अभिजीत रणदिवे

जगाकडे आणि स्वत:कडेही तिरकसपणे पाहणाऱ्या फ्राँस्वा या पॅरिसस्थित मध्यमवयीन प्राध्यापकाभोवती फिरणारी ही कादंबरी ‘पाश्चात्त्य संस्कृती’च्या ऱ्हासाची भयचिन्हं दाखवते, अन् २१व्या शतकातलं परिचित वास्तवच वाचकासमोर उभं राहातं..

‘डिस्टोपियन फिक्शन’मध्ये बऱ्याचदा सुरुवातीपासूनच ‘डिस्टोपिया’ अस्तित्वात असतो. उदाहरणार्थ, ‘बिग ब्रदर’च्या आधिपत्याखालीच जॉर्ज ऑर्वेलची ‘१९८४’ सुरू होते. मिशेल वेलबेक या फ्रेंच लेखकाच्या ‘सबमिशन’मध्ये (‘सबमिशन’, मूळ फ्रेंच शीर्षक : र४्रे२२्रल्ल;  प्रकाशक : फ्लामारिओं; इंग्रजी भाषांतर : लोरिन स्टाइन; प्रकाशक : विलियम हाइनमान; पृष्ठे : २५६, किंमत : ८३१ रु.) मात्र तसं नाही. २०२२च्या फ्रान्समध्ये कादंबरी सुरू होते, तेव्हा २१व्या शतकातलं परिचित वास्तवच दिसतं. फ्राँस्वा नावाच्या पॅरिसस्थित मध्यमवयीन प्राध्यापकासमोर आयुष्याच्या विशिष्ट टप्प्यावर काही अस्तित्ववादी प्रश्न उभे असतात; पण त्यांना सामोरं जाण्यापेक्षा एका उच्चभ्रू, माणूसघाण्या, तुच्छतावादी (थोडक्यात, खास फ्रेंच!) नजरेतून तो जगाकडे आणि स्वत:कडेही तिरकसपणे पाहात असतो. त्याची मतं वाचताना गंमत वाटते खरी, पण एका फ्रेंच कादंबरीची सुरुवात म्हणून हे इतकं ठोकळेबाज आहे, की जणू येऊ घातलेल्या ‘डिस्टोपिया’विषयी वाचकाला गाफील ठेवण्याचाच हा कट वाटावा! किंबहुना, सावजाला हसवत-खेळवत एका गाफील क्षणी त्याची मुंडी पिरगाळणारी ही कादंबरी आहे. वाचक गाफील राहतो, कारण पाश्चात्त्य संस्कृतीचा ऱ्हास पुस्तकातल्या ‘डिस्टोपिया’चा पाया आहे. तो ऱ्हास समजून घेण्यासाठी, वेलबेकचा रोख जिच्यावर आहे ती पाश्चात्त्य संस्कृती कोणती हे आधी पाहायला हवं.

मध्ययुगीन काळापर्यंत ‘पाश्चात्त्य संस्कृती’चं काही प्रारूप अस्तित्वातच नव्हतं. प्लेगसारख्या महासाथी, धर्मयुद्धं, सत्तापिपासूंचे आपसांतले संघर्ष, अशा गोष्टींखाली पिचलेला तेव्हाचा युरोप सुसंस्कृत आहे असं कुणी म्हणू धजलं नसतं. त्याउलट, पश्चिम आशियातील आणि पौर्वात्य संस्कृती तेव्हा प्रगत मानल्या जात. पण मग काही तरी हललं. ‘आय थिंक, देअरफोर आय अ‍ॅम’ असं (फ्रेंच!) देकार्त म्हणून गेला (इ.स. १६३७). त्यामुळे जगात विवेकवादाचा पाया घातला गेला आणि ते घालणारी संस्कृती म्हणजे ‘पाश्चात्त्य संस्कृती’ असं (त्याच संस्कृतीत) मानलं जाऊ लागलं. मग १७८९ मध्ये राज्यक्रांती झाली (पुन्हा फ्रेंच!) आणि राजसत्ता झुगारून लोकराज्य आलं असंही मानलं जाऊ लागलं. मानवी हक्क, अभिव्यक्तिस्वातंत्र्य वगैरे लोकशाही मूल्यं राज्यघटनेत समाविष्ट झाली. मग त्यात आणखी एका गोष्टीची भर पडली- निधर्मीवाद! निधर्मी प्रजासत्ताकाची फ्रेंच संकल्पना आपल्या राज्यघटनेतल्या सर्वधर्मसमभावापेक्षा खूप वेगळी आहे. धर्मसंस्था आणि राज्यसंस्था यांची पूर्ण फारकत फ्रेंच निधर्मीवादाला अभिप्रेत आहे. मध्ययुगीन युरोपात ‘इन्क्विझिशन (धार्मिक न्यायमंडळ)’सारख्या गोष्टींद्वारे ख्रिस्ती धर्मसंस्थेनं अनन्वित अत्याचार केले. नाझींनी ज्यूंचं शिरकाण केलं हा तर ताजाच इतिहास आहे. म्हणून, कोणताही धर्मविचार मानवतावादी मूल्यांविरोधातच काम करतो, असं मानत धर्माला सार्वजनिक जीवनातून हद्दपार करणं फ्रेंच निधर्मीवादात अभिप्रेत आहे.

या मूल्यांच्या पायावर आपल्या संस्कृतीचं श्रेष्ठत्व उभं आहे असं मानणारी ‘आयडिया ऑफ फ्रान्स/ युरोप’ आणि तिचा ऱ्हास वेलबेकला अभिप्रेत आहे. याचे अनेक पुरावे कादंबरीच्या सुरुवातीपासून मिळतात. फ्राँस्वा फ्रेंच साहित्याचा प्राध्यापक आहे. त्याची पीएच.डी. वीसमाँस या १९व्या शतकाच्या अखेरच्या काळातल्या एका साहित्यिकावर आहे. एखादी संस्कृती पराकोटीची परिष्कृत अवस्था (रिफाइनमेंट) गाठते तेव्हा त्यातच तिचा ऱ्हास अंतर्भूत असतो, अशी मांडणी वीसमाँसनं केली. आधुनिक जगण्यातली निर्थकता जाणवल्यामुळे आयुष्याला कंटाळलेले प्रतिनायक (अँटीहिरो) त्यानं रंगवले. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात वीसमाँसला कॅथॉलिक धर्मामध्ये जगण्याचा अर्थ सापडला आणि तो विविध मठांच्या सान्निध्यात जगला. फ्राँस्वाचं (आणि त्याच्या बुद्धिजीवी परिसरातल्या कित्येकांचं) आयुष्यही परिष्कृततेच्या टोकावर आहे. सोबरेन या जगविख्यात विद्यापीठात तो प्राध्यापक आहे. तो एकटा राहतो. भावनिक जवळिकीचा अनुभव ज्यातून मिळेल अशा कोणत्याही नात्याला त्याच्या आयुष्यात स्थान नाही; तशी त्याची गरज असल्याचं कोणतंही चिन्ह तो दाखवत नाही. शारीरिक गरज भागवण्यासाठी तो आपल्या एखाद्या विद्यार्थिनीशी मैत्री करतो (जी फार तर वर्षभरच टिकते), वेश्यागमन करतो किंवा इंटरनेटवर पॉर्न पाहतो. त्याचा अभ्यासविषय असलेलं १९व्या शतकातलं फ्रेंच साहित्य वगळता त्याला कशातही रस नाही. त्याला जगाविषयी आशा नाही. त्याची कशावरही श्रद्धा नाही. त्याचा तुच्छतावादही त्यातून येतो आणि त्याचा परात्मभावही (एलियनेशन). थोडक्यात, फ्राँस्वा एखाद्या फ्रेंच अस्तित्ववादी कादंबरीचा प्रतिनायक शोभतो.

व्यक्तिस्वातंत्र्याच्या एका उपभोक्ततावादी टोकावर उभ्या आताच्या पाश्चात्त्य संस्कृतीची जी टिंगल फ्राँस्वा करतो ती पाहता, त्याच्या मते ती संस्कृती ऱ्हास होण्याच्याच लायकीची असावी. या ऱ्हासाची भयचिन्हं कथानकात सुरुवातीपासून पेरलेली आहेत. सुरुवातीला एखाद्या दबा धरलेल्या श्वापदाप्रमाणे असलेला ‘डिस्टोपिया’ आधुनिक लोकशाहीच्याच सुपरिचित अवताराद्वारे स्पष्ट दर्शन देतो : २०२२ राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीचं वर्ष असतं. (प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या आणि सध्या लक्षणीय लोकाश्रय मिळणाऱ्या) कट्टर उजव्या, ख्रिस्ती धर्मवादी, राष्ट्रवादी, वर्णवर्चस्ववादी ‘नॅशनल फ्रंट’ पक्षाशी जवळीक असलेले लोक आणि अल्पसंख्य इस्लामधर्मी लोक यांच्यात देशभर दंगली होत असतात (आजचा फ्रान्स = सुमारे ४१ टक्के लोक ख्रिस्ती; ४० टक्के निधर्मी; ६ टक्के मुस्लीम). दंगलींच्या वार्ताकनामुळे उजव्या पक्षाची सरशी होईल या भीतीनं प्रसारमाध्यमं ते टाळत असतात किंवा वास्तव सौम्य करून सांगत असतात. निवडणुकीच्या पहिल्या फेरीतले पहिल्या दोन क्रमांकाचे उमेदवार राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेच्या अखेरच्या फेरीत टिकणार असतात. अपेक्षेनुसार ‘नॅशनल फ्रंट’ची उमेदवार मारीन ल पेन प्रथम येते, पण दुसऱ्या क्रमांकावर ‘मुस्लीम ब्रदरहूड’ या (काल्पनिक) इस्लामवादी पक्षाचा उमेदवार मुहंमद बेन अब्बेस येतो. समाजवादी पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला जातो. ख्रिस्ती पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी समाजवाद्यांचा पाठिंबा इस्लामवादी पक्षाला मिळतो. इतिहासात प्रथमच एक इस्लामधर्मी पुरुष फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष होतो. सत्तेवर येताच तो फ्रान्सला इस्लामी राष्ट्र जाहीर करून तिथे शरिया कायदा लागू करतो. आतापावेतो निधर्मी असलेल्या शिक्षणव्यवस्थेत इस्लामी पद्धतीच्या शिक्षणाचा पर्याय सरकारी अनुदानानं उपलब्ध होतो. पुढच्या पिढय़ांना परंपरावादी, पुरुषवर्चस्ववादी आणि धर्मवादी करण्याचा चंग ‘मुस्लीम ब्रदरहूड’नं बांधलेला असतो. सोबरेन इस्लामी विद्यापीठ होतं. नोकरी टिकवण्यासाठी प्र-कुलगुरू धर्मातर करतो आणि फ्राँस्वालाही तसा सल्ला देतो. आपल्या हयातीत परिस्थिती फारशी बदलणं शक्य नाही असं मानणाऱ्या फ्राँस्वाला आणि त्याच्यासारख्या फ्रेंच वाचकाला हा ‘डिस्टोपिया’ का वाटेल ते सुस्पष्ट आहे.

पण ही ‘डिस्टोपिया’ची केवळ नांदी ठरते. वेलबेकचा फ्रान्स म्हणजे राजा-राणीचा शिरच्छेद करणारा क्रांतिकारी फ्रान्स नाही, तर नाझी आक्रमणाखाली तगून राहण्यासाठी जर्मन सत्ताधाऱ्यांशी संगनमत करणारा फ्रान्स आहे. नवा राष्ट्राध्यक्ष हिटलरसारखा आक्रमक नाही, तर एक उच्चशिक्षित, मवाळ, चलाख आणि ठाम विचारांचा माणूस आहे. आपापलं जगणं ‘आहे तसं’ राखण्यासाठी धुरीणवर्ग शांतपणे हे नवं वास्तव स्वीकारतो. आणि हे केवळ तगून राहणं नाही : आपलं वय झालं तरीही शरियानुसार आपण कितीही तरण्याताठय़ा मुलींशी विवाह करू शकतो आणि त्यांना हक्कानं भोगू शकतो ही कल्पना फ्राँस्वाला सुखावतेच! म्हणजेच, विवेकवाद, समान मानवी हक्क, वगैरे गोष्टींचा वारसा मानणारी ‘आयडिया ऑफ फ्रान्स’ इथे मरतेदेखील आणि कुणी आसवंही ढाळत नाही, हा इथला खरा ‘डिस्टोपिया’ आहे.

समकालीन फ्रेंच लेखकांपैकी एक आघाडीचा लेखक तर वेलबेक आधीपासून होताच. त्यातच, विषयाच्या निवडीमुळेही ‘सबमिशन’ बहुचर्चित व बहुखपाऊ कादंबरी होणार हे प्रकाशनाआधीच स्पष्ट होतं. पण एका विचित्र योगायोगामुळे प्रकाशनाच्या दिवशीच ‘शार्ली एब्दो’ नियतकालिकावर (प्रेषित मुहंमदाची अर्कचित्रं छापली म्हणून) हल्ला झाला. ‘शार्ली’च्या ताज्या अंकाच्या मुखपृष्ठावर तेव्हा वेलबेकच झळकत होता. पुस्तकाच्या खपासाठी ही अकल्पित पर्वणी ठरली.

सोव्हिएत रशियाच्या अस्तानंतर ‘आता जग एकध्रुवीय झालं आहे आणि त्या ध्रुवावर आपणच आहोत’ असं पाश्चात्त्य जगाला वाटू लागलं होतं. पण सलमान रश्दीविरुद्धच्या फतव्यानंतरच (१९८९) वातावरण बदलू लागलं. नव्वदच्या दशकात इस्लामी मूलतत्त्ववादाचा प्रश्न फणा काढू लागला. उत्तर आफ्रिकेतल्या फ्रेंच वसाहतींतून आलेल्या अनेक इस्लामधर्मीयांच्या दुसऱ्या-तिसऱ्या पिढय़ाही फ्रान्समध्ये जन्मलेल्या होत्या; पण ‘आम्हाला इथे परकं मानलं जातं’ ही त्यांची तक्रार गांभीर्यानं ऐकून न घेता सरकारं उलट संस्कृतिबहुलता नाकारणारे कायदे आणत राहिली (उदा. सरकारी शाळांमध्ये प्रकट धर्मचिन्हांवर बंदी आहे. यात शिखांची पगडीही चालत नाही. तसंच संपूर्ण चेहरा झाकणाऱ्या बुरख्यावर सार्वजनिक ठिकाणी बंदी आहे.). नव्वदच्या दशकापासून अधूनमधून मुस्लीम युवकांच्या दंगली होत राहिल्या. २०१५ नंतर सातत्यानं दहशतवादी हल्ले होत राहिले. ऑक्टोबर २०२० मध्ये सॅम्युएल पाती या शाळाशिक्षकाचा शिरच्छेद करण्यात आला. त्याचा गुन्हा? – वर्गात अभिव्यक्तिस्वातंत्र्याची संकल्पना समजावून सांगताना त्यानं प्रेषिताची अर्कचित्रं दाखवली. या वातावरणात राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन (माक्रों) यांनी एकीकडे फ्रेंचांचा सर्वधर्मनिंदा करण्याचा हक्क उचलून धरला व पोलीसदलाला व्यापक अधिकार देणारे कायदे आणण्याचा प्रयत्नही केला. गोऱ्या माणसापेक्षा काळ्या माणसावर पोलीस अधिक अत्याचार करतात हे उघड आहे. त्यात सरकारच्या अशा धोरणांमुळे समाजातलं ध्रुवीकरण वाढत चाललं आहे. आधुनिकतावादी- अभिव्यक्ती स्वातंत्र्यवादी- उदारमतवादी नागरिक आणि कट्टर उजवे ख्रिस्ती यांच्यातली सीमारेषा एकीकडे धूसर होत चालली आहे, तर दुसरीकडे स्वत:ला आधी फ्रेंच, मग मुस्लीम मानणारे मवाळ तरुणही कट्टर इस्लामवाद्यांच्या बाजूला जाऊ लागले आहेत.

वेलबेकच्या कादंबरीला आता सहा वर्ष झाली आहेत. वर्गात अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर चर्चा करून झाल्यावर, ‘अर्कचित्रं प्रकाशित करणं योग्य की अयोग्य?’ यावर विद्यार्थ्यांचं मत सॅम्युएल पातीनं विचारलं होतं. वर्गाचा कल अर्कचित्रं प्रकाशित करण्याच्या विरोधात गेला होता. काहींच्या मते हीच प्रत्यक्षातल्या ‘डिस्टोपिया’ची सुरुवात आहे, तर काहींच्या मते पाश्चात्त्य संस्कृतीविषयी खोलात जाऊन प्रश्न उपस्थित करण्याची हीच वेळ आहे : ते केलं नाही, तर डिस्टोपिया अटळ आहे. ‘एखाद्या संस्कृतीचा अंत होतो ते तिची हत्या होते म्हणून नव्हे, तर ती आत्महत्या करते, म्हणून’ असं उद्धरण कादंबरीत येऊन जातं. पाश्चात्त्य संस्कृतीनं आत्महत्या केलेली आहे, हे सांगण्यासाठी ते कादंबरीत वापरलं जातं. वेलबेकचं असं मत आहे का? नक्की सांगता येत नाही, पण वाचकाला या मुद्दय़ांविषयी अंतर्मुख करण्यासाठी तो संस्कृतीच्या आत्महत्येचा ‘डिस्टोपिया’ वापरतो हे स्पष्ट आहे.

rabhijeet@gmail.com