22 October 2019

News Flash

डार्विनची ‘अर्थ’दृष्टी!

प्रिन्स्टन विद्यापीठाने २०११ मध्ये प्रथम प्रकाशित केले असले तरी भारतात ते २०१८ मध्ये उपलब्ध झाले.

संजीव चांदोरकर

‘उत्पादकांमधील अनिर्बंध स्पर्धेमुळे समाजाचेच हित होत असते’ या लोकप्रिय केल्या गेलेल्या प्रमेयाला उत्क्रांतिवादाचा जनक चार्ल्स डार्विनच्या सिद्धांताचा दाखला देत निर्णायक आव्हान देऊ पाहणाऱ्या पुस्तकावरील हे टिपण..

व्यक्तींना आपापले आर्थिक हित साधण्यासाठी अनिर्बंध स्वातंत्र्य देण्यातून एकूण समाजाचेच भले होते, हा अ‍ॅडम स्मिथचा (१७२३-१७९०) सिद्धांत. तर उत्क्रांतिवादाचा प्रणेता चार्ल्स डार्विन (१८०९-१८८२) सांगतो की, निसर्गात जे एखाद्या प्राण्याच्या हिताचे असते ते दीर्घकाळात त्या प्राण्याच्या प्रजातीच्या हिताला छेद देणारे सिद्ध होऊ  शकते. रॉबर्ट फ्रँक यांनी त्यांच्या ‘द डार्विन इकॉनॉमी’ या पुस्तकात असे प्रतिपादन केले आहे की, २१ व्या शतकातील जागतिक भांडवलशाहीचे पुर्नसघटन करण्यासाठी अ‍ॅडम स्मिथचीच नव्हे, डार्विनचीही अंतर्दृष्टी साहाय्यक ठरू शकेल.

नाही, पुस्तकाचे वा लेखाचे शीर्षक चुकलेले नाही; ते बरोबरच आहे.

१९ व्या शतकातील चार्ल्स डार्विन सर्व जगात उत्क्रांतिवादाचा जनक म्हणून ओळखला जातो. त्याच्या वैचारिक कामाचा अर्थशास्त्राशी वरकरणी काहीही संबंध नाही. पण समाजव्यवस्था व अर्थव्यवस्था या मानवनिर्मित विचारव्यूहांवर बेतलेल्या असतात. असे होऊ  शकते की, एका क्षेत्रातील विचारव्यूह दुसऱ्या क्षेत्राला चपखलपणे लागू होऊ  शकतो.

डार्विनने दिलेली जीवसृष्टीसंबंधित अंतर्दृष्टी भांडवलशाही अर्थव्यवस्थेसाठी मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन रॉबर्ट फ्रँक या अर्थतज्ज्ञाने ‘द डार्विन इकॉनॉमी’ या पुस्तकात केले आहे. ‘स्वातंत्र्य, स्पर्धा आणि सामाईक साधनसामग्री’ हे पुस्तकाचे उपशीर्षक लेखकाला पुस्तकात काय म्हणायचे आहे, ते सांगते. प्रिन्स्टन विद्यापीठाने २०११ मध्ये प्रथम प्रकाशित केले असले तरी भारतात ते २०१८ मध्ये उपलब्ध झाले. हे २५० पृष्ठांचे पुस्तक ऑनलाइनदेखील उपलब्ध आहे

कॉर्नेल विश्वविद्यालयात अर्थशास्त्राचे अध्यापन करणारे रॉबर्ट फ्रँक ‘न्यू यॉर्क टाइम्स’चे स्तंभलेखक आणि अर्थशास्त्रावरील काही गाजलेल्या पुस्तकांचे लेखकदेखील आहेत. अलीकडे ‘माणसाच्या वर्तणुकीच्या भिंगातून’ अर्थव्यवस्थेतील घडामोडी समजून घेण्याचे शास्त्र- ‘बिहॅविरल इकॉनॉमिक्स’- विकसित होत आहे. रॉबर्ट फ्रँक या विषयातदेखील काम करतात.

फ्रँक यांनी मुख्य प्रवाहातील बऱ्याच आर्थिक विचारांचा ऊहापोह केला आहे. पण ते डार्विन प्रमेयांच्या साहाय्याने मुख्यत्वे अ‍ॅडम स्मिथ आणि अलीकडच्या काळातील ‘अतिरेकी बाजारवादी (लिबर्टरियन्स)’ या दोन परस्परपूरक विचारसरणींना भिडू पाहतात. पुस्तकातील सारी उदाहरणे, आकडेवारी, राजकीय निर्णय, त्यांचे नागरिकांवर झालेले परिणाम अमेरिकेतील आहेत. भारतासारख्या गरीब देशात ते तंतोतंत लागू होणार नाहीत कदाचित; पण अमेरिकी अर्थव्यवस्थेला निर्णायक आकार देणाऱ्या अर्थशास्त्रातील विचारव्यूह, संकल्पना भारतासकट जगातील सर्वच देशांतील ‘ओपिनियन मेकर्स’वर प्रभाव पाडून असतात. त्या अर्थाने या पुस्तकाचे महत्त्व आहेच.

स्मिथ आणि डार्विन

अ‍ॅडम स्मिथ हा नवउदारमतवादाचा गुरू, तर चार्ल्स डार्विन हा उत्क्रांतिवादाचा जनक. स्मिथचा ‘वेल्थ ऑफ नेशन्स’ आणि डार्विनचा ‘ओरिजिन ऑफ स्पेसीज्’ हे ग्रंथ म्हणजे त्या- त्या विषयांतील मैलाचे दगड. दोघेही स्पर्धेबद्दल बोलतात. स्मिथ अर्थव्यवस्थेतील स्पर्धेबद्दल, तर डार्विन प्राणिजगतातील.

‘स्वहिताला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या एका व्यक्तीच्या नफा कमावण्याच्या ईर्षेमुळे अर्थव्यवस्थेतील उपलब्ध साधनसामग्रीचे अधिक कार्यक्षमपणे वाटप होते. समाजाला लागणाऱ्या वस्तुमाल-सेवांचे वाजवी उत्पादन खर्चात मुबलक उत्पादन होऊ  लागते. त्यातून उत्पादनात पुढाकार घेऊन नफा कमावणाऱ्या उद्योजकांचेच नव्हे, तर सर्व समाजाचे आर्थिक हित साधले जाते. मात्र, त्यासाठी ‘मार्केटचा अदृश्य हात’ सतत फिरता राहणे, शासनाने त्यात कोणताही अडथळा न आणणे ही पूर्वअट असेल’.. ढोबळमानाने स्मिथची अशी मांडणी आहे.

तर डार्विनच्या मांडणीनुसार, लाखो वर्षांच्या उत्क्रांतीत, जगण्याच्या संघर्षांत टिकून राहण्यासाठी वनस्पती, प्राण्यांना सतत संघर्षरत राहावे लागले. ‘जिंकण्या’साठी त्यांना काही गुण आत्मसात वा स्वत:त ‘बदल’ करावे लागले. जे यशस्वी झाले ते तगून राहिले. हरले ते कायमचे नामशेष झाले. मुद्दा फक्त विशिष्ट प्राणी तगून राहण्याचा नव्हता, तर त्या प्राण्याची प्रजाती टिकण्याचा होता.

प्रजाती तेव्हाच टिकू शकणार होत्या, जेव्हा आधीच्या पिढय़ांनी कमावलेले गुण वा सामर्थ्य नवीन पिढय़ांमध्ये संक्रमित होणार होते. इथे सामर्थ्यवान नराचे बीज गर्भारक्षम माद्यांनी धारण करण्याला महत्त्व प्राप्त झाले. सामर्थ्यवान नर जास्तीत जास्त माद्यांना आकर्षित करण्यासाठी इतर नरांबरोबर स्पर्धा करू लागले. स्पर्धा जिंकण्यासाठी इतर नरांच्या तुलनेत अधिक सामर्थ्य कमावू लागले. याला डार्विनचा ‘नैसर्गिक निवडीचा सिद्धांत’ म्हटले जाते. पण डार्विननेच या सिद्धांताच्या मर्यादादेखील दाखवून दिल्या आहेत. त्याबद्दल खाली येईलच.

अतिरेकी बाजारवादी व डार्विन

अ‍ॅडम स्मिथच्या ‘मार्केटच्या अदृश्य हाता’च्या सिद्धांताचा हात धरून, गेल्या काही दशकांत अतिरेकी बाजारवाद्यांनी टोकाची मांडणी करायला सुरुवात केली.

‘समाज सुटय़ा सुटय़ा व्यक्तींचा बनलेला असतो. अशा व्यक्तींना आपले आर्थिक व्यवहार करण्याचे अनिर्बंध स्वातंत्र्य असले पाहिजे. आपल्या भल्यासाठी काय चांगले, काय वाईट हे ठरवण्याची कुवत प्रत्येकात असते. एखाद्यात ती कुवत नसेल, तर नुकसान झाल्यावर तो शहाणा होईल. नाहीच झाला आणि उद्ध्वस्त जरी झाला, तरी इतरांनी त्याची काळजी घेण्याचे काहीच कारण नाही’.. असे काहीसे त्यांचे तत्त्वज्ञान आहे.

लिबर्टरियन्स हे ‘बाजारशक्ती हव्यात’ एवढेच मांडून थांबत नाहीत, तर ‘शासनच नको’ अशी भूमिका घेतात. अर्थव्यवस्थेत नियामक मंडळे, करआकारणी, शासकीय हस्तक्षेप काही म्हणजे काही नको; कर म्हणजे तर मानवी स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे, असे ते मानतात. मार्केटच्या स्वत:च्या चुका स्वत: सुधारण्याच्या क्षमतेवर त्यांचा अतिविश्वास आहे.

फ्रँक हे डार्विनच्या मांडणीच्या मदतीने अतिरेकी बाजारवाद्यांचा प्रतिवाद करतात. डार्विनच्या मांडणीप्रमाणे स्वत:त परिस्थितीला अनुकूल बदल करणाऱ्या प्राण्यांचा फायदा नक्कीच होतो. पण पिढय़ांमागून पिढय़ा होणारे हे बदल दीर्घकालीन कालपट्टीवर बघितले, तर निष्कर्ष वेगळे निघू शकतात. त्याचप्रमाणे लिबर्टरियन्स मांडतात तसे अनिर्बंध आर्थिक स्वातंत्र्यामुळे काही आर्थिक ‘एजंटां’चा अल्पकाळात भरपूर फायदा होत असेल. पण दीर्घकालीन चित्र वेगळे असते.

अतिरेकी बाजारवादी सामुदायिक कृती वा समाजातर्फे शासनाने केलेला हस्तक्षेप महापाप समजतात. पण फ्रँक हे दाखवून देतात, की वातावरणातील बदल सामुदायिक कृतीद्वारेच होऊ  शकतो वा वित्त भांडवलाच्या अतिरेकामुळे अर्थव्यवस्थेत तयार होणाऱ्या अस्थिरतेला पायबंद शासकीय हस्तक्षेपामुळेच बसू शकतो.

मांडणीची उपयुक्तता

डार्विनचा हवाला देत फ्रँक बारशिंग्या या हरीण प्रजातीतील प्राण्याची कुळकथा सांगतात. बारशिंग्याचा केसस्टडी लेखकाच्या मांडणीच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळेच त्यांनी पुस्तकाच्या मुखपृष्ठावर लढाईच्या पवित्र्यातील दोन बारशिंग्यांचे छायाचित्र योजले आहे.

बारशिंग्याच्या डोक्यावर कपाळाच्या दोन्ही बाजूंना वेडीवाकडी वाढलेली शिंगे असतात. ती अधिक जाडजूड, उंच यावीत अशी नराची अंगभूत प्रेरणा होती. बाहेरच्या शत्रूंशी लढण्यासाठी नव्हे, तर माद्यांना जिंकून घेण्यासाठी, आपल्या प्रतिस्पर्धी नराला घायाळ करण्यासाठी. लाखो वर्षांच्या उत्क्रांतीत ही शिंगे वाढली व वजनदार झाली. अमेरिकेतील बारशिंग्याच्या एका प्रजातीत शिंगे चार फूट उंच व २० किलो वजनाची आहेत.

अशा शिंगांच्या सामर्थ्यांवर बारशिंगे प्रतिस्पर्धी नरांना नामोहरम करू लागले. त्या प्रजातीतील माद्या त्यांना वश होऊ  लागल्या. पुढच्या पिढीतील बारशिंग्यांची शिंगे आणखी ताकदवान होऊ  लागली. पण पाणी आणि अन्नाच्या शोधात जंगलात फिरताना आता हीच शिंगे त्यांचा कर्दनकाळ ठरू लागली. झाडात शिंगे अडकू लागल्यामुळे इतर हिंस्र प्राण्यांच्या भक्ष्यस्थानी हे ‘हिरो’ बारशिंगे पडू लागले. परिणामी प्रजातीची संख्या रोडावू लागली.

हीच अंतर्दृष्टी वापरून फ्रँक कॉर्पोरेट भांडवलशाहीतील अनेक प्रचलित व्यवहारांची चिरफाड करतात. वस्तुमाल व सेवांच्या बाजारातील मार्केटच्या अदृश्य हातामुळे उत्पादकांमधील स्पर्धा वाढली, उपभोक्त्यांना स्वस्तात माल मिळू लागला हे खरे. पण एकमेकांना ‘अंडरकट’ करताना उत्पादकांनी विवेकाची सीमारेषा ओलांडल्यामुळे भांडवलशाही प्रणालीच धोक्यात आली. पुष्टय़र्थ त्यांनी दोन उदाहरणे दिली आहेत. एक कामगारांच्या वेतनाचे व दुसरे पर्यावरणाच्या हानीचे.

स्पर्धकापेक्षा कसाही करून उत्पादन खर्च कमी ठेवण्यासाठी भांडवलशाहीत कामगारांना कमीत कमी वेतन देण्यात येऊ  लागले. पण तोच कामगार अर्थव्यवस्थेतील ग्राहकदेखील असतो. त्याची क्रयशक्ती त्याच्या वेतनातूनच येत असते. कमी वेतन, कमी क्रयशक्ती, मालाला कमी मागणी, कुंठित अर्थव्यवस्था अशा दुष्टचक्रात भांडवलशाही प्रणाली सापडली.

तीच गोष्ट पर्यावरणाची. पर्यावरणाची कमीत कमी हानी करायची असेल, तर उत्पादकांना बराच भांडवली व महसुली खर्च करण्याची गरज असते. पण स्पर्धेत टिकायचे, तर हे खर्च टाळण्याकडे उत्पादकांची प्रवृत्ती वाढत गेली. परिणामी जमीन, हवा, पाणी वेगाने प्रदूषित होऊ  लागले आहेत. निसर्गचक्र कोलमडत आहे. भांडवलशाहीचाच नव्हे, तर मानवी अस्तित्वाचा भौतिक पाया उखडला जात आहे.

उत्पादकांच्या नफ्याच्या अनिर्बंध हव्यासापोटी सामायिक सुविधांची शोकांतिका झाल्याचे फ्रँक दाखवून देतात. त्यासाठी अमेरिकेतील मासेमारीच्या धंद्यात मोठी कॉर्पोरेट्स यांत्रिक बोटी घेऊन उतरल्यामुळे सर्वच मासेमारी कंपन्यांना मासे कसे कमी मिळू लागले, याचे उदाहरण बोलके आहे. वित्तीय क्षेत्रातील फंड मॅनेजर्सच्या गुंतवणुकीबद्दलही तेच. एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील गुंतवणुकीवर खूपच आकर्षक परतावा मिळतोय असे समजल्यावर त्या क्षेत्रातील शेअर्समध्ये अवाजवी गुंतवणूक होऊ  लागते. शेअर्सचे भाव अवाजवी पातळीवर पोहोचतात आणि एक दिवस काही कारणाने कोसळतात.

मांडणीच्या मर्यादा

डार्विनने पुरवलेल्या अंतर्दृष्टीचा बाजाराधारित भांडवलशाहीच्या पुनर्रचनेसाठी उपयोग होईल, असे जोरदार प्रतिपादन करणाऱ्या या पुस्तकाच्या काही मर्यादा जाणवल्या.

२०११ सालात प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाने २००८ मधील अमेरिकेतील वित्तीय अरिष्टाची चर्चा केली आहे. पण सत्तरच्या दशकापासून राष्ट्रा-राष्ट्रांतील आंधळ्या स्पर्धेवर आधारित जागतिक भांडवलशाहीच्या प्रचलित प्रारूपाला गंभीर आव्हाने २०११ नंतरच मिळू लागली आहेत. ब्रेग्झिट, ट्रम्प यांचे ‘अमेरिका फर्स्ट’ व छेडलेली व्यापारयुद्धे, त्यास मिळणाऱ्या साखळी प्रतिक्रिया, जागतिक व्यापार संघटनेची हतबलता, स्थलांतरितांविरुद्धचा असंतोष आणि सर्वात गंभीर म्हणजे- उजव्या फॅसिस्ट राजकीय शक्तींनी व्यापलेला अवकाश! हे सारे म्हणजे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ प्रकारात मोडू शकते. लेखकाला अर्थातच या घडामोडींचा अंदाज आलेला नव्हता.

त्याशिवाय पुस्तकाच्या संकल्पनात्मक चौकटीतदेखील खोट आहे. प्राणिजगतात एकाच प्रजातीत सामर्थ्यवान व कमकुवत प्राणी असतात. नैसर्गिक निवडीच्या तत्त्वानुसार सामर्थ्यवान नर जिंकतात. माणसांचे समाज व आधुनिक भांडवलशाही अर्थव्यवस्था प्राणिजगताच्या काहीपट गुंतागुंतीच्या आहेत.

मानवी समाज वर्गावर्गात विभागलेले आहेत. उच्च वर्गातील व्यक्तींकडे गोळा झालेली सर्व प्रकारची ताकद कल्पनातीत आहे. या व्यक्ती ‘व्यक्ती’ म्हणूनच नव्हे, तर ‘वर्ग’ म्हणूनही आपापले आर्थिक हितसंबंध वाढवतात. प्राणिजगतात सर्व सामर्थ्यवान प्राणी एकत्र येऊन आपल्याच प्रजातीतील कमकुवत प्राण्यांविरुद्ध आघाडी उघडत नाहीत.

दुसरा महत्त्वाचा फरक आहे शासनसंस्थेचा. भांडवलशाहीत उत्पादकांमधील स्पर्धा निर्वात पोकळीत घडत नसते. त्याला कायद्यांची अधिमान्यता असते. राजकीय व्यवस्थेने हस्तक्षेप करणारा कायदा करण्यासाठी दिलेला नकार हादेखील एक निर्णयच असतो. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाकडे न्यायालये, दंडसत्ता, तुरुंग असे बरेच काही असते. प्राणिजगतात अशी शासनसंस्था अस्तित्वात नसते.

फ्रँक हे बाजारातील अस्वीकारार्ह आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण नको, असे ठासून सांगतात. त्याऐवजी अशा व्यवहारांवर जबरी कर (सिन टॅक्स) आकारण्याची शिफारस करतात. जबरी कर आकारणीतून शासनाकडे भरभक्कम पैसे गोळा होतील, त्यातून सरकारच्या डोक्यावरील कर्जे फेडता येतील, लोककल्याणकारी योजना राबवता येतील, अशी त्यांची सरधोपट मांडणी आहे.

कोणतीही करप्रणाली अमलात आणली तरी ती कोणी तरी लिहावी लागते, मंजूर करावी लागते, मंजूर करणाऱ्याला समाजाने मान्यता द्यावी लागते, अंमलबजावणी करणारी यंत्रणा लागते. या सगळ्याच्या काही किमती आहेत आणि अंमलबजावणीतही समस्या येऊ  शकतात. या सत्याकडे मात्र फ्रँक डोळेझाक करतात.

असे असले तरी, ‘उत्पादकांमधील अनिर्बंध स्पर्धेमुळे समाजाचेच हित होत असते’ या लोकप्रिय केल्या गेलेल्या प्रमेयाला डार्विनच्या सिद्धांताचा दाखला देत निर्णायक आव्हान देण्याचे काम या पुस्तकाने केले आहे, असे म्हणता येईल!

‘द डार्विन इकॉनॉमी’

लेखक : रॉबर्ट फ्रँक

प्रकाशक : प्रिन्स्टन प्रेस

पृष्ठे: २४०, किंमत : १,१२२ रुपये

chandorkar.sanjeev@gmail.com

First Published on June 29, 2019 2:02 am

Web Title: the darwin economy liberty competition and the common good book review