जयप्रकाश सावंत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘जेम्स बॉण्ड’ या गुप्तहेर पात्राचा जन्मदाता लेखक इयन फ्लेमिंग हा दुर्मीळ ग्रंथांचा संग्राहक आणि ग्रंथनादिष्टांच्या विश्वात अभिजात ठरलेल्या ‘द बुक कलेक्टर’ या त्रमासिकाचा संस्थापक होता. त्याच्या या अलक्षित पैलूची ओळख करून देणारा लेख..

इयन फ्लेमिंगच्या कर्तृत्वात अशा दोन गोष्टी आहेत, ज्यांच्याविषयी त्याच्या चाहत्यांनाही फारशी कल्पना नाही. यांतली एक आहे त्याने जमवलेल्या दुर्मीळ ग्रंथांचा संग्रह आणि दुसरी, ग्रंथ-अभ्यासक  व ग्रंथप्रेमी यांच्या विश्वात ज्याला मानाचं स्थान आहे अशा ‘द बुक कलेक्टर’ या त्रमासिकाची निर्मिती!

फ्लेमिंगच्या ग्रंथसंग्रहाची महती निकोलस बास्बेन्सच्या ‘एव्हरी बुक इट्स रीडर’ (हार्पर पेरेनिअल, २००४) या पुस्तकात वाचायला मिळते. इंग्लंडमध्ये १९६३ साली प्रिंटिंग मशिनरी बनवणाऱ्या उद्योजकांचं आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरलं होतं. याला जोडून ब्रिटिश म्युझियमच्या विद्यमाने दुर्मीळ ग्रंथांचं प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं. मानवाच्या इतिहासावर प्रभाव टाकणारी ४२४ पुस्तकं प्रदर्शित करणाऱ्या या प्रदर्शनाचं नाव ‘प्रिंटिंग अ‍ॅण्ड द माइंड ऑफ मॅन’ असं होतं. ही पुस्तकं विविध देशांतील ६३ ग्रंथालयांतून व व्यक्तींकडून मिळवण्यात आली होती. तर, या प्रदर्शनासाठी सर्वाधिक पुस्तकं देणाऱ्यांच्या यादीत फ्लेमिंग त्याच्या ४४ पुस्तकांसह दुसऱ्या स्थानावर होता आणि त्याच्या वर होतं ५१ पुस्तकं देणारं केम्ब्रिजचं किंग्ज कॉलेज! या प्रदर्शनानंतर एकाच वर्षांने फ्लेमिंगचं निधन झालं आणि प्रदर्शनासाठी ३१ पुस्तकं देणाऱ्या इंडियाना विद्यापीठाने आपल्या ‘द लिली लायब्ररी’साठी फ्लेमिंगचा संग्रह त्याच्या पत्नीकडून विकत घेतला.

‘द बुक कलेक्टर’ या त्रमासिकाचा पहिला अंक १९५२ च्या वसंतात प्रसिद्ध झाला. या अंकाच्या मास्टहेडवर इयन फ्लेमिंग, जॉन हेवर्ड आणि पर्सी म्युअर यांची नावं आहेत. हे तिघेही त्यांच्या निधनापर्यंत या नियतकालिकाशी निगडित राहिले. मात्र, ‘द बुक कलेक्टर’च्या निर्मितीमागची मोठी प्रेरणा फ्लेमिंगचीच होती. तो पहिल्या अंकापासून त्याच्या संपादक मंडळावर राहिला, तसंच त्याचा प्रमुख भागधारकही राहिला. जॉन हेवर्ड हाही पहिल्या अंकापासून अखेपर्यंत या त्रमासिकाचा प्रमुख संपादक राहिला. हेवर्ड फ्लेमिंगच्याच इमारतीत, त्याच्या खालच्या मजल्यावर राहत होता. टी. एस. एलियट हाही या जागेत हेवर्डसोबत राहत होता. (त्यामुळे ‘द बुक कलेक्टर’च्या पहिल्या वर्षांच्या दोन अंकांत एलियटचं एक व्याख्यान छापलेलं आहे.) हेवर्ड साधारण १९२५ पासून स्नायूंच्या एका असाध्य व्याधीमुळे व्हीलचेअरला जखडलेला होता. तरीही लंडनच्या साहित्यिक वर्तुळात एक कुशाग्र बुद्धीचा संपादक, समीक्षक आणि अ‍ॅन्थॉलॉजिस्ट म्हणून त्याचा दबदबा होता. त्याला ग्रंथसंग्रहाच्या क्षेत्राचंही उत्तम ज्ञान होतं. ग्रंथसूचीशास्त्रातले (Bibliography) अनेक विद्वान त्याला घरी भेटायला येत. इंग्लंडबाहेरील सूचीकारांशीही त्याचा चांगला संपर्क होता. ‘द बुक कलेक्टर’च्या पहिल्या अंकातला तिसरा साथीदार पर्सी म्युअर हा दुर्मीळ ग्रंथविश्वातला एक नामवंत ग्रंथविक्रेता आणि या क्षेत्रातला विशेषज्ञ होता.  फ्लेमिंगला ग्रंथसंग्रहाच्या छंदाकडे वळवायला तोच कारणीभूत होता. फ्लेमिंगच्या संग्रहाला जे विशेष स्वरूप आलं त्यामागे म्युअरच्या मार्गदर्शनाचा फार मोठा वाटा होता.

या तिघांनी आणि त्यांच्यानंतर आलेल्या संपादक-मंडळांनी या मासिकाला जो दर्जा आणून दिला, तो आजही कायम आहे. ‘द बुक कलेक्टर’ने २००२ साली ५० वर्ष पूर्ण केली. त्या निमित्ताने त्यात प्रसिद्ध झालेल्या निवडक लेखांचं एक संकलन ‘द प्लेझर्स ऑफ बिब्लिओफिली : फिफ्टी इयर्स ऑफ द बुक कलेक्टर’ या शीर्षकाने २००३ साली प्रसिद्ध झालं. हे तीनशे पानी देखणं पुस्तक ब्रिटिश लायब्ररी आणि अमेरिकेतील ओक नॉल प्रेस यांनी संयुक्तपणे प्रकाशित केलंय, यावरून या नियतकालिकाच्या दर्जाची कल्पना येईल. ‘द बुक कलेक्टर’ने ग्रंथसंग्रह व संग्राहक, ग्रंथसूच्या व सूचीकार, ग्रंथबांधणी, मुद्रण, ग्रंथविक्रेते, आगळी ग्रंथालयं अशा विविध विषयांचा सखोल व्यासंग असणाऱ्या आणि त्याचवेळी उत्तम लिहू शकणाऱ्या लेखकांचा एक ताफाच उभा केला. या त्रमासिकाच्या http://www.thebookcollector.co.uk ??या संकेतस्थळावरील अर्काइव्ह विभागात त्यात प्रसिद्ध झालेल्या सर्व लेखांची यादी पाहायला मिळते. पण फक्त पाहायलाच! वाचायला मिळण्यासाठी काही हजार रुपये भरून त्याचं वर्गणीदार व्हावं लागतं. खेदाची गोष्ट ही की, मुंबई / महाराष्ट्रातील कुठल्याही ग्रंथालयात हे नियतकालिक घेतलं जातंय असं मला आढळलं नाही. (हे चुकीचं असल्याचं कोणी कळवल्यास मला अतिशय आनंद होईल!)

फ्लेमिंगच्या या अनोख्या क्षेत्रातल्या कर्तृत्वाची दखल घेताना आणखी एक बाब लक्षात ठेवायला हवी, की या दोन्ही गोष्टी त्याने त्याच्याकडे प्रचंड पैसा येण्याच्या आधीच्या काळात केल्या. ग्रंथसंग्रह करायची सुरुवात त्याने १९२९ च्या सुमारास, म्हणजे वयाच्या २१ व्या वर्षी केली. त्या काळात तो स्थिर होण्यासाठी धडपड करणारा एक ‘स्ट्रग्लर’ होता. ‘द बुक कलेक्टर’च्या स्थापनेच्या वेळी (१९५२ साली) तो लॉर्ड केम्सले याच्या वृत्तपत्रसमूहात ‘फॉरेन मॅनेजर’ म्हणून नोकरी करत होता. त्याला पैसा व कीर्ती मिळण्याची सुरुवात ज्या बॉण्ड- कादंबरीपासून झाली ती ‘कॅसिनो रॉयल’ ही एका वर्षांनंतर- १९५३ मध्ये प्रकाशित झाली.

फ्लेमिंगच्या मृत्यूनंतर त्याच्या सहवासाच्या आठवणी जागवणारा पर्सी म्युअरचा ‘इयन फ्लेमिंग : अ पर्सनल मेमॉयर’ हा लेख ‘द बुक कलेक्टर’च्या १९६५ च्या वासंतिक अंकात प्रकाशित झाला. त्याच्या सुरुवातीला, या दोघांची पहिली भेट १९२९ च्या सुमारास एका आगळ्या योगातून कशी झाली, याची म्युअरने सांगितलेली हकीकत रोचक आहे.

म्युअर या वेळी ‘द्यूलू’ (Dulau) नावाच्या दुर्मीळ पुस्तकं विकणाऱ्या दुकानात काम करत होता. या दुकानात नवी पुस्तकंही विकली जात. ही पुस्तकं जुन्या पुस्तकांची जागा व्यापतात हे म्युअरला पसंत नव्हतं आणि तो आपली नाराजी वारंवार दुकानाच्या चालकांकडे व्यक्त करत असे. पण त्यांच्या मते, या निमित्ताने काही इतरही ग्राहक दुकानात येतात आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा निर्णय योग्य होता. म्युअरने लिहिलंय की, ‘जर मला माझ्या मतानुसार दुकान चालवायला दिलं असतं, तर मी माझ्या आयुष्यातल्या सर्वात दीर्घ आणि फलदायी मैत्रीला मुकलो असतो. कारण एका सकाळी तरुण फ्लेमिंग बॉण्ड स्ट्रीटवरच्या (!) या दुकानात नुकत्याच प्रकाशित झालेल्या डी. एच. लॉरेन्सच्या ‘पॅन्सीज’ या कवितासंग्रहाची चौकशी करत आला..’ फ्लेमिंगने म्युअरला त्याचं या पुस्तकावरचं मत विचारलं. म्युअर त्याविषयी उत्साहाने बोलला. तेव्हा फ्लेमिंगने विचारलं, की त्याचा हा उत्साह विक्रेता म्हणून आहे की तो लॉरेन्सचा भक्त आहे? म्युअर म्हणाला, ‘दोन्ही किंवा दोन्हीही नाही.’ मग स्पष्टीकरण देत म्युअरने सांगितलं की, त्याला स्वत:ला लॉरेन्सचे विचार आणि त्याच्या व्यक्तिरेखा गर्हणीय वाटतात. पण त्याचबरोबर त्याला विद्यमान साहित्यिकांमध्ये लॉरेन्स हा सर्वात श्रेष्ठ लेखक वाटतो. यातून दोघांचा पुस्तकांविषयीचा संवाद सुरू झाला आणि फ्लेमिंगला हव्या असणाऱ्या पुस्तकांचा टेबलावरचा ढीग वाढत गेला. या गप्पा इतक्या जमून आल्या की, दोघं दुपारी  एकत्रच जेवले.  संध्याकाळीही एकत्र जेवले असते, मात्र फ्लेमिंगने ते आधीच दुसऱ्या कोणाबरोबर तरी ठरवलं होतं. परंतु दोघं जेवणाच्या वेळेनंतर रात्री पुन्हा भेटले आणि पहाटेपर्यंत गप्पा मारत बसले! फ्लेमिंग या वेळी जिनिव्हातील एका विद्यापीठात फ्रेंच शिकत होता आणि थोडय़ाच दिवसांत तिथे परतणार होता. ‘काही नवीन चांगली पुस्तकं आली तर मला ती जीनिव्हाच्या पत्त्यावर पाठव,’ असं सांगून त्याने म्युअरचा निरोप घेतला.

यानंतर दोघांचा पत्रसंवाद सुरू झाला. परस्परांमधला जिव्हाळा एवढा वाढला, की फ्लेमिंग त्याची उन्हाळ्याची सुट्टी ऑस्ट्रियातील एका निसर्गरम्य स्थळी राहणाऱ्या मित्रांसोबत घालवणार होता, तर तिथे तो म्युअरलाही सोबत घेऊन गेला. ही सुट्टी फार बहारीची गेली हे सांगताना म्युअरने फ्लेमिंगविषयीची काही निरीक्षणंही नोंदवली आहेत. जसं की : ‘तो सदैव ‘कॅप्टन’ होता, कधी ‘लेफ्टनंट’ होऊ शकला नसता.’ फ्लेमिंगपेक्षा म्युअर दहा वर्षांनी मोठा असूनही या सहलीची सर्व सूत्रं फ्लेमिंगने स्वत:कडेच ठेवली होती. दुसरी गोष्ट म्हणजे, फ्लेमिंगला स्त्रियांचा सहवास अतिशय प्रिय होता. या सहलीदरम्यानही फ्लेमिंग तीन स्त्रियांमध्ये गुंतलेला होता.

फ्लेमिंगला राजनैतिक सेवेत शिरायची इच्छा होती. त्यासाठी तो विविध भाषा शिकत होता. फ्रेंच, जर्मन, इटालियन आणि रशियन भाषा तो नुसता शिकलाच नाही तर त्याने त्यांच्यावर असाधारण प्रभुत्व मिळवलं. त्या तो सफाईने बोलू शकत होता. जिनिव्हातलं फ्रेंचचं शिक्षण संपल्यानंतर राजनैतिक सेवेसाठी आवश्यक असणारी परीक्षा द्यायला तो लंडनला परतला आणि तेव्हापासून त्याची ग्रंथसंग्रहाच्या क्षेत्रातली मुशाफिरी सुरू झाली.

म्युअरने लिहिल्यानुसार, फ्लेमिंगने त्यांच्या अगदी पहिल्या भेटीतच त्यावेळी ललित पुस्तकांच्या पहिल्या आवृत्त्या जमवण्याची जी टूम होती, तिच्याविषयी म्युअरकडे विचारणा केली. परंतु त्याचबरोबर याविषयी थोडा उपहासही व्यक्त केला. तो म्हणाला, किशोरवयात त्यालाही स्टॅम्प्स, सिगारेटची पाकिटं, वगैरे जमा करण्याचा छंद होता. पण विशीत तो अशा वृत्तीतून बाहेर पडला होता. संग्रह करण्याच्या अशा प्रवृत्तीचं फ्रॉइडने कसं विश्लेषण केलंय, हेही त्याने म्युअरला ऐकवलं. यावर म्युअर त्याला म्हणाला होता की, त्याने ते वाचलंय- ते अकारण क्लिष्ट तर आहेच, शिवाय त्याला स्वत:ला त्याविषयी थोडा तिरस्कारही वाटतो.

मधल्या काळात मात्र फ्लेमिंगचा कल संग्रह करण्याकडे झुकत चाललेला दिसून येत होता. परंतु त्याला ललित पुस्तकांऐवजी कुठल्या तरी वेगळ्या विषयावरचा संग्रह करायची इच्छा होती. प्रथम त्याच्या मनात आलं की, ज्या पुस्तकांनी एखाद्या गोष्टीची सुरुवात झालीय अशी पुस्तकं मिळवायची. उदाहरणार्थ, गोल्फ खेळावरचं पहिलं पुस्तक, सायकल- मोटर- विमान यांवरची पहिली पुस्तकं, वगैरे. नुकताच त्याला शेअर बाजारातील एका व्यवहारात अडीचशे पौंडांचा फायदा झाला होता. त्याने ही रक्कम म्युअरच्या हातात ठेवली आणि अशा तऱ्हेची पुस्तकं विकत घ्यायला सांगितली. त्यासाठी आवश्यक ते संशोधन म्युअरनेच करायचं होतं. त्या काळाच्या मानाने (१९३० च्या आसपास) ही रक्कम बऱ्यापैकी मोठी होती. पण म्युअरला या विषयाविषयी फारशी माहिती नव्हती. म्युअर यावेळी आधीची नोकरी सोडून ‘एल्किन मॅथ्यूज’ नामक दुकानात काम करत होता. त्याने तंत्रज्ञानविषयक पुस्तकांचे कॅटलॉग्ज मागवून अभ्यास सुरू केला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, फ्लेमिंगला हवीत तशा प्रकारची फारशी पुस्तकं उपलब्ध नाहीत. मग दोघांनी पुन्हा एकदा भेटून चर्चा केली. आणि फ्लेमिंगच्या मनात असलेल्या  विषयात थोडासा बदल करून तो अधिक सखोल व व्यापक बनवला.

आता, मानवाच्या प्रगतीला आणि विकासाला कारणीभूत झालेली तत्त्वज्ञानं व शास्त्रीय संशोधनं याविषयीच्या पुस्तकांचा संग्रह करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. याचा एक फायदा असाही झाला की, त्यावेळी या क्षेत्रात फारसे संग्राहक शिरलेले नसल्याने म्युअरला खूप महत्त्वाची पुस्तकं खूप कमी किमतीत मिळाली. संग्रहाची सुरुवातच डार्विनच्या ‘ऑन द ओरिजिन ऑफ स्पीशीज्’च्या (म्युअरच्या दुकानातच सापडलेल्या) उत्कृष्ट प्रतीने झाली (दहा पौंड). यानंतर मिळालेली सामग्री पाहा : रॉबर्ट कॉखच्या क्षयरोगविषयक संशोधनाशी निगडित १८८२ च्या आसपासचे समग्र निबंध (पाच पौंड), विल्हेम रॉण्टजेनच्या क्ष-किरणांवरच्या १८९५ च्या सुमारासच्या दोन संशोधन-निबंधांच्या मूळ प्रती (सात पौंड), मादाम क्यूरी यांचे रेडियमवरच्या संशोधनासंदर्भातले १९०३ चे दोन प्रबंध (चार पौंड), आदी. फ्लेमिंगने यानंतर म्युअरला पैशाची मर्यादा न ठेवता मुक्तपणे खरेदी करण्याची मुभा दिली.

इथे म्युअरने दोन गोष्टी मात्र स्पष्टपणे सांगितल्या आहेत. त्यांतली एक म्हणजे, या संग्रहाबाबतचा फ्लेमिंगचा दृष्टिकोन हा एखाद्या गुंतवणुकीसारखाच होता आणि हे त्याने कधी लपवून ठेवलं नाही. पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या म्युअरचा यावरून फ्लेमिंगशी कधी कधी वादही होत असे. अर्थात, शेअर सर्टिफिकेटं गोळा करण्यापेक्षा हे काम जास्त रंजक आणि वाहवा मिळवणारं आहे याचीही फ्लेमिंगला जाणीव होती. आपण मानवी विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांतली ‘मैलाचा दगड’ ठरणारी पुस्तकं जमवली आहेत, याचा तो संधी मिळेल तेव्हा अभिमानाने उल्लेख करत असे. ‘द बुक कलेक्टर’च्या संदर्भातही, ‘जेम्स बॉण्डचा निर्माता हा असा विद्वत्मान्य नियतकालिकाच्या संपादक मंडळावर असावा’ याविषयीचं लोकांचं कौतुक व चकित होणं त्याला सुखावून जात असे.

म्युअरने सांगितलेली दुसरी गोष्ट म्हणजे, पुस्तकं, चित्रपट आदींमधून लाभलेल्या श्रीमंतीनंतर मात्र फ्लेमिंगने या संग्रहात भर घालणं थांबवलं. म्युअरच्या मते, या गुंतवणुकीतून मिळणारा फायदा त्याला क्षुल्लक (‘चिकनफीड’) वाटला असावा. काहीही असो, या संग्रहाचं मोल वादातीत होतं आणि म्युअरने म्हटलंय की, ‘तो उभारण्यातला माझा सहभाग ही मला माझ्या आयुष्यातली सर्वात अभिमानास्पद कामगिरी वाटते.’

jsawant48@gmail.com

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The book collector story of ian fleming bookstore
First published on: 11-08-2018 at 01:50 IST