दिवस वावर-निर्बंधांचे, काही ठिकाणी टाळेबंदीचे आहेत. गेल्या वर्षीच्या मार्चपासूनच, म्हणजे करोनाचा कहर सुरू झाल्यापासून हे असेच सुरू आहे म्हणा. पण लहानग्यांसाठी तेव्हापासून जी शाळासुट्टी सुरू झाली, ती अजून संपलेली नाही. इथे कोणी म्हणेल, आहे की ऑनलाइन शाळा सुरू. तेही खरेच. पण प्रत्यक्ष शाळेत जायचे नाही अन् परीक्षाही नाही, म्हणजे लहानग्यांसाठी सुट्टीच. पण अशी दीर्घ सुट्टीही कंटाळवाणी वाटू शकते. नव्हे, त्या कंटाळवाणेपणाची तीव्रता आणि परिणाम सांगणारी सर्वेक्षणे, अभ्यासलेखही गेल्या सहाएक महिन्यांत खोऱ्याने प्रसिद्ध झाले आहेत. मग ही ‘सुट्टी’ कंटाळवाणी न वाटावी यासाठी काय करायचे, असाही प्रश्न अनेकांना पडला असेल. त्याचे पारंपरिक, पण सिद्ध उत्तर म्हणजे- वाचन! गेल्या मेमध्येच, म्हणजे करोनाची पहिली लाट ऐन भरात होती आणि भारतासह अनेक देश टाळेबंदीत होते, तेव्हाच ‘हॅरी पॉटर’ मालिकेच्या लेखिका जे. के. रोलिंग यांनी हे जाणले होते. लहानग्यांचे मनोविश्व त्यांना(च) नेमके कळले आहे, असे म्हणतात ते उगाच नाही! तर… या रोलिंगबाईंनी त्यांच्या नव्या पुस्तकाची घोषणा तेव्हा केली होती. ‘द ईकाबॉग’ हे त्याचे शीर्षक अन् ते त्यांच्या संकेतस्थळावर क्रमश: प्रसिद्ध होत होते. लहानग्यांनी या क्रमश: प्रसिद्ध होणाऱ्या भागांवर चित्रे काढायची आणि त्यांना पाठवायची, असे आवाहन रोलिंगबाईंनी तेव्हा केले होते. त्या चित्रांसह ते पुस्तक गेल्या नोव्हेंबरात छापील स्वरूपात प्रसिद्धही झाले. पण करोनाचा कहर काही संपलेला नाही अन् आता तर दुसऱ्या लाटेचे अक्राळविक्राळ रूप समोर येऊन ठाकले आहे.

…आणि पुन्हा रोलिंगबाईंच्या पुस्तकाची बातमी आली आहे! पुस्तक लहानग्यांसाठीच आहे. हॅचेट या प्रकाशन संस्थेकडून प्रसिद्ध होणाऱ्या या पुस्तकाचे शीर्षक आहे- ‘द ख्रिसमस पिग’! ‘हॅरी पॉटर मालिकेनंतर रोलिंग यांनी लहानग्यांसाठी लिहिलेली पहिली पूर्ण कादंबरी’ अशी या पुस्तकाची ओळख करून दिली जात आहे. पुस्तकाचा नायक आहे जॅक. त्याला प्रिय असलेले त्याच्याजवळचे ‘ड्र पिग’ अर्थात ‘डीपी’ नावाचे बाहुले हरवते. मग ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला त्याला नवीन बाहुले मिळते, तेच ‘ख्रिसमस पिग’! पण म्हणून कथा इथे संपत नाही. ‘डीपी’चा शोध घ्यायला, जॅक आणि ख्रिसमस पिग बाहेर पडतात. त्याचे पुढे काय होते, याची ही कहाणी वाचण्यासाठी मात्र १२ ऑक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागेल! तोवर ‘सुट्टी’तल्या वाचनासाठी रोलिंगबाईंची इतर पुस्तके आहेतच!