|| निखिलेश चित्रे

अर्जेन्टाइन कादंबरीकार रिकाडरे पिग्लियाची ‘द अ‍ॅब्सेन्ट सिटी’ ही कादंबरी एक वाचक म्हणून आणि नागरिक म्हणूनही इतिहास आणि साहित्य यांच्याशी असलेल्या आपल्या नात्यासमोर प्रश्नचिन्ह उभे करते..

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!
lokrang article, book review, Noaakhali manuskicha avirat ladha, novel, mahatma gandhi, last days, Ramesh Oza And Shyam Pakhare,
माणुसकीच्या अविरत लढ्याची गोष्ट

माणसांप्रमाणेच काही कादंबऱ्याही आत्मनाशी असतात. त्या आकारताना स्वत:चीच मोडतोड करत पुढे जातात; परंतु या प्रक्रियेतूनच कादंबरी या साहित्यप्रकाराच्या क्षमता विस्तारतात. समावेशकता वाढते. अशा कादंबऱ्या वाचकासाठी आव्हानात्मक असतात. त्यांचं वाचन सुखाचं असण्याची हमी नसते. उलट हे वाचन त्रासदायक होण्याचीच शक्यता अधिक. परंतु या प्रक्रियेतच वाचकाला समृद्ध करण्याची बीजं असतात.

अर्जेन्टाइन लेखक रिकाडरे पिग्लिया (Ricardo Piglia) याची ‘द अ‍ॅब्सेन्ट सिटी’ ही या प्रकारची कादंबरी! या कादंबरीत विविध साहित्यप्रकारांचा वापर केलेला दिसतो. कादंबरीतल्या अनेक कथासूत्रांपैकी एक मुख्य कथासूत्र रहस्यकथेचं आहे. त्यात एक पत्रकार ब्युनोस आयर्स शहरात घडणाऱ्या काही गूढ घटनांचा छडा लावण्याचा प्रयत्न करतोय. परंतु हे कथासूत्र रहस्यकथेचे घटक सामावून घेत त्यापलीकडे जातं. त्याचं उद्दिष्ट केवळ रहस्याची उकल एवढय़ापुरतं मर्यादित राहत नाही. तर कादंबरी हे शहराचं रूपक बनत जातं आणि शहर कादंबरीसारखं वाटायला लागतं. शहरामध्ये घडणारी अनेक आख्यानं एकमेकांना छेदणाऱ्या रस्त्यांप्रमाणे पुढे जात राहतात. ही सगळी कथानकं वेगवेगळ्या शैली आणि प्रकारांमधली आहेत. त्यांच्या एकमेकांना छेदत आणि मिसळत पुढे जाण्यातून कथानकातली उत्कंठा तर वाढतेच, शिवाय अन्वयाच्या अनेक शक्यता निर्माण होतात. एक बहुमुखी प्रसरणशील संहिता आकार घेते.

या कथानकांच्या जाळ्याच्या मध्यभागी ‘एलेना’ नामक स्त्री आहे. ती मासेदोनियो फेर्नान्देझ (Macedonio Fernandez) या विख्यात अर्जेन्टाइन लेखकाची बायको! असाध्य आजारपणात तिचा मृत्यू झाल्यानंतर फेर्नान्देझ तिच्या मेंदूमधल्या स्मृती संगणकात साठवून तिला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतो. कादंबरीतल्या रहस्यकथेला समांतर असं हे प्रेम आणि विज्ञानकथेचं दुसरं कथासूत्र! वर ज्या आख्यानांचा उल्लेख केला, ती याच स्मृतिपुंजातून निर्माण होतात.

हे सगळं ज्या शहरात घडतं, ते ब्युनोस आयर्स शहर पोलिसांच्या कडक पहाऱ्याखाली आहे. या तपशिलातून १९७६ ते १९८३ या काळात अर्जेन्टिनावर असलेल्या हुकूमशाही राजवटीची आठवण होते. परंतु तो संदर्भ तेवढय़ापुरता मर्यादित राहत नाही. त्यातून जगभरातल्या हुकूमशाही राजवटी आणि त्यांची दडपशाही आठवते. त्यातूनच कादंबरीचं आणखी एक आशयसूत्र लक्षात येतं. ते म्हणजे- वास्तवाची निर्मिती करून त्याचा अर्थ लावण्याची भाषेची क्षमता! सत्ताधिकाऱ्यांनी निर्माण केलेली इतिहासाची ‘अधिकृत’ आवृत्ती, संगणकाच्या स्मृतीतून निर्माण होऊन वास्तवात रूपांतरित झालेल्या कथा, माहितीच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवण्याची पोलिसांची धडपड, इतिहासाचं पुनर्लेखन करण्यासाठी वा इतरांना आपला इतिहास लिहिण्यापासून रोखण्यासाठी एकमेकांना गोष्टी सांगणारे नागरिक.. या सगळ्या धाग्यांचा पीळ घट्ट बसत जातो. त्यातून ‘द अ‍ॅब्सेन्ट सिटी’ ही कादंबरी वास्तवाच्या अधिकृत रूपाला आव्हान देते. एकाच संहितेची पुनर्निर्मिती, भाषांतर, अनुकरण आणि अन्वय यातून वास्तवाच्या आकलनासमोर प्रश्न उभे करते. त्यात आख्यान वा कथन ही राजकीय आणि कलात्मक प्रतिरोधाची भूमी बनते. कादंबरीच्या रचनेत सामावलेले रहस्यकथा, प्रेमकथा, विज्ञानकथा असे विविध साहित्यप्रकार एकमेकांना छेदत कादंबरीचं पारंपरिक रूप उद्ध्वस्त करत जातात. त्यातून पिग्लियाची लेखक म्हणून वैचारिक भूमिका लक्षात येते. त्याला विविध कथनघटकांना एकमेकांमध्ये मिसळण्यापेक्षा त्यांच्या खंडित रूपांना एकत्र आणून कादंबरीचा आकार घडवायचा आहे. यातला कोणताही एक घटक वा कथनप्रकार स्वतंत्रपणे कादंबरीचा पूर्ण अनुभव देऊ  शकत नाही. कारण प्रत्येकाची दिशा वेगळी आहे. तरीही त्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगितलेला किंवा सुचवलेला आशय एकच आहे.

उदाहरणार्थ, आपण ‘द अ‍ॅब्सेन्ट सिटी’ एक राजकीय कादंबरी म्हणून वाचू शकतो. कारण त्यात अर्जेन्टिनाच्या इतिहासातले ठोस राजकीय संदर्भ आहेत. परंतु त्याच वेळी या संहितेमधल्या पात्रांना जाणवणाऱ्या आभासांच्या मालिकांकडे दुर्लक्ष करता येत नाही. या आभासांमुळे ही पात्रं खरोखरच एखाद्या राजकीय कटाचे बळी आहेत, की हे सगळे त्यांच्या मनाचे खेळ आहेत, हे नक्की ठरवणं अशक्य होऊन बसतं.

‘आंतरजालावर आधारित विज्ञानकथा’ (Cyberpunk Science Fiction) हा या कादंबरीतला आखणी एक साहित्यप्रकार! एकमेकींमध्ये गुंतलेल्या कथांमधून पात्रं, कथानकं, घटना, संदर्भ यांचं आंतरजालासारखं गुंतागुंतीचं महाजाल निर्माण होतं. हे सगळं एका संगणकातल्या स्मृतिपुंजामधून निर्माण होत असल्यानं त्याचा आंतरजालाशी असलेला संबंध अधिकच स्पष्ट आहे. कथा निर्माण करणारा संगणक, नायक आणि त्याच्यासह वाचकानं घेतलेला भूत, भविष्य आणि वर्तमानाचा शोध; पोलीस तपास आणि पाठलाग यात होणारा संगणकीय बुद्धिमत्तेचा वापर; अमली पदार्थाच्या माध्यमातून चेतासंस्थेवर मिळवलेलं नियंत्रण- हे सगळं विज्ञानकथेतून वाचकाला परिचित झालेले घटक. मात्र, या कादंबरीतल्या घटनांचे आणि घटकांचे एकाहून जास्त संभाव्य अर्थ आहेत. जिवंत राहण्यासाठी नायिकेनं सांगितलेल्या एकमेकींमध्ये गुंतलेल्या गोष्टींच्या प्रवाहामुळे सहजच ‘अरेबियन नाइट्स’मधल्या शहरजादची आठवण होते. या कथा गोष्ट सांगण्याच्या प्राचीन परंपरेला स्पर्श करतात. गोष्ट सांगण्याच्या इच्छेवर अप्रत्यक्ष भाष्य करतात. हजारो वर्षांपासून माणसाच्या गुणसूत्रांमधून जागी असलेली गोष्ट सांगण्याची आणि ऐकण्याची ऊर्मी त्यातून व्यक्त होते. कथनाचा वास्तवाच्या आकलानाशी असलेला संबंधही जाणवतो.

या कादंबरीत अनेक अर्जेन्टाइन लेखक कधी पात्रांच्या रूपात तर कधी संदर्भाच्या निमित्तानं डोकावतात. पिग्लियाच्या इतर कथा-कादंबऱ्यांप्रमाणे ‘द अ‍ॅब्सेन्ट सिटी’मध्येही वाङ्मयीन वंशावळींचं पुनर्लेखन आणि रूढ वाङ्मयीन संकेतांची फेरतपासणी केलेली दिसते. एखादं राष्ट्र वाङ्मयीन वारशाचं जतन आणि संवर्धन कसं करतं, यावर त्याची सांस्कृतिक ओळख अवलंबून असते. आधीच्या पिढीतल्या लेखकांचा हा वारसा पुढच्या पिढीतल्या लेखकांना आयता मिळत असतो. मात्र होर्खे लुईस बोर्खेसनं म्हटल्याप्रमाणे, काही लेखक आपले पूर्वज घडवतात. आपल्या लेखनातून वाचकांची आधीच्या लेखकांकडे पाहण्याची दृष्टी बदलतात. म्हणजे, काफ्काचं लेखन वाचल्यानंतर आपल्याला त्याआधीच्या हेन्री जेम्स वा एडगर अ‍ॅलन पोसारख्या लेखकाचं लेखनही काही वेळा ‘काफ्काएस्क’ वाटायला लागतं.

अर्जेन्टिनाबाहेरच्या अनेक लेखकांचे आणि साहित्यकृतींचे संदर्भही ‘द अ‍ॅब्सेन्ट सिटी’मध्ये वेळोवेळी येतात. त्यात ‘अरेबियन नाइट्स’, रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन, फ्योदोर दस्तयेव्हस्की, दान्ते, विल्यम फॉकनर, जेम्स जॉईस ही त्यातली काही उदाहरणं.

वर उल्लेख केलेला मासेदोनियो फेर्नान्देझ हा अर्जेन्टाइन लेखक कादंबरीत महत्त्वाच्या पात्राच्या रूपात येतो. त्यानं १९०४ साली लिहायला सुरुवात केलेल्या ‘द म्युझियम ऑफ इटर्नाज् नॉव्हेल’ (The Museum of Eterna’s Novel) या कादंबरीचा आधुनिकोत्तर अर्जेन्टाइन कादंबरीकारांवर मोठा प्रभाव आहे. फेर्नान्देझ ही कादंबरी सुमारे ४५ वर्षे लिहीत होता. मात्र, त्याच्या हयातीत ती प्रकाशित झाली नाही. त्याचीच तशी इच्छा नव्हती. ती प्रकाशित व्हायला १९६७ साल उजाडावं लागलं.

फेर्नान्देझचं लेखन उपरोध आणि अनपेक्षित गोष्टींनी भरलेलं आहे. माणसाला जाणवणारा काळ निर्माण करण्यात भाषेचं महत्त्व अधोरेखित करणं, हा त्याच्या लेखनाचा गाभा. असं करताना तो रूढ वाङ्मयीन परंपरांचं आणि एकूणच लिखित रूपातल्या भाषिक कृतींचं फोलपण दाखवतो. त्याची ‘द म्युझियम ऑफ इटर्नाज् नॉव्हेल’ ही कादंबरी पन्नास प्रस्तावनांनी बनलेली आहे. ती एकाच वेळी कादंबरी आहे आणि कादंबरीविषयक सिद्धांतही!

परंतु प्रत्यक्षातला मासेदोनियो फेर्नान्देझ आणि कादंबरीतलं त्याच्या नावाचं पात्र यांची गल्लत करू नये. त्या दोघांमधला संबंध केवळ प्रत्यक्ष आणि पात्रं वा प्रतिकृतीपुरता मर्यादित नाही. त्याला अनेक कंगोरे आहेत. बऱ्याच मिती आहेत. त्यांचा संबंध गुंतागुंतीचा आणि सजग वाचकाला आव्हान देणारा आहे. फेर्नान्देझच्या कादंबरीतल्या प्रस्तावनांमधली पात्रं ‘द अ‍ॅब्सेन्ट सिटी’मधल्या संगणकानं निर्माण केलेल्या कथांमध्येही येतात. त्या कादंबरीत प्रस्तावनांचं रूपांतर कथानकांमध्ये होतं, तर इथे उपकथानकं त्यातून सुचवलेल्या बृहत् आख्यानाच्या प्रस्तावनेचं काम करतात.

वास्तव आणि कल्पिताच्या या बहुमुखी नात्याकडे होर्खे लुईस बोर्खेसनं आपल्या कथांद्वारे ठळकपणे लक्ष वेधलं. त्याच्या लेखनात निबंध आणि कथा, समीक्षा आणि कल्पित साहित्य यातल्या सीमा अस्पष्ट असतात. काल्पनिक पुस्तकाच्या गंभीर परीक्षणाची कथा होते वा कथेतून केलेल्या समीक्षेचं आख्यानात रूपांतर होतं. पिग्लियानं केलेला या तंत्राचा सजग पुनर्वापर हा त्याने बोर्खेसशी केलेला संहितात्मक संवाद आहे. बोर्खेसच्या अनेक कथांमध्ये काल्पनिक लेखक-पात्रानं लिहिलेल्या साहित्यकृतींची परीक्षणं असतात. त्या लेखक-पात्राचं संपूर्ण विश्व बोर्खेस कल्पनेनं रचतो. उदा. त्याच्या ‘सव्‍‌र्हे ऑफ द वर्क्‍स ऑफ हर्बर्ट क्वेन’ या कथेत हर्बर्ट क्वेन या काल्पनिक लेखकाचं पात्र निर्माण करून बोर्खेसनं त्याच्या कल्पित साहित्याच्या तपशीलवार परीक्षणाचं आख्यान रचलेलं आहे. पिग्लियानं या तंत्राचा वापर करताना खऱ्या लेखकाला कादंबरीत पात्र बनवलं आणि त्याच्याकडून प्रत्यक्षात त्यानं न लिहिलेल्या साहित्यकृती लिहून घेतल्या. हा बोर्खेसच्या वाङ्मयीन भूमिकेशी साधलेला संवादच आहे. ‘द अ‍ॅब्सेन्ट सिटी’मधलं मासेदोनियो फेर्नान्देझचं पात्र या प्रकारचं आहे. परंतु याचा अर्थ ते पात्र केवळ गंमत म्हणून वापरलेलं आहे असा नाही. मासेदोनियो फेर्नान्देझच्या अराजकवादी वाङ्मयीन भूमिकेचा वापर लेखकानं व्यक्तीच्या आयुष्यावर वचक ठेवू पाहणाऱ्या राजकीय दडपशाहीविरुद्ध प्रतिरोधाचं साधन म्हणून केला आहे. या पाश्र्वभूमीवर व्यक्तीचं अस्तित्व पूर्णपणे भाषेवर अवलंबून आहे, असं मासेदोनियो फेर्नान्देझ मानतो. म्हणूनच त्याचं अस्तित्व अस्थिर आणि इतरांनी केलेल्या त्याच्या वर्णनात न बसणारं आहे. मासेदोनियो फेर्नान्देझच्या पात्राच्या विरुद्ध लिओपोल्दो लुगोनेस (Leopoldo Lugones) या दुसऱ्या लेखकाचं पात्र येतं. लुगोनेस सहजच दमनकारी राज्यव्यवस्थेचा भाग बनतो. त्याचा वापर करून राज्यव्यवस्था इतरांचं व्यक्तिस्वातंत्र्य ताब्यात ठेवते. त्यामुळे लुगोनेस अराजकाची वाट अडवणाऱ्या व्यवस्थाशरण अशा नेमस्त कलावंताचं प्रतीक बनतो, तर फेर्नान्देझ अराजकवादी बंडखोर कलावंताचं!

‘द अ‍ॅब्सेन्ट सिटी’मध्ये आणखी एका खऱ्या लेखकाचं रूपांतर पिग्लियानं पात्रामध्ये केलेलं आहे. तो म्हणजे- जेम्स जॉईस! जॉईस प्रत्यक्षात होता तसाच बंडखोर लेखक म्हणून कादंबरीत वावरतो. जॉईसची ‘फिनिगन्स वेक’ आणि पिग्लियाची ‘द अ‍ॅब्सेन्ट सिटी’ यांत काही समांतर दुवे सापडतात. ‘फिनिगन्स वेक’मध्ये जॉईसनं भाषेच्या अनेक प्रकारांना एकमेकांमध्ये मिसळून त्यांच्यातले व्याकरणोक्त भेद नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यातून शेवटी एक सर्वसमावेशक भाषा निर्माण करण्याचा त्याचा उद्देश होता. ‘द अ‍ॅब्सेन्ट सिटी’मध्ये एका बिंदूवर विविध आख्यानांच्या रेषा एकत्र येतात, मिसळून जातात. त्यातून कादंबरीतल्या विविध स्त्री-पात्रांचं मिळून एकच पात्र बनतं.

कादंबरीत अनेक ठिकाणी अशा अनपेक्षित एकीकरणातून चकित करणाऱ्या गोष्टी निर्माण होतात. ही कादंबरी सतत स्वत:ला मोडत, पुन्हा नव्याने रचत जाते. त्यातून अनेक वाङ्मयीन आणि राजकीय दुष्प्रवृत्ती उघड होतात. हे एरवी पारंपरिक निवेदनाद्वारे साधणं अशक्य होतं.

पिग्लियाचं निवेदनतंत्र नागरिक आणि वाचक म्हणून इतिहास आणि साहित्याशी असलेल्या आपल्या नात्यासमोर प्रश्न उभं करतं. त्यातल्या उणिवांचं, दोषांचं रूप दाखवतं. ‘द अ‍ॅब्सेन्ट सिटी’ आपल्याला एका भयावह सांस्कृतिक रिक्ततेचं दर्शन घडवते. त्या रिक्ततेचं स्वरूप आकळण्यासाठी तिला शांतपणे सामोरं जाणं ही वाचकाची जबाबदारी असते.

  • ‘द अ‍ॅब्सेन्ट सिटी’
  • लेखक : रिकाडरे पिग्लिया
  • इंग्रजी अनुवाद : सर्जिओ वाइजमन
  • प्रकाशक : डय़ूक युनिव्हर्सिटी प्रेस
  • पृष्ठे : १६०, किंमत : सुमारे १,५०० रुपये

satantangobela@gmail.com