18 January 2019

News Flash

ऑर्वेलची प्रकाशवाणी : अभिव्यक्तीला अटकाव

जॉर्ज ऑर्वेल यांच्या निबंधांचा आढावा घेणाऱ्या पाक्षिक सदरातील हा दुसरा लेख

जॉर्ज ऑर्वेल यांच्या निबंधांचा आढावा घेणाऱ्या पाक्षिक सदरातील हा दुसरा लेख.

जॉर्ज ऑर्वेल यांच्या निबंधांचा आढावा घेणाऱ्या पाक्षिक सदरातील हा दुसरा लेख. जानेवारी, १९४६ मध्ये लिहिलेल्या ‘The Prevention of Literaturel या निबंधाचा हा सारांश; हुकूमशाही, प्रसारमाध्यमांच्या मालकीचे केंद्रीकरण व कलानिर्मितीचे बदलते स्वरूप यांपासून वैचारिक स्वातंत्र्याला असलेल्या धोक्याचे विश्लेषण करतानाच पत्रकार व साहित्यिकांसमोरील लढय़ाचे स्वरूप लक्षात आणून देणारा..

मिल्टनने तीनशे वर्षांपूर्वी लिहिलेल्या पत्रकापासून आजतागायत वृत्तपत्र स्वातंत्र्याचा अर्थ ‘टीका आणि विरोध करण्याचे स्वातंत्र्य’ हाच राहिलेला आहे. वैचारिक स्वातंत्र्यावर आज एका बाजूने एकाधिकारशाहीच्या समर्थकांकडून, तर दुसऱ्या बाजूने वृत्तपत्र व्यवसायातील मक्तेदारी व नोकरशाहीकडून हल्ला होतो आहे. अशा परिस्थितीत आपली वैचारिक निष्ठा जपू पाहणाऱ्या कुणाही लेखक/पत्रकाराची प्रत्यक्ष छळ वा दडपशाहीपेक्षा समाजव्यवस्थेच्या प्रवाहामुळेच जास्त अडवणूक होते. मूठभरांच्या हातात केंद्रित झालेल्या वृत्तपत्रे, रेडिओ व चित्रपट यांच्या मालकीचा सामना करतानाच त्याला पुस्तकांवर खर्च करण्याची इच्छा नसलेल्या वाचकजनतेच्या उदासीनतेमुळे चरितार्थासाठी थोडेफार विकाऊ  असे कमअस्सल साहित्य लिहावेच लागते. आपल्याला दिसणारे पूर्ण सत्य सांगण्याऐवजी ‘वरून आलेल्या’ आदेशानुसार विषयवस्तूवर काम करताना लेखक किंवा कलावंताचा ‘दुय्यम दर्जाचा नोकरशहा’ होतो.

बऱ्याचदा आपण साहित्याचा अर्थ आणि साहित्यनिर्मितीची प्रक्रिया नीट समजून न घेता लेखकाला ‘मनोरंजन करणारा कलावंत’ किंवा  प्रचारकी साहित्य ‘‘ऑर्डर’प्रमाणे बनवून देणारा कारागीर’ समजतो. सुमार लेखन सोडल्यास, साहित्य हा अनुभवांच्या मांडणीतून समकालीनांच्या दृष्टिकोनावर प्रभाव टाकण्याचा एक प्रयत्न असतो. असे कोणतेही साहित्य आजच्या काळात खऱ्या अर्थाने ‘अराजकीय’ राहूच शकत नाही. कारण राजकीय व्यवस्थेशी निगडित भीती, द्वेष आणि बांधिलकी आपल्या जाणिवेच्या सर्वच स्तरांवर वास करीत आहेत. म्हणूनच अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून पत्रकार आणि साहित्यिक यांच्यात फारसा फरक करता येत नाही. खोटे लिहिण्यास भाग पाडले किंवा महत्त्वाची बातमी लिहिण्यास मज्जाव केला तर जसे पत्रकाराचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जाते तसे व्यक्तिगत भावना दडपाव्या किंवा मोडतोड करून व्यक्त कराव्या लागतात तेव्हा साहित्यिक आपले स्वातंत्र्य गमावून बसतो. हे ‘स्वातंत्र्य’ लैंगिकतेसंबंधी मुक्तपणे लिखाण करण्यापुरतेच मर्यादित नसून त्यात ‘राजकीय’ मते मांडण्याचे स्वातंत्र्यही अंतर्भूत आहे. हुकूमशाही व्यवस्था विचारवंतांवर दबाव आणत असतानाच विचारवंतांमधील स्वातंत्र्याची ऊर्मी कमकुवत होऊ  लागल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होते.

वृत्तपत्र स्वातंत्र्य व भाषणस्वातंत्र्य यासंबंधीच्या चर्चेत मूळ मुद्दा असतो खोटय़ा गोष्टी खपविण्याचा, मात्र या स्वातंत्र्याची गळचेपी करू पाहणारे हा प्रश्न ‘सत्य विरुद्ध असत्य’ असा नव्हे तर ‘शिस्त विरुद्ध व्यक्तिस्वातंत्र्य’ असा मांडतात. मुख्य म्हणजे, आपली मते विकायला नकार देणाऱ्या लेखक-पत्रकारांवर अहंमन्यतेचा शिक्का मारतात. असेही युक्तिवाद केले जातात, की ‘सत्य सांगण्याची ही योग्य वेळ नव्हे’ किंवा ‘त्यामुळे कुणाच्या तरी हातात आयतेच कोलीत मिळेल’. विचारस्वातंत्र्याचे रक्षण करताना जसा परंपरावाद्यांशी आणि धार्मिक कट्टरतावाद्यांशी सामना करावा लागतो, तसेच साम्यवाद्यांसारख्या क्रांतिवाद्यांशीही लढावे लागते. हुकूमशाही व्यवस्थेत पद्धतशीरपणे खोटे बोलण्याचे जे प्रयत्न चालतात ते तात्पुरते उत्तर किंवा डावपेचांचा भाग नसून या व्यवस्थेचा अविभाज्य भाग असतात. एक वेळ ही व्यवस्था छळछावण्या आणि गुप्त पोलिसांशिवाय काम करू शकते, पण खोटय़ावर आधारित प्रचारयंत्रणेशिवाय ती चालूच शकत नाही. स्वत:ला सतत बरोबर सिद्ध करण्याच्या (जे प्रत्यक्षात कुणालाच शक्य नाही) हुकूमशाही शासकांच्या गरजेतूनच चुका झाकण्यासाठी व काल्पनिक विजय दाखविण्यासाठी भूतकाळातील घटनांची पुनर्माडणी आणि ऐतिहासिक व्यक्तींचे पुनर्मूल्यांकन केले जाते.

अस्थैर्य, स्वीकार, बदल..

आपले अस्तित्व दीर्घकाल टिकविण्यात यशस्वी होणारी हुकूमशाही ‘स्किझोफ्रेनिया’च्या रुग्णासारखी दुहेरी विचारप्रणाली प्रस्थापित करते, ज्यात दैनंदिन जीवन आणि विज्ञान यांत ‘कॉमन सेन्स’ काम करतो; पण राजकारण, इतिहास वा समाज यांचा विचार करताना त्याला तिलांजली द्यावी लागते.

एकीकडे हुकूमशाही प्रवृत्तींची तत्त्वे अभेद्य (शंका उपस्थित करण्यापलीकडची) आहेत असे भासवले जाते, तर दुसरीकडे ही तत्त्वे अस्थिर असतात. एकीकडे ती स्वीकारण्याची सक्ती असते, तर दुसरीकडे राजकीय गरजांनुसार ती क्षणार्धात बदलण्याचीही कसरत असते. याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात साम्यवाद्यांविषयी सहानुभूती बाळगणाऱ्यांना एकमेकांशी पूर्णपणे विसंगत अशी मते क्रमाक्रमाने आपलीशी करावी लागली. हिटलर-स्टालिन अनाक्रमणाचा करार होण्याआधी साम्यवाद्यांसाठी नाझीवाद भयानक होता, मात्र करारानंतरचे वीस महिने त्यांच्या दृष्टीने जर्मनी स्थानिक राज्यकर्त्यांपेक्षा इतर देशांकडून झालेल्या अत्याचारांचा बळी होता आणि हिटलरच्या रशियावरील हल्ल्यानंतर पुन्हा नाझीवाद हिडीस गोष्ट ठरला!

एखाद्या राजकारणी व्यक्तीला अशी मते बदलणे सोपे असू शकते, मात्र लेखकांसाठी ही गोष्ट तितकीशी सरळ नसते. योग्य वेळी राजकीय निष्ठा बदलण्यासाठी भावनांची खोटी अभिव्यक्ती करावी लागल्यास लेखकामधील निर्मितीचे जनित्र खराब होऊन जाते. सुचणाऱ्या कल्पनांची सहजता निघून गेल्याने शब्द त्यांची तरलता गमावून ताठर होऊन जातात. अशा प्रकारे स्वत:च स्वत:वर ‘सेन्सॉरशिप’ लादल्याने लेखक शब्दसमूहांच्या यांत्रिक जोडणीतून बनलेल्या शैलीतून लिहू लागतो. राजकीय विषयांवर साध्या, परंतु ओजस्वी भाषेत लिहिण्यासाठी निर्भयपणे विचार करता येणे आवश्यक असते आणि असा विचार करणारा राजकीयदृष्टय़ा कर्मठ राहू शकत नाही.

गप्प राहणे वा  मृत्यू

हे लक्षात घ्यायला हवे, की गेल्या काही शतकांत विकसित झालेले गद्यसाहित्य हा विवेकवाद, धर्मसुधारणा आणि व्यक्तीच्या स्वायत्ततेची संकल्पना यांचा परिपाक आहे. विचारस्वातंत्र्या-वरील बंधने प्रथम पत्रकाराला आणि क्रमाक्रमाने समाजशास्त्रीय लेखन करणाऱ्यांना, तसेच इतिहासकार, कादंबरीकार, समीक्षक आणि कवी यांना शक्तिहीन बनवितात. अर्थात, सत्तास्थानांच्या दबावामुळे लिखाण भ्रष्ट करावे लागण्याची वेळ फक्त हुकूमशाही देशातल्या लेखकांवरच येते असे नाही, तर तांत्रिकदृष्टय़ा ‘लोकशाही’ असलेल्या राष्ट्रांतही विशिष्ट कल्पनांचा पगडा बसला, की तो पसरणाऱ्या विषाप्रमाणे एकामागून एक विषय साहित्यिक हाताळणीसाठी बाद ठरवीत जातो. जिथे लादलेली विचारसरणी असेल तिथे चांगले लेखन आपोआपच थांबते आणि गद्य लेखकाला गप्प राहणे अथवा मृत्यू यांतील एक पर्याय निवडावा लागतो. कारण त्याच्या दृष्टीने आपल्या विचारांची व्याप्ती मर्यादांमध्ये बंदिस्त करणे म्हणजे स्वत:तील नवनिर्मितीची शक्ती मारून टाकण्यासारखे असते.

व्यक्तिगत भावना किंवा सत्याविषयीच्या निरीक्षणांना कोणतेही स्थान नसलेले साहित्य निर्माण होण्याची चिन्हे आजच दिसत आहेत. औद्योगिकीकरण झालेल्या देशांतील बहुसंख्य लोकांना वर्तमानपत्रांच्या पलीकडे कोणत्याही प्रकारच्या साहित्याची गरज वाटत नाही; निदान उपलब्ध मनोरंजनाच्या साधनांइतके पैसे वाचनावर खर्च करण्याची त्यांची तयारी नसते. भविष्यात कथा-कादंबऱ्यांची जागा सिनेमा वा रेडिओ घेतील आणि ‘कन्व्हेयर बेल्ट’सदृश पद्धतीने मानवी सर्जनशीलतेचा कमीत कमी वापर करून निर्मिलेले दुय्यम दर्जाचे साहित्यच उरेल. आजच ‘डिस्ने फिल्म्स्’सारख्या ठिकाणी ‘फॅक्टरी’ प्रक्रियेप्रमाणे बरेचसे काम यंत्रांच्या मदतीने व बाकीचे कलाकारांकडून (तेही वैयक्तिक शैली बाजूला ठेवून जथ्याने) केले जाते. भविष्यात असेही होईल, की नोकरशहांकडून आलेल्या पुस्तकांच्या ढोबळ आराखडय़ात तपशील भरून ते पूर्णत्वास नेण्यात एवढे हात लागलेले असतील जेवढे ‘असेंब्ली लाइन’वर बनणाऱ्या कारला लागलेले असतात. अशा रीतीने तयार झालेल्या पुस्तकांची किंमत अर्थातच रद्दीपेक्षा जास्त नसेल, कारण रद्दी नसलेले कोणतेही पुस्तक अशा राज्यव्यवस्थेची रचना धोक्यात आणू शकेल. अशी व्यवस्था येण्यापूर्वीचे साहित्य एक तर दडपून टाकले जाईल किंवा हव्या त्या पद्धतीने पुनर्लिखित करून घेतले जाईल.

निदान अजून तरी अशी व्यवस्था सगळीकडे अस्तित्वात आलेली नाही. इंग्लंडमधील व्यवस्था स्थूलमानाने उदारमतवादीच आहे. मात्र याही व्यवस्थेत विचार-उच्चार स्वातंत्र्याची बूज राखताना गुप्त पोलिसांशी नाही तरी निदान आर्थिक दबाव आणि जनमताचा रेटा यांच्याशी लढावेच लागते. त्यातच विचारस्वातंत्र्याचे ज्यांनी रक्षण करावे तीच मंडळी आज त्याची शत्रू होऊ  पाहात आहेत. वैचारिक सभ्यतेवरचा जाणीवपूर्वक केला गेलेला हल्ला हा विचारवंतांकडूनच होतो आहे. अतिशय उच्चशिक्षित व्यक्तींना मी जेव्हा जुलूम-जबरदस्तीकडे डोळेझाक करताना बघतो तेव्हा मला प्रश्न पडतो, की मला घृणा नेमकी कशाची वाटावी? त्यांच्या माणसाला दुष्टच मानण्याच्या प्रवृत्तीची (cynicism) की त्यांच्यातील दूरदृष्टीच्या अभावाची?

प्रश्न विज्ञाननिष्ठेचाही..

हुकूमशाही व्यवस्थेला निदान आज तरी शास्त्रज्ञांची गरज आहे, म्हणून ती त्यांना सहन करते आहे. जेव्हा ही व्यवस्था पूर्णपणे जीवनाचा ताबा घेईल तेव्हा या मंडळींना कळेल, की नेमके काय झाले आहे. अशी परिस्थिती येण्याआधी जर त्यांना विज्ञाननिष्ठा टिकवायची असेल, तर त्यांनी त्यांच्या साहित्यिक सहकाऱ्यांबरोबर एकी दाखवावी आणि त्यांची मुस्कटदाबी होताना, त्यांना जाणीवपूर्वक खोटे लिहिण्यास सांगितले जात असताना उदासीन बघ्याची भूमिका घेऊ  नये.

हुकूमशाही दृष्टिकोन स्वीकारणारा कोणताही लेखक जेव्हा जुलूम आणि खोटेपणाचे समर्थन करण्यासाठी युक्तिवाद शोधतो तेव्हा तो स्वत:ला लेखक म्हणून नष्ट करीत असतो. साहित्याच्या निर्मिती प्रक्रियेत कुठे तरी उत्स्फूर्ततेचा समावेश व्हावाच लागतो, अन्यथा साहित्याची भाषाच पाषाणभूत होऊन जाते. मानवी कल्पनाशक्ती जंगलातल्या मुक्त श्वापदांसारखी असते, बंधनात तिची वाढ खुंटते. ही गोष्ट नाकारणारा कोणताही पत्रकार किंवा लेखक शेवटी आपल्याच अस्तित्वावर घाला घालीत असतो.

डॉ. मनोज पाथरकर  manojrm074@gmail.com

First Published on January 20, 2018 2:55 am

Web Title: summary of the prevention of literaturel essay