निखिल बेल्लारीकर – nikhil.bellarykar@gmail.com

‘मुघल बादशहाला अंकित करणे हेच ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील सत्तेचे परिणत स्वरूप’ हे तथ्य मांडू पाहणारे इतिहासकार विल्यम डॅलरिम्पल यांचे हे नवे पुस्तक ईस्ट इंडिया कंपनीचा भारतात शिरकाव आणि विस्तार कसा झाला, याची रोचक कहाणी सांगते..

israel iran war history
Iran-Israel War: एकेकाळी मित्र असणारे दोन देश एकमेकांचे कट्टर शत्रू कसे झाले?
Israel use of AI in war revealed in reports by Israeli and Palestinian journalists
इस्रायलकडून युद्धात ‘एआय’चा वापर? इस्रायली आणि पॅलेस्टिनी पत्रकारांच्या अहवालात खुलासा
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ
Five Chinese nationals and their Pakistani driver were killed
पाकिस्तानात चीनच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले सुरूच; आत्मघातकी हल्ल्यात पाच चिनी अभियंते ठार

चिमूटभर इंग्रजांनी यथावकाश अख्खा भारत काबीज केल्याची कथा भारतात शालेय इतिहासामुळे ढोबळमानाने परिचित असते. मात्र २०१५ साली ऑक्स्फर्ड विद्यापीठात ख्यातनाम लेखक आणि खासदार शशी थरूर यांच्या छोटय़ा, परंतु घणाघाती भाषणाने इंग्रज वसाहतवादाचा भेसूर चेहरा जगभर पुन्हा एकदा उघड केला. समाजमाध्यमांमार्फत त्यांच्या भाषणाचे दृक्मुद्रण प्रसारित झाले आणि या विषयाबद्दल पुन्हा नव्याने चर्चा होऊ  लागली. थरूर व जॉन विल्सन यांच्या पुस्तकांनंतर प्रख्यात लेखक विल्यम डॅलरिम्पल यांचे नवे पुस्तकही त्याच मालिकेतील आहे. संशोधन आणि ओघवती, रोचक मुद्दे अधोरेखित करणारी लेखनशैली या दोहोंची सांगड घालणाऱ्या मोजक्यांमध्ये डॅलरिम्पल यांची गणना होते.

३१ डिसेंबर १६०० रोजी इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. इंडोनेशियामध्ये मसाल्यांच्या व्यापाराकरिता अयशस्वी प्रयत्न केल्यावर कंपनीने भारतावर भर दिला. कापडासोबतच नीळ, गंधक, इत्यादी वस्तूंचा व्यापार होऊ  लागला. या पुस्तकात सतराव्या शतकातील कंपनीची ओझरती चर्चा झाल्यामुळे त्यामागील पार्श्वभूमीची नीट कल्पना येते. सुरतेला वखार उघडण्यासाठी थॉमस रो या इंग्रज राजदूताने तत्कालीन मुघल सम्राट जहांगीरशी केलेल्या वाटाघाटींचे वर्णन सांस्कृतिक फरकांचे उत्तम उदाहरण म्हणून मुळातूनच वाचण्यासारखे आहे. मुंबई, कोलकाता आणि मद्रास ही ठिकाणे ब्रिटिश सत्तेचे तीन खांब कशी बनली, याचा इतिहासही इथे येतो. औरंगजेबाच्या काळात मुघल साम्राज्य ताकदवान असताना झालेल्या अँग्लो-मुघल युद्धातील कंपनीच्या पराभवाचे तपशीलही रोचक आहेत. एकूणच मुघल साम्राज्य एकसंध टिकून असतानाची सुव्यवस्था आणि सामर्थ्य यांपुढे युरोपीय कसे हतबल होते, हे डॅलरिम्पल आवर्जून सांगतात.

यातच शिवचरित्राला थोडक्यात स्पर्श करून डॅलरिम्पल पुढे मुघल-मराठे संघर्ष विस्ताराने कथन करतात. पुढे मराठय़ांच्या उत्कर्षांची आणि मुघलांच्या अपकर्षांची नांदी सांगून ते वाचकांना एकदम नादिरशहाच्या आक्रमणापाशी नेऊन पोहोचवतात. नादिरशहाने केलेली दिल्लीची अनिर्बंध लूट हा मुघल साम्राज्याला, विशेषत: राजधानी दिल्लीला बसलेला मोठाच धक्का असून त्यानंतर मुघलांचे उरलेसुरले सामर्थ्यही संपू लागले. मुघल आणि अन्य भारतीय सत्तांमध्ये या घडामोडी चालू असतानाच इ.स. १७५० पासून बंगाल प्रांतात एकामागोमाग एक अतिशय वेगाने घटना घडू लागल्या. बंगालमध्येच ब्रिटिश साम्राज्याची पायाभरणी झालेली असल्याने तेथील घडामोडी अधिक विस्ताराने वर्णिलेल्या आहेत.

बंगालमधील घडामोडी

नवाब अलीवर्दीखान १७५६ साली मरण पावल्यापासून १७७० सालच्या दुष्काळापर्यंत बंगालचा आणि त्यासोबतच कंपनीचाही चेहरामोहरा आमूलाग्र बदलला. बंगाल हा कंपनीच्या शासनाखाली येणारा पहिला भारतीय प्रदेश बनला. व्यापारी संस्थेपासून एका सामर्थ्यशाली सत्तेपर्यंत कंपनीचा प्रवासही प्रथम इथेच झाला. या अभूतपूर्व स्थित्यंतराची कहाणी डॅलरिम्पल विस्ताराने सांगतात. अलीवर्दीखानानंतर त्याचा नातू सिराजउद्दौलाच्या मनमानी कारभारावर कुटुंबीयांसोबतच जगत्सेठसारखे सावकारही नाखूश होते. इंग्रजांसोबतच्या वादामुळे सिराजने कोलकात्यावर स्वारी करून कब्जा केला. प्रत्युत्तरादाखल मद्रासहून क्लाइव्ह आणि वॉट्सनने पाठवलेल्या सैन्याने कोलकाता व चंद्रनगरचे फ्रेंच ठाणे ताब्यात घेतले आणि त्यातूनच प्लासीची लढाई झाली. मीरजाफरच्या दगाबाजीमुळे सिराजचा त्यात पराभव झाला. मीरजाफर आणि कंपनीमधील कराराप्रमाणे सिराजला मारण्यात आले. मीरजाफरशी संबंध सुरुवातीला चांगले असूनही बंगालमधील अराजक थांबवण्यात आलेल्या अपयशामुळे त्याला हटवून त्याचा जावई मीरकासिमला नवाब करण्यात आले.

मीरकासिमने अल्पावधीतच राज्यकारभारात चांगला जम बसवून बंगालची आर्थिक घडी अंशत: नीट बसवली. दिल्लीहून निसटून बंगालमध्ये आलेल्या नामधारी मुघल बादशहा शाहआलमकडून बंगालची दिवाणगिरीही स्वत:ला मिळवली. इंग्रजांच्या उद्धटपणा आणि करचुकवेगिरीला वैतागलेल्या मीरकासिमने शाहआलमसोबतच अवधच्या शुजाउद्दौलासोबत युती केली. शाहआलमच्या दिल्लीतील पुन:स्थापनेसोबतच इंग्रजांची खोड मोडणे हा या युतीचा मुख्य हेतू होता. पण १७६४ मध्ये बक्सारच्या लढाईत इंग्रजांनी या त्रिकुटाचा पराभव केला. शुजाउद्दौलाने स्वत: मीरकासिमला कैद करून त्याची संपत्ती हडपली. इंग्रजांनी शुजाउद्दौलाशी फायदेशीर करार करून त्याला धाकात ठेवले. शाहआलमला अलाहाबादेत ठेवून त्याच्या हस्ते बंगालची दिवाणगिरी मिळवली. अशा प्रकारे कंपनीला भारतातील सर्वात सुपीक आणि श्रीमंत प्रांत जवळपास आयताच ताब्यात मिळाला. कंपनीने त्याचा पुरेपूर फायदा उठवून बंगाल लुटण्यास सुरुवात केली. या घटनांमधील बारकावे डॅलरिम्पल यांच्या ओघवत्या शैलीत वाचून घटनांच्या वेगाची आणि दूरगामी परिणामांची कल्पना येते. शुजाउद्दौलाचा बेरकीपणा आणि त्याच्याही वरताण करणाऱ्या इंग्रजांची कुटिलता वाचकांसमोर यथातथ्य उभी राहते.

यामुळे कंपनीचे उखळ प्रमाणाबाहेर पांढरे झाले. पण बंगालमधील जनसामान्यांसाठी कंपनीचे शासन म्हणजे मरण होते. याचे प्रत्यंतर १७७० सालच्या दुष्काळात आले. कमी पावसामुळे पिकांवरही परिणाम झाला, बंगालभर अन्नान्न दशा होऊनही मोजके अपवाद वगळता कोणत्याही सवलतीशिवाय कंपनीने वसुली चालूच ठेवली. परिणामी कंपनीला मोठा फायदा होऊन भांडवलदारांनाही उत्तम परतावा मिळाला. समकालीन साधनांआधारे याचे करुण चित्र डॅलरिम्पल उभे करतात. हळूहळू बंगालमधील अत्याचारांची कहाणी इंग्लंडपर्यंत पोहोचली. तत्कालीन छापील माध्यमांद्वारे हा विषय अखेरीस पार्लमेंटमध्ये पोहोचल्यावर क्लाइव्हसह अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप होऊन त्यांना पदच्युत करण्याचे प्रयत्नही झाले. त्यात पुरेसे यश न येताही तत्कालीन पंतप्रधान लॉर्ड नॉर्थने कंपनीला पार्लमेंटप्रति उत्तरदायी करण्यात यश मिळवले. याच सुमारास नुकत्याच दिलेल्या परताव्यामुळे आणि अनेक युद्धांमुळे कंपनीवरचा आर्थिक बोजा वाढला होता. इंग्लंडमधून घेतलेल्या कर्जाची परतफेड आणि कस्टम डय़ुटी भरण्यात १७७२ मध्ये प्रथमच कंपनीला अपयश आले. परंतु पार्लमेंटचे जवळपास ४० टक्के सदस्य हे कंपनीचे शेअरहोल्डर असल्याने आणि इंग्लंडचा जवळपास निम्मा परदेशी व्यापार कंपनीतर्फे होत असल्यामुळे पार्लमेंटतर्फे कंपनीला ‘बेल-आऊट’ करण्यात आले. कंपनीवर नियंत्रणाचे बहुतेक प्रयत्न हे कंपनी आणि पार्लमेंट सदस्य व राजघराणे यांची मिलीभगत असल्याने अयशस्वी होत. साधनशुचितेकडे पूर्ण दुर्लक्ष करून हेतू साध्य करणारा कंपनीचा मनमानी कारभार वाचकांच्या मनावर बिंबवण्यात डॅलरिम्पल यशस्वी झाले आहेत.

यादरम्यानच शाहआलम महादजी शिंदेंच्या संपर्कात होता. त्यांच्या मदतीने १७७३ मध्ये तो पुन्हा दिल्लीच्या गादीवर बसला. त्याचा सरदार नजफखान आणि महादजी शिंदे या दोघांनी रोहिल्यांवर स्वारी केली. पत्थरगडला नजीबखानाचा मुलगा झाबेताखान याचा दोघांनी पराभव केला. झाबेताखानाचा मुलगा गुलाम कादिर याला मुघलांच्या हवाली करण्यात आले. शाहआलमने त्याची चांगली काळजी घेऊनही त्याला नपुंसक केल्याने गुलाम कादिर त्याच्यावर चिडून होता. पुढे शाहआलमची व्यवस्था लावून महादजी अन्यत्र मोहिमांसाठी निघून गेले तेव्हा नजफखानाने दिल्लीच्या आसपासचा काही भाग आपल्या कौशल्याने जिंकून घेतला. एका दशकभराने नजफखानही मरण पावल्यावर शाहआलमची शेवटची आशाही मावळली. पुढे १७८८ मध्ये गुलाम कादिरने महादजी शिंदे हे राजस्थानात असल्याचा फायदा घेऊन रोहिल्यांच्या छोटय़ा सैन्यासह दिल्लीवर हल्ला करून राजपरिवारावर अनन्वित अत्याचार व लूटमार केली. महादजी शिंदे परत आल्यानंतर त्यांनी गुलाम कादिरला पकडून ठार मारले. शाहआलमने आपला बचाव आणि मुघल साम्राज्याच्या स्थापनेसाठी केलेल्या अनेक खटपटींचे तपशीलवार वर्णन या पुस्तकात आलेले आहे. विशेषत: शाहआलमची इतकी तपशीलवार माहिती अन्यत्र मिळणे विरळाच. सामान्यत: दुर्लक्षित असलेला हा पैलू डॅलरिम्पल विस्ताराने सांगतात.

दोन आव्हाने : मैसूर आणि मराठे

कंपनीला आव्हान देऊ  शकणाऱ्या दोनच सत्ता आता उरल्या होत्या- मैसूर आणि मराठे. हैदरअलीने १७६७ व १७८० मधील पोल्लिलूरच्या लढाईत कंपनीच्या केलेल्या दणकेबाज पराभवांमागे कुशल लष्करी नियोजन होते. हैदर आणि त्याचा पुत्र टिपू सुलतान या दोघांनी कंपनीप्रमाणेच आपल्याही वखारी देशोदेशी उघडण्यासोबतच आरमारही विकसित केले होते; परंतु वेळ आणि पैशाअभावी ते मागे पडले. परदेशात आपले प्रतिनिधी पाठवून आंतरराष्ट्रीय साहाय्य मिळवण्यासाठीही टिपूने खूप खटपट केली होती. फ्रेंचांकडून तंत्रज्ञानाची आयात करून आपले लष्कर अद्ययावत ठेवण्यात त्यांना यशही मिळाले होते. विशेषत: हैदरच्या काळात दक्षिण भारतात मैसूरचे सामर्थ्य खूप वाढले होते. पण पुढे टिपूच्या काळात मैसूरचे मराठे व निजामाशी असलेले संबंध पूर्वीपेक्षा बिघडल्याने मैसूरचे सामर्थ्य कमी कमी होत गेले. अखेरीस १७९२च्या तहान्वये टिपूला कंपनीस बराच प्रदेश द्यावा लागला. बंगालनंतर कंपनीला झालेला हा मोठाच प्रदेशलाभ होता. धर्मवेड आणि अनावश्यक क्रूरपणा या अवगुणांनीही टिपूचे खूप नुकसान केले. १७९९ मध्ये अखेरच्या अँग्लो-मैसूर युद्धात टिपू मरण पावल्यावर मैसूरचा धोका ब्रिटिशांसाठी नष्ट झाला. मैसूरच्या तांत्रिक, लष्करी (रॉकेट्स) व आर्थिक सुधारणांची तपशीलवार चर्चा करून डॅलरिम्पल दाखवून देतात की, भारतीय राज्येही कंपनीला तिच्याच युक्त्या वापरून हरवू शकत होती. त्याचे स्पष्ट प्रत्यंतर मैसूरसंबंधित प्रकरणे वाचताना येते.

हैदराबादच्या निजामासोबत तैनाती फौजेचा करार अगोदरच केलेला असल्याने इंग्रजांचे पुढील शत्रू मराठेच होते. १७७९ मध्ये प्रथम अँग्लो-मराठे युद्धात अनेक ठिकाणी इंग्रज लष्कराला मराठय़ांनी गनिमी काव्याने हतबल केले. १७८२ मधील सालबाईच्या तहाने दोहोंत शांतता प्रस्थापित होऊनही इंग्रजांनी मराठय़ांच्या दुफळीचा फायदा घेण्यासाठी बरेच प्रयत्न केले. नाना फडणवीसांनी कंपनीची चाल ओळखून निजाम आणि हैदर यांच्याशी युतीचा प्रस्ताव ठेवला होता; परंतु टिपूच्या आडमुठेपणामुळे पुढे युती झाली त्याच्याविरुद्ध! नानांचे राजकारण पाहता, डॅलरिम्पल त्यांना ‘मराठा मॅकिआव्हेली’ असे सार्थ संबोधन वापरतात (निकोलो मॅकिआव्हेली (इ.स. १४६९ ते १५२७) हा इटलीतील राजकीय तत्त्वज्ञ होता.). महादजी आणि नाना या दोघांच्याही मरणानंतर मराठेशाहीत अराजक डोके वर काढू लागले. महादजींनी डय़ुबॉइन या फ्रेंच सेनापतीच्या साहाय्याने विकसित केलेली आणि अखिल उत्तरेत गाजलेली सेना पुढे दौलतराव शिंदे नीट वापरू शकले नाहीत. होळकरांच्या सत्तासंघर्षांत दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी हस्तक्षेप केल्याने चिडलेल्या यशवंतराव होळकरांनी १८०२ मध्ये पुण्यावर हल्ला केला. त्याला भिऊन पेशवे पळून इंग्रजांना जाऊन मिळाले. पुढे पेशव्यांशी १८०३ मध्ये तैनाती फौजेचा करार करून इंग्रजांनी त्यांना आपल्या अंकित केले आणि त्याच एक-दोन वर्षांत शिंदे आणि होळकरांचाही पराभव करून त्यांच्याशीही तसेच करार केले. उत्तरेत लेक नामक सेनापतीने दिल्लीवर स्वारी करून नामधारी मुघल बादशहाला कंपनीअंकित केले. इथे पुस्तकातील कथाभाग संपतो. मुघल बादशहाला आपल्या अंकित करणे हेच लेखकाच्या मते कंपनीच्या सत्तेचे परिणत स्वरूप असल्याचे दिसते.

बलस्थान आणि मर्यादा

मराठेशाहीतील गुंतागुंतीच्या आणि महत्त्वाच्या या घटनाक्रमाचा परामर्श डॅलरिम्पल त्रोटकपणेच घेतात. कंपनीला हरवण्याची मराठय़ांची क्षमता, नामधारी मुघल बादशहाला आपल्या अंकित करणे, आदींचा उल्लेख करूनही त्यासंबंधीचे विशेष तपशील ते देत नाहीत. तुलनेने शाहआलमच्या खटपटींना बरीच जागा मिळते. इंग्रजांचे सर्वात प्रबळ आरमारी शत्रू असलेल्या आंग्रेंचा साधा उल्लेखही येत नाही. याखेरीज खटकणारी गोष्ट म्हणजे तत्कालीन भारतातील सत्तासंघर्षांकडे डॅलरिम्पल मुघलकेंद्री दृष्टिकोनातूनच पाहतात. मुघलांना नामधारी प्रतिष्ठा असूनही शेवटी मराठय़ांना हरवूनच कंपनीने भारतावर राज्य केले, हे सत्य या पुस्तकातून पुढे येत नाही. अठराव्या शतकाकडे ‘अराजकाचे शतक’ म्हणून बघण्याची पूर्वी परंपरा होती; कारण ब्रिटिशांच्या समर्थनासाठी त्याचा उपयोग होत असे. याविरुद्धच्या संशोधनानंतरही हा जुना समज कायम आहे. मुघल आणि ब्रिटिश यांमधील स्थित्यंतराच्या काळातील एक प्रादेशिक सत्ता इतके दुय्यम स्थान मराठेशाहीचे खचितच नव्हते. या पुस्तकाद्वारे मराठय़ांच्या इतिहासाला न्याय मिळत नाही, हे खेदाने म्हणावे लागते.

या मोठय़ा त्रुटी सोडल्यास, कंपनी व क्लाइव्ह, हेस्टिंग्ससारख्या कंपनीच्या अधिकाऱ्यांबद्दल पुस्तकात मोठी तपशीलवार माहिती मिळते. कंपनीच्या साम्राज्यवादी मनोवृत्तीवर लेखकाने टीका करूनही, विशेषत: वॉरन हेस्टिंग्सने केलेल्या भ्रष्टाचाराचा उल्लेखही इथे येत नाही. त्याच्या महाभियोगाची प्रसिद्ध कहाणी मोठय़ा विस्ताराने येऊनही एकुणात त्याचे समर्थनच सापडते. तेच क्लाइव्हच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेचे वर्णन विस्ताराने येते. तांत्रिक प्रगतीपेक्षा कंपनीचे भारतातील अफाट आर्थिक सामर्थ्य हाच भारतातील त्यांच्या बंगालनंतरच्या विजयाचा पाया असल्याचे डॅलरिम्पल आवर्जून सांगतात. ब्रिटिश सैन्यापेक्षाही दुप्पट असलेले कंपनीचे सैन्य आणि त्याआधारे भारतात मनमानी करणारी कंपनी, तिच्यावर नियंत्रण ठेवायला धडपडणारे ब्रिटिश अधिकारी, जगभरातील कंपनीचा जगड्व्याळ कारभार यांची उत्तम कल्पना पुस्तक वाचून येते. उत्तम छपाई, अनेक चित्रे आणि विविध स्रोतांमधील रोचक आकडेवारी दिल्याने पुस्तक अधिक वाचनीय होते. विषयच मोठा असल्याने कैक ठिकाणी योग्य तो न्याय दिला गेलेला नाही. हे अटळ नक्कीच म्हणता येणार नाही. ब्रिटिश आणि मुघल इतिहासातील नेहमीची तथ्ये सोप्या भाषेत काही ठिकाणी अधिक माहितीसोबत सांगितली आहेत, त्यावरून तुलनेने थोडय़ा अधिक तपशिलात या सत्तांतराची ढोबळ कल्पना हे पुस्तक वाचून येते. हेच याचे बलस्थान व मर्यादाही!

द अनार्की : द ईस्ट इंडिया कंपनी, कॉर्पोरेट व्हॉयलन्स अ‍ॅण्ड द पिलेज ऑफ अ‍ॅन एम्पायर

लेखक : विल्यम डॅलरिम्पल

प्रकाशक : ब्लूम्सबरी पब्लिशिंग

पृष्ठे: ५७६ , किंमत : ७९९ रुपये