एखादा लेखक मृत्यूनंतरही किती वर्षे उरतो, त्यावर त्याच्या लेखणीची ताकद ठरत असते. एच. पी. किंवा हॉवर्ड फिलिप्स लवक्राफ्ट यांच्या मृत्यूला येत्या १५ मार्च रोजी ८० वर्ष पूर्ण होत आहेत. या कालावधीत त्यांची महत्ता जराही कमी झाली नाही. उलट जगभरच्या लेखकपिढय़ांनी लवक्राफ्टच्या विश्वाचा पसारा आणखी विस्तारला. या समृद्ध कथाकाराची मराठी वाचकांना माहिती असणे का आवश्यक आहे, हे सांगणारा लेख..

कालौघात टिकून राहिलेल्या, गूढ, रहस्यमय, अतिमानवी विषयांना आपल्या दर्जेदार साहित्यातून मान्यता मिळवून देणाऱ्या, अल्पायुषी आणि कफल्लक आयुष्य जगलेल्या एका साहित्यिकाचं नाव आपल्याला आज चांगलंच परिचित आहे. ते म्हणजे एडगर अ‍ॅलन पो. मात्र हेच सारे गुणधर्म असलेला दुसरा एक साहित्यिक आपल्याकडल्या वाचकांच्या केवळ विस्मृतीतच गेलेला नाही, तर अनेकांना त्याचं नाव पूर्णत: अपरिचित असण्याची शक्यता आहे. हे नाव म्हणजे एच. पी. किंवा हॉवर्ड फिलिप्स लवक्राफ्ट. लवक्राफ्ट आणि पो समकालीन नाहीत. वयाच्या चाळिसाव्या वर्षी झालेला पोचा मृत्यू १८४९ चा, तर लवक्राफ्टचा जन्म १८९० चा. पोसारखा तोही अल्पायुषी, १५ मार्च १९३७ ला, वयाच्या सेहेचाळिसाव्या वर्षी त्याचा मृत्यू झाला.  पण मृत्युसमयी फार कोणाला माहीत नसलेल्या लवक्राफ्टचा प्रभाव पुढल्या काळात मात्र जगभरात पसरला. स्टीवन किंग, रॅमसी कॅम्पबेल, विलिअम बरोज, अ‍ॅलन मूर, नील गायमनपासून आपल्या नारायण धारपांपर्यंत या क्षेत्रात काम करणारे बरेचसे लेखक या ना त्या मार्गाने त्याच्या ऋणात आहेत. एके काळी सामान्य, रंजक मानल्या जाणाऱ्या या लिखाणाला आज इंग्रजी साहित्यात महत्त्वाचं स्थान आहे. आपल्याकडे मात्र साहित्य प्रामुख्याने मध्यमवर्गीय जाणिवा आणि नातेसंबंधांपुरतं मर्यादित राहिल्याने लवक्राफ्टचं नाव फार माहीत नसणं क्रमप्राप्तच आहे.

Chunky Panday on daughter Ananya Panday relationship with Aditya Roy Kapur
“ती माझ्यापेक्षा जास्त पैसे कमावते, त्यामुळे…”, चंकी पांडेचं अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूरच्या नात्याबद्दल विधान
chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
Man Commits Suicide, Killing Second Wife , Killing Son, Immoral Relationship, nagpur crime, Immoral Relationship crime, nagpur news, murder news, crime news, marathi news,
नागपूर : अनैतिक संबंधामुळेच घडले हत्याकांड, तिघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार
mukhtar ansari umar ansari
“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”

मला स्वत:ला लवक्राफ्टचा शोध अनपेक्षितपणे लागला, आणि अप्रत्यक्षपणेही. शालेय काळात कधी तरी घरातली पुस्तकं धुंडाळताना ऑगस्ट डल्रेथ नामक लेखकाचं ‘द मास्क ऑफ कथुलू’ ( कथुलू हा उच्चार सरसकट वापरला जात असला, तरी विवाद्य आहे. इथे मात्र आपण तोच वापरू.) नावाचं एक पुस्तक हाताला लागलं. बाबा (रत्नाकर मतकरी) आणि नारायण धारप यांची गूढ – भय या विषयाला स्थान असलेली पुस्तकं मी नित्यनेमाने वाचत असल्याने ते वाचायला सुरुवात करताना मला काहीच वाटलं नाही, पण लवकरच लक्षात आलं, की ते वाचताना, आपल्याला खरोखरची भीती वाटायला लागलीये. हे प्रकरण केवळ भुताखेतांची भीती दाखवणारं नाही, तर वैश्विक संचार असणारी दैवतं, आणि त्यापुढली माणसाची हतबलता हा या कथांचा प्रमुख विषय आहे. भीती तयार होतेय ती माणसांच्या विरोधातल्या दुष्प्रवृत्तींमधून नाही, तर माणसं या वैश्विक शक्तीच्या खिजगणतीतच नाहीत, या भावनेतून. त्याला जोड आहे, ती चमत्कारिक उच्चार न करता येणारे शब्दप्रयोग- नावं, वातावरणनिर्मिती आणि भाषेचा चमत्कृतीपूर्ण वापर, याची.

untitled-3

या संग्रहाने झपाटून गेल्यावर मी (या इंटरनेट-अ‍ॅमेझॉन-इंग्रजी पुस्तकांची मोठी दुकानं नसलेल्या काळात) हे आपण वाचलं ते काय होतं याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला आणि मला लवक्राफ्टचा शोध लागला. कथुलू हे समुद्राखाली तात्पुरत्या मृतावस्थेत राहणारं, आणि ग्रहताऱ्यांची अनुकूल स्थिती येताच पुन्हा पृथ्वीचा ताबा घेण्यासाठी पुढे सरसावणारं महाकाय दैवत, हे मुळात उतरलं लवक्राफ्टच्या लेखणीतून. कॉस्मिक हॉरर या भयसाहित्यातल्या नव्या उपप्रकाराचा त्याने शोध लावला आणि थोडं भय, थोडं विज्ञान, थोडं तत्त्वज्ञान यांना एकत्र करत मानवाच्या आकलनाबाहेरच्या (आणि कधी मितीबाहेरच्याही) दैवतांच्या कहाण्या लिहिल्या. या कहाण्यांत मानवी व्यक्तिरेखांचा दृष्टिकोन तर असायचा, पण हतबल अवस्थेत होईल ते पाहणं यापलीकडे त्यांना बहुधा स्थान नसायचं. या कथासाहित्याचा लवक्राफ्टच्या मृत्यूनंतर ताबा घेणं आणि प्रसार करणं, स्वत: तसेच इतर लेखकांकडून अशा साहित्याची निर्मिती होत राहिलसं पाहणं, आणि त्या कथाचक्राचं कथुलू मायथोज असं नामकरण करणं, या गोष्टी ऑगस्ट डल्रेथ या लवक्राफ्टच्या वर्तुळातल्या लेखकमित्राने केलं. एका परीने लवक्राफ्टला मान्यता मिळवून देणं हे मोठं काम त्याने केलं असलं, तरी त्याने या साहित्याचा एका मर्यादित चौकटीत अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. लवक्राफ्टलाही अभिप्रेत नसलेले काही अर्थ काढले, काही नियम या वैश्विक संघर्षांला लावले. या गोष्टीसाठी त्याला दोषी ठरवणाऱ्या लवक्राफ्टच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. मात्र माझ्यासारखे अनेक जण लवक्राफ्टला जिवंत ठेवण्याच्या त्याच्या प्रयत्नांमुळे लवक्राफ्टकडे वळले हेदेखील नाकारता येणार नाही.

स्वत: लवक्राफ्टवर अनेक लेखकांचा प्रभाव होता. एडगर अ‍ॅलन पो याचा तर होताच, पण फॅन्टसी वळणाच्या कथा लिहिणारे लॉर्ड डन्सेनी, आर्थर मॅकन (विशेषत: ‘द ग्रेट गॉड पॅन’ ही दीर्घकथा), रॉबर्ट चेम्बर्स (विशेषत: ‘द किंग इन यलो’ मालिकेतल्या कथा), एच. जी. वेल्स यांच्या कथांमधलं विज्ञान तसेच परग्रहवासीयांच्या पृथ्वीवरल्या हल्ल्याबद्दल असलेली कादंबरी ‘वॉर ऑफ द वल्र्ड्स’, असे अनेक लेखक आणि साहित्यकृती या प्रभावात सामील होते. लवक्राफ्टच्या कथा या केवळ कथुलू मायथॉलॉजीशी संबंधित होत्या असं नाही, तर त्यात वेगवेगळे प्रकार होते. सुरुवातीच्या काळातल्या कथा या प्रामुख्याने दोन प्रकारच्या होत्या. काही तरी भीतीदायक, अतिमानवी अस्तित्वाबद्दल असलेल्या आणि ताणाखाली असलेल्या प्रमुख पात्राकडून वदवल्या जाणाऱ्या, बऱ्याचशा पो याच्या छायेतल्या कथा- हा एक प्रकार, तर ‘ड्रीम सायकल’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या, स्वप्नसृष्टी आणि प्राचीन कथानकांवर आधारलेल्या, डन्सेनीच्या छायेतल्या कथा, हा झाला दुसरा प्रकार. पहिल्या अनेक वर्षांतलं त्याचं काम, हे या दोन प्रकारांमध्ये मोडणारंच आहे. मात्र त्याची १९२६ साली लिहिली गेलेली ‘द कॉल ऑफ कथुलू’ ही गोष्ट लवक्राफ्टला नवी दिशा दाखवणारी ठरली. इथून पुढलं त्याचं काम, हे मायथोजशी जोडलेलं आहे. ‘द केस ऑफ चार्ल्स डेक्स्टर वॉर्ड’, ‘द कलर आऊट ऑफ स्पेस’, ‘द व्हिस्परर इन द डार्कनेस’, ‘अ‍ॅट द माऊन्टन्स ऑफ मॅडनेस’, ‘द श्ॉडो ओव्हर इन्समथ’ आणि ‘द श्ॉडो आऊट ऑफ टाइम’ या सगळ्या गाजलेल्या गोष्टी त्याने आपल्या शेवटच्या दहा वर्षांत लिहिल्या.

अनेक लेखक हे आपलं एक विश्व तयार करतात आणि त्यात काम करतात. स्टीवन किंग हे यातलं अगदी अलीकडलं उदाहरण. त्याचं साहित्य हे ‘द डार्क टॉवर’ या साऱ्या अस्तित्वाच्या मुळाशी असलेल्या मनोऱ्याशी आणि त्याभोवती विविध समांतर मितींमध्ये विभागलेल्या विश्वाशी जोडलेलं आहे. डन्सेनी, चेम्बर्स यांचीही आपापली विश्वं आहेत. मात्र ही विश्वं बहुधा त्या त्या लेखकाच्या साहित्याशी जोडलेली राहतात. त्याच्या पलीकडे ती इतर कोणी वापरत नाही, आणि त्यातलं लिखाण मर्यादित राहतं. लवक्राफ्टचं असं झालं नाही, कारण त्याच्या लेखकमित्रांचा परिवार. प्रत्यक्षात एकलकोंडय़ा, कदाचित मनोविकारानेही ग्रासलेल्या (त्याच्या आई-वडिलांचा मृत्यू हा काही वर्षांच्या अंतराने, पण एकाच मनोरुग्णालयात झाला आणि लवक्राफ्टच्या डोक्याची शंकाही नेमाने घेतली जाते.) व्यक्तीचा एवढा मित्रपरिवार कसा, हा एक वेगळ्या लेखाचा विषय आहे, पण परिवार होता. त्यातल्या अनेकांशी त्याचा सततचा पत्रव्यवहार चाले. कथाविषय, साहित्य, समीक्षा, सूचना या सगळ्याबद्दल ही पत्रं असत. (यातली साडेनऊशेच्या आसपास पत्रं लवक्राफ्ट या विषयातले तज्ज्ञ मानल्या जाणाऱ्या सुनंद त्र्यंबक जोशींनी विविध संग्रहातून छापून आणली आहेत. पण एकूण आकडा लाखाच्या आसपास असल्याचं मानलं जातं. पत्रांचा आकारही विस्तृत आहे. माझ्या माहितीप्रमाणे यातलं मोठय़ात मोठं पत्र तब्बल सत्तर पानांचं आहे.) या लेखकांनी विविध स्थळं, व्यक्ती, शब्द, मंत्रोच्चार, दैवतं ही एकमेकांच्या लिखाणातून घ्यायला सुरुवात केली, आणि त्यामुळे या समविचारी, समान शैलीतल्या लिखाणाचा परीघ वाढत गेला. यातलं बरंच लिखाण कथुलू मायथोजच्या आवाक्यात येतं. लवक्राफ्ट गेल्यानंतरही हे लिखाण सुरू राहिलं. डल्रेथने त्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, पण ते फारसं जमलं नाही. आजही गूढ साहित्यप्रकाराशी संबंधित नवे-जुने लेखक मायथोजसंबंधित गोष्टी लिहिताना दिसतात.

स्वत: लवक्राफ्टचं जे लिखाण आहे, ते प्रत्यक्षात त्याच्या नावावर जे आहे, त्याहून अधिक आहे. लवक्राफ्टच्या हयातीत विअर्ड टेल्स या मासिकातून त्याच्या बऱ्याच कथा प्रकाशित झाल्या, पण त्या अनियमितपणे, आणि पुस्तकरूपात जवळपास काही नाही. त्यामुळे लवक्राफ्टला पशाची कायम चणचण असे. या परिस्थितीत अनेक लेखकांना मदत करण्याचं, कथा सुधारून देणं, कधी कधी संपूर्ण नव्याने लिहिणं या प्रकारचं बरंच काम त्याने केलं. आता जोशींनी जे काम सुरू केलंय, त्यात लवक्राफ्टला त्याच्या या लिखाणाचं श्रेयही मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. अलीकडेच ‘मेडय़ूसा’ज कॉइल अ‍ॅण्ड अदर्स’ आणि ‘द क्रॉिलग केऑस अ‍ॅण्ड अदर्स’ या दोन संग्रहांतून जोशींच्या संपादनाखाली या श्रेय हरवलेल्या कथादेखील प्रसिद्ध झाल्या आहेत. लवक्राफ्ट हे आज केवळ भयसाहित्यातलंच नाही, तर पॉप कल्चरमधलं महत्त्वाचं नाव आहे. त्याच्या अनेक साहित्यकृतींवर चित्रपट निघाले आहेत, त्यांचं ग्राफिक नॉव्हेल्समध्ये रूपांतर झालंय. एक व्यक्तिरेखा म्हणून स्वत: लवक्राफ्ट साहित्यात, ग्राफिक नॉव्हेल्स आणि चित्रपटात चमकलेला आहे. याच वर्षी प्रकाशित झालेली पॉल ल फार्ज लिखित ‘द नाइट ओशन’ ही कादंबरी लवक्राफ्टच्या आयुष्यातल्या एका घटनेभोवती फिरते, तर या वर्षांच्या शेवटी सायनाइड स्टुडिओजतर्फे येणाऱ्या ‘द कॉल ऑफ कथुलू’ या प्रसिद्ध कथेवर आधारित त्याच नावाच्या कन्सोल गेमची प्रतीक्षा जगभरातल्या सर्व गेमर्सना आहे. मृत्यूपश्चात ऐंशी वर्षांनंतर या लेखकाला आणि त्याच्या योग्यतेला साजेशी कीर्ती मिळालेली आहे. कदाचित ती योग्य वेळी मिळती, तर त्याची साहित्यनिर्मिती अधिक विस्तारू शकली असती का, या प्रश्नाचं उत्तर मात्र आज मिळणं अशक्य आहे.

 

गणेश मतकरी

ganesh.matkari@gmail.com