आलिया मलेक हिच्या ‘द होम दॅट वॉज अवर कंट्री’ या  पुस्तकाच्या शीर्षकात ज्या देशाचा ती निर्देश करतेय, तो देश आहे सीरिया. त्याला ती आपली मायभूमी म्हणतेय, पण तिचे कुटुंब सीरियातून अमेरिकेत स्थलांतरित झाल्याला आता सुमारे चार दशकांहून अधिक काळ लोटलाय. या कुटुंबाच्या दुसऱ्या पिढीची ती प्रतिनिधी. पेशाने पत्रकार. आतापर्यंत तिची ‘अ कंट्री कॉलड् अमेरिका- अरब रूटस्, अमेरिकन स्टोरीज’, ‘पॅट्रियट अ‍ॅक्ट – नॅराटिव्हज् ऑफ पोस्ट ९/११ इनजस्टीस’ ही पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. सीरियाबद्दच्या पुस्तकाची बीजं रुजली ती एप्रिल २०११ मध्ये आलिया सीरियात गेली तेव्हापासून. ‘अरब स्प्रिंग’ चळवळीचा तो काळ.  ती तिथे जाण्याचे कारण तिच्या आजीच्या- सलमाच्या घराची डागडुजी करण्याची तिने उचललेली जबाबदारी. सीरियातल्या अनेक घडामोडींवर तिने त्या वेळी रिपोर्ताज लिहिले. त्याबद्दल तिला मेरी कोल्वीन पुरस्कारही मिळाला. पुढे ती २०१३ मध्ये अमेरिकेला परतली ते सीरियाच्या भूमीत असलेली आपली मुळं शोधण्याची असोशी घेऊन. त्या असोशीचं फलित म्हणजे ‘द होम दॅट वॉज अवर कंट्री’ हे पुस्तक.

तिच्या आजीचं सलमाचं घर ६० र्वष जुनं – फ्रेंच राजवट दूर होऊन सीरिया स्वतंत्र झाला, तेव्हाचं. पश्चिम आशियातील अनेक देशांप्रमाणे तिथेही ‘लोकशाही’ स्थापन झाली. परंतु पुढे  पश्चिम आशियात जिथे लष्करी राजवटी आल्या त्यात सीरियाचाही समावेश होतो. इस्रायलला सामोरे जाण्यासाठी अरब राष्ट्रवाद आणि साम्यवाद यांचा संयोग असलेला सद्दाम हुसेनप्रणीत बाथ समाजवाद सीरियाने स्वीकारला. त्यात हाफीज अल् असाद या सीरियाच्या राज्यकर्त्यांने पुढाकार घेतलेला. सीरियातील शियांचे नेतृत्व करणाऱ्या असादच्या कारकीर्दीने तिथल्या बहुसांस्कृतिकतेला तडे जाऊ लागले. १९७०च्या दशकात असादच्या दहशतीला तोंड द्यावे लागल्याने ज्यांना सीरियातून स्थलांतरित व्हावे लागले, त्यात आलियाचे कुटुंबीयही होते. आलियाच्या आजीचे घर ज्या दमास्कस शहरात होते तिथे तुर्क, अरब, अर्मेनियन, ज्यू, कुर्द, मुस्लीम, ख्रिश्चन आदी अनेक धर्म-पंथाचे लोक एकत्र राहत होते. असादच्या राजवटीने ही बहुसांस्कृतिकता नाहीशी करण्याचा प्रयत्न केला. त्यातून अशांतता, हिंसा, द्वेष वाढतच गेला. पुढे आयसिसची स्थापनाही त्यातूनच झालेली. आलियाच्या कुटुंबातील तीन पिढय़ांनी हे सारे आपापल्या परीने पाहिले, जगले आहे. आलियादेखील त्याच पाश्र्वभूमीवर सीरियाची ही कहाणी  सांगते आहे.

‘एका स्थलांतरित स्त्रीने आपल्या मुळांचा घेतलेला शोध’ असे त्याचे वरवर स्वरूप वाटत असले, तरी ते तसे नाही. साठ वर्षांपूर्वी ज्या देशात स्वत:च्या विकासाची प्रचंड क्षमता सामावलेली होती, तोच देश अस्मितांच्या राजकारणात बिघडत कसा गेला याचा हा आढावा आहे. पुस्तक २८ फेब्रुवारीला  प्रकाशित होत आहे.