20 January 2019

News Flash

ऑर्वेलची प्रकाशवाणी : मी का लिहितो?

अलंकारिक वर्णने आणि बारीकसारीक तपशील टिपणाऱ्या वास्तववादी कादंबऱ्या लिहाव्या असे मला वाटू लागले.

जॉर्ज ऑर्वेल

अर्ध्याअधिक साहित्यिक प्रवासानंतर १९४६ मध्ये मागे वळून पाहताना ऑर्वेलला लक्षात आलेल्या स्वत:च्या लेखनामागील प्रेरणा ‘व्हाय आय राइट?’ या निबंधात त्याने मांडल्या. साऱ्याच लिहित्यांना मननीय अशा या निबंधाचा सारांशानुवाद..

अगदी लहान वयापासूनच मला लेखक व्हावेसे वाटत आले आहे. मला नेहमी जाणवायचे, की शब्दांच्या वापराची एक विशिष्ट हातोटी आणि अप्रिय सत्यांना सामोरे जाण्याची ताकद माझ्याकडे आहे. त्याबरोबरच एकाकीपणाची भावनाही माझ्या साहित्यिक आकांक्षांमागे असावी. अधूनमधून मी सुमार आणि अर्धवट सोडलेल्या निसर्ग कविता लिहीत असे. एक-दोनदा लघुकथा लिहिण्याचा भयंकर अपयशी प्रयोगही करून पाहिला. मात्र ‘सांगितले तसे लिहिले’ या प्रकारची बरीच सामग्री मी सहज आणि झटपट लिहू शकायचो. कधी शालेय अंकाचे संपादन कर, कधी ग्रीक प्रहसनांवर बेतलेले नाटक लिही असे उद्योगही मी फारशी मेहनत न घेता केले. त्याच वेळी मनातल्या मनात स्वत:बद्दलची दीर्घकथा रचित राहण्याचा साहित्यिक सरावही सुरू असायचा. बालपणातील साहसांची ओढ, किशोरावस्थेतील आत्मकेंद्रीपणा, आणि मग भोवतालच्या जगाचे वर्णन असा हा प्रवास होता. मी सोळा वर्षांचा असताना अचानक मला शब्दांमधल्या आनंदाचा- म्हणजे त्यांच्यातील संगीताचा आणि अनुभवांशी जोडून घेण्याच्या त्यांच्या शक्तीचा- शोध लागला. अलंकारिक वर्णने आणि बारीकसारीक तपशील टिपणाऱ्या वास्तववादी कादंबऱ्या लिहाव्या असे मला वाटू लागले.

हे महत्त्वाचे यासाठी, की कारकीर्दीच्या सुरुवातीला होणाऱ्या लेखकाच्या जडणघडणीतूनच त्याच्या लेखनामागील प्रेरणा समजून घेता येतात. लेखनाची विषयवस्तू जरी बाह्य़ परिस्थितीतून येत असली तरी त्यामागचा एक भावनिक दृष्टिकोन लेखकात आधीच तयार झालेला असतो. या मूळ प्रकृतीला योग्य वळण देतानाच एखाद्या अपरिपक्व टप्प्यावर अडकून राहण्यापासून स्वत:ला वाचविणे आवश्यक असते. त्याच वेळी या काळातील महत्त्वाच्या प्रभावांमधून पूर्णपणे मुक्त होणे आपल्या लेखनामागील प्रेरणाच संपवू शकते.

चरितार्थासाठी लिहिणे बाजूला ठेवले, तर लेखनामागे चार प्रमुख हेतू असतात-

१) केवळ मीपणा – म्हणजे आपली हुशारी सर्वासमोर मांडणे, चारचौघांच्या चर्चेचा विषय होणे आणि मृत्यूनंतर कीर्तिरूपे उरणे. शिवाय ज्यांनी आपल्याला लहान असताना चार गोष्टी ऐकवल्या त्यांना चार गोष्टी ऐकवण्याची संधी साधणे. हा ‘स्व’शी संबंधित हेतू नाकारणे दांभिकपणा ठरेल. फक्त लेखकांतच नव्हे, तर शास्त्रज्ञ, कलावंत, राजकारणी, वकील, सैन्याधिकारी आणि यशस्वी उद्योजक यांच्यातही अशी ऊर्मी असते. तसे पाहिले तर बहुसंख्य लोक स्वार्थी नसतात. वयाच्या तिसाव्या वर्षांनंतर वैयक्तिक आकांक्षा बाजूला ठेवून एक तर ते इतरांसाठी जगतात अथवा आयुष्याच्या ओझ्याखाली पिचून जातात. मात्र दैवी देणगी असलेली आणि आपलेच खरे करू पाहणारी मोजकीच माणसे स्वत:च्या पद्धतीने जगण्याचा निकराचा प्रयत्न करतात.

२) शब्दसौंदर्याचे कौतुक – म्हणजे शब्दरचनेतील सौंदर्य अनुभवण्याचा उत्साह, शब्दांमधील संगीत, उत्तम गद्याचा डौल आणि कथेचा आकार यांनी मोहून जाण्याची वृत्ती. आपल्याला अमूल्य वाटणाऱ्या आणि ज्याला कुणीही पारखा होऊ  नये अशा अनुभवात इतरांना वाटेकरी करून घेण्याची तीव्र इच्छा. रेल्वेचे वेळापत्रक सोडल्यास कोणतेही पुस्तक रचनासौंदर्याचा विचार केल्याशिवाय अस्तित्वात येऊ  शकत नाही.

३) ऐतिहासिक ऊर्मी – म्हणजे गोष्टी जशा आहेत तशा पाहण्याची, त्यांच्यामागील सत्य शोधण्याची आणि भावी पिढय़ांसाठी ते मांडून ठेवण्याची इच्छा.

४) राजकीय हेतू – म्हणजेच जगाला एका विशिष्ट दिशेने पुढे ढकलण्याची आणि आपण कशा प्रकारच्या समाजाकडे वाटचाल केली पाहिजे हे इतरांसमोर प्रभावीपणे मांडण्याची इच्छा. इथे ‘राजकारण’ हा शब्द अतिशय व्यापक अर्थाने घेतला आहे. कोणतेही पुस्तक राजकीय भूमिकेशिवाय लिहिले जाऊ  शकत नाही. कलेचा राजकारणाशी काहीही संबंध नसावा हे मतदेखील एक राजकीय दृष्टिकोनच असतो.

हे स्पष्टच आहे, की या विविध प्रेरणांचा केवळ एकमेकांशी संघर्ष होतो असे नाही, तर एकाच लेखकात वेळोवेळी त्या बदलत असतात. लेखक म्हणून माझी मूलप्रवृत्ती वरील चारपैकी पहिल्या तीन हेतूंना अनुसरून लिहिण्याची आहे. एखाद्या शांततापूर्ण युगात मी फक्त अलंकारिक आणि वर्णनात्मक पुस्तके लिहिली असती आणि स्वत:च्या राजकीय बांधिलकीबद्दल अनभिज्ञ राहिलो असतो. पण झाले असे की, मला एक प्रकारचा राजकीय लेखक होणे भाग पडले.

मला न मानवणाऱ्या नोकरीत (बर्माच्या पोलीस दलात) कशीबशी पाच वर्षे काढून राजीनामा दिल्यानंतर गरिबीशी झुंजताना मला पराभवाच्या भावनेला सामोरे जावे लागले. यांतून माझा सत्तास्थानांविषयीचा नैसर्गिक राग तर वाढलाच, पण पहिल्यांदाच मला कष्टकरी वर्गाच्या अस्तित्वाची जाणीव झाली. बर्मातल्या नोकरीतून मला साम्राज्यवादाच्या स्वरूपाची थोडी कल्पना आलेलीच होती. पण हिटलरशाही आणि स्पेनमधील यादवी युद्ध पाहिल्यानंतर मला निश्चित राजकीय दिशा मिळाली. १९३६ नंतरची माझी ओळन्ओळ प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे हुकूमशाहीच्या विरोधात आणि लोकशाही समाजवादाच्या समर्थनार्थ लिहिली गेली आहे.

आजच्या काळात राजकीय विषय टाळून लेखन करणे अशक्य आहे. वेगवेगळ्या स्वरूपात सर्वच त्यांच्याबद्दल लिहीत असतात. प्रश्न असतो तो आपण कुणाची बाजू घेतो आणि कोणत्या दृष्टिकोनातून ती मांडतो हा. जेवढी आपल्या राजकीय भूमिकांची जाणीव स्पष्ट तेवढे राजकीय मतप्रदर्शन करताना सौंदर्यात्मक आणि वैचारिक मूल्ये जपणे सोपे. राजकीय लेखन एक कला म्हणून विकसित करणे नेहमीच माझे ध्येय राहिलेले आहे. अन्यायाच्या जाणिवेतून आणि त्याबद्दलच्या माझ्या भूमिकेतून माझ्या लेखनाचा आरंभ होतो. असत्याचे आवरण भेदून मला सत्याकडे लक्ष वेधायचे असते आणि कुणापर्यंत तरी ते पोहोचवायचे असते. मात्र लिहिताना रचनासौंदर्याची कोणतीही अनुभूती होत नसेल तर मला ते जमणार नाही.

माझ्या तद्दन प्रचारकी लिखाणातही असे काही आहे जे पूर्णवेळ राजकारण्याला अनावश्यक वाटेल. बालपणापासून कमावलेला एक विशिष्ट दृष्टिकोन टाकून देणे मला शक्यही नाही आणि ते योग्यही नाही. लिहिता आहे तोवर मला गद्यशैलीच काय, पण पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट, अगदी निरुपयोगी माहितीदेखील खुणावत राहील. माझी ही बाजू दडपून टाकण्यात काहीच हशील नाही. माझ्या वैयक्तिक आवडीनिवडींची परिस्थितीने लादलेल्या सार्वजनिक कार्याशी सांगड कशी घालावी, हे माझ्यासमोरचे खरे आव्हान आहे. अर्थातच हे सोपे नाही; कारण भाषा, रचना आणि सत्य यांचे महत्त्वाचे प्रश्न याच्याशी जोडलेले आहेत. माझ्या ‘होमेज टू कॅटालोनिया’ या स्पेनमधील यादवी युद्धावरच्या उघड उघड राजकीय पुस्तकातही मी माझ्या साहित्यिक प्रेरणांची मोडतोड न करता पूर्ण सत्य सांगण्याचा आटोकाट प्रयत्न केला. निरपराध ट्रॉट्स्कीवाद्यांचा  बचाव करणारे वर्तमानपत्रातील उताऱ्यांनी भरलेले एक प्रकरण पुस्तकाच्या रचनासौंदर्याला बाधा आणत असूनही मी गाळले नाही. कारण फ्रँकोच्या कटात सामील असण्याच्या त्यांच्यावरील खोटय़ा आरोपांच्या रागातूनच तर मी ते पुस्तक लिहिले होते.

भाषेच्या प्रश्नात तर आणखीनच बारकावे आहेत ज्यांची चर्चा इथे करणे शक्य नाही. एवढेच सांगतो, की अलीकडे माझा भर शब्दचित्र भव्य असण्यापेक्षा ते काटेकोर असण्यावर असतो. ‘अ‍ॅनिमल फार्म’ लिहिताना पहिल्यांदाच मी जाणीवपूर्वक राजकीय हेतू आणि कलात्मक हेतू यांना एकरूप करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गेली सात वर्षे मी कादंबरीच्या वाटेला गेलेलो नाही, पण लवकरच जाईन अशी आशा आहे. ती अपयशी ठरण्याचीच शक्यता जास्त आहे. पण माझ्या प्रत्येक अपयशी पुस्तकाबरोबर मला कशा प्रकारचे पुस्तक लिहायचे आहे हे अधिकाधिक स्पष्ट होत गेलेले आहे.

लेखनामागच्या वर सांगितलेल्या चार प्रेरणांपैकी कोणती प्रेरणा माझ्यात प्रभावी आहे हे मी छातीठोकपणे सांगू शकत नाही. मात्र त्यांच्यापैकी कोणत्या प्रेरणेच्या प्रभावाखाली येणे माझ्यासाठी अधिक योग्य हे मला ठाऊक आहे. माझ्या साहित्यनिर्मितीकडे मागे वळून पाहताना माझ्या असे लक्षात येते, की त्यातील निश्चित राजकीय हेतू नसताना लिहिलेली पुस्तके निर्जीव वाटतात आणि त्यांत माझ्याकडून बटबटीत शैलीतील उतारे, अर्थहीन वाक्ये, अलंकारिक विशेषणे आणि एकूणच फसव्या शब्दजंजाळाची बऱ्यापैकी निर्मिती झालेली आहे.

आतापर्यंत मी जे सांगितले त्यात लिहिण्यामागच्या माझ्या प्रेरणा पूर्णपणे सामाजिक होत्या असे दाखविण्याचा माझ्याकडून प्रयत्न झाला आहे. पण तुमचा असा ग्रह करून देऊन मला लेखाचा शेवट करायचा नाही. खरे सांगायचे तर सर्वच लेखक कुठे तरी वृथाभिमानी, स्वार्थी आणि आळशी असतात. मात्र कोणती तरी गूढ प्रेरणा त्यांना लेखनाकडे ओढून आणते. पुस्तक लिहिणे ही प्रक्रिया एखाद्या दीर्घ आजाराशी झगडण्यासारखी, प्रचंड थकविणारी असते. आकलनापलीकडच्या आणि जिला रोखणे शक्य नाही अशा कुठल्या तरी अतिमानवी शक्तीचा अंमल स्वत:वर असल्याशिवाय कुणीही ही गोष्ट करू धजणार नाही. कुणी सांगावे, ही शक्ती लक्ष वेधून घेण्यासाठी आकांत करणाऱ्या बालकाच्या प्रेरणेपेक्षा फारशी वेगळी नसावी. मात्र त्याच वेळी स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा आपल्या लेखनावरून पुसून काढण्याची धडपड केल्याशिवाय वाचनीय असे काहीही लिहिणे शक्य नाही. या सगळ्यांतून तावून सुलाखून निघालेले उत्तम गद्य हे खिडकीच्या तावदानासारखे स्वच्छ असते.

डॉ. मनोज पाथरकर : manojrm074@gmail.com

First Published on February 3, 2018 3:24 am

Web Title: summary of book why i write by george orwell