महाराष्ट्रातल्या सत्तांतराबद्दल तिघा पत्रकारांनी तीन पुस्तकं लिहून झालेली असताना आणखीही काही ‘पडद्याआडच्या गोष्टी’ सांगायच्या राहिल्या आहेत, असा दावा करणारं चौथं पुस्तक येतं आहे. हे पुस्तक लिहिणाऱ्या प्रियम गांधी-मोदी या रूढार्थानं ‘पत्रकार’ नाहीत. मग त्या कोण आहेत?

‘राजकीय लेखक आणि सल्लागार’ अशी स्वत:ची दुहेरी ओळख प्रियम गांधी-मोदी यांनी ‘लिंक्डइन’ या प्रतिष्ठित संकेतस्थळावरील त्यांच्या खात्याच्या प्रारंभीच सांगितली आहे. या आगामी पुस्तकामुळे, तसंच त्याआधी नारायण राणे जेव्हा भाजपमध्ये येणार होते आणि आपली बाजू मांडणारं पुस्तक त्यांना लिहायचं होतं, त्याचंही लेखन प्रियम गांधी-मोदी यांनीच केल्यामुळे त्या ‘राजकीय लेखक’ आहेत हे तर उघडच आहे. पण सल्लागार? – याची उत्तरं तीन. एक म्हणजे २०१४ पासून ‘मीडिया मास्टर्स अ‍ॅडव्हायजर्स’ या कंपनीच्या त्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ही कंपनी ‘ब्रॅण्ड घडविणे’, ‘मार्केटिंग’ आणि ‘व्यूहात्मक संज्ञापन’ (स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन) यांची विशेषज्ञ असल्याचंही ‘लिंक्डइन’ सांगतं. आता पुस्तकाबद्दल.

‘ट्रेडिंग पॉवर’ हे या पुस्तकाचं नाव. यातलं ‘ट्रेडिंग’ कोणी केलं, हे अर्थात पुस्तकातूनच कळेल. अजित पवार यांचा शपथविधी होणार याची माहिती शरद पवार यांना असल्याचा (आधीच्या तीनपैकी एका पुस्तकानं केलेला) दावा याही पुस्तकात आहे. पण या इंग्रजी पुस्तकाचे जे भाग काही मराठी चित्रवाणी वाहिन्यांच्या संकेतस्थळांवर मराठीत प्रकाशित झालेले आहेत, त्यात अजित पवार यांनी स्वत:ला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची काही नावं देवेंद्र फडणविसांना सांगितली आणि मग ‘आणि आणखी १३’ असं अजित पवार म्हणाले, असाही भाग येतो. हा भाग इतका संवादमय आहे की, प्रत्यक्ष हे संवाद जिथं घडले तिथंच ते ध्वनिमुद्रित करून, लेखिकेनं फक्त मुळाबरहुकूम उतरवून काढलेले असावेत असा भास वाचकाला होऊ शकेल!

हे पुस्तक आणि ‘मीडिया मास्टर्स अ‍ॅडव्हायजर्स’ ही लेखिकेनं स्थापलेली कंपनी यांचा काही म्हणता काहीही संबंधच नाही, हे इथंच स्पष्टपणे नमूद करायला हवं. मात्र ‘बुकमार्क’च्या अनेक वाचकांना काही साहित्यिक सत्यं आधीपासूनच माहीत असतील.. उदाहरणार्थ, लेखकांच्या व्यक्तिमत्त्वाचा संबंध फक्त लेखनशैलीशी नसतो, तर लिखाणाच्या हेतूशीही असतो!