अनिरुद्ध फडके        

वैद्यकशास्त्राची घडण कशी झाली ते हे पुस्तक सांगतंच; पण चांगला वैद्यक कसा ‘घडवावा’ हेही त्यात आलं आहे..

Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
world's oldest and first curry was made with brinjal
वांग्याची भाजी… तब्बल चार हजार वर्षे जुनी, ‘इथे’ सापडला पुरावा, संशोधकांचे शिक्कामोर्तब!
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान

वैद्यकीय व्यवसाय व व्यावसायिकांची समाजातील प्रतिमा गेल्या काही वर्षांत कमालीची काळवंडलेली दिसते. अशा परिस्थितीत गरज आहे वैद्यकीय व्यवसाय व समाज यांच्यामधला दुरावा दूर करण्याची. वैद्यकशास्त्राला असलेल्या वैभवशाली परंपरेची जाणीव डॉक्टर व रुग्ण यांना पुन्हा नव्याने करून देण्याची गरज आहे. एखाद्या डॉक्टरकडे कुठले गुण असावेत, हे या परंपरेचा पुन्हा अभ्यास केल्यास नव्याने लक्षात येईल. त्याचबरोबर रुग्ण व त्याच्या नातेवाईकांच्या वैद्यकीय व्यावसायिकांबद्दल असलेल्या अपेक्षांची पुनर्माडणी करणे शक्य होईल.

वैद्यकशास्त्राच्या याच स्फूर्तिदायक परंपरेबद्दल विवेचन करणारे पुस्तक आहे – ‘तबियत’! ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकाचे लेखक आहेत सुप्रसिद्ध वैद्यकीय चिकित्सक डॉ. फारोख उडवाडिया! ब्रीच कँडी रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागाचे प्रमुखपद त्यांनी कित्येक वर्षे सांभाळले आहे. सर जे. जे. रुग्णालय व ग्रँट मेडिकल कॉलेज येथे ते मानद प्राध्यापकही आहेत. वैद्यकीय नियतकालिकांमध्ये त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. धनुर्वात, अतिदक्षता विभागातल्या उपचार पद्धती यांसारख्या विषयांवरची त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. डॉ. उडवाडियांनी वैद्यकशास्त्राशी संबंधित विषयांवर सर्वसामान्यांसाठी लिहिलेल्या नऊ  निबंधांचा संग्रह म्हणजेच ‘तबियत’ हे नवे पुस्तक. यातील पाच निबंध वैद्यकाच्या इतिहासावर आधारित आहेत. इतर निबंधांमध्ये ‘वैद्यकीय नीतिमत्ता’, ‘चांगला वैद्यक कसा घडवावा?’, ‘वैद्यकशास्त्र आणि संगीत यांतील परस्परसंबंध’ व ‘मृत्यू’ या विषयांचा ऊहापोह करण्यात आला आहे.

शारीरिक व्याधींबद्दल मानवाचे कुतूहल हजारो वर्षांपासून आहे. रोग, व्याधी यांच्याबद्दलच्या संकल्पना मात्र काळाप्रमाणे बदलत गेल्या. त्याचबरोबर शारीरिक व्याधींचे निदान व उपचार करण्याची जबाबदारीही. प्राचीन काळी रोगांना दैवी कोप किंवा चेटूक समजले जात असे. हा कोप उतरवण्यासाठी मांत्रिक, जादूटोणा करणाऱ्यांकडे जावे लागत असे. (आजही जगाच्या पाठीवर अनेक देशांत हीच परिस्थिती आहे!) नंतरच्या काळात ही जबाबदारी मंदिरांचे पुजारी वा धर्मगुरूंवर आली. प्राचीन इजिप्तमध्ये जसे वैद्यकशास्त्र अभ्यासले जाऊ  लागले तसेच भारतातही. प्राचीन भारतातील चरक, सुश्रुत या वैद्यक व्यावसायिकांची नावे त्या काळातही चीन, पर्शिया व अरबस्तान या प्रदेशांत प्रसिद्ध होती. वैद्यकविषयक संकल्पना व्यापारी मार्गाने जगात इतरत्र पोहोचत होत्या. तत्कालीन ग्रीक, अरबी व भारतीय वैद्यकातल्या संकल्पनांमध्ये पुष्कळ साम्य होते. कफ, वात व पित्त या संकल्पनांवर आयुर्वेद आधारित होता, तर ग्रीक वैद्यक काळे पित्त, पिवळे पित्त, कफ व रक्त यांचा विचार करून रोगसंकल्पना मांडत होते. अरबी वैद्यकानेही ग्रीक संकल्पना अंगीकारल्या. या काळात शरीररचनाशास्त्र व शरीरक्रियाशास्त्र यांबद्दल वैद्यकाला जुजबी माहिती होती. रुग्णाचे निरीक्षण हा रोगनिदानाचा गाभा होता. निरीक्षण करताना साहजिकच जखमेतून वाहणारे रक्त, खोकताना बाहेर पडणारा कफ, जखमांमधला पू, गुद्द्वारावाटे बाहेर पडणारे वायू व विष्ठा, ओकारी करताना बाहेर येणारे आम्लपित्त वा रक्त यांवरच रोगांविषयीचे आडाखे बांधले जात. भारत, युरोप व मध्यपूर्वेतील देशांमधल्या रोगविषयक संकल्पना शेकडो वर्षे टिकून होत्या. अगदी एकोणिसाव्या शतकापर्यंत पाश्चात्त्य वैद्यकातही रक्तस्राव घडवून आणणे, रेचक देणे असे उपचार केले जात होते.

आधुनिक वैद्यकशास्त्राची खरी सुरुवात झाली युरोपमधल्या पुनरुज्जीवनाच्या (renaissance) कालखंडात. सोळाव्या शतकात अ‍ॅन्ड्रीआज् व्हेसालियसने मानवी देहाची अंतर्गत रचना उलगडून दाखविणारा ग्रंथ प्रसिद्ध केला. व्हेसालियसला आद्य शरीररचनाशास्त्रज्ञ मानले जाते. मात्र व्हेसालियसचा ग्रंथ प्रसिद्ध होण्याआधी लिओनार्दो दा विंची याने किती तरी मृतदेहांचे विच्छेदन करून रेखाचित्रांसहित मानवी शरीराच्या अंतर्गत रचनेबद्दल नोंदी करून ठेवल्या होत्या. मात्र तेव्हा मानवी देहाची चिरफाड करणे बेकायदेशीर होते. त्यामुळे त्याने आपल्या नोंदी कधी कुणाला दाखवल्या नव्हत्या. व्हेसालियसच्या ग्रंथाने वैद्यकीय विश्वात खळबळ माजवली. तत्पूर्वी हजारो वर्षे शरीररचनाशास्त्र शिकवले जायचे ते गेलन या प्राचीन ग्रीक तज्ज्ञाने लिहिलेल्या ग्रंथातून. गेलनने मानवी देहाचे विच्छेदन कधीच केले नव्हते. इतर प्राण्यांच्या अंतर्गत रचनेचा अभ्यास करून त्याने मानवी देहरचनेवर ग्रंथ लिहिला होता. त्यामुळे व्हेसालियसच्या ग्रंथावर खूप टीका झाली. त्याला देशांतर करून स्पेनमध्ये स्थायिक व्हावे लागले.

युद्ध व वैद्यकशास्त्र यांचा अनोखा संबंध आहे. युद्धामध्ये माणसे मारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते, तर वैद्यकशास्त्र जीव जगवण्यासाठी पराकाष्ठा करते. युद्धकाळात साधने, मनुष्यबळ यांची कमतरता असल्याने अनेक नव्या संकल्पना युद्धकाळात प्रथमच वापरल्या जातात. शांततेच्या कालखंडात त्यातल्याच क्रांतिकारी संकल्पना वैद्यकशास्त्र सामावून घेते. अम्ब्रॉइझ पारे या फ्रेंच शल्यक्रियातज्ज्ञाने युद्धकाळात आपल्या कौशल्याने शेकडो सैनिकांचे प्राण वाचवले. युद्धामध्ये झालेल्या जखमांवर उपचार करण्यासाठी त्यावर उकळते तेल टाकणे किंवा रक्तस्राव थांबवण्यासाठी लोखंड गरम करून जखमा भाजून काढणे हे अघोरी उपाय वापरले जात. जखमी सैनिकांना असह्य़ वेदना होत. जंतुसंसर्गाने किंवा रक्तस्रावाने बहुतेकांचा जीव जात असे. मात्र पारेने रक्तस्राव थांबवण्यासाठी रक्तवाहिनी विशिष्ट चिमटय़ात पकडून नंतर ती दोऱ्याने बांधण्याचे तंत्र विकसित केले. उकळते तेल वापरण्याची पद्धत त्याने थांबवली. त्यामुळे सोळाव्या शतकातल्या चार फ्रेंच राजांच्या दरबारातला मुख्य शल्यक्रियातज्ज्ञ होण्याचा मान पारेला लाभला.

युद्धकाळातल्या कर्तृत्वाने वैद्यकशास्त्रात भरीव योगदान देणारी आणखी एक व्यक्ती म्हणजे- फ्लोरेन्स नाइटिंगेल! श्रीमंत घरात जन्माला आलेल्या फ्लोरेन्सने आपल्या मातापित्यांच्या विरोधाला न जुमानता जनसेवेसाठी परिचारिका होण्याचा निर्णय घेतला. १८५४ साली सुरू झालेल्या क्रिमियन युद्धात ब्रिटन व फ्रान्स लढत होते रशियाबरोबर. साठ हजारांच्या ब्रिटिश सैन्यापैकी एकवीस हजार सैनिकांना या युद्धात प्राण गमवावे लागले. मात्र त्यातले केवळ साडेचार हजार सैनिक युद्धभूमीवर रक्तस्रावाने दगावले होते. उरलेले मृत्यू सैनिकी इस्पितळात जंतुसंसर्गाने झाले होते. जखमी सैनिकांची शुश्रूषा करण्यासाठी पुरेशी साधनसामग्री, मनुष्यबळ व आर्थिक तरतूद नव्हती. रुग्णांची दाटीवाटी असलेल्या लष्करी रुग्णालयात ना कपडे-चादरी बदलल्या जात, ना जखमा स्वच्छ धुऊन त्यांची मलमपट्टी केली जाई. शौचालये ओसंडून वाहत असत. जमीन सतत दमट राहत असे. रुग्णकक्षात हवा खेळती राहण्याची काहीच सोय नव्हती. जखमांतून येणारा पू, सडलेले मांस, वाहणारे मूत्र व शौच यांची सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असे. या अवस्थेचे वर्णन लंडनच्या ‘द टाइम्स’ने प्रसिद्ध केल्यावर ब्रिटिश सरकारने तातडीची उपाययोजना करण्यासाठी फ्लोरेन्स नाइटिंगेलची निवड केली.

फ्लोरेन्सने आपल्या सहकाऱ्यांच्या साहाय्याने या लष्करी इस्पितळात आमूलाग्र बदल घडवून आणला. एवढेच नव्हे, तर तिथल्या वैद्यकीय समस्यांविषयी (रोग, मृत्यू यांच्या आकडेवारीसह) अतिशय बिनचूक नोंदी तिने ब्रिटिश सरकारपुढे प्रस्तुत केल्या. फ्लोरेन्सच्या अभ्यासामुळे, तिने सुचवलेल्या संकल्पनांचा वापर केवळ लष्करी इस्पितळातच नव्हे तर युद्धानंतर इंग्लंडमधल्या सर्वसामान्य रुग्णालयांच्या आराखडय़ातही केला जाऊ  लागला. फ्लोरेन्सने जंतुसंसर्गावर काबू मिळवून जखमी सैनिकांचे जीव वाचवले; तेव्हा ‘जंतूं’मुळे रोग होतात ही संकल्पना आधुनिक वैद्यकशास्त्रात पूर्णपणे विकसित झाली नव्हती. स्वच्छ, खेळती हवा, पुरेसा सूर्यप्रकाश, सकस आहार, जखमा धुऊन झाकून ठेवणे, रुग्णांचे कपडे-चादरी रोज बदलणे या उपायांचा वापर करून फ्लोरेन्सने लष्करी रुग्णालयातील मृत्युदर ४० टक्क्यांवरून अवघ्या दोन टक्क्यांवर आणला.

अचूक निरीक्षणांवर आधारित उपाययोजना करून इग्नाझ सेमेलेविस या स्त्रीरोगतज्ज्ञाने प्रसूतीपश्चात जंतुसंसर्ग टाळण्यात यश मिळवले. तसेच शस्त्रक्रियेदरम्यान जंतुसंसर्ग टाळण्यात यशस्वी झाला- जोसेफ लिस्टर! या दोघांच्या कहाण्या मुळात वाचण्याजोग्या आहेत. किती तरी मानवी आजार जंतुसंसर्गाने होतात ही संकल्पना एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात विकसित झाली. श्वानदंशाने होणाऱ्या ‘रेबीज’ या जीवघेण्या जंतुसंसर्गाचा प्रतिबंध करणारी लस लुई पाश्चरने विकसित केली. त्यामुळे पोलिओ, घटसर्प, डांग्या खोकला अशा अनेक रोगांपासून बचाव करणाऱ्या लसी आज लहान मुलांना देता येतात.

वैद्यकशास्त्राने विसाव्या व एकविसाव्या शतकांत फार मोठी झेप घेतली. भूल देण्याची आधुनिक प्रक्रिया अधिक सुरक्षित झाली. मेंदू, हृदय, यकृत, मूत्रपिंड या अवयवांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया सुकर झाल्या. अवयव प्रत्यारोपण जगभर होऊ लागले. कर्करोगाचा मुकाबला करणारी औषधे उपलब्ध झाली. दुर्बिणीतून शस्त्रक्रियेचे तंत्र विकसित झाले. सीटी स्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी ही तंत्रे कमालीची प्रगत झाली. या सुधारणांबरोबर डॉक्टर व रुग्णसंबंधातील विसंवाद वाढीस लागला. वैद्यकशास्त्र ज्या तंत्रज्ञानामुळे नव्या उपचार पद्धतींचा अवलंब करू लागले त्या तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय उपचार पद्धती महागडी झाली. स्वास्थ्यसेवा सर्वदूर उपलब्ध करून देण्यास सरकार असमर्थ ठरल्याने बऱ्याच देशांत खासगी वैद्यकीय व्यवसायाची भरभराट झाली. आधुनिक वैद्यकीय उपचारांमध्ये होणाऱ्या मोठय़ा खर्चामुळे उपचारांना आलेले अपयश किंवा उपचारांदरम्यान झालेली गुंतागुंत रुग्ण व त्याचे नातेवाईक यांना स्वीकारणे कठीण जाऊ  लागले. वैद्यकीय शास्त्रातली अपूर्णता, अनिश्चितता रुग्णांना समजावून सांगण्यास वैद्यकीय व्यावसायिक अपुरे पडू लागले. डॉक्टर-रुग्ण संवाद खऱ्या अर्थाने पूर्ण होईनासा झाला.

डॉक्टर-रुग्णसंबंधात, संवादात, निर्णयप्रक्रियेत अंतर्भूत असलेल्या वैद्यकीय नीतिमत्तेशी निगडित मूलतत्त्वांविषयी डॉ. उडवाडिया यांनी सविस्तर विवेचन केले आहे. रुग्णाची संमती, रुग्णविषयक गोपनीयता, रुग्णाला असलेले निर्णयाचे स्वातंत्र्य, इच्छामरण यांविषयी त्यांनी आपली मते मांडली आहेत. डॉक्टर नुसता वैद्यकशास्त्रात पारंगत असून चालत नाही, तर तो कनवाळू, वैद्यकीय नीतिमत्ता जपणाराही हवा, हे त्यांचे मत सर्वाना मान्य व्हावे. डॉक्टर ‘घडवण्या’साठी वैद्यकीय शाखांमधल्या अभ्यासाखेरीज मानव्यविद्यांचाही (कला, साहित्य, आदी) अभ्यास व्हायला हवा, असे त्यांचे मत आहे.

डॉ. उडवाडिया यांची शैली प्रवाही आहे. पानोपानी वैद्यकाच्या इतिहासातील टोलेजंग व्यक्तींचा परिचय घडतो. रंजक किस्से, काव्यपंक्ती वाचकाला सामोऱ्या जातात. मात्र विसाव्या शतकाचा उत्तरार्ध व एकविसाव्या शतकातील वैद्यकशास्त्रातल्या घडामोडींबद्दल पुस्तकात फारसे उल्लेख नाहीत. उदा. ‘मृत्यू’ या विषयावरील निबंधात मस्तिष्क-मृत्यू (Braindeath) या क्रांतिकारी संकल्पनेचा अनुल्लेख खटकतो.

वैद्यकशास्त्र व वैद्यकीय व्यावसायिक या विषयांवर सकारात्मक दृष्टिकोन असलेले लेखन आजकाल दुर्मीळ झाले आहे. त्यामुळेच डॉ. उडवाडियांचे पुस्तक महत्त्वाचे ठरते.

‘तबियत’

लेखक : डॉ. फारोख उडवाडिया

प्रकाशक :  ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी प्रेस

पृष्ठे : २०९, किंमत : ६९५ रुपये 

ayphadke@gmail.com