सत्ता मूठभरांच्या हातांत असली की अनर्थ ठरलेलाच.. हे अर्थसत्तेबाबतही खरं, याची जाणीव हे पुस्तक देतं..

हे युग वित्तभांडवलाचे आहे. वर्षांगणिक जगातील अधिकाधिक लोकसंख्येला वित्तभांडवल आपल्या प्रभावाखाली ओढत आहे. सातशे कोटी लोकांच्या दैनंदिन जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या, दररोज ट्रिलियन्स डॉलर्सची उलाढाल करणाऱ्या जागतिक वित्तक्षेत्राची सूत्रे मात्र मूठभर उच्चपदस्थ व्यक्तींच्या हातात आहेत, हे कळल्यावर विचारी मनाची अस्वस्थता थांबवता येत नाही.

गेली काही दशके अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेत वित्तभांडवलाचा दबदबा आहे. अमेरिकेत टोकाचा; भारतात तुलनेने कमी, पण वाढता. या देशांच्या धोरणकर्त्यांना आर्थिक, मौद्रिक, पतपुरवठय़ाची वा विनिमयदराची धोरणे वित्तभांडवलाचे हितसंबंध लक्षात ठेवूनच आखावी लागतात. पण जगावर राज्य करणाऱ्या या वित्तसंस्था म्हणजे कोणती अपौरुषेय शक्ती नव्हे. त्या चालवतात हाडामांसाची माणसेच.

व्यापारी व गुंतवणूक बँका, म्युच्युअल/ विमा/ पेन्शन फंडस्, प्रायव्हेट इक्विटी, व्हेंचर, हेज/ सॉव्हरीन वेल्थ फंडस्, नॉन बँकिंग कंपन्या अशी वित्तसंस्थांची यादी करता येईल. यांतील जगावर राज्य करण्याची कुवत असणाऱ्या फारच थोडय़ा. बऱ्याचशा छोटय़ा वा मध्यम आकाराच्या. त्याशिवाय जागतिक पातळीवर जागतिक बँक, नाणेनिधी तर खंडांच्या पातळीवरील संस्था (उदा. एडीबी) कार्यरत आहेत. या साऱ्यांना विविध सेवा व बौद्धिक, विश्लेषणात्मक खाद्य पुरवतात ते ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’सारखे थिंकटँक, ‘मूडीज्’सारख्या पतमापन संस्था, ‘डीलॉइट’सारख्या सल्लागार/लेखापरीक्षण संस्था, विविध विद्यापीठांत अर्थशास्त्र व संबंधित विषयात मूलभूत संशोधन करणारे विचारवंतही!

यांपैकी काही संस्थांचे चालक अफाट ताकदीचे आहेत. त्यांचे प्रभावक्षेत्र त्यांच्या संस्थेपुरतेच सीमित नसून वित्तप्रणालीत दूपर्यंत त्याचा अंमल चालतो. या प्रभावशाली व्यक्ती, पूर्वीच्या सरंजामदारांसारख्या स्वत:च्याच छोटय़ा-मोठय़ा साम्राज्यात चूर राहणाऱ्या, पोकळ प्रतिष्ठेसाठी एकमेकांचे गळे घोटणाऱ्या नाहीत. त्यांची वर्गीय जाण प्रगल्भ आहे. त्यांना नेटवर्कचे महत्त्व कळते. मग परस्परांशी व्यावसायिकच नाही तर व्यक्तिगत बंध जाणीवपूर्वक जोपासले जातात.  अशा व्यक्तींसाठी ‘सुपरहब्ज्’ हे विशेषनाम  वापरले आहे.

वित्तक्षेत्र सुटय़ा वित्तसंस्थांचे फेडरेशन नसते. ते वित्तसंस्थांचे जैवपणे विणलेले जाळे असते. समाजशास्त्रांत अति-गुंतागुंतीच्या संरचना समजून घेण्यासाठी ‘नेटवर्क थिअरी’चा वापर केला जातो. चाकाच्या मध्यभागी जसा ‘तुंबा’ (इंग्रजीत ‘हब’) तसाच प्रत्येक नेटवर्कच्या केंद्रस्थानी ‘हब’ असतो. नेटवर्क जेवढे गुंतागुंतीचे तेवढे ‘हब’चे माहात्म्य मोठे. जागतिक वित्तक्षेत्राच्या गुंतागुंतीच्या नेटवर्कच्या केंद्रस्थानी आहेत- ‘सुपरहब्ज्’. संख्येने फार थोडे असणारे सुपरहब्ज् व त्यांचे नेटवर्क साऱ्या जगावर कसे अधिराज्य गाजवतात यावर सँड्रा नाविदी यांनी या पुस्तकाद्वारे प्रकाश टाकला आहे.

सँड्रा मूळच्या जर्मन. शिक्षणाने कॉर्पोरेट विधिज्ञ. व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, इन्व्हेस्टमेंट बँकर. अमेरिकी अर्थशास्त्री नॉरील रॉबिनीच्या हाताखाली काम केलेल्या. सध्या अमेरिकेत स्वत:ची व्यवस्थापन सल्लागार कंपनी चालवतात. सँड्रा दूरान्वयानेदेखील डाव्या विचारांच्या नाहीत. हे पुस्तक लिहिण्यामागे वित्तक्षेत्राला झोडपून काढण्याचा त्यांचा इरादा नाही. आंतरराष्ट्रीय वित्तक्षेत्रावर, पर्यायाने आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर मूठभर व्यक्ती, स्वहित साधण्यासाठी निर्णायक प्रभाव टाकून आहेत हे त्यांना खटकते. निर्णयप्रक्रिया मूठभरांच्या हातात असेल तर साचत जाणाऱ्या अरिष्टसदृश परिस्थितीचे गांभीर्य जोखण्यात खोट येते, हे त्यांच्या पुस्तकातील सर्वात गाभ्याचे प्रतिपादन आहे. याच्या पुष्टय़र्थ त्या २००८ मधील अमेरिकेतील ‘सबप्राइम क्रायसिस’चे विश्लेषण करतात. त्या काळात अनेक जाणकारांनी इशारे दिले होते. पण संख्येने मूठभर असणाऱ्या नेत्यांना त्याचे गांभीर्यच आकळले नाही. जागतिक वित्तीय प्रणालीच्या सद्यस्थितीवर साधकबाधक चर्चा व्हावी, त्यातून काही सुधारणा व्हाव्यात या आशेने सँड्रा यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

तीनशे पृष्ठांच्या या पुस्तकात १२ प्रकरणे आहेत. त्यात आंतरराष्ट्रीय वित्तक्षेत्राची संरचना व कार्यपद्धती; ‘सुपरहब्ज्’च्या व्यक्तिमत्त्वांमधील सामायिकपणा; बिगरवित्तसंस्थांचे (उदा. थिंकटँक) महत्त्व; परस्परांमधील व्यावसायिक व व्यक्तिगत बंधामुळे सर्वानाच होणारा फायदा.. अशा विविध अंगांना लेखिका स्पर्श करते. मात्र पुस्तक विद्यापीठीय शोधनिबंधासारखे नाही; वित्तक्षेत्राच्या नेटवर्कच्या बाहेर असणाऱ्या सामान्य नागरिकांना या क्षेत्राची जाण व्हावी, या दृष्टीने ते लिहिले आहे.

प्राय: अमेरिकी वित्तक्षेत्रात सध्या कार्यरत असणाऱ्या अनेक नामवंतांचे नावासकट उल्लेख, त्यांच्या कहाण्या, त्यांच्या व्यक्तिगत व व्यावसायिक आयुष्यातील रोचक प्रसंग पुस्तकात आहेत. त्यात ‘जेपी मॉर्गन’चे जिमी डीमॉन, विख्यात गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे क्लॉस श्वाब यांचे उल्लेख अनेकदा येतात. विविध परिषदा व संमेलनांचे वृत्तान्तदेखील आहेत. उद्धृत केलेल्या प्रसंग वा घटनांसाठी लेखिकेने ३५५ संदर्भाची सूची दिली आहे. अनेक ठिकाणी लेखिका स्वत: प्रत्यक्ष सहभागी आहे, तर काही प्रतिपादने मुलाखतींवर आधारित आहेत.

‘सुपरहब्ज्’ शिक्षणात हुशार, मेहनती, नेतृत्वगुण असणारे, जोखीम घ्यायला तयार असणारे, उच्च भावनांक असणारे असतात. व्यावसायिक आयुष्यात त्यांना अपयश आलेलेच नसते असे नाही. या संदर्भात लेखिकेने अनेक सुपरहब्ज्च्या जीवनातील घटनांचे दाखले दिले आहेत. लेखिकेला भेटलेले जवळपास सर्व अमेरिकी सुपरहब्ज् पुरुष आहेत. अमेरिकी कॉर्पोरेटस्मध्ये सक्षम स्त्रियांसाठी अदृश्य ‘ग्लास सीलिंग’ असल्याचे आपण वाचतो; त्याला यातून दुजोराच मिळतो.

सुपरहब्ज् फक्त निमंत्रितांसाठी असणाऱ्या बंदिस्त खासगी क्लबसारखे असतात. काही कारणाने एखाद्या उच्चपदस्थाने आपली वित्तसंस्था सोडली तर त्याच तोलामोलाच्या दुसऱ्या संस्थेत तो कालांतराने उच्चपदी विराजमान झालेला दिसतो- हीच ‘फिरता दरवाजा पद्धती’. पण एखाद्याने क्लबच्या अलिखित नियमांचे उल्लंघन केल्यास मात्र गय नसते. नाणेनिधीचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉमिनिक स्ट्रॉस-काह्न यांच्यावर अमेरिकेतील एका हॉटेलात महिला कर्मचाऱ्याच्या विनयभंगाचा आरोप झाल्यावर त्यांना क्लबमधून खडय़ासारखे बाजूला करण्यात आले होते.

‘पशाकडे पसा जातो’ हे वचन वित्तयुगातही लागू पडते. सुपरहब्ज्नी त्यात स्वत:साठी काही मूलभूत बदल केलेले दिसतात. त्यातून, ‘पसा + माहिती + उच्चपदस्थांशी असणारे सामाजिक बंध = अमर्याद नफासंधी’ असे नवे समीकरण प्रस्थापित झाले आहे.

महाबलाढय़ वित्तसंस्था या एकच नाही तर अनेक वित्त-व्यवहार करतात. त्यात वित्तीय मत्तांमध्ये (Financial Assets) गुंतवणूक- निर्गुतवणूक सर्वात महत्त्वाची. उदा. शेअर्स, रोखे, विविध प्रकारचे डेरिव्हेटिव्हज् इत्यादी. या मत्तांची किंमत सतत वर-खाली होत असते. कशामुळे? तर जागतिक वा मोठय़ा देशांच्या राजकीय-आर्थिक अवकाशात, व्याजदरात, तंत्रज्ञानात होणारे बदल या मत्तांच्या नफा कमावण्याच्या क्षमतेवर परिणाम करतात, म्हणून. त्यामुळे नजीकच्या काळात या अवकाशात काय बदल होऊ शकतात, याचा अचूक अंदाज बांधणारे गुंतवणूकदार अधिक नफा कमवू शकतात किंवा आपला तोटा कमीत कमी ठेवू शकतात. त्यामुळे भविष्यात वारे कोणत्या दिशेला वाहू शकतात याची माहिती सर्वाच्या आधी मिळणे ही यशाची गुरुकिल्ली ठरते. ‘अचूक व इतरांच्या आधी माहिती’ हा वित्तीय मार्केटचा ‘कोडमंत्र’ आहे. अशी माहिती कोणाकडे मिळू शकणार? तर यासंबंधातील निर्णय घेणाऱ्यांकडे. कारण कोणतेही निर्णय सार्वजनिक होण्याच्या आधी अनेक दिवस शिजत असतात. आणि काय शिजायला ठेवले आहे ते फक्त काही मुख्य आचाऱ्यांनाच माहीत असते. ही माहिती ऐऱ्यागऱ्याला जाऊ द्या, पण भरमसाट पैसे टाकून, लाच देऊनदेखील मिळणारी नसते. त्यासाठी सतत तेलपाणी केलेले सामाजिक बंधच कामी येत असतात. सुपरहब्ज्ची संकल्पना-चौकट या गृहीतकावर उभी आहे.

आजच्या इलेक्ट्रॉनिक युगात पृथ्वीच्या दोन टोकांवर असणाऱ्या व्यक्ती अत्याधुनिक सुविधांद्वारे कितीही वेळा संवाद साधू शकतात. तरीही वित्तक्षेत्रातील उच्चपदस्थ -ज्यात सुपरहब्ज्देखील मोडतात- प्रत्यक्ष भेटीगाठी घेण्यास प्राधान्य का देत असतील? व्यावसायिक बठकांमधील भेटीगाठी समजू शकतो. त्याखेरीज व्यायामशाळा, क्लब्ज् वा सामाजिक कार्यासाठी आयोजिलेल्या कार्यक्रमांत  सुपरहब्ज् एकमेकांच्या नित्य भेटीगाठी घेत असतात.

अशा भेटींमध्ये दर वेळी एकमेकांना धंद्याच्या गुप्त बातम्या दिल्या जातात असे नव्हे. एकमेकांशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करणे, त्याला वारंवार तेलपाणी करणे, शिवाय मनातील विचार, व्यवसाय-धंदा वा अर्थव्यवस्थेविषयीच्या चिंता, भावी योजना यासंबंधी माहितीचीही परस्परांशी देवाणघेवाण होत असते. यात कोणाच्या काय प्रतिक्रिया येऊ शकतात, याचा अंदाज बांधायला त्यांना मदत होते. अतिशय तरल पातळीवर हे सर्व सुरू असते.

अमेरिकेत ‘इनसायडर ट्रेडिंग’संबंधातील कायदे अतिशय कडक आहेत, असे सांगितले जाते. त्याच तरतुदींखाली काही वर्षांपूर्वी भारतीय वंशाच्या रजतकुमार गुप्तांना कोठडीत पाठवण्यात आले होते. सुपरहब्ज्मधील घट्ट व्यक्तिगत संबंधांच्या केंद्रस्थानी परस्परांचे व्यावसायिक हितसंबंध असतात, हे उघड गुपित आहे. एकमेकांना बांधून घेताना सुपरहब्ज् जे तरल धागे वापरतात ते अमेरिकेतील ‘इनसायडर ट्रेण्डिंग’च्या तरतुदींच्या चिमटीत कसे येत नाहीत, याबद्दल मात्र लेखिका फारसे भाष्य करीत नाही.

तीच गोष्ट वित्तक्षेत्राला लागू होणाऱ्या कायद्यांची. इतर कोणत्याही देशाप्रमाणे अमेरिकी वित्तक्षेत्राला तेथील प्रचलित कायद्याच्या चौकटीतच काम करावे लागते. कायदे बनवण्याचे, बदलण्याचे अधिकार राजकीय नेतृत्वाकडे असतात. त्यामुळे राजकीय नेतृत्वाला -सत्ताधारी, तसेच विरोधी पक्षांतीलही- ‘मॅनेज’ करणे आले. त्यासाठी सिनेटपासून अध्यक्षीय निवडणुकांपर्यंत प्रचारनिधीचा पुरवला जातो. सुपरहब्ज्ची अफाट ताकद, शासनव्यवस्था व राजकीय प्रणालींच्या परस्परसंबंधांची चिरफाड  टाळण्याचे लेखिकेने ठरवलेले दिसते.

लेखिका अमेरिकेतील वित्तक्षेत्राच्या आतल्या गोटात वावरणाऱ्या व्यावसायिक. अशा व्यक्तीला प्रणाली नक्की कशी चालते याची मिळणारी अंतर्दृष्टी विरळाच. विद्यापीठांत बसून शेकडो लेख वा पुस्तके वाचूनदेखील न मिळू शकणारी. आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या, त्यातही वित्तक्षेत्राच्या अभ्यासकांना तर हे पुस्तक मेजवानीच ठरेल.

भारत ज्या वेगाने जागतिक अर्थव्यवस्थेच्या केंद्राकडे खेचला जाईल त्या प्रमाणात भारतीय बँकिंग व वित्तक्षेत्र जागतिक बँकिंग व वित्तक्षेत्राबरोबर एकरूप होत जाणार. भारतातील स्टॉक मार्केटस्, बँकिंग, विमा/ पेन्शन/ म्युच्युअल फंडस् अशा वित्तक्षेत्राच्या सर्वच उपक्षेत्रांत परदेशी गुंतवणूक वाढत आहे. रिझव्‍‌र्ह बँक वा सेबीच्या नियामक मंडळांचे कारभार असू द्यात किंवा व्याजदर, भारतात निर्णय घेणाऱ्यांना आंतरराष्ट्रीय वित्तप्रणालीत -ज्याच्या केंद्रस्थानी सुपरहब्ज् आहेत- घेतल्या जाणाऱ्या निर्णयांना नजरेसमोर ठेवावे लागत आहे. तुमची इच्छा असो वा नसो, हे निर्णय तुमच्या-आमच्या दैनंदिन आयुष्याची गुणवत्ता ठरवणार आहेत. म्हणून सामान्य नागरिकांनीदेखील या साऱ्याची माहिती घेतली पाहिजे.

‘सुपरहब्ज्- हाऊ द फायनान्शियल एलिट अ‍ॅण्ड देअर नेटवर्क्‍स रूल अवर वर्ल्ड’

लेखिका : सँड्रा नाविदी

प्रकाशक :  हॅचेट इंडिया

पृष्ठे : ३००, किंमत : ५९९ रुपये

 

संजीव चांदोरकर

chandorkar.sanjeev@gmail.com