आसिफ बागवान

अनवट विषय-आशयाच्या कलाकृतींमुळे ‘नेटफ्लिक्स’ हे नवमाध्यम फलाट आता सर्वत्र परिचयाचे झाले आहे. नेटफ्लिक्सने आखून दिलेली वाट मळवणाऱ्या इतरही अनेक माध्यमकंपन्या आल्या, यशस्वी झाल्या. पण नेटफ्लिक्सची कल्पना नक्की कशी अस्तित्वात आली, हे सांगत तिचा प्रवास रेखाटणाऱ्या पुस्तकाची ही ओळख..

एखाद्या वस्तूची निर्मिती कथा किंवा एखाद्या गोष्टीच्या शोधाची कहाणी प्रेरक असतेच; पण तिच्यात संशोधनासारखा रुक्षपणा नसतो. ते संशोधन आकारास येत असतानाच्या प्रवासातील चढ-उतार, संघर्षांचे प्रसंग त्या कहाणीला भावनिक ओलही प्राप्त करून देतात. ती कहाणी केवळ यशाचे गोडवेच गाते असे नाही; तर ते यश मिळण्याआधी आलेले अपयशाचे कडू डोस कसे पचवावेत, हेही त्या कहाणीतून सांगितले जाते. कोणताही नवा आविष्कार जन्माला येण्याच्या आधी एक संकल्पना आकारास यावी लागते आणि विचारांचे बीज रोवल्याखेरीज संकल्पनेचा अंकुर उमलत नाही. ही विचार ते आविष्कारापर्यंतची साखळी उलगडलेली पाहणे खूपच उत्कंठावर्धक असते. याखेरीज एखादा गौप्यस्फोट, वादावरचा खुलासा, वादग्रस्त विधान, प्रांजळ कबुली यांसारख्या गोष्टी या शोधकथेला अधिक वाचकप्रिय बनवत असतात. ‘नेटफ्लिक्स’चे संस्थापक सीईओ मार्क रॅण्डॉल्फ यांचे ‘दॅट विल नेव्हर वर्क : द बर्थ ऑफ नेटफ्लिक्स अ‍ॅण्ड द अमेझिंग लाइफ ऑफ अ‍ॅन आयडिया’ हे पुस्तक वरीलपैकी काही गोष्टींची नक्कीच पूर्तता करते.

मार्क रॅण्डॉल्फ यांचे हे पुस्तक म्हणजे ‘नेटफ्लिक्स’ची जन्मकथा आहे. नेटफ्लिक्स हे काय आहे, हे माहीत नाही अशी व्यक्ती सापडणे कठीणच. पण ज्यांना त्याबद्दल फारशी माहिती नाही, त्यांनाही सध्याच्या ‘टाळेबंदी’च्या काळात नेटफ्लिक्स या नवमाध्यम फलाटावरील  मनोरंजन विश्व उलगडले असेलच. जगभरात जवळपास १७ कोटी सशुल्क सदस्य असलेल्या या ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’चा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. अगदी भारतातही महिन्याला पाचशे ते एक हजार रुपये इतके शुल्क मोजून नेटफ्लिक्सची सेवा घेणाऱ्यांची संख्या २० लाखांच्या आसपास आहे. ‘सॅक्रेड गेम्स’पासून ‘लस्ट स्टोरीज्’पर्यंत आणि ‘आयरिश मॅन’पासून ‘स्ट्रेंजर थिंग्ज’पर्यंतच्या वेब मालिकांचा लोकप्रिय ‘कण्टेंट’ माध्यमविश्वात आणणारी नेटफ्लिक्स ही ऑनलाइन स्ट्रिमिंग सेवा पुरवणारी सर्वात मोठी कंपनी आहे. एवढेच नव्हे, तर या कंपनीचे बिझनेस मॉडेल अर्थात व्यवसायतंत्र आत्मसात करून अनेक ओटीटी सेवा सुरू  झाल्या, सफलही झाल्या. पण मुळात नेटफ्लिक्स हे किती वेळा असफल झाले, हे जाणून घ्यायचे असेल तर मार्क रॅण्डॉल्फ यांचे हे पुस्तक वाचायलाच हवे.

‘नेटफ्लिक्स’ हा विचारच मुळी एका वेगळ्या संकल्पनेचे फलित होता. रॅण्डॉल्फ यांच्याच शब्दांत सांगायचे तर – ‘१९९७ मध्ये जर मला कुणी विचारलं असतं की काय चालेल किंवा काय चालणार नाही, तर मला त्याचं उत्तर देता आलं नसतं. कारण मला स्वत:ची एक कंपनी काढायची होती आणि मला इंटरनेटवरून काही तरी विकायचं होतं..’ रॅण्डॉल्फ यांच्या डोक्यात तेव्हा ई-कॉमर्सची कल्पना घोळत होती. शॅम्पू किंवा श्वानांचे खाद्यान्न असे काही तरी विकण्याच्या योजना आखत असतानाच रॅण्डॉल्फ यांना चित्रपटांच्या डीव्हीडी ऑनलाइन भाडय़ाने देण्याची कल्पना सुचली. ती त्यांनी गुंतवणूकदार रीड हॅस्टिंगला सांगितली. त्या काळात डीव्हीडी अमेरिकेच्या बाजारात रुजू लागली होती. ‘अ‍ॅमेझॉन’च्या ऑनलाइन पुस्तकविक्रीप्रमाणे आपणही डीव्हीडी भाडय़ाने देण्याचा ऑनलाइन व्यवसाय सुरू करू, या विचाराने या द्वयीने हालचाली सुरू केल्या. खरे तर त्या काळी घरी डीव्हीडी प्लेअर असणाऱ्या कुटुंबांची संख्या तशी कमीच होती. त्यातच ‘ब्लॉकबस्टर व्हिडीओज्’ या अमेरिकेतच नव्हे, तर जगभरात व्हिडीओ कॅसेट भाडय़ाने देणाऱ्या दुकानांचे जाळे असलेल्या कंपनीशी त्यांची गाठ होती. अशा वेळी ही कल्पना ‘चालणार नाही’ असे सांगणाऱ्यांचीच संख्या जास्त होती. पण रॅण्डॉल्फ आणि हॅस्टिंग यांनी आपली कल्पना तिथेच सोडून दिली नाही. डीव्हीडी भाडय़ाने देणारी कंपनी ते ऑनलाइन सदस्यत्व देणारी कंपनी ते ऑनलाइन स्ट्रिमिंग सेवा पुरवणारी कंपनी इथपर्यंतच्या नेटफ्लिक्सच्या प्रवासाची सुरुवात अशाच ‘दॅट विल नेव्हर वर्क’ या नकारात्मक भूमिकेतून झाली होती. तो प्रवास आज ज्या टप्प्यावर येऊन उभा ठाकला आहे, ते पाहता त्यावेळी अवतीभोवतीच्या व्यक्तींचा नकारात्मक दृष्टिकोन बाजूला ठेवून रॅण्डॉल्फ आणि हॅस्टिंग यांनी ही कंपनी कशी उभी केली, हे जाणून घेणे रोचक आहे.

नेटफ्लिक्सची निर्मिती म्हणजे एका कल्पनेचा जीवनप्रवास आहे, असे रॅण्डॉल्फ म्हणतात. एखादी कल्पना जेव्हा स्वप्नवत यश मिळवते, तेव्हा तिच्या मूळ विचारात, उद्देशात अनेक बदल होतात. अनेकदा यशाची पायरी गाठण्याच्या प्रयत्नात ती कंपनी भरकटण्याची भीतीही असते. नेटफ्लिक्सच्या वाटचालीतही असे प्रसंग अनेकदा आले. अ‍ॅमेझॉनकडून कंपनी ताब्यात घेण्यासाठी झालेले प्रयत्न, ब्लॉकबस्टरचा वर्चस्वाचा प्रयत्न किंवा खुद्द रॅण्डॉल्फ यांची पदावनती अशा अनेक घटना या पुस्तकात तपशीलवार वाचायला मिळतात. नेटफ्लिक्सच्या रडतखडत सुरुवातीनंतर दोन वर्षांतच हॅस्टिंगचा रॅण्डॉल्फ यांच्यावरचा विश्वास डळमळीत होऊ लागला आणि त्याने थेट रॅण्डॉल्फना सीईओ पदावरून पायउतार होण्यास सांगितले. त्यावेळच्या परिस्थितीचे रॅण्डॉल्फ यांनी अतिशय प्रांजळपणे विश्लेषण केले आहे. आपली शक्तिस्थळे आणि कच्चे दुवे या दोन्हींचा विचार करून आपण हॅस्टिंगच्या निर्णयाला राजी झालो, असे सांगतानाच रॅण्डॉल्फ म्हणतात, ‘कर्मठ प्रामाणिकपणा थोरच असतो. पण आपण त्याच्या केंद्रस्थानी नसतो तोपर्यंतच!’

२००२ मध्ये रॅण्डाल्फ यांनी नेटफ्लिक्सचे अध्यक्षपद सोडले आणि नवी कारकीर्द सुरू केली. पदावनती होऊन कंपनीच्या बाहेर जाण्याची वेळ आल्यानंतर एखाद्याला त्या कंपनीबद्दल आकस वाटणे किंवा त्या व्यक्तींबद्दल मनात राग असणे स्वाभाविक आहे. पण रॅण्डॉल्फ यांच्या लेखनात तशी अढी किंचितच जाणवते. उलट नेटफ्लिक्समधील सुरुवातीच्या काळात कर्मचाऱ्यांना ढोरासारखे राबवून घेणाऱ्यांत आपणही होतो, याची ते प्रांजळ कबुलीही देतात.

मार्क रॅण्डॉल्फ यांचे हे पुस्तक म्हणजे केवळ नेटफ्लिक्सच्या प्रवासाची कहाणी नाही, तर कोणत्याही नवउद्यमीच्या मार्गात काय काय अडथळे येऊ शकतात, याविषयी हे पुस्तक मार्गदर्शकही ठरते. त्यामुळे नवउद्यमींनी हे पुस्तक आवर्जून वाचायलाच हवे. हे पुस्तक आपल्याला फार मोठे चढ-उतार दाखवत नाही, किंबहुना नेटफ्लिक्सच्या प्रवासात ते नसावेत. पण एक साधी, सरळ, तरीही नावीन्याचा ध्यास दाखवणारी शोधाची कथा म्हणून त्याकडे नक्कीच पाहता येईल.

asif.bagwan@expressindia.com