अजिंक्य कुलकर्णी

भारतीय उपखंडाचे रॅडक्लिफ रेषेमुळे जसे स्पष्ट दोन भाग केले गेले, तितक्या स्पष्टपणे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान व त्यांची पत्नी बेगम राणा या दोहोंचा विलगपणे विचार करणे अवघड आहे. बेगम राणांसारख्या निर्भय, महत्त्वाकांक्षी महिलेचे चित्रण करणे हेही तितकेच आव्हानात्मक. एका नव्याने जन्माला घातलेल्या राष्ट्राचे बाळंतपण करण्यासाठी बेगम राणा यांनी पदर खोचला होता. म्हणूनच त्या ‘मदर ऑफ पाकिस्तान’ म्हणून ओळखल्या जातात. त्यासाठी त्यांनी आपले दिल्लीतील घर- ज्याची नुसती बागच जवळजवळ तीन एकर एवढी होती- ते सोडले. ज्या घरात त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना (अशरफ आणि अकबर) यांना जन्म दिला होता, ते सोडून एका नव्याने जन्माला आलेल्या देशात कायमचे राहायला गेल्या होत्या. मुळात हा नवीन देश राष्ट्र म्हणून टिकेल की नाही याचीही खात्री नव्हती. हे दिल्लीतले घर फक्त एवढय़ासाठीच महत्त्वाचे आहे का? तर तसे अजिबात नाही. भारतीय मुस्लीम लीग ही याच घरात- ‘८, होल्डिंग रोड’ – वाढली, पोसली गेली. लीगच्या बैठकांवर बैठका या घरात झाल्या, ते मुस्लीम लीगच्या चळवळीचे एक महत्त्वाचे केंद्र होते. हे सर्व विस्ताराने चित्रित केलेय पेंग्विन प्रकाशनातर्फे प्रकाशित तसेच दीपा अग्रवाल (भारत) व ताहमीना अयुब (पाकिस्तान) या लेखिकाद्वयींद्वारे लिखित ‘द बेगम : अ पोट्र्रेट ऑफ राणा लियाकत अली खान, पाकिस्तान्स पायोनीअिरग फर्स्ट लेडी’ या पुस्तकात! या पुस्तकात दोन भाग केलेले आहेत. पहिला भाग बेगम राणांचा भारतातील कालखंड- जो लिहिला आहे दीपा अग्रवाल यांनी, तर पाकिस्तानातील कालखंड चितारला आहे ताहमिना अयुब यांनी.

१३ फेब्रुवारी १९०५ रोजी अल्मोरा (उत्तराखंड) येथे राणा यांचा जन्म झाला. राणांचे आजोबा तारादत्त पंत यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. तारादत्त यांनी आपल्या मुलाचे नाव डॅनियल असे ठेवले होते. डॅनियल यांना जे कन्यारत्न प्राप्त झाले तिचे नाव इरिन असे ठेवले गेले. इरिन- नंतरच्या बेगम राणा- अभ्यासात हुशार व स्वभावत: बंडखोर होत्या. अर्थशास्त्रात शिक्षण पूर्ण करून त्यांनी दिल्लीत तीनेक वर्षे प्राध्यापकी केली. इथेच त्यांची ओळख झाली ती के. माइल्स यांच्याशी. या दोघी पुढे अतिशय जिवलग मैत्रिणी झाल्या. के. माइल्स यांनी पुढे बेगम राणा यांचे एक छोटेखानी चरित्र लिहिले.. ‘द डायनामो इन सिल्क’ या नावाने! वर उलेख केलेल्या धर्मातर प्रकरणामुळे तत्कालीन समाजाची सामाजिक, वैचारिक घुसळण समजण्यास मदत होते. धर्मातर करणे एक वेळ सोपे, पण ते निभावणे मात्र कठीण! त्या वेळी नैनीताल परिसरातील अनेक बुद्धिमान ब्राह्मणांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. त्यांच्याप्रमाणेच अनेक दलितांनीही ख्रिस्ती धर्माचा मार्ग अंगीकारला होता. याने हे दोन वर्ग ख्रिस्ती या समान पातळीवर आले होते का? तर तसेही काही दिसत नाही. ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतरही त्यांच्यातील उच्च-नीच भेद मिटू शकला नाही. हे धर्मातर करून घेण्यामागे ब्रिटिशांचा ख्रिस्तीधर्मीयांची संख्या वाढावी हा हेतू असेलही; पण भारतातील उच्चवर्णीयांनी धर्मातर करण्यामागे आधुनिक शिक्षणाबद्दलची ओढ, नवे काही शिकण्यास मिळणे हीदेखील कारणे होती. इरिन अर्थात बेगम राणा यांचे बरेचसे शिक्षण लखनौमध्ये झाले. तिथे काकोरी कटानंतर ‘सायमन गो बॅक’ ही चळवळ जोर धरू लागली होती. लखनौमध्ये विद्यार्थ्यांपैकी ‘सायमन गो बॅक’चा फलक हातात धरून रस्त्यावर उतरलेली पहिली विद्यार्थिनी इरिन या होय. सायमन कमिशनविरुद्ध उत्तर प्रदेश विधिमंडळात एक तरुण तडफदार व्यक्तिमत्त्व जोरदार भाषण करत होते. ते व्यक्तिमत्त्व म्हणजे लियाकत अली खान! त्यांच्या भाषणाचा, व्यक्तिमत्त्वाचा इरिन यांच्यावर प्रभाव पडला.

१९२७-२८ पर्यंत मुहम्मद अली जिना हेच मुस्लीम लीगचे सर्वेसर्वा होते. लखनौ करारानंतर जिना काँग्रेस आणि मुस्लीम लीग अशा दोहोंचे सदस्य होते. नंतर जसजसा महात्मा गांधींचा प्रभाव काँग्रेसमध्ये वाढत गेला, तसतशी गांधी-जिना यांच्यातील मतभेदांची दरी रुंदावली. शेवटी जिना काँग्रेसमधून बाहेर पडले. वकिली करण्यासाठी जिनांनी लंडनचा रस्ता धरला. दरम्यान, लियाकत अली खान यांचा निकाह इरिनशी झाला. लियाकत अलींसह निकाह करण्यासाठी इरिन यांना मुस्लीम धर्म स्वीकारावा लागला. आता इरिनच्या त्या झाल्या ‘बेगम राणा’! लियाकत अलींचा हा दुसरा निकाह. लियाकत अली व बेगम राणा लंडनला मधुचंद्रासाठी जाणार आहे हे कळल्यावर मुस्लीम लीगच्या कार्यकर्त्यांनी- जिनांची भेट घ्या आणि त्यांना भारतात परत येण्याचा आग्रह करा, अशी विनंती त्यांना केली. लियाकत अली-बेगम राणा यांचा हा मधुचंद्र मुस्लीम लीगसाठी मैलाचा दगड ठरला. बेगम राणांच्याच शब्दांत सांगायचे तर, लियाकत अली जिनांना म्हणाले, ‘‘आम्हाला अशी व्यक्ती हवी आहे जी विकली जाऊ शकत नाही. तुम्ही परत यायला हवे. तुम्ही एकटेच असे आहात जे लीगला नवसंजीवनी देऊ शकता, वाचवू शकता.’’ ..आणि लियाकत अलींच्या सांगण्यावरून जिना भारतात परतले. जिनांचे मन वळवण्यात बेगम राणा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. लियाकत अलींशी निकाह होईपर्यंत राणांची राजकारणाची समज ही साधारणच होती. मात्र लियाकत अलींच्या ध्येयास स्वत:चे ध्येय समजून राणांनी सर्वस्व त्यात ओतले. राणा या गृहिणी म्हणूनही उत्तम होत्या. राणांच्या या सर्व प्रवासात त्यांची सावली म्हणून उभी राहिली ती त्यांची जिवलग मैत्रीण के. माइल्स. राणांबरोबर त्यांनीही भारत सोडला व कायमच्या पाकिस्तानात स्थायिक झाल्या.

इथून पुढचा- पाकिस्तानातील बेगम राणा यांचा कालखंड पुस्तकाच्या दुसऱ्या भागात चितारला आहे. राणांनी तिथे महिलांसाठीचे एक स्वतंत्र संघटन उभे केले. पाकिस्तानच्या स्थापनेनंतर उत्तर भारतात उसळलेल्या दंगलीमध्ये होरपळलेल्या स्त्रियांना पाहून आपल्यासमोर काय वाढून ठेवले आहे याची बऱ्यापैकी कल्पना राणांना आली होती. राणांच्या या कामासाठी त्यांना प्रेरणा मिळाली होती ती जिनांपासून. जिना राणांना म्हणाले होते, ‘‘महिलांना प्रशिक्षित करण्यासाठी तयार राहा. महिलांनी घरी गप्प बसावे, बुरख्यात आयुष्य कंठावे असे इस्लाम कधीही सांगत नाही.’’ ‘मुस्लीम लीग विमेन्स कमिटी’च्या बेगम शहनवाज यांच्या विनंतीवरून राणांनी ‘विमेन्स व्हॉल्युंटरी सव्‍‌र्हिस’ला लाहोरमध्ये मोठी जागा मिळवून दिली. बेगम राणा यांनी लीगच्या आर्थिक सल्लागार म्हणूनही काम पाहिले होते. या सामाजिक कामांच्या अनुभवांचा उपयोग राणांना फाळणीच्या काळात पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या व छावण्यांत राहात असलेल्या स्त्रिया-बालकांना प्रथमोपचार मिळवून देण्यात झाला. कराचीत कित्येक अनाथ मुलांचे पुनर्वसन राणांनी केले. ही अनाथ मुले शाळेत कशी जाऊ शकतील याकडे त्यांनी लक्ष पुरवले. याच काळात तिथे कॉलराची मोठी साथ पसरली होती. आता मुस्लीम स्त्रियांना नर्सिगचे प्रशिक्षण कसे द्यायचे, हा मोठा पेच त्यांच्यापुढे होता. त्यांनी शिकलेल्या मुलींना गोळा केले व नर्सिगच्या शिक्षणासाठी परदेशी पाठवले. प्रशिक्षण पूर्ण करून आलेल्या मुलींना वैद्यकीय सेवेत रुजू करवून घेतले. या अनुभवातूनच त्यांनी ‘पाकिस्तान नर्सिग फेडरेशन’ची स्थापना केली.

या सर्व गोष्टी सनातनी मुस्लिमांनी खपवून घेतल्या का? अजिबात नाही! लियाकत अली मात्र राणांच्या पाठीमागे सतत खंबीरपणे उभे राहिले. १९४९-५० मध्ये राणांनी ‘पाकिस्तानी विमेन्स नॅशनल गार्ड’ ही महिला सैन्याची तुकडी तयार केली. त्यातील महिला सैनिकांना ब्रिगेडियर पदापर्यंत बढती देण्याची तरतूद करवून घेतली. या सर्व धावपळीच्या काळातच १६ ऑक्टोबर १९५१ रोजी लियाकत अलींची राजकीय वैमनस्यातून गोळ्या घालून हत्या केली गेली. राणांसमोर अनेक प्रश्न आ वासून उभे होते- भारतात परतायचे की पाकिस्तानमध्येच राहायचे? मुलांच्या शिक्षणाचे काय? पाकिस्तान सरकारमधील लियाकत अलींच्या एका मित्राने राणांसाठी दोन हजार रुपये महिना पेन्शनची सोय केली, पण ही मदत त्यांच्यासाठी अतिशय तुटपुंजी होती. १९५१ पर्यंत तर पाकिस्तानमध्ये मुलींसाठी पदवीपर्यंत शिक्षण देऊ शकेल असे एकही महाविद्यालय नव्हते. ते राणांच्या पुढाकाराने सुरू झाले. १९५३ साली एलिझाबेथ द्वितीय या राणीच्या राज्याभिषेक सोहळ्याला सर्व मुस्लीम राष्ट्रांमधून फक्त राणा यांना निमंत्रण होते. पुढे राणांनी नेदरलँड्समध्ये पाकिस्तानच्या राजदूत म्हणूनही काम पाहिले.

एकुणात, राणांच्या व्यक्तिगत, सामाजिक जीवनातील विविध पैलू पुस्तकात उलगडले आहेत; पण राणा सक्रिय राजकारणापासून दूरच का राहिल्या यावर मात्र कोणताही प्रकाश लेखिकाद्वयींनी टाकलेला नाही.

ajjukul007@gmail.com