ब्रिटिश – भारतीय कादंबरीकार आणि निबंधकार म्हणून ओळखले जाणारे सलमान रश्दी यांना ‘मिडनाइट्स चिल्ड्रन’ (१९८१) या त्यांच्या दुसऱ्या कादंबरीसाठी बुकर पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांचे सुरुवातीचे अधिकतर लेखन हे भारत आणि भारतीय उपखंड यांवर आधारित आहे. पौर्वात्य-पाश्चात्त्य देशांतील परस्पर संबंध, देशांतर हे रश्दी यांच्या कादंबरी लेखनातील प्रमुख विषय आहेत. तसेच ऐतिहासिक कल्पनांशी संबंधित मांडलेला ‘जादूई वास्तववाद’ असे त्यांच्या शैलीचे जे वर्णन केले जाते, त्याचा प्रत्यय त्यांच्या नव्याकोऱ्या ‘द गोल्डन हाऊस’ या कादंबरीतून प्रकर्षांने येत राहतो. रश्दी यांची ही १३ वी कादंबरी. ही कादंबरी म्हणजे आधुनिक काळातील एक नाटय़मय थरार आहे. विशेष म्हणजे, या कादंबरीचे कथानक मुंबई-न्यू यॉर्क या शहरांत आकारास येते. मुंबईतील एक अतिश्रीमंत कुटुंब कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. मुंबईतील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर आपला देश सोडून जावे लागलेल्या या कुटुंबाभोवती गुंफलेले या कादंबरीचे कथानक सध्याच्या जागतिक स्तरावरील राजकीय-सांस्कृतिक परिस्थितीचा चिकित्सक वेध घेणारे आहे. मुंबई सोडून हे कुटुंब आपली ओळख लपवत न्यू यॉर्क शहरात राहायला आले आहे. भूतकाळात आपल्या कुटुंबावर झालेले आघात विसरत, सावरत आपले नवीन जग शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या अर्थी ही कादंबरी म्हणजे २६/११च्या आधी आपण कुठे होतो, आज कुठे आहोत आणि इथवर कसे पोहोचलो याचा शोध आहे.

सन २००८ साली अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या सत्ताग्रहण कार्यक्रमाच्या पाश्र्वभूमीने सुरू झालेले या कादंबरीचे कथानक आठ वर्षांनंतर स्वतला ‘जोकर’ म्हणवणारा उमेदवार राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येतो या घटनेपर्यंत येऊन थांबते. या दरम्यान ‘द गोल्डन हाऊस’ या भव्य महालात राहायला आलेल्या एका असाधारण कुटुंबाची विक्षिप्त, अनाकलनीय घटना-प्रसंगांनी गुंफलेली शोकात्मकथा आपल्यासमोर उलगडत जाते.

कादंबरीतील निरो गोल्डन याच्या संपन्न कुटुंबाला आपल्या मातृभूमीचा त्याग करावा लागला आहे. कुटुंबातील सदस्यांची खरी ओळख लपवण्यासाठी नावे बदलून हे कुटुंब अमेरिकेतल्या न्यू यॉर्क शहरात वास्तव्याला येते. मोठा मुलगा पेट्रोनियसचे नवे नाव ‘पेटय़ा’, लुसियस आपुलीस याचे ‘अपू’, डिओंयसिसचे ‘डी’, तर स्वत: कुटुंबप्रमुख ‘निरो’ असे नाव धारण करतो. या कुटुंबाचा एकूणच विक्षिप्तपणा निरोच्या शेजारी असलेल्या रेने नावाच्या चित्रपटकर्त्यांला आकर्षित करतो. आपल्या चित्रपटासाठी हे कुटुंब अगदी योग्य ‘विषय’ आहे असे त्याला वाटू लागते. आणि मग रेने गोल्डन कुटुंबातील अगदी लहानसहान हालचालींच्या आधारे आपल्या कल्पनेने, स्वतच्या- चित्रकर्त्यांच्या- दृष्टिकोनातून, कधी मित्र तर कधी हेर बनून या कुटुंबाचे निरीक्षणात्मक तपशील नोंदवण्यास सुरुवात करतो.

नव्या शहरात प्रस्थापित होण्यासाठी संघर्ष करणारे गोल्डन कुटुंबीय थोडय़ा अवधीतच न्यू यॉर्कमध्ये आपले यशस्वी बस्तान बसवितात. मात्र चित्रकर्ता रेने दुसऱ्याच्या आयुष्यात कुतूहलाने डोकावून बघण्याचा शेजारधर्म(!) पाळत आपल्या निरीक्षणांतून व कल्पनेने या ओळख लपवणाऱ्या कुटुंबाचे पूर्वायुष्य उकरून काढतोच. न्यू यॉर्क शहरातील गोल्डन कुटुंबाची अतिश्रीमंत जीवनशैली, कला- फॅशन, भावंडांतील भांडणे, अनाकलनीय वर्तनबदल, वसालीसा या सुंदर रशियन स्त्रीचे आगमन, नात्यातील विश्वासघात आणि खून.. अशा घटना-प्रसंगांच्या आधारे घडत गेलेल्या नाटय़ाचा थरार रेने मांडतो. या नाटय़ाच्या अधेमधे साहित्य, पॉप संस्कृती आणि सिनेमा यांचे संदर्भही रश्दी यांनी पेरले आहेत. त्यातून मागील आठ वर्षांत अमेरिकेतील आर्थिक मंदी, कर्जतारण बाजारपेठेत उद्भवलेले पेचप्रसंग, बेरोजगारी, दहशतवाद, बर्थर चळवळीचा उद्रेक, उफाळून आलेला राष्ट्रवाद अशा विविध समस्यांतून आकारास आलेली अमेरिकन समाजाची नव-मनोव्यवस्था अधोरेखित होते.

‘द गोल्डन हाऊस’ ही कादंबरी म्हणजे कौशल्याने रचलेले, अनेक लोकांच्या जीवनाचे, ‘एका गोष्टीत आणखी एक गोष्ट’ अशा प्रकारचे रहस्यमय नाटय़ आहे. कुटुंबप्रमुख निरो गोल्डन यांची तीन मुले ही अनन्यसाधारण अशी व्यक्तिमत्त्वे आहेत. त्यातील पेटय़ाला गर्दीची भीती आहे. तो सतत स्वतला खोलीत कोंडून घेतो. आत्मकेंद्रित असलेला पेटय़ा संगणकासमोर बसून सारखा व्हिडीओ गेम खेळत असतो. दुसरा मुलगा- अपूला अध्यात्माचे वेध लागले आहेत. तो साधक आहे आणि उपजतच उत्कृष्ट असा चित्रकार आहे. मातृभूमीपासून पलायन करावे लागल्याचे आंतरिक दुख अपूला सतावत असते. त्यामुळे त्याला आपल्या जन्मभूमीची विलक्षण ओढ लागली आहे. तर तिसरा मुलगा- डी स्वतच्या स्त्री वा पुरुष असण्याविषयी साशंक आहे.

कादंबरीतील आणखी एक महत्त्वाचे पात्र म्हणजे रेने. हा गोल्डन कुटुंबीयांचा शेजारी. रेने आपली प्रेयसी सुचित्राबरोबर माहितीपट आणि जाहिरात बनविण्याचे काम करतो. चित्रपट बनवण्यासाठी त्याच्या शेजारी राहणारे गोल्डन कुंटुंब त्याला योग्य विषय वाटतो. प्रेयसी सुचित्रा त्याला सांगते, ‘खऱ्या गोष्टी माहीत होणार नसतील तर तुझ्या कल्पनेने लिही.’ मग रेने या कुटुंबाशी जवळीक साधून, कधी हेरगिरी करून त्यांची माहिती काढण्याचा प्रयत्न करतो. आणि एकापाठोपाठ एक घडणाऱ्या घटनांतून उलगडत जाणाऱ्या नाटय़ात रेने त्याच्या नकळत केंद्रस्थानी जाऊन पोहोचतो. या कुटुंबात घडणाऱ्या घटनांकडे चित्रपटाची कथावस्तू म्हणून पाहणारा रेने स्वतच्या कल्पनेने, कॅमेऱ्याच्या दृष्टीतून एक एक घटना गुंफत कथानक रचत राहतो. जे प्रसंग गुप्त ठेवावेसे वाटतात तेव्हा ‘कट’, ‘ब्लॅकआऊट’ म्हणत जे सांगू नये ते  काही तरी गुप्त ठेवत असल्याचा आव मात्र आणतो. परंतु त्या त्या घटनेचे दृश्य स्पष्टपणे उभे राहते. अनेक चित्रपटांतील दृश्यांच्या,  विविध मिथक कथांच्या संदर्भाने एका रहस्यमय नाटय़ाचा उलगडा होत राहतो.

निरो गोल्डन आपल्या तिन्ही मुलांना आपण कुठून आलो, आपला भूतकाळ कोणालाच सांगू नका असे सांगून न्यू यॉर्क शहरातील ‘द गोल्डन हाऊस’ या भव्य महालात मागे मोठा भूतकाळ सोडून राहायला येतो. मात्र भूतकाळ लवकरच त्यांचा पाठलाग करू लागतो. अवैध मार्गाने कमावलेली संपत्ती, भ्रष्ट- वाईट संगत, मुंबईतील अधोविश्वाशी असलेला संबंध, विवाहबाह्य़ संबंध असा इतिहास असलेल्या गोल्डन निरोचा प्रवास पुढे गोल्डन हाऊसमधील वास्तव्यापासून शोकांतिकेपर्यंत होत जातो. मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात निरोची पत्नी मरण पावते. त्याची दुखद छाया कुटुंबातील प्रत्येकावर आहे. निरो म्हणतो, ‘मी एक साप आहे आणि कात टाकण्यासाठी इथे आलो आहे.’ आणि त्याप्रमाणे नव्या शहरात भूतकाळ-ओळख लपवत नवीन चकचकीत आयुष्य तो जगू लागतो. त्यातच वसालीसा या सुंदर रशियन स्त्रीच्या प्रेमात पडतो आणि वृद्धापकाळात तिच्याशी लग्न करतो. वसालीसा जितकी सुंदर तितकी क्रूर. ती अगदी क्रूरपणे निरो गोल्डन आणि त्याच्या घरावर ताबा मिळवते. पाठोपाठ निरोची तिन्ही मुले घर सोडून निघून जातात. निरोचा भूतकाळ त्याचा पिच्छा सोडत नाही आणि त्याच्या जवळची माणसे आत्महत्या, खून, जाळपोळ, दंगलीत एकेक करून मारली जातात. मिसेस गोल्डन आपल्याला या वृद्ध पतीकडून मूल होणार नाही म्हणून रेनेला जवळ करते. रेने तिच्या सौंदर्यावर भाळून तिला वश होतो.

डीचा स्वतच्या स्त्री वा पुरुष असण्याच्या संभ्रमातून लेखकांनी एक नवा दृष्टिकोन मांडला आहे. डीची प्रेयसी रिया त्याला म्हणते, ‘तुला जे बनायचंय ते तू निवडू शकतोस. लैंगिक ओळख ही वरदान नसते तर निवड असते.’ लेखक म्हणून सलमान रश्दी अनेक ठिकाणी आताच्या नव्या युगाचा नवा विचार- दृष्टिकोन पात्रांच्या वागण्याबोलण्यातून सतत मांडत राहतात.

रेनेच्या पालकांचा कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर रेने म्हणतो : ‘जीवन आणि मृत्यू दोन्ही अर्थहीन आहेत. जन्म आणि मृत्यू या दोन्ही घटना अतिक्षुल्लक कारणाने होत असतात. या जगात कुठलेच शहाणपण नाही. आपले भाग्य अर्थहीन आहे. या सुंदर पृथ्वीवर आपण आहोत आणि आपण सारे नगण्य आहोत. आपल्या बाबतीत जे घडतेय ते त्याहून नगण्य आहे आणि आपण या टाकाऊ भाग्यासाठी पात्र नाहीत.’ रेनेचा हा दृष्टिकोन त्याची स्वभाववैशिष्टय़े अधोरेखित करतो. या स्वभाववैशिष्टय़ांचा प्रभाव रेने या कादंबरीत निभावत असलेल्या निरीक्षक, निवेदक आणि चित्रकर्ता या भूमिकेवर दिसून येतो.

‘द गोल्डन हाऊस’कडे तो काहीशा हळव्या, निराश मनाने आणि सतत काही तरी अर्थहीन घडत असतेच या दृष्टिकोनातून पाहतो. तरी जिज्ञासूपणे डोकावून काही वास्तवातले, तर काही काल्पनिक-‘फिल्मी’ वाटावेत असे उभे करतो. त्यातून एक गुंतागुंतीचे थरारनाटय़ उभे राहते. लेखकाने रेनेच्या कल्पनेला दिलेल्या स्वातंत्र्यामुळे ‘द गोल्डन हाऊस’मध्ये वास्तव आणि कल्पना यांचा एक मजेशीर फिल्मी खेळ खेळवला जातो.

‘गोल्डन हाऊस’मधील एकामागून एक होत असलेला रहस्यउलगडा, त्यातून निर्माण होणारे वाद, व्यक्ती-व्यक्तीतील प्रेम, विश्वासघात, बेभरवशाचा सहवास आणि एकटेपणाचे दुख, स्वैराचार, तुटलेपणाचं आंतरिक दुख, न संपणारा भूतकाळ, विविध पात्रांच्या भावभावनांच्या विविध छटा दाखवत रेने या चित्रकर्त्यांचा कॅमेरा वरकणी संपन्न वाटणाऱ्या गोल्डन कुटुंबाचा एका शोकांतिकतेकडे झालेला प्रवास चित्रित करतो.

त्याच दरम्यान अमेरिकेतल्या विविध समकालीन समस्यांची चर्चाही कादंबरीत येते. त्यातून समकालीन अमेरिकेतल्या आणि जगभर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे नीतिमत्तेविषयीच उभे राहिलेले प्रश्न, दहशतवाद आणि त्यातून निर्माण झालेली असुरक्षितता- भय, उफाळून आलेला हिंसक संकुचित राष्ट्रवाद आणि त्यातून वादग्रस्त, वंशवादी, लिंगभेदवादी भूमिका घेणाऱ्या, संपत्तीचं अवडंबर माजवणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांचा उदय या साऱ्यावर अप्रत्यक्षरीत्या भाष्य केले आहे.

२००८ साली बराक ओबामा यांच्या सत्ताग्रहण कार्यक्रमाच्या पाश्र्वभूमीवर आपली जन्मभूमी सोडून अमेरिकेतल्या एका ‘गोल्डन’ हवेलीत आपला भूतकाळ विसरून नवे आयुष्य सुरू करण्यासाठी आलेला, अवैध मार्गाने संपत्ती कमावलेला अब्जाधीश निरो याच्यापासून सुरू झालेला कादंबरीचा शेवट आठ वर्षांनंतर अमेरिकेच्या ४५ व्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीने होतो. नैतिक अधपतन गोल्डन हाऊसच्या विनाशाला कारणीभूत होते आणि एका अतिश्रीमंत कुटुंबाचा शोकात्म शेवट होतो. अमेरिकेच्या अध्यक्ष निवडणुकीत एक विक्षिप्त, वादग्रस्त व्यक्तिमत्त्व असलेला उमेदवार जिंकून येणे आणि ‘अमेरिकेला पुन्हा महान बनवू या’चा उद्घोष करीत गोल्डन हाऊस- अर्थात अमेरिकेचा सत्ताधीश बनतो, हे प्रतीकात्मकरीत्या दाखवले आहे. आपापल्या देशाला महासत्ता बनवू पाहणाऱ्या ‘सुपरहिरों’चा जगभरात होत असलेला उदय म्हणजे एका ‘गोल्डन हाऊस’चा प्रवास विध्वंसाकडे.. एका शोकात्म शेवटाकडे होत असल्याचे समकालीन वास्तव रश्दी आपल्या कादंबरीत अधिक जोरकसपणे मांडतात.

जगभर निर्माण झालेला संकुचित राष्ट्रवादाचा हिंसक कोलाहल, अतिश्रीमंत-प्रगत कुटुंबांपुढे आधुनिक काळात निर्माण झालेला नीती-अनीतीच्या बाबतीतला संभ्रम, त्यातून निर्माण झालेले नातेसंबंधातील पेचप्रसंग ‘द गोल्डन हाऊस’मध्ये टिपला गेला आहे. विविध घटना-प्रसंगांची एका चित्रपटासारखी दृश्यमालिका रश्दी यांनी रेने या निवेदकाच्या माध्यमातून आपल्या ऐटबाज शैलीत सांगितली आहे. या सर्व घटना-प्रसंगांचा संबंध अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ‘जोकर’ उमेदवार निवडून येण्याच्या जागतिक घटनेपर्यंत जोडत वर्तमानातील नैतिक अधपतनाचे समग्र दर्शन रश्दी यांनी घडवले आहे. त्यातून भविष्यातील विध्वंसक भयावहतेचा पायरव ऐकू येतो. एका चांगल्या कथाकाराकडून चांगली कथा ऐकत- पाहत असल्याचा अनुभव ही कादंबरी वाचताना सतत येत राहतो. त्यातच या कादंबरीचे यश आहे आणि द्रष्टेपणही!

‘द गोल्डन हाऊस’

लेखक : सलमान रश्दी

 प्रकाशक : पेंग्विन प्रकाशन

 पृष्ठे : ३७०, किंमत : ६९९ रुपये

फेलिक्स डिसोजा  dsouzafelix1982@gmail.com