‘रवींद्रनाथ टागोरांच्या कल्पनेतली स्त्री आणि तिचे आधुनिकतेतील बदलते आत्मभान’ असा विस्तृत पैस मांडणारे हे पुस्तक.. काहीसे गुंतागुंतीचे, काहीसे विरोधाभासात्मक तपशील देत टागोरांसारख्या लोकोत्तर साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वाकडे पाहण्याची वेगळी, अधिक स्पष्ट दृष्टी देणारी या पुस्तकातील चर्चा आपल्या स्त्रीविषयक जाणिवा विस्तारणारी आहे..

भारतीय साहित्यसृष्टीला पडलेले पहाटस्वप्न होते रवींद्रनाथ. जगभर दीर्घकाळ भारतीय साहित्य त्यांच्या नावाने ओळखले गेले. प्रचंड भौगोलिक विस्तार आणि भाषिक-सांस्कृतिक विविधता असलेल्या आपल्या देशात जनमानसावर रवींद्रनाथांच्या प्रतिभेने गारूड केले होते. ‘गीतांजली’ची आंतरराष्ट्रीय आवृत्ती लंडनमध्ये प्रसिद्ध झाली ती नोव्हेंबर १९१३ मध्ये; त्यानंतर अवघ्या तीन वर्षांत- मार्च १९१७ मध्ये तिचे पहिले पूर्ण मराठी भाषांतर (अनुवादक- ह. ना. आपटे) प्रकाशित झाले. त्याआधीच माधवानुज (काशिनाथ हरी मोडक) यांनी केलेला बंगाली ‘गीतांजली’मधल्या १५ कवितांचा पद्यरूप मराठी अनुवाद विविध मासिकांतून प्रकाशित झाला होता. रवींद्रनाथांच्या ‘घरे बाईरे’ या कादंबरीचे इंग्रजी भाषांतर (‘अ‍ॅट होम अ‍ॅण्ड आऊटसाइड’) मॉडर्न रिव्ह्य़ूमध्ये जानेवारी व डिसेंबर १९१८ या अकांत क्रमश: प्रकाशित झाले. त्यावरून शिवराम गोविंद भावे यांनी केलेले मराठी भाषांतर १९२० मध्ये प्रकाशित झाले. संपर्कक्रांती कल्पनेतही नसतानाच्या काळातली ही तत्परता पुरेशी बोलकी आहे. हा प्रभाव आजही फारसा पुसट झालेला नाही.

२०११ साली रवींद्रनाथांची शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती जगभर अनेक उपक्रमांनी साजरी झाली. प. बंगाल राज्य विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाने ‘टागोरांच्या कल्पनेतली स्त्री आणि तिचे आधुनिकतेतील बदलते आत्मभान’ असा विस्तृत पैस असलेल्या विषयावर एक आंतरराष्ट्रीय चर्चासत्र या निमित्ताने आयोजित केले होते. रवींद्रनाथांच्या प्रतिभेने ज्या ज्या क्षेत्रांत नाना परींनी व सहजतेने विपुल संचार केला त्या त्या क्षेत्रांतील आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त अभ्यासकांनी विविध दृष्टिकोनांतून विषयाची चिकित्सा करणारे १४ शोधनिबंध यात सादर केले. यात अंतर्भाव नसलेले आणखी दोन निबंध (‘ ‘घरे बाईरे’मधील लिंगभावात्मक अन्याय’ आणि ‘रवींद्र संगीतातील लिंगभाव’) चित्र पूर्ण व्हावे यासाठी नंतर लिहून घेण्यात आले. या सर्व विचारमंथनाचे ग्रंथरूप सिद्ध झाले- ‘टागोर्स आयडियाज् ऑफ द न्यू वुमन- द मेकिंग अ‍ॅण्ड अनमेकिंग ऑफ फीमेल सब्जेक्टिव्हिटी’. त्याचे संपादन केले आहे चंद्रावा चक्रवर्ती आणि स्नेहा कर-चौधरी यांनी.

इतक्या काळानंतर इतक्या वेगवेगळ्या अंगांनी अभ्यासकांनी केलेली ही फेरतपासणी टागोरांच्या साहित्यादी सर्जनाची समकालीनता अधोरेखित करणारी आहे. यातून एकच एक स्पष्ट चित्र उभे राहणे अर्थातच अभिप्रेत नाही. यातून दिसणारे चित्र गुंतागुंतीचे, काहीसे विरोधाभासात्मक असले तरी टागोरांसारख्या लोकोत्तर साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वाकडे पाहण्याची वेगळी, अधिक स्पष्ट दृष्टी देणारे आहे.

पुस्तकाला ढाका विद्यापीठातील प्रा. फक्रुल आलम यांची छोटी पण नेमकी प्रस्तावना आहे. टागोरांचे तत्कालीन भारतातील स्त्री-प्रश्नाविषयीचे भान प्रा. आलम यांनाही गुंतागुंतीचे, काहीसे विरोधाभासी वाटते. याबाबतीतले टागोरांचे पूर्वग्रह (वसाहतवादी?) आणि व्यक्तिगत आयुष्यात कसोटीच्या क्षणीचे (जसे मुलींची अल्पवयात लग्ने, इ.) त्यांच्या वर्तनाचा ते उल्लेख करतात. तेव्हा नकळत आपल्याकडे त्याच सुमारास न्या. रानडेंना लहान मुलीशी करावे लागलेले दुसरे लग्न, त्या वेळचा लोकापवाद, त्यांना झालेला मनस्ताप आठवतो. असे असले तरी टागोरांच्या सर्व सर्जनातून उमटलेले स्त्रीचे चित्र हे पारंपरिकतेतून येणाऱ्या साचलेपणाच्या हळूहळू पण ठामपणे विरोधात जाणारे, स्त्रीला स्वातंत्र्य आणि आत्मभानाकडे नेणारे आहे, असेही ते म्हणतात.

चंद्रावा चक्रवर्ती आणि स्नेहा कर-चौधरी यांची संपादकीय प्रस्तावना पुस्तकांची गरज स्पष्ट करतानाच पुढील लेखांत फारसा उल्लेख न झालेला रवींद्रनाथांचा ‘वुमन’ (पर्सनॅलिटी लेक्चर्स डिलिव्हर्ड इन अमेरिका, १९२१) हा निबंध चर्चेस घेते. तिथे रवींद्रनाथ मुक्त स्त्रीची भारतीय संकल्पना पाश्चात्त्य स्त्रीमुक्तीच्या संदर्भात मांडतात. भारतीय संस्कृतीतला स्त्रीविषयक पूज्यभाव आणि कुटुंबातील ब्राह्मो समाजाचा प्रभाव असणारे तुलनेतले सुधारकी वातावरण यांची सांगड घालताना टागोरांचा वैचारिक गोंधळ जाणवतो, असे संपादकांना वाटते. यात रवींद्रनाथ भारतीय स्त्रीचे दोन भाग कल्पितात. एक- ‘आई’ आणि दुसरी- ‘प्रिया’. पाश्चात्त्य संस्कृतीतले मोकळेपण आणि भारतीय संस्कृतीतली प्रगल्भता (?) यांची सांगड घालताना ते भारतीय स्त्रीच्या प्रेमाला तिच्या आध्यात्मिक भक्तीच्या प्रकटीकरणाचे रूप देतात. पहिल्या महायुद्धाच्या या काळातली पाश्चात्त्य आक्रमकता आणि शांतता चिंतणारा भारत यांच्यात सांस्कृतिक साकव निर्माण करण्याची गरज त्यांना भासते.

प्रत्यक्षात हे अमेरिकेच्या १९१६-१७ च्या दौऱ्यात दिलेले व्याख्यान आहे. नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतरच्या प्रसिद्धीचा फायदा घेत मुख्यत्वे शांतिनिकेतनसाठी निधीसंकलन करण्याच्या हेतूने ते तिथे गेले होते. त्यात त्यांचा प्रयत्न श्रोतृवर्गाशी- जो बहुतांश सधन आहे- जमवून घेण्याचा असणे काही अंशी साहजिक होते. परदेशात बोलताना आपली भूमिका न सोडताही श्रोत्यांची मानसिकता लक्षात घेऊन ती काहीशी लवचीक करण्याची कसरत नंतरही दीर्घकाळ त्यांना करावी लागली. (रवींद्रनाथ परदेशात असताना गैरव्यवस्थापनामुळे शांतिनिकेतनचे परदेशी मदतीवरचे अवलंबित्व वाढत गेल्याने) त्यामुळे अशा भाषणांमधल्या उद्धृतांवरून त्यांची भूमिका ठरवणे, त्यातून काही ढोबळ निष्कर्ष काढणे कितपत न्याय्य होईल, असे वाटून गेले.

त्यांच्या मुलींचे लहान वयात झालेले लग्न यालाही संपादक जोडी धक्कादायक विरोधाभास म्हणते. रेणुका आणि मीरा यांची लग्ने ११व्या तर माधुरीचे लग्न १४व्या वर्षी झाले. मुलींना शिकवण्यात, जीवनात आदर्शाकडे वळवण्यात त्यांनी कसूर केली नाही. मग लहान वयातच त्यांना लग्नबंधनात का अडकवले? आपल्या लेखनातून सामाजिक कुप्रथांवर ज्यांनी आसूड ओढले ते हेच रवींद्रनाथ आहेत काय, असा उपरोधी प्रश्नही येतो. पण पुढे कदाचित हुंडा वा लग्नाचा मोठा खर्च महर्षीच्या जमीनदारीतून व्हावा यासाठी त्यांच्या हयातीतच मुलींच्या लग्नाची गडबड केली असावी, असे काहीसे स्पष्टीकरणही येते. टागोरांनी मुलींच्या लग्नात हुंडा दिला होता का, असल्यास किती याची तपासणी पुढे येत नाही हे त्यांचे नशीब! मुळात अलौकिक प्रतिभावंत इतक्या काळानंतर जोखायचे कशावर, त्यांचे समोर असलेले सर्जनाविष्कार का वैयक्तिक आयुष्यात दिसलेले त्यांचे मातीचे पाय? दोन्हींची सांगड दोन अधिक दोन बरोबर पाच इतक्या थेटपणे घालता येते का? समकालीनता कशाची असते? पुस्तकातल्या सर्वच लेखांमधून असे तपशील येतात.

यशोधरा बागची यांचा लेख, जो या चर्चासत्राचा बीजलेखही आहे, हा या पुस्तकातला सर्वोत्तम लेख म्हणता येईल. विषयातील काही ठोस निष्कर्ष काढण्यातल्या मर्यादा त्या अधोरेखित करतात. रवींद्रनाथांच्या स्त्रियांमधील सर्जक गुंतवणुकीचे थेट साधारणीकरण अवघड आहे हे सांगताना यातला महत्त्वाचा प्रश्न त्या उपस्थित करतात. स्त्रियांमधील गुंतागुंतीचे संबंध दाखवताना आपल्याला कोणते रवींद्रनाथ अभिप्रेत आहेत? (त्यांचे केवळ सर्जन लक्षात घेतले तरी) कवी? लघू-दीर्घ कथात्म गद्य लिहिणारे? नट-नाटककार? ज्यांनी संगीताची वैष्णव परंपरा आणि पाश्चात्त्य रोमँटिसिझमचा मेळ घातला अशी गीते लिहिणारे- ती सादर करणारे? सामाजिक विचारवंत? नव्या विचारांच्या शिक्षणाचा पाया ज्यातून घातला त्या शांतिनिकेतनचे संस्थापक? नात्याबाहेरील स्त्रियांना पत्रे लिहिणारे? ज्यांच्या भविष्यवेधी चित्रांनी आम्हाला आमच्या काळाजवळ आणले ते चित्रकार? यातल्या बहुतांश पैलूंवरील संशोधनात्मक असे या बीजलेखाव्यतिरिक्त १५ लेख या पुस्तकात आहेत. तरी एकूण रवींद्रनाथांच्या प्रचंड सर्जनाचा स्रोत हुडकणे अवघड आहे, असे बागची म्हणतात ते खरेच आहे.

आपल्या आयुष्यातील स्त्रियांचे प्रामुख्य सांगताना रवींद्रनाथ म्हणतात, ‘स्त्रियांबद्दल माझ्या मनात खोल आदराची भावना आहे. माझ्या सर्व सर्जक आणि सौंदर्यशील प्रेरणा अशा स्त्रियांकडून आलेल्या आहेत, ज्यांनी माझे संगोपन करीत मला आयुष्य दिले. मी त्याबद्दल त्यांचा कायमचा ऋ णाईत आहे.’ (‘प्राच्य नरीर साधना’ या निबंधातून) त्यांच्या लेखनातील स्त्री पात्रांचे प्रामुख्य, त्यांच्या मानसिकतेला हळुवारपणे समजून घेणे, याला समांतर दंतकथा व्हाव्यात इतक्या संख्येने वैयक्तिक आयुष्यात आलेल्या स्त्रिया- रवींद्रनाथांच्या मोठय़ा भावांची लग्ने झाली तेव्हा ते सहा आणि दहा वर्षांचे होते. भावजयी त्यांच्यापेक्षा मोठय़ा असल्या तरी खेळकर वयातल्याच. भाऊ जमीनदारी बघत, त्यामुळे जोरासंकीमधल्या अंदरमहलमध्ये काहीशा एकाकीही. त्या अनघड वयात त्यांच्याशी जुळलेले भावबंध, पुढे यौवनाच्या उंबरठय़ावर लंडनला जाण्याआधी मुंबई मुक्कामात अंगावर आलेले अ‍ॅना तर्खड नावाचे वादळ.. पुढे यश आणि कीर्तीच्या शिखरावर प्रत्येक परदेशमुक्कामी मिळालेल्या जिवाभावाच्या मैत्रिणी, तिथूनही ते ज्यांच्याशी दीर्घ पत्रसंवाद करत त्या बंगालमधील सधन आणि सुशिक्षित वर्गातील स्त्रिया.. असा आयुष्यभराचा सखी सहवास. हे सगळे उघड होते. त्यांचा हा पत्रव्यवहार तिथल्या नियतकालिकांत प्रकाशित होई. त्यामुळे वसाहतवादी आधुनिकतेच्या काळातही सनातनी मानसिकता शाबूत असलेल्या समाजात चर्चाची वादळं उठली नसती तरच नवल! या पुस्तकात ज्याचा बहुतांश लेखांत उल्लेख होतो त्या विरोधाभासाची मुळं असलीच तर ती त्यांच्या जोरोसंको ठाकूरबारी इथल्या घरातच असू शकतील.

रवींद्रांचे आजोबा द्वारकानाथ हे बंगालमधल्या आधुनिकांच्या पहिल्या पिढीतले. व्यवसायानिमित्ताने पाश्चिमात्य आधुनिकतेशी त्यांचा परिचय झाला. मनावरचे सनातनी ओझे पुरते नाही तरी काहीसे उतरले. पण हा थोडासा बदलही पत्नी दिगंबरीदेवींनी स्वीकारला नाही. यासंदर्भात काही चर्चा झाल्यादिवशी त्यांनी गंगास्नान केले. पुढे कर्तव्यात कसूर केली नाही तरी पतीशी संबंध ठेवले नाहीत. त्यांचे पुत्र (रवींद्रांचे वडील) देवेंद्र ब्राह्मो समाजाच्या संस्थापकांपैकी. घरातल्या स्त्रिया, मुलींनी शिकावे असा प्रयत्न त्यांनी केला तरी घरातील स्त्री-पुरुषांसाठी वेगळी व्यवस्था (अंदरमहल, बाहरमहल) कायम ठेवली. पुढे रवींद्रांचे आयसीएस झालेले मोठे बंधू सत्येंद्रनाथ यांनी आधुनिकतेचा हा संस्कार पुढे नेत मधल्या भिंती काढल्या. पत्नी ज्ञानदानंदिनीला शिक्षणाबरोबर पाश्चिमात्य आधुनिकतेचे धडे दिले. दुसरे बंधू ज्योतिंद्रनाथ यांनी हे लोण आणखी पुढे नेत पत्नी कादंबरीदेवींना घेऊन नाटके, प्रहसने, संगीतिका सादर केल्या. अरेबियन घोडय़ावरून सवारी करणाऱ्या कादंबरीदेवींच्या रूपात लहान वयातच रवींद्रांनी मुक्त स्त्री पाहिली. रवींद्रनाथांच्या पत्नी मृणालिनीदेवी यांनी संस्कृत आणि इंग्रजी असे दोन्ही शिक्षण घेतले तरी त्यांची भूमिका बहुतांश सर्व तडजोडी करत संसार सांभाळणाऱ्या पत्नीचीच राहिली. आधुनिकता, सर्जनशीलता आणि आचार-विचारांतला काहीसा विरोधाभास यांची मुळे अशी बरीचशी घरातच असावीत.

‘रवींद्र संगीतातील लिंगभाव’ या देबशिष रायचौधरी यांच्या लेखात रवींद्र संगीतातील स्त्री-प्रतिमेची चिकित्सा येते. अगदी कोवळ्या वयापासून जवळपास सहा-सात दशकांत २२०० हून अधिक गाणी त्यांनी लिहिली. त्यात पुरुषी-मर्दानी, एक काहीसा तटस्थ आणि यात सगळ्यात मोठा आणि अधिक नेमका स्वर स्त्रीचा आहे, असे नोंदवत लेखक त्याची कारणे रवींद्रांना असलेल्या तत्कालीन पारंपरिक वैष्णव पदावल्यांच्या आकर्षणात शोधतात. त्यातल्या राधेचा, तिच्या सख्यांचा हा प्रभाव आहे असे सुचवतात.

र्तीथकर बोस यांच्या निबंधाचे शीर्षक आहे- ‘स्त्रीस कसे फसवावे? अर्थात् टागोरांच्या फूस लावण्याच्या कथा’. लिंगभाव कळायला लागला तेव्हापासूनच स्त्री-पुरुष एकमेकांवर कुरघोडीचा खेळ खेळत आले आहेत. या चकमकींमधल्या प्रेम नावाच्या नात्यावर टागोर कसे व्यक्त झाले हे तपासताना बोस ‘घरे बाईरे’ (१९१६) आणि ‘सेशेर कविता’ (१९२९) या दोन कादंबऱ्या चर्चेला घेतात. पहिलीत त्यांना शोषणकारी दुटप्पीपणा दिसतो तर दुसरीला ते प्रेरक लबाडी-फसवणुकीचे उदाहरण ठरवतात. प्रेमाच्या भावनिक व्यवहारात नैतिक बुद्धी लोभावर मात करते, हे सांगायला टागोर कधीच विसरत नाहीत. पण लबाडी हेही केव्हा केव्हा प्रेमाचे हत्यार होते हेही त्यांना माहीत होते, असे निरीक्षण बोस नोंदवतात.

‘ब्रेकिंग द मोल्ड’ हा तपती गुप्ता यांचा लेख रवींद्रनाथांच्या उतारवयातल्या चित्रकलेतल्या मुशाफिरीबद्दल बोलतो. १९२७-२८ पासून शेवटपर्यंत त्यांनी २५०० हून अधिक चित्रे काढली. त्यात त्यांनी तत्कालीन साच्यांची पूर्णत: मोडतोड केली. हे करताना युरोपच्या ‘एक्स्प्रेशनझिम’बरोबरच प्राचीन जपानी चित्रकलेचाही प्रभाव त्यांच्यावर होता. त्यांनी रंगवलेली स्त्रियांची चित्रे इतकी गूढ का आहेत, याची चर्चा करताना टागोरांचे स्त्रीमधील सुप्तावस्थेतील मानसिक, शारीरिक ऊर्जेचे चित्रण काळाच्या किती तरी पुढे आहे, असे मत गुप्ता नोंदवतात. पण हे चित्रण रवींद्रनाथ वास्तववादी अंगाने करत नाहीत, त्यासाठी ते स्त्रीच्या नेणिवेत प्रवेश करतात. रवींद्रांचाच एक उद्गार यासाठी त्यांनी दिलाय तो असा –

‘शेवटी आज काळाने त्याचा सांगावा स्त्रीकडे पाठवला आहे. मानवतेच्या जगातील आध्यात्मिक श्रेष्ठत्वाचे पुनरुज्जीवन व्हावे यासाठी स्त्रीने कोशातून बाहेर यावे. स्त्रीत्व हे मुख्यत्वे सजावटीत नाही. मुख्यत: आरोग्यही केवळ सौंदर्याच्या मोहोरातून येत नाही, तर मनाचा आनंद आणि आयुष्याच्या परिपूर्णतेतून येते.’

कुठंही थेट विद्रोहाची भाषा न करताही रवींद्रनाथ स्त्रीवास्तवाचं नेमकं भान देतात, हे महत्त्वाचे वाटते. हे पुस्तक वाचताना मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. आपले भान विस्तारते आहे याची जाणीव होते. हे विस्तारणे रवींद्रनाथ टागोरांसारखा लोकोत्तर प्रतिभावंत आणि त्याचे विविधरंगी सर्जन यासंदर्भात आहे, तसेच ते स्त्रीविषयक जाणिवेसंदर्भातही आहे.

‘टागोर्स आयडियाज् ऑफ द न्यू वुमन – द मेकिंग अ‍ॅण्ड अनमेकिंग ऑफ फीमेल सब्जेक्टिव्हिटी’

संपादक : चंद्रावा चक्रवर्ती/ स्नेहा कर-चौधरी

 प्रकाशक : सेज पब्लिकेशन

 पृष्ठे : २७६, किंमत : ८५० रुपये.

नितीन वैद्य vaidyaneeteen@gmail.com