मनीषा टिकेकर tikekars@gmail.com

स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्राचे वैचारिक नेतृत्व करणारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या वैचारिक भूमिकेचा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील ‘कार्यकर्ता’ या पलूचा पुनर्परिचय करून देणारा हा चरित्रग्रंथ विसाव्या शतकातील भारतात घडत असलेले मोठे बदल आणि शास्त्रीजींची वैचारिक जडणघडण हे परस्परपूरक कसे होते, हे सांगते..

मोठय़ा व्यक्तींची एकाहून अधिक चरित्रे का लिहिली जातात, असा प्रश्न काही वेळा पडू शकतो. असा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे चरित्रलेखनाबद्दलचा मर्यादित दृष्टिकोन. एखाद्या चरित्रनायकाच्या आयुष्यातील घटनाक्रम जरी तोच राहिला तरी त्या आयुष्यावर, विचारांवर अधिक प्रकाश टाकणारी साधने काही काळानंतर उपलब्ध होऊ शकतात, काही वेळेस कालांतराने चरित्रनायकाचा खासगी पत्रव्यवहार उपलब्ध होतो आणि तोवर माहिती नसलेला त्याच्या जीवनाबद्दलचा नवीन तपशील मिळतो व त्या व्यक्तीच्या मनोव्यापाराबद्दल, विचारसरणीबाबत नवा उलगडा होतो. तर काही वेळेस त्या व्यक्तीच्या विचारांची विद्यमान समाजाला आठवण व नव्याने ओळख करून देणे आवश्यक ठरते.

आज साठीच्या घरात असलेले मराठी वाचक त्यांच्या शालेय व महाविद्यालयीन जीवनात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नावाशी परिचित झाले असणारच. त्यांच्या ‘हिंदू धर्माची समीक्षा’, ‘जडवाद अर्थात अनीश्वरवाद’ आणि ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ या ग्रंथांनी आणि इतर लिखाणाने तर्कतीर्थाना हिंदू धर्माशास्त्राचे गाढे विद्वान आणि प्रकांड पंडित म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली होतीच. मग प्रश्न असा पडतो की, तर्कतीर्थाची विद्वत्ता, त्यांचे कार्य महाराष्ट्राबाहेर कितपत पोहोचले? त्यांना अखिल भारतीय मान्यता मिळाली का? प्रश्नाचे उत्तर उघडच आहे. पण लक्ष्मणशास्त्री होते क्रियाशील विद्वान. धर्मकोश आणि विश्वकोश यांच्या निर्मितीची मुहूर्तमेढ रोवून त्या कार्याला चालना देणे, ‘नवभारत’सारख्या वैचारिक मासिकाची स्थापना करणे हे तर त्यांनी केलेच; परंतु विसाव्या शतकाच्या भारताच्या जडणघडणीच्या राजकीय आणि सामाजिक चळवळींत त्यांचे मोलाचे योगदान राहिले. शास्त्रीजी अक्षरश: विसावे शतक जगले (१९०१-१९९४). भारतात होणाऱ्या परिवर्तनात ते मनापासून सामील झाले आणि समाजाचे वैचारिक नेतृत्वही त्यांनी केले.

लक्ष्मणशास्त्रींचे सर्व लिखाण मराठी आणि संस्कृत भाषेत. त्यांच्या कन्या डॉ. अरुंधती खंडकर यांनी लिहिलेली शास्त्रीजींची तिन्ही चरित्रे मराठीतच. शास्त्रीजींवर लिहिलेले बहुतेक लेखही मराठीत. जरी त्यांच्या वर उल्लेखलेल्या तिन्ही ग्रंथांचे इंग्रजीत अनुवाद झाले असले, तरी ते इतर भाषकांपर्यंत कितपत पोहोचले, हा मुद्दा उरतोच. जर्मन विद्वान मॅथ्यू लेदर्ले लिखित ‘फिलॉसॉफिकल ट्रेण्ड्स इन मॉडर्न महाराष्ट्र’ (१९७६) या प्रसिद्ध ग्रंथातही तर्कतीर्थाचा उल्लेख अगदी ओझरताच येतो, याचे नवल वाटते. म्हणूनच प्रस्तुतच्या पुस्तकाचे महत्त्व मोठे आहे. विशेष म्हणजे, हे पुस्तक इंग्रजीत असल्याने आणि ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने प्रकाशित केल्याने तर्कतीर्थाचा धर्मशास्त्रांच्या बाबतीतला विवेकवादी दृष्टिकोन, विचारसरणी आणि विश्लेषण देशात आणि देशाबाहेरही जाईल. हे पुस्तक रूढार्थाने चरित्र नाही, तर ही आहे त्यांच्या बौद्धिक-वैचारिक जडणघडणीची कहाणी आणि ही कहाणी गुंफली आहे भारताच्या बदलत्या पार्श्वभूमीवर. पुस्तकाला राजमोहन गांधी यांची लहानशी प्रस्तावना लाभली आहे आणि त्यात शास्त्रीजींच्या बौद्धिक व्यक्तिमत्त्वावर दोन-तीन ठिकाणी मार्मिक भाष्यही केले आहे.

या पुस्तकातून रेखाटलेला शास्त्रीजींचा वैचारिक प्रवास परिवर्तनवाद, गांधीविचार, मार्क्‍सवाद ते रॉयवाद म्हणजेच मूलगामी किंवा नवमानवतावाद (रॅडिकल ह्य़ुमॅनिझम) असा आहे. यातून शास्त्रीजींच्या व्यक्तिमत्त्वाचा एक मुख्य पलू प्रकर्षांने पुढे येतो; तो म्हणजे, वेद आणि हिंदू धर्मशास्त्रविषयक त्यांची विद्वत्ता आणि आधुनिक विचारांचे अनोखे मिश्रण. हिंदू धर्मशास्त्रीय ग्रंथांतील प्रगतिशील उत्क्रांतिवाद समजून घेण्यासाठी आणि त्याचे स्पष्टीकरण करण्यासाठी इतिहासलेखन पद्धतीचा वापर करून शास्त्रीजींनी परिवर्तनवादाची मांडणी केली, असे लेखकद्वयीचे म्हणणे आहे. म्हणजेच परिवर्तनवादात केवळ घटनांचा सनावळीप्रमाणे अभ्यास अभिप्रेत नसतो, तर समाज, संस्कृती, विचार यांतील उक्रांतिवादी बदलांमुळे कालांतराने धार्मिकता, ईश्वर आणि विश्वासंबंधीच्या कल्पनांत बदल घडतो. त्याचा प्रामुख्याने विचार केला जातो.

अशा परिवर्तनवादाच्या संकल्पनेवर ठाम विश्वास असल्यामुळेच त्यांनी हिंदू धर्माच्या मौलिक ग्रंथांच्या स्थितीवादी स्पष्टीकरणांना आव्हान दिले आणि पर्यायाने परंपरावादी कर्मठ हिंदू विद्वानांचा रोषही अनेक वेळा पत्करला. तर्कतीर्थाचा िपड सुधारणावादी होता. ब्रिटिश राजवटीपासून भारताला मुक्ती मिळावी ही त्यांची उत्कट इच्छा तर होतीच, पण लेखकांनी नमूद केल्याप्रमाणे, त्याहीपेक्षा भारतीयांची त्यांच्याच ‘आत्मविनाशी’ भूतकाळापासून सुटका करण्याची आणि जातिव्यवस्थेपासून मुक्ती मिळवून देण्याची ओढ जास्त होती. शास्त्रीजींनी सार्वत्रिक शिक्षण आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा हिरिरीने पुरस्कार केला, जेणेकरून स्वतंत्र आणि सशक्त नवभारताच्या उभारणीत समाजाचे मोठे योगदान राहावे.

याच ऊर्मीतून लक्ष्मणशास्त्री गांधीविचार आणि चळवळीकडे ओढले गेले. गांधीजींचे अस्पृश्यता निवारणाचे कार्य शास्त्रीजींना सर्वाधिक भावले. या कार्यासाठी भारतभर प्रवास करताना उच्चवर्णीय हिंदू कार्यकर्त्यांचा दुटप्पी भाव शास्त्रीजींनी बरोबर हेरला. या काळात ते धर्मशास्त्रीय ग्रंथांतून अस्पृश्यता निवारण मोहिमेला आधार काढून देत आणि गांधीजींना आश्वस्त करत. म्हणूनच शास्त्रीजींवर लवकरच पाखंडी असा शिक्का बसला. गांधीजींचे चिरंजीव देवदास आणि सी. राजगोपालाचारी (राजाजी) यांची कन्या लक्ष्मी यांनी परस्परांशी विवाह करायचे ठरवले आणि गांधीजी चिंतेत पडले. परंपरावाद्यांच्या दृष्टीने हा प्रतिलोम विवाह होता आणि म्हणूनच धर्मशास्त्राप्रमाणे अमान्य. राजगोपालाचारी अय्यंगार ब्राह्मण, तर गांधीजी वैश्य वर्णाचे. गांधीजींनी तर्कतीर्थाना सल्ला विचारला. त्यावर शास्त्रीजींचा युक्तिवाद प्रभावी होता. त्यांच्या मते, शंकराचार्याच्या काळापासून वर्णव्यवस्थेत सतत उत्क्रांती होत आली आहे. आणि व्यावहारिक विचार करता गांधीजी व राजाजी यांचे वर्णव्यवस्थेतील स्थान एकच आहे. दोघेही पेशाने वकील आहेत. दोघांनी देशाच्या स्वातंत्र्यलढय़ाला वाहून घेतले आहे, दोघांनी सारखीच मूल्ये जोपासली आहेत. असे असताना गांधीजी आणि राजाजी यांना भिन्नवर्णीय कसे मानता येईल? पुढे शास्त्रीजींनी त्या विवाहाचे पौरोहित्यही केले. कालांतराने गांधीजींचे आणि शास्त्रीजींचे मार्ग वेगळे झाले, तरी शास्त्रीजींनी कायमच गांधीजींविषयी आदर जोपासला.

गांधीवादानंतरचा तर्कतीर्थाचा वैचारिक प्रवास ‘मार्क्‍सिझम अ‍ॅण्ड बीयॉण्ड’ या प्रकरणात चितारलेला आहे. युरोपीय तत्त्वज्ञान, इतर विषयांविषयीचे साहित्य आणि मार्क्‍सवाद समजून घेण्यासाठी तर्कतीर्थानी उत्तम इंग्रजी शिकून घेतले. मानवेंद्रनाथ रॉय यांचेही मार्क्‍सवादावरील लिखाण वाचले. या दोघांची प्रथम भेट झाली १९३७ साली आणि ते वैचारिक सहप्रवासी झाले. भारतातील सामाजिक राजकीय परिस्थिती समजून घेण्यासाठी मार्क्‍सवाद पुरेसा नाही, असे दोघांचे मत बनले. रॉय यांनी स्थापन केलेल्या रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टीचे १९४८ मध्ये विसर्जन होईपर्यंत ते क्रियाशील सदस्य राहिले. तसेच रॉय यांच्या नवमानवतावादाचे खंदे पुरस्कत्रे राहिले. रॉय यांनी ‘भारतीय प्रबोधनाचे सर्वोत्कृष्ट प्रतिनिधी’ अशा शब्दांत शास्त्रीजींचा गौरव केला होता. रॉय आणि शास्त्रीजी या दोघांनी या काळात निकटचे वैचारिक साहचर्य अनुभवले आणि जडवादावर (मटेरियालिझम) अनुक्रमे इंग्रजी आणि मराठीतून लिखाणही केले. १९४४ मध्ये रॉय यांनी प्रसृत केलेल्या स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचा मसुदा- ‘कॉन्स्टिटय़ुशन ऑफ फ्री इंडिया : अ ड्राफ्ट’ – यातही शास्त्रीजींचा सहभाग होता. भारताच्या स्वातंत्र्यानंतर शास्त्रीजींनी काँग्रेसमध्ये पुनप्र्रवेश केला.

महाराष्ट्रात शास्त्रीजींच्या रॉयवादाच्या मार्गाने जाणारा मोठा शिष्यवर्ग तयार झाला. त्यात होते यशवंतराव चव्हाण, जी. डी. पारेख, न्या. तारकुंडे, सिबनारायण रे, व्ही बी. कर्णिक आदी अनेक. या मंडळींना ‘हिस्टोरिकल डिटर्मिनिझम’च्या (सर्व गोष्टी पूर्वी ठरल्याप्रमाणेच घडणार) सिद्धांतात स्वारस्य होते. रॉय यांच्या पक्षाचे १९४८ साली विसर्जन झाल्यानंतर पक्षाच्या सदस्यांपैकी बहुतेक जण आपापल्या व्यवसायांकडे परत गेले. मात्र, रॉयिस्ट मंडळींचे लहान लहान गट अस्तित्वात राहिले. भारतभर रॅशनॅलिस्ट असोसिएशन्स स्थापन झाली. पंजाबमध्ये तर्कशील सोसायटीची स्थापना झाली. आजही ‘रॅडिकल ह्य़ुमॅनिस्ट’ हे मासिक दिल्लीहून नियमित प्रसिद्ध होते. पण देशातली एक बौद्धिक चळवळ म्हणून नवमानवतावाद अत्यंत क्षीण झाला आहे.

तर्कतीर्थ रॅशनॅलिस्ट विचारवंत होते. म्हणजेच तर्कवाद, बुद्धिवाद हा त्यांच्या विचारांचा पाया होता. याहीपेक्षा रॅशनॅलिझमला अधिक योग्य शब्द म्हणजे ‘विवेकवाद’! पारंपरिक धर्मशास्त्रविषयक विचार ‘शाश्वत सत्य’ या संकल्पनेवर आधारित होते. तर शास्त्रीजींचे विचार ‘वैश्विक नीतितत्त्वां’च्या आधारावर उभे होते. म्हणूच त्यांनी केलेले हिंदू धर्मशास्त्रीय ग्रंथांचे विश्लेषण अभिनव आणि सर्जनशील होते. त्यांनी हे कार्य करताना बुद्धाच्या धर्मसूत्रांचा, तसेच बौद्ध विद्वान नागार्जुन आणि धर्मकीर्ती यांच्या लिखाणांचाही अभ्यास केला होता. रा. ग. जाधव यांनी त्यांच्या ‘शास्त्रीजी’ या १९९४ सालच्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, शास्त्रीजींच्या अभ्यासामागे होती- ‘पश्चिमी ज्ञानविज्ञानाच्या मुळाशी असलेल्या तात्त्विक अधिष्ठानाची व वस्तुनिष्ठ मीमांसेची नेमकी अभिज्ञता’!

शास्त्रीजींची कन्या अरुंधती आणि नातू अशोक खंडकर यांनी लिहिलेले प्रस्तुतचे पुस्तक त्यांच्या वैचारिक भूमिकेविषयी, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या ‘कार्यकर्ता’ या पलूविषयी पुनर्परिचय करून देते. त्याच वेळी त्या काळातील भारतात घडत असलेले मोठे बदल आणि शास्त्रीजींची वैचारिक जडणघडण हे परस्परपूरक कसे होते, हेही सांगते. पुस्तकाची मांडणी आणि भाषा दोन्ही चांगल्या दर्जाची आहेत. फक्त किंमत कमी असती, तर ते अधिक लोकांपर्यंत पोहोचले असते. तर्कतीर्थाचे विचार लोकांपर्यंत पोहोचण्याची भारतात आज तरी तीव्र निकड आहे.

आजच्या भारतातले सार्वजनिक जीवन- सामाजिक, सांकृतिक, राजकीय- झपाटय़ाने विवेकशून्यतेकडे चालले आहे. याचा प्रत्यय पदोपदी येतो. राजकीय आणि सामाजिक नेत्यांची सततची अश्लाघ्य म्हणता येतील अशी वक्तव्ये, लहानसहान गोष्टींचा थेट राष्ट्रवादाशी संबंध जोडणे, वेगवेगळ्या समाजगटांनी पदोपदी धार्मिक- सांकृतिक जाणिवा व भावना दुखावल्या गेल्याचा कांगावा करणे, इतिहासाचा, संस्कृतीचा अवाजवी उदोउदो करणे, नको त्या परंपरांचे पुनरुज्जीवीकरण घडवून आणणे, विविध समाजघटकांमध्ये अकारण तेढ वाढणे, राजकारणात सतत लोकानुनयाचा मार्ग चोखाळणे, न्यायपालिकेचे निर्णय बिनदिक्कत धाब्यावर बसवणे, समाजातील असहिष्णुता, वाढती झुंडशाही; या सर्वाची यादी कितीही लांबवता येईल. भारतीयांनी जणू तर्क, बुद्धिप्रामाण्य आणि विवेक या सर्वाना जाणूनबुजून बाजूला सारले आहे. आणि हे केवळ आपल्याच देशात घडतेय असे नाही, तर जगभरच्या अनेक देशांत अशी परिस्थती आहे. अशा वेळी विवेकवादी विचारांची समाजाला आठवण करून देणे महत्त्वाचे ठरते आहे. विवेकवाद हा वैयक्तिक आणि समाजमनावर बिंबविण्याचा विषय आहे. सद्य:परिस्थितीत हे कोण आणि कसे करणार, हा मात्र गहन प्रश्न आहे.

स्विमिंग अपस्ट्रीम : लक्ष्मणशास्त्री जोशी अ‍ॅण्ड द इव्होल्यूशन ऑफ मॉडर्न इंडिया

लेखक : अरुंधती खंडकर, अशोक खंडकर

प्रकाशक : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस

पृष्ठे: १९३+२३, किंमत : १,१९५ रुपये