं?
Just Now!
X