News Flash

लोकांना जे हवं, तेच!

संगणकोत्तर काळात लोक हातांतल्या स्मार्टफोनने एकमेकांशी आणि जगाशी जोडले जाताहेत.

प्रा. भरत आनंद (अगदी वर),  आणि त्यांनी पुस्तकात अभ्यासलेल्या काही कंपन्यांची बोधचिन्हे  तसेच ‘द इकॉनॉमिस्ट’साप्ताहिकाच्या   ‘हू किल्ड द न्यूजपेपर’  अंकाचे मुखपृष्ठ

संगणकोत्तर काळात लोक हातांतल्या स्मार्टफोनने एकमेकांशी आणि जगाशी जोडले जाताहेत. ही नवी समाजरचना घडत असताना तिच्या नव्या गरजा ओळखणाऱ्या कल्पना मांडणारे पुढे गेले. काही जुन्यांनी स्वतत बदल घडवला. लोकांना आत्ता नेमकं काय हवं आहे, हे जाणणंच या काळात महत्त्वाचं ठरणार आहे, असा विचार हे पुस्तक मांडतं, म्हणूनच ते नेहमीच्या यशोगाथांच्या पुढे जातं!

‘काम बोलता है’ हे कॅची घोषवाक्य घेऊन उत्तर प्रदेशची निवडणूक लढविणाऱ्या अखिलेश यादव यांचा दारुण पराभव झाला. या निवडणुकीमध्ये त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळत होते हार्वर्ड विद्यापीठाचे स्टीव्ह जार्डिग आणि योगायोगाने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांचा प्रचारसुद्धा याच जार्डिग यांनी सांभाळलेला होता. अमेरिकेतील निवडणुकीची टस्सल ऐन रंगात असतानाच जार्डिग यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत अखिलेश यादव यांचे प्रतिमावर्धन आणि प्रचाराचे काम आले. जगातील प्रसिद्ध विश्लेषकांचे अभ्यास आणि आडाखे चुकवीत डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. ट्रम्प यांच्या विजयापेक्षाही हिलरी क्लिंटन यांचा पराभव विश्लेषकांच्या अभ्यासाचे कारण बनलेला आहे. स्टीव्ह जार्डिग यांनी आखलेल्या प्रभावी आणि आशययुक्त प्रचाराचा ट्रम्प यांच्या कलुषित आणि अतिरेकी वक्तव्यांनी सहजच पराभव केला. क्लिंटन यांनी सुरुवातीला प्रचारात आघाडी घेतली असतानाही आवाजी आणि सायबर युगात मतदारांना अनेक ठिकाणी ‘टॉकिंग पॉइंट्स’ उपलब्ध करून देत ट्रम्प विजयी ठरले. हार्वर्डच्याच प्रा. भरत आनंद यांच्या पेंग्विन रॅण्डम हाऊसकडून नुकतेच प्रकाशित झालेल्या ‘द कन्टेंट ट्रॅप : अ स्ट्रॅटेजिस्टस् गाइड टू डिजिटल चेंज’ या पुस्तकातून वाचकांना या दोन्ही घटनांचा अन्वयार्थ सहज समजू शकतो.

भरत आनंद यांनी या पुस्तकामध्ये संगीतापासून ते वर्तमानपत्रापर्यंत आणि चित्रपट व जाहिरात उद्योगापासून ते शिक्षणापर्यंत विविध क्षेत्रांचा खुमासदार शैलीत वेध घेतलेला आहे. अतिशय स्पर्धात्मक काळात ‘टिकून राहणे’ हेच मोठे आव्हान असतानाही, काही उद्योगसमूह मात्र वाढतच आहेत.. आपला प्रगतीचा राक्षसी वेग टिकवून ठेवीत आहेत. याचे गमक हे त्यांच्या दर्जेदार उत्पादनाइतकेच त्यांची ग्राहकानुकूल निर्मिती आणि अतिशय कमी नफ्यावर काम करण्याच्या पद्धतीमध्ये सामावले आहे. ‘टेंसेन्ट’ ही चीनमधील सायबरच्या युगात निर्माण झालेली महाकाय कंपनी. ‘इन्स्टंट मेसेंजिंग’ने सुरुवात झालेला हा उद्योगसमूह सुरुवातीची तीन र्वष कसलाही नफा मिळवू शकला नव्हता; पण जास्तीत जास्त उपभोक्त्यांना खरेदीसाठीचे विविध प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत टेंसेन्ट ही कंपनी आंतरजालावरील जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वश्रेष्ठ व्यवसायसमूह बनली. या यशाचे गमक काय असते? आणखी एक उदाहरण- जंगल तोडण्यासाठी आलेल्या कामगारांनी टाकून दिलेल्या सिगारेटच्या तुकडय़ाने येलोस्टोनच्या जंगलाला आग लागते. या महाभयंकर आगीची दृक्-श्राव्य फीत काही वर्षांनी एकमेकांना पाठवताना आलेल्या अडचणीतून ‘पेपल’चा कर्मचारी जावेद करीम आणि त्याचे दोन सहकारी ‘यूटय़ूब’ची निर्मिती (फेब्रुवारी, २००५ मध्ये) करतात. प्रा. आनंद यांच्या मते, जंगलाला लागलेल्या आगीपेक्षाही आंतरजालावरील यूटय़ूबच्या निर्मितीचा वणवा हाच प्रचंड मोठा आहे. निर्मितीपासून आजपर्यंत- बारा वर्षांत- एक अब्जाहून अधिक व्हीडिओ त्यावर अपलोड झाले. त्यातूनच या व्यवसायसमूहाचे यश आणि ताकद आपल्याला सहज समजून येते.

प्रा. आनंद यांच्या मते, या दोन्ही उद्योगसमूहांनी आपल्या उपभोक्त्यालाच आपल्या निर्मितीप्रक्रियेत सामील करून घेतले आहे. सध्या स्टार्टअप्चे वारे सगळीकडे आहे. या संकल्पनेनुसार उभे राहिलेले कित्येक व्यवसाय हे ग्राहकांच्या गरजेसोबतच ग्राहकांच्या परस्परांच्या देवाणघेवाणीतून उभे राहत आहेत. ‘ब्ला ब्ला कार’ हे कारपूलिंगचे अ‍ॅप असेल किंवा माहितीचा स्रोत असलेले ‘क्वॉरा’ हे पोर्टल वा फेसबुक, ट्विटर किंवा व्हॉट्सअ‍ॅप, या साऱ्यांचे यश हे त्यांचा लाखो ग्राहकांशी असलेला संपर्क हेच आहे. ग्राहकांचा संपर्क आणि त्यांच्या अभिप्रायाच्या मिलाफातून अलीकडच्या काळात डिजिटल युगाच्या महाकाय दंतकथा निर्माण होत आहेत. उपभोक्त्यांशी असलेला सहज संपर्क आणि संवाद हाच यांच्या यशाचे मुख्य कारण आहे, हे ‘द कन्टेंट ट्रॅप’ वाचकांना यशस्वीपणे पटवून देते.

चित्रपटांविषयी भाष्य करताना या पुस्तकात प्रा. आनंद यांनी चित्रपटगृहांच्या उद्योगासंदर्भात अलीकडचे काही कल मांडले आहेत. अमेरिका आणि युरोपमध्ये सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहणाऱ्यांची संख्या मध्यंतरी एकदमच कमी झाली. मग जास्तीत जास्त ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी तिकिटांचे दर कमी केले जाऊ  लागले. मोठमोठाली आणि आरामदायी आसनव्यवस्था आणि सोबत ‘मोफत पॉपकॉर्न’च्या जाहिराती करण्यात आल्या, पण फारसा फायदा झाला नाही. कालांतराने काही सिनेमागृहांनी सिनेमासोबतच ‘बेबीकेअर’ सुरू केले आणि ग्राहकांचे लोंढे अशा सिनेमागृहांकडे वळू लागले. सिनेमाला येणाऱ्या प्रेक्षकांच्या वयोगटाचा अभ्यास करून त्यांच्या अडचणी सोडवण्याचे काम सिनेमागृहांनी केले आणि यासाठी त्यांनी ‘आऊटसोर्स’ हा पर्याय स्वीकारला.

फिलिप मेयर या विचारवंताने ‘द व्हॅनिशिंग न्यूजपेपर’ या पुस्तकात सन २०४३ च्या दरम्यान अमेरिकेतील मुद्रित वृत्तपत्रे संपलेली असतील, असे भाकीत केले आहे. तर २००६ साली वर्तमानपत्रांचे भवितव्यासंदर्भात ‘इकॉनॉमिस्ट’ने ‘व्हू किल्ड न्यूजपेपर?’ नावाने एक लेख प्रकाशित केला होता. एकंदरीत तो संपूर्ण काळ हा मुद्रित वृत्तपत्रांसाठी भयानक होता. ‘शिब्स्टेड’  या नॉर्वेच्या वृत्तसमूहाने २००३ च्या आसपास आपला मोर्चा ऑनलाइन व्यवहारांकडे वळवला होता. २००६ साली समूहाच्या नफ्यापैकी ३०टक्के वाटा हा ऑनलाइन व्यवहारातून आला होता, तर २०११ पर्यंत हीच संख्या ६०टक्के अर्थात २२० दशलक्ष डॉलर झाली होती. ‘जगातील सर्व महत्त्वाची मुद्रित वृत्तपत्रे अडचणीत असताना शिब्स्टेडची ही कामगिरी दुर्मीळ घटना आहे,’  असाो उल्लेख इकॉनॉमिस्टने केला.

या साऱ्या बदलांमागील घटना प्रा. आनंद यांनी २०११ च्या सुमारास युरोपातील एका आपत्तीच्या माध्यमातून उलगडल्या आहेत. २०११ च्या सुमारास युरोपमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. त्यातून सारेच जनजीवन विस्कळीत झाले होते. हवेतील धुळीमुळे युरोपातील अनेक ठिकाणी विमानाची उड्डाणे रद्द करण्यात आली होती. प्रवासाच्या भयाण समस्या निर्माण झाल्या होत्या. युरोपमधील सारीच माध्यमे फक्त बातम्या करण्याच्या पाठीमागे लागली असताना, शिब्स्टेडने त्यांच्या संकेतस्थळावरील बातम्यांच्या खाली अनेक वाचकांनी केलेल्या संवादाचे निरीक्षण केले. हे सारे संवाद एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासंदर्भात होत होते. लोक एकमेकांना त्या संदेशांच्या माध्यमातून मदत करीत होते. कारपूलिंग सुरू होते. शिब्स्टेडच्या तंत्रज्ञ मंडळींनी एका रात्रीत हिचहायकर्स सेंट्रल (Hitchhiker’s Central) हा अ‍ॅप तयार केला. या अ‍ॅपच्या माध्यमातून हजारो लोक एकमेकांशी संपर्क करू लागले. संवाद सुरू झाला आणि एकमेकांच्या गरजा लक्षात घेऊन लोक आपल्या प्रवासाची तयारी करू लागले. अशा प्रकारे या माध्यमाने वाचकांना बातमी पोहोचवीत असताना वाचकांच्या अडचणींवर उपाय शोधण्यासाठी एक लोकसंवादाचा पूल बांधला आणि त्यातून निर्माण झालेली संधी त्याच्या निव्वळ  नफ्याला २२० दशलक्ष डॉलपर्यंत घेऊन गेली.

एकीकडे जास्तीत जास्त वाचकाभिमुख होत असताना बदलाला नकार कसा द्यावा आणि तेच आपली ताकद कशी बनवावी याचे उत्तम उदाहरण म्हणून इकॉनॉमिस्ट या जगप्रसिद्ध माध्यमाची कथा प्रा. आनंद मांडतात. ‘तुम्ही बातमी पाहिली, आता त्यातील कथा शोधू या’ असे आवाहन करीत ‘ब्रेकिंग न्यूज’च्या जमान्यात इकॉनॉमिस्ट हे जगातील सर्वात मोठे आणि विश्वसनीय माध्यमसमूह म्हणून टिकून आहे. मागच्या पंधरा वर्षांत त्यांच्या वितरणात दोन पटीने, तर नफ्यामध्ये २५ टक्के एवढी वाढ झाली.

बदलांचे दडपण घेऊन फक्त नक्कल करू पाहणारे यशस्वी ठरू शकत नाहीत, हे प्रा. आनंद ठामपणे सांगतात. डिजिटल युगाच्या काळात दंतकथा ठरू शकतील अशा यशस्वी उद्योगसमूहांचे विविध पातळ्यांवर ‘डिसेक्शन’ करीत प्रा. आनंद यांनी माध्यमांपासून ते शिक्षणापर्यंत अनेक उद्योगधुरिणांना उपयोगी पडेल, अशा पुस्तकाची निर्मिती केली आहे. हार्वर्ड विद्यापीठाच्या ‘ऑनलाइन एज्युकेशन’अंतर्गत अभ्यासक्रम राबवीत असताना आलेल्या अनुभवांतून त्यांनी भविष्यातील शिक्षणव्यवस्थेचे एक भव्य स्वरूप उभे केले आहे. ग्राहकाच्या किंवा उपभोक्त्याच्या संपर्कावर भर देत असताना ‘द कन्टेंट ट्रॅप’मध्ये प्रा. आनंद कुठेही आशयाला किंवा दर्जेदार उत्पादन-निर्मितीला कमी लेखत नाहीत. त्यांच्या मते, बदलत्या काळात जर यशस्वी व्हायचे असेल, तर फक्त या पारंपरिक गोष्टीवर अवलंबून राहता येणार नाही. हा ‘डिसरप्टिव्ह’चा जमाना आहे. ‘अ‍ॅपल’सारख्या किंवा गुगलसारख्या उत्कृष्ट उत्पादनालाही दररोज ‘रिलेव्हन्ट’ किंवा ग्राहकाभिमुख राहण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, यातच संपर्काचे महत्त्व विशद होते.

‘ग्राहक, उत्पादन आणि कार्यात्मक पद्धतीने निर्माण झालेला संपर्क’ ही त्रिसूत्री  तर प्रा. आनंद यांनी केली आहेच; पण पुस्तकाच्या शेवटच्या भागात ते- ‘प्रत्येक माणूस हा माध्यम झाला आहे,’ असे विधान करतात. अलीकडे निवडणुकीच्या निकालांपासून वापरलेल्या उत्पादनावर बेधडक प्रतिक्रिया देणाऱ्या ग्राहकांपर्यंत प्रत्येक ठिकाणी माणूस नावाची माध्यमसंस्था अस्तित्वात आलेली दिसते. डिजिटलच्या निळ्या आभाळाशी जगाचा लंबक हा ‘कन्टेन्ट’कडून ‘कनेक्शन्स’कडे सरकत असताना ‘द कन्टेन्ट ट्रॅप’मधील प्रा. आनंद यांचा विचार नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे.

  • द कन्टेंट ट्रॅप – अ स्ट्रॅटेजिस्टस् गाइड
  • टु डिजिटल चेंज
  • लेखक : भरत आनंद
  • प्रकाशक : पेंग्विन रँडम हाऊस
  • पृष्ठे : ४६४, मूल्य : (हार्डकव्हर : १०३१ रु., पेपरबॅक : ३५९ रु., किंडल : ३४१ रु.)

 

सुशीलकुमार शिंदे

shinde.sushilkumar10@gmail.com

लेखक एका खासगी कंपनीच्या वितरण विभागात कार्यरत असून त्यांचा एक काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 2:35 am

Web Title: the content trap bharat anand
Next Stories
1 उफाडा ओसरल्यावर..
2 ‘खुलाशा’नंतरही उरणारं पुस्तक..
3 चौथी औद्योगिक क्रांती
Just Now!
X