पंकज भोसले

खासगीकरण धोरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या माजी ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्या मृत्यूच्या दिवशी २०१३ साली या प्रदेशात लोकांनी रस्त्यावर येऊन आनंद व्यक्त केला. उत्सव आणि जलशांसारखेच ते वातावरण होते.. त्या आनंदामागची कारणं इथं एक बालकामगार आणि त्याची मद्यपी आई यांची ही कादंबरी वाचून उमगू शकतात..

hotel Solapur district
सोलापूर : हॉटेल व्यवस्थापनाच्या नावाखाली मित्राला ६८ लाखांचा गंडा, अक्कलकोटमध्ये दागिने लंपास
russian soldier
‘रशियात अडकलेल्या २० भारतीयांच्या सुटकेसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न’, परराष्ट्र खात्याची माहिती
Supreme Court ban Patanjali from advertising
अग्रलेख : बाबांची बनवेगिरी !
Rajendra Pawar vs Ajit Pawar
“..आणि तेव्हापासून पवार कुटुंबीयात दुरावा निर्माण झाला”, बारामतीमध्ये निनावी पत्र व्हायरल; राजेंद्र पवार म्हणाले…

आर्थिक आणि सामाजिक वाताहतीच्या कहाण्या साहित्याला नव्या नाहीत. गेल्या शतकभरात दोन महायुद्धे, दुष्काळ-पूर, महासाथ, पर्यावरणीय बदल, उद्योग विस्थापन आदी घटकांच्या ओझ्यात व्यक्ती आणि व्यक्तिसमूहांच्या शोकांतिका तीव्रतेने साहित्यामध्ये उमटल्या. याचे अगदीच जवळचे उदाहरण घ्यायचे तर मुंबईकडे पाहता येईल. ऐंशीच्या दशकात मुंबईतील गिरणउद्योगावर अवलंबून असलेल्या अन् अचानक बेरोजगार झालेल्या लाखो कुटुंबीयांच्या वाताहतीने या शहराची सामाजिक रचना तयार केली. इथले राजकारण, दूर उपनगरांच्या टोकापर्यंत फोफावलेल्या मानवी वस्त्या, झोपडपट्टी, भू-माफिया, संघटित गुन्हेगारी या साऱ्यांमध्ये गिरणगाव विघटनाची मुळं सापडतात. गेल्या वीसेक वर्षांत मुंबईतून विस्थापित झालेल्या व्यक्तींच्या कहाण्या मराठी, इंग्रजी आणि हिंदीतही लक्षवेधी ठरल्या. याचे कारण भरडले गेलेल्या लेखकांनी भवतालाकडून सततच्या आघाताला लेखनद्रव्य पुरवणारा कच्चा माल म्हणून योग्यरीत्या वापरले. शहरांच्या धमन्या ज्ञात असलेल्या या साहित्यिकांनी वाताहतीच्या प्रेमकथा रचल्या.

मुंबईची गिरणकेंद्री ओळख पुसल्यानंतर ती जशी पोखरण्यास सुरुवात झाली, तशीच नेमकी परिस्थिती स्कॉटलंडमधील ग्लासगो शहरात त्याच कालावधीत तयार झाली. ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्या धडाकेबाज निर्णयामुळे उद्योगांचे खासगीकरण झाले. अनेक कारखाने बंद पाडण्यात आले. त्यातून हजारो नागरिक बेरोजगार झाले. विस्थापनाच्या या प्रक्रियेत मद्य, ड्रग्ज, दारिद्रय़, आत्महत्या, बकाल वस्त्या आणि गुन्हेगारीची आवर्तने समाजात घडू लागली.

त्या घुसळणीला शब्दबद्ध करणाऱ्या स्कॉटलंडच्या ग्लासगो आणि इतर शहरांमधून काही कादंबऱ्या नव्वदोत्तरीत जगभर निर्यात झाल्या. त्यात पहिला उल्लेख जेम्स केलमन यांच्या ‘हाऊ लेट इट वॉज, हाऊ लेट’ या कादंबरीचा करावा लागेल. या कादंबरीने १९९४ चे बुकर पारितोषिक मिळवून सगळ्यांना धक्का दिला होता. कारण यातली भाषा ही उच्चभ्रूंची इंग्रजी नव्हती. कष्टकरी आणि निम्न मध्यमवर्गात बोलली जाणारी स्कॉटिश पोटभाषा तिचे वैशिष्टय़ होते. भुरटय़ा-मद्यपी व्यक्तिरेखेवर आधारलेल्या केलमन यांच्या गाजलेल्या कादंबरीपेक्षा पुढे जगाला सर्वाधिक माहीत झाली, ती आयर्विन वेल्श यांची ‘ट्रेनस्पॉटिंग’ (कारण होते, त्यावर आधारलेला चित्रपट). ग्लासगोनजीकच्या एडिनबरा शहरात ड्रग्जच्या आहारी गेलेल्या तरुणांच्या नजरेतून जग दाखविणारी ही कादंबरी केलमन यांच्याहून अधिक प्रमाणात पोटभाषेचा वापर करते. ड्रग्ज व्यसनाचा फोफावलेला वटवृक्ष येथे पाहायला मिळतो. ही कादंबरी वाचण्यास पूर्णपणे खडतर असलेल्या लोकप्रिय जागतिक साहित्यात मोडते. येथील ओबन शहरातील तरुणाईला साहित्याच्या केंद्रस्थानी आणणाऱ्या अ‍ॅलन वॉर्नर यांच्या ‘मॉर्वन कॉलर’ या कादंबरीलाही चित्रपटीय रूपांतरानंतर जगभर प्रसिद्धी लाभली. स्कॉटलंडमधील व्यक्तींच्या वाताहतीचा अर्वाचीन इतिहास हा या सर्व साहित्यकृतींमधील समान धागा आहे. यंदा बुकरची संभाव्य विजेती कादंबरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘शगी बेन’ने या धाग्याला नवी गाठ यंदा बांधली आहे.

डग्लस स्टुअर्ट या अमेरिकी लेखकाने आपले स्कॉटलंडमधील बालपण आत्मकथेऐवजी कादंबरीच्या रूपात समोर आणले. उपजीविकेसाठी वस्त्रोद्योगात असलेल्या या लेखकाने १९८० च्या दशकातील ग्लासगो शहराच्या उपनगरांचे पर्यटन ‘शगी बेन’मधून घडविले आहे. तिथल्या माणसांइतक्याच कुरूप बनलेल्या निमशहरांचे हे तिथल्या साहित्य किंवा पत्रकारितेतूनही अधोरेखित न झालेले सूक्ष्म अवलोकन आहे. लेखक तीव्र साहित्यप्रेमाने किंवा ओढीने घडला नसल्याने त्याच्या लिखाणात भाषिक-साहित्यिक प्रभावाची मात्रा नाही. ज्या वातावरणात तो लहानपणी वावरला, तिथल्या व्यवहारबोलींनी तो आकाराला आला असला, तरी अमेरिकेतील दोन दशकांच्या वास्तव्यामुळे स्थानिक पोटभाषेचा मर्यादित वापर त्याने कादंबरीत केला आहे. त्यामुळे जेम्स केलमन आणि आयर्विन वेल्श यांच्या कादंबऱ्यांपेक्षा तिचे वाचन सहजसोपे ठरते. पुस्तकरूपात येण्याआधी अडीच डझन प्रकाशकांकडून नाकारली गेलेली ही ‘शगी बेन’ सध्या सर्वाधिक चर्चेतील कलाकृती बनली आहे.

‘शगी बेन’ १९९२ साली सुरू होते, ती शीर्षकनाम असलेल्या व्यक्तिरेखेच्या ओझरत्या उल्लेखासह. सुपरमार्केटमध्ये काम करणारा शगी बेन हा बालमजूर कुणा पाकिस्तानी स्थलांतरित महिलेने उभारलेल्या चाळीवजा इमारतीच्या खुराडय़ात तुटपुंजे भाडे देऊन राहत असतो. कफल्लकांच्या गोतावळ्याखेरीज त्याचे कुणीच उरलेले नसते. त्याच्या या परिस्थितीला जबाबदार असलेली आधीची ११ वर्षे हा कादंबरीचा मुख्य भाग आहे. बेन कुटुंबाच्या पडझडीची गोष्ट त्यात आली आहे. कथा शगी बेनची असली, तरी यातील मुख्य व्यक्तिरेखा आहे त्याची आई अ‍ॅग्नेस बेन (स्पेलिंगनुसार बी-ए-आय-एन असल्याने हिचा ‘बिग बेन’शीच काय, पण गुजराती ‘बेन’शीही काही संबंध नाही).

या अ‍ॅग्नेस बेनचे हॉलीवूड अभिनेत्री एलिझाबेथ टेलर हिच्या चेहरेपट्टीशी साम्य असल्यामुळे तिचे तारुण्य तोऱ्यात मिरविले गेले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी छानछोकी, मद्यछंद जोपासण्यात तिची उमेदीची वर्षे खर्च झाली. पुढे मातृत्वाची जबाबदारी अंगावर आल्यानंतर विविध संकटांनी तिच्या मद्यछंदाचे व्यसनात रूपांतर झाले आणि तीन मुलांसह संसारगाडा हाकण्याची जबाबदारी झटकून, मुलांना वाऱ्यावर सोडून स्वकेंद्री जगण्याचे तिने ठरविले. त्यामुळे झालेल्या दु:खवस्तू कुटुंबाचे कुतूहलवर्धक तपशील लेखकाने आपल्या खास शैलीत खोदून काढले.

पहिल्या नवऱ्याशी काडीमोड घेऊन कॅथरीन, लीक आणि शगी या तीन मुलांसह १९८१ साली साइटहीलमधील माहेरी दाखल झालेल्या अ‍ॅग्नेसचे आयुष्य आई-वडिलांच्या देखरेखीखाली फार बरे नसले, तरी भीषणही नसते. शग (बिग शग या नावाने त्याचा उल्लेख होतो) या टॅक्सीचालकाच्या प्रेमात ती पडते. आवेग ओसरण्याआधी त्याच्याशी लग्नही करते. लग्नानंतर थोडय़ाच दिवसांत बिग शगच्या बाहेरख्याली उठाठेवी आणि विकृतींचे प्रदर्शन अ‍ॅग्नेसपुढे केले जाते. त्यानंतरही बिग शग प्रतारणारहित संसाराची स्वप्ने तिला दाखवतो. त्याच्यावर विसंबून दूरच्या उपनगरातील मुर्दाड वस्तीत मुलांसह दाखल झालेल्या अ‍ॅग्नेसला एकाएकी तो सोडून जातो. नुकतीच नोकरी गमावलेल्या कोळसा खाण कामगारांच्या या वस्तीत हिऱ्यासारख्या तळपणाऱ्या अ‍ॅग्नेसची स्वत:ला उभारी देण्याची, मुलांना घडविण्याची सारी स्वप्ने कोसळून जातात. तिचा तीव्र मद्याधार तिच्या मुलांपासून आणि समाजापासून तिला तोडत नेतो. घरातील लहान मुले उपासमार, मानहानी, अपमान आणि जगाच्या उफराटय़ा वागणुकीचा सामना करीत आपली आपणच वाढू लागतात. या तिघा भावंडांपैकी थोरली मुलगी कॅथरिनला लग्न करून नवऱ्यासोबत दक्षिण आफ्रिकेत स्थलांतर करण्याचा पर्याय उपलब्ध होतो. मधला लीक हा चित्रकलेत प्रचंड गती असूनही अ‍ॅग्नेसने निर्माण करून ठेवलेल्या अडचणींमुळे कुटुंबाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी शहरात राबतो. त्यामुळे सर्वात लहान शगी बेन आपल्या आईला आनंदी ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या क्ऌप्त्या लढवू पाहतो.

मद्य सोडून आयुष्याची नवी सुरुवात करण्याचा अ‍ॅग्नेसचा सततचा उत्साह वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्घटनांनी कादंबरीभर मावळत राहतो. व्यसनमुक्ती केंद्राआधारे तिच्या आयुष्याला काही काळ मद्यमुक्त अवस्था लाभते. एकटेपणा घालविण्यासाठी ती नोकरीही धरते. तिथे तिच्या आयुष्यात खरे सुख आणू शकणारी प्रेमकहाणीही सुरू होते. पण त्या प्रेमकहाणीचा सुखान्त काही घडत नाही. परिस्थिती आधी असते, त्याहून बिकट बनते. तरीही शगी बेनची आपल्या आईला दु:खाच्या गर्तेतून बाहेर काढण्याची लढाई संपत नाही.

मुलांचे संगोपन नाकारण्यात निपुण बनलेल्या अ‍ॅग्नेसचा छानछोकीपणा आणि मद्य मिळविण्यासाठी वाटेल त्या गोष्टी करण्याची तयारी, यांची वर्णने धक्कादायक आहेत. कोळसा खाणकामगारांच्या वस्तीतल्या जगण्याचे तपशीलही विस्ताराने येतात. दलदलीच्या शेजारी तयार झालेली दोन किंवा तीन खोल्यांची घरे. त्यातील भणंगासारखे कपडे घालणारे आणि बायका-मुलांनी पैशांसाठी खिसे चाचपून पाहू नये यासाठी विजारींसह निद्राधीन होणारे कामगार येथे चित्रित होतात. सरकारी मदतनिधीतील, आठवडी पगारातील सारा पैसा दारूच्या गुत्त्यांमध्ये उडवणारी माणसे, वेश्यालये, बेरोजगारांचे जथे, निराश- हताश- उपाशी- अर्धपोटी नागरिकांची इथली वर्णने पकडून ठेवतात. अ‍ॅग्नेसच्या मद्यलहरी आणि बेजबाबदार कृत्यांमधूनही ती ‘वाईट’ म्हणून समोर येत नाहीत, हे डग्लस स्टुअर्ट यांचे कौशल्य. शाळेपासून सर्वच ठिकाणी अन्यायाची परिसीमा भोगणाऱ्या शगी बेन या व्यक्तिरेखेचा उमेदपूर्ण अवतार हा गुण कादंबरीच्या कौतुकास पात्र आहे.

जगाच्या कुठल्याही भूभागावर वास्तव्यास असलेल्या समाजाच्या भल्या किंवा बुऱ्या स्थितीमध्ये घटना-घटकांचे अनंत संदर्भ दडलेले असतात. वाताहतीनंतर उद्यमशीलता जोपासत झेप घेण्याऐवजी आणखी तळ गाठणाऱ्या स्कॉटलंडमधील शहरांच्या नाकर्तेपणाची भूमिका ‘शगी बेन’ ही कादंबरी, त्या साऱ्या संदर्भासहित स्पष्ट करते. मार्गारेट थॅचर यांच्या मृत्यूच्या दिवशी २०१३ साली या प्रदेशात लोकांनी रस्त्यावर येऊन आनंद व्यक्त केला. उत्सव आणि जलशांसारखेच वातावरण थॅचर-मृत्यूनंतर स्कॉटलंडमध्ये होते (ज्याच्या चित्रफिती यूटय़ूबवर उपलब्ध आहेत). त्या आनंदामागची कारणपरंपरा जाणून घेण्यासाठीही ‘शगी बेन’ उपयुक्त ठरू शकते.

pankaj.bhosale@expressindia.com