|| महेश दत्तात्रय लोंढे

युद्धाची कथा सांगणाऱ्या या कादंबरीचे मध्यवर्ती पात्र आहे अल्फा हा तरुण सैनिक. पण ही गोष्ट केवळ युद्धाची वा अल्फाची राहात नाही. मृत्यूचे आणि हिंसेचे तांडव पाहिलेल्या कोणत्याही माणसाची गोष्ट अशीच असते… ओरखडे उमटविणारी, व्रण मागे सोडणारी…

इंग्रजी साहित्यविश्वातील प्रतिष्ठित अशा ‘मॅन बुकर’ पुरस्काराला पूरक आणि अनुवादाला महत्त्व देणारा ‘इंटरनॅशनल बुकर’ पुरस्कार २००५ सालापासून दिला जात आहे. ‘मॅन बुकर’ पुरस्कार केवळ कॉमनवेल्थ देश, आयर्लंड आणि झिम्बाब्वे या देशांतील इंग्रजी भाषेत लिहिणाऱ्या लेखकांसाठीच आहे. त्यामुळे बाकीच्या देशांत आणि इतर भाषांत लिहिली जाणारी, परंतु इंग्रजीत अनुवादित झालेली चांगली पुस्तके या पुरस्काराच्या स्पर्धेतून बाद होत होती. बुकर पुरस्काराच्या ‘लाँगलिस्ट’ वा ‘शॉर्टलिस्ट’मध्ये पुस्तकाचा समावेश होणे म्हणजे जगभर पोहोचण्याची संधी असते. इतर भाषांत लिहिली गेलेली कित्येक चांगली पुस्तके या संधीला मुकत होती. याच कारणामुळे ‘इंटरनॅशनल बुकर’ पुरस्काराची सुरुवात झाली.

यंदाच्या ‘इंटरनॅशनल बुकर’ पुरस्कार विजेत्याची घोषणा जूनच्या पहिल्या आठवड्यात झाली. फ्रेंच लेखक डेव्हिड डियप (डिओप) यांना त्यांच्या ‘अ‍ॅट नाइट ऑल ब्लड इज ब्लॅक’ या पुस्तकासाठी तो जाहीर झाला. डेव्हिड डियप यांनी मूळ फ्रेंच भाषेत लिहिलेल्या या पुस्तकाचा अ‍ॅना मोस्कॉवाकिस यांनी इंग्रजीत अनुवाद केला आहे. हा पुरस्कार प्राप्त होणारे डेव्हिड डियप हे पहिलेच फ्रेंच तसेच आफ्रिकी वंशाचे कादंबरीकार आहेत. पहिल्या महायुद्धाची पार्श्वभूमी असणारी ही कादंबरी युद्ध आणि त्याचे मानसिक आघात यांवर भाष्य करते. वंशवाद, वसाहतवाद, पुरुषत्व आदी संकल्पनाचे आडवे-उभे धागे यात गुंफलेले आहेत. पहिल्या महायुद्धात सेनेगल या फ्रान्सची वसाहत असणाऱ्या देशातून आणि इतर आफ्रिकी राष्ट्रांतून सव्वा लाखापेक्षा जास्त तरुण फ्रान्सच्या वतीने जर्मनीविरोधात लढण्यासाठी फ्रेंच सैन्यात रायफलमन म्हणून पाठवले गेले होते. यांपैकी तीसेक हजार मारले गेले होते. जर्मन सैन्यात काळ्या त्वचेच्या आफ्रिकी सैनिकांची भीती बसावी म्हणून त्यांच्या क्रूरतेविषयी अनेक दंतकथा पसरवल्या गेल्या होत्या. या आफ्रिकी सैनिकांच्या पोशाखासमवेत मोठ्या पात्याचे धारदार हत्यार येत असे. त्यांना युद्धात सर्वात पुढच्या फळीत ठेवले जाई. अशा खंदकात राहून लढणाऱ्या सेनेगलीज् सैनिकांचे अंतर्विश्व या कादंबरीत आले आहे.

कादंबरीचे मध्यवर्ती पात्र अल्फा नावाचा एक तरुण मुलगा आहे. शत्रुसैन्याच्या अतिशय क्रूर अशा हल्ल्यात अल्फाचा बालपणीचा मित्र- त्याचा साथीदार सैनिक मडेम्बा भयंकररीत्या जखमी होतो. पोटावर झालेल्या वारामुळे आतडी बाहेर पडलेल्या, रक्तबंबाळ अशा अवस्थेत असणाऱ्या मडेम्बाला शेवटच्या घटका मोजणेही असह्य झालेले असते. तो आपल्या प्रिय मित्राकडे आपल्याला मारून टाक आणि असह्य अशा वेदनांपासून मुक्ती दे, अशी विनवणी करत राहतो. पण अल्फा आपल्या मित्राला मारू शकत नाही. मडेम्बाचा अखेर विकल अवस्थेत तडफडून मृत्यू होतो. खरे तर त्याने आपल्याच बंकरमधील इतर सैनिकांचे मृत्यू पाहिलेले असतात. कॅप्टनच्या आदेशावर किती तरी शत्रुसैनिकांना यमसदनी धाडलेले असते. तो रोज मृत्यूशीच खेळत असतो. परंतु मित्राचा मृत्यू व त्याचे झालेले हालहाल त्याच्या डोळ्यांसमोरून हलत नाहीत. जिवलग मित्राच्या मृत्यूने अल्फावर प्रचंड मानसिक आघात होतो. त्याचे भावविश्व उद्ध्वस्त होते आणि तो अधिकाधिक हिंसक होतो. राक्षसी वाटावी इतकी क्रूरता त्याच्या कृतींमध्ये दिसू लागते. तो मानसिकदृष्ट्या अस्थिर होऊन वेडसर वागू लागतो. रागाच्या आणि वेडसरपणाच्या भरात तो शत्रुसैनिकांना एकेकटे गाठू लागतो. अंधार पडल्यावर युद्धविराम झाला तरी तो बंकरमध्ये न परतता मागे थांबून, मृत झाल्याचे सोंग घेऊन बेसावध अशा एकेकट्या शत्रुसैनिकांना पकडतो. नंतर ‘नो मॅन्स लॅण्ड’मध्ये आणून त्यांना भयंकर क्रूर पद्धतीने हालहाल करून मारू लागतो. त्यांचे रक्त अंधारात सांडू लागतो. आपल्या मित्राची जी अवस्था शत्रुसैन्याने केलेली असते तशी अवस्था तो पकडलेल्या प्रत्येक शत्रुसैनिकाची करू लागतो. त्याला मरणाची भीती उरलेली नसते. सैनिकांना मारून झाल्यावर त्यांचे बंदूक वागवणारे हात तोडून स्मरणिका म्हणून बंकरमध्ये आणू लागतो. यातूनच तो नरमांसभक्षक असल्याची अफवा बंकरमध्ये पसरू लागते. सुरुवातीला त्याचा अभिमान वाटणारे त्याचे साथीदार त्याला घाबरू लागतात. ही अफवा तो खोडून काढू शकत नाही. त्याला कुठल्याही परिस्थितीला व्यवस्थित प्रतिसादच देता येत नाही. कारण मडेम्बाच्या मृत्यूनंतर बाहेरच्या गोष्टी त्याच्यासाठी धूसर होऊ लागलेल्या असतात व मित्राच्या मृत्यूला आपणच जबाबदार आहोत अशी भावना प्रबळ होऊ लागलेली असते. त्याचे बोलणे आधीच शून्य झालेले असते.

नंतर त्याला केवळ युद्धाच्या आधीच्या गोष्टी आठवत असतात. युद्धावर येण्याआधीची त्याची आणि मडेम्बाची मैत्री, युद्धाला निघण्याआधीच्या रात्री त्याला मिळालेला गावातल्या सर्वात सुंदर अशा फॅरी नावाच्या मुलीचा सहवास यांसारख्या गोष्टी त्याला आठवत राहतात. आठवणींच्या माध्यमातून आपण अल्फाच्या भूतकाळात प्रवेश करतो. त्याच्या बालपणीच्या आठवणीतून त्याच्या कुटुंबाचा इतिहास समोर येतो. विशिष्ट अशा मन:स्थितीत माणसाला भूतकाळातील ठरावीक गोष्टीच आठवत असतात. सध्याच्या परिस्थितीला व मन:स्थितीला जोडल्या जातील अशाच घटना, प्रसंग माणूस भूतकाळाच्या विहिरीतून उपसून काढत असतो. अल्फाच्या आयुष्यातील अशा घटना त्याच्या स्मरणातून आपल्यापर्यंत पोहोचतात. त्याच्याविषयीच्या अफवेनंतर त्याला सक्तीची विश्रांती दिली जाते. तो लढाईत नसला तरी त्याचे स्वत:शी युद्ध चालू राहते. तो स्वत:ला सोलत राहतो. त्याच्या आतल्या कल्लोळाचा युद्धविराम कधी होत नाही आणि तो केवळ स्वत:च्या विश्वात वावरू लागतो. त्याला विश्रांतीच्या काळात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले जाते. तिथे त्याच्या आतील कल्लोळ आणखी उसळून येतो. तो शेवटी इतका उसळतो की, त्याच्या विचारांवर आणि कृतींवर त्याचे नियंत्रण राहत नाही. कादंबरीचा शेवट आपल्याला हादरवून सोडतो.

‘युद्धस्य कथा रम्या:’ असे जरी म्हटले जात असले, तरी त्या कथा केवळ ऐकणाऱ्यासाठी रम्य असतील. युद्धात अंतर्विश्व बेचिराख झालेल्या व्यक्तीला काय रम्य वाटेल? युद्धाचे सामाजिक, आर्थिक परिणाम ढोबळ अशा पातळीवर आपल्याला माहीत असतात. आफ्रिकी सैन्याच्या खराब परिस्थितीबद्दल, त्यांना मिळणाऱ्या तुटपुंज्या वेतनाबद्दल अनेक कागदपत्रे आज उपलब्ध आहेत; पण त्यांच्या आंतरिक आयुष्याचे दस्तावेजीकरण कसे करणार? एका व्यक्तीवर वा सैनिकावर युद्धाचा काय परिणाम होतो किंवा आघात होतो, हे त्याच्या मानसिक अवस्थेच्या विश्लेषणानेच समजू शकेल. पण मानसिक आघातांच्या नोंदी इतिहासात होत नाहीत. त्या व्यक्तीबरोबर संपून जातात. त्या व्यक्तीने काही लिहून ठेवले तर काही हाताला लागते. किंवा मग डेव्हिड डियपसारखे लेखक कल्पनाशक्तीच्या जोरावर त्या मानसिक अवस्थेचा अनुभव वाचकाला देऊ शकतात. या अर्थाने डियप यांनी, ज्यांना आजपर्यंत आवाज नव्हता अशा लोकांना आवाज दिला आहे. युद्धातील भयंकर अनुभवातून पोळून मौनाच्या अरण्यात निघून गेलेल्या लोकांचा आतला आवाज, कल्लोळ ही कादंबरी आपल्याला ऐकवते.

ही कादंबरी अनेक गोष्टींसाठी महत्त्वाची ठरते. एक म्हणजे, या कादंबरीतून युद्धाचा फोलपणा प्रत्ययास येतो. युद्धातून फायदा कोणत्या वर्गाला होतो आणि त्याचे अनेकांगी दुष्परिणाम मात्र कोणता वर्ग भोगतो, हे मानवजातीच्या इतिहासातून उघड झालेले आहेच. परंतु इतिहासातून सुटलेल्या किंवा गाळल्या गेलेल्या जागा, कथानके, उपकथानके यांना चर्चेच्या केंद्रबिंदूवर ही कादंबरी आणते. ही कथानकेच खरी केंद्रस्थानी असायला हवीत अशी बाजू वाचकाच्या मनावर ठसवते. दुसरे असे की, कादंबरीतील मुख्य पात्राचे क्रौर्य राक्षसी असले तरी युद्धाची सामुदायिक हिंसादेखील तितकीच राक्षसी असते, हेही आपल्या मनावर ठसत जाते. युद्धाच्या सामुदायिक हिंसेला नैतिकतेचे, योग्य-अयोग्यतेचे मुलामे दिलेले असतात. इतका क्रूर होऊ शकणारा तरुण मुळात तरल आणि नाजूक भावना अनुभवायलाही सक्षम होता, हे त्याच्या स्वत:च्या भूतकाळातील आठवणींतून आपल्याला उमजत जाते. ही कादंबरी तरुणाची स्वप्ने आणि त्याचे भावविश्व उद्ध्वस्त होण्याची कहाणी आहे. पात्रांना नावे तर आहेत, पण ते सैनिक म्हणून नेमके कुठल्या जागी आहेत, ते सैन्याच्या कोणत्या तुकडीत आहेत असे काही वर्णन यात येत नाही. या अर्थाने या कादंबरीतील अल्फा हे मध्यवर्ती पात्र हे सर्व सैनिकांचा प्रतिनिधी बनते. ही गोष्ट केवळ अल्फाची राहत नाही. मृत्यूचे आणि हिंसेचे तांडव पाहिलेल्या कोणत्याही सैनिकाचे अंतर्विश्व असेच असेल, यात आपल्याला शंका उरत नाही.

कादंबरीत प्रथम पुरुषी निवेदनाचा वापर केल्याने मुख्य पात्राच्या मानसिक अवस्थेचे, अस्वस्थतेचे आणि भावनिक आंदोलनांचे आपण साक्षीदार होतो. लेखकाचा प्रयत्न इतिहास सांगण्याचा नाही तर इतिहासाने जे आजपर्यंत सांगितले नाही किंवा इतिहास मुळातच ज्या गोष्टी सांगू शकत नाही अशा गोष्टी सांगण्याचा आहे. इथे अशी गोष्ट म्हणजे भयंकर हिंसा अनुभवलेल्या/ केलेल्या अल्फासारख्या काळ्या सैनिकाचे आंतरिक आयुष्य- त्याचे अंतर्विश्व.

लेखकाला जे अंतर्विश्व दाखवायचे आहे ते या निवेदनशैलीमुळे साध्य होते. पात्राचा बाह््यविश्वाशी संबंध नाममात्र आहे. पात्राच्या अंतर्विश्वाचे किमान नेपथ्य म्हणून केवळ बाह््यविश्वाची वर्णने येतात. पात्राच्या अंतर्विश्वातील विचारांच्या, आठवणींच्या लाटा आपल्याला झुलवत राहण्यात यशस्वी होतात. पात्राच्या कृतीतील सहज हिंसा ही प्रतिसाद म्हणून आली आहे. मुख्य पात्राची नीट प्रतिसाद द्यायची आणि तार्किक विचार करण्याची ताकदच हरवत चालली आहे हे आपल्याला समजत जाते. त्याच्या पायातून अजून निरागसतेचे चप्पल निसटून जायचे आहे, त्याच्या स्वप्नांची घुंगरे अजून आवाज करताहेत; इतक्यात त्याला भयंकर कर्णकर्कश अशा युद्धात कसे लोटले जाते, त्याच्या माथ्यावर हिंसा कशी स्वार होते, त्यामागे अप्रत्यक्षपणे वा प्रत्यक्षपणे वंशवाद, वसाहतवाद कसा असतो; पुरुषत्व कसे हत्यार म्हणून वापरले जाते, हे दाखवण्यात लेखक यशस्वी ठरतो.

पहिल्या महायुद्धाची अखेर होऊन एक शतक लोटले असताना, एक आफ्रिकी लेखक प्रश्न उभे करतो. हे प्रश्न युद्धाच्या आवश्यकतेविषयी आहेत, वसाहतवादाविषयी आहेत, वंशवादाविषयी आहेत, पुरुषत्व या संकल्पनेविषयी आहेत. हे प्रश्न लेखकाला पडले, कारण त्याचे आजोबा पहिल्या महायुद्धात लढले होते. परंतु त्याला ते कधीही युद्धाविषयी कोणतीच कथा रंगवून सांगताना दिसले नाहीत. उलट ते गप्प असायचे. लेखकाने त्यांचे अनुभवविश्व काय असेल या कुतूहलापोटी फ्रेंच सैनिकांची पत्रे व युद्धासंदर्भात इतर प्रकाशित साहित्याचे वाचन केले. सैनिकांनी लिहिलेली पत्रे वाचताना त्यांतील भावनिक आंदोलनामुळे लेखक प्रभावित झाला. विशीतही न पोहोचलेल्या तरुणांना -ज्यांना अजून कोवळ्या भावनाही नीट अनुभवास आल्या नाहीत- क्रूर आणि हिंसक अशा युद्धात तोफगोळे आणि बंदुका यांच्या छायेत राहावे लागत होते. शिट्टीच्या इशाऱ्यावर युद्धाला निघावे लागत होते. जगण्याची अनिश्चितता शिखरावर असणारा काळ ज्यांनी पाहिला, मृत्यूच्या छायेत जे जगले; जे स्वत: युद्धखोर नव्हते तर युद्धाचे बळी होते- अशा लोकांना आवाज देण्याच्या आंतरिक दाबातून कादंबरी लिहायला सुरुवात केल्याचे लेखकाने मुलाखतींमध्ये स्पष्ट केले आहे.

सैनिक नव्हे, तर युद्ध वाईट असते, हे दाखवण्यात ही कादंबरी यशस्वी होते.  कादंबरीतील हिंसा, हळवेपणा, क्रूरता आणि प्रेम अशा सतत चढउतार होणाऱ्या मानसिक/ भावनिक अवस्थांतराच्या प्रवासाचे आपण साक्षीदार बनून जातो. दीडशे पानांच्या आसपास संपणारी ही कादंबरी आपल्याला बराच काळ अस्वस्थ करून सोडते. आपल्या आत ओरखडे उमटवते, व्रण उमटवते… आणि व्रण मागे सोडणाऱ्या गोष्टी आपण सहसा विसरू शकत नाही.

लेखक भारतीय राजस्व सेवेत कार्यरत असून ‘निद्रानाशाची रोजनिशी’ हा त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आहे.

maheshlondhe2020@gmail.com