28 February 2021

News Flash

समाज अपकर्षांची गोष्ट!

स्पर्धेतील नियम बदलल्यानंतर यंदा सलग तिसऱ्यांदा बुकर पारितोषिक अमेरिकी साहित्यिकाला जाहीर झाले.

|| पंकज भोसले

स्पर्धेतील नियम बदलल्यानंतर यंदा सलग तिसऱ्यांदा बुकर पारितोषिक अमेरिकी साहित्यिकाला जाहीर झाले, तर रेचल कुशनरची ‘द मार्स रूम’ ही कादंबरी सर्वात उजवी आहे. अमेरिकेतील सर्वात मोठय़ा महिला तुरुंगालयातील कैद्यांशी सहा वर्षांहून अधिक काळ संवाद साधून आणि अखंड संशोधनसत्याचा पाठपुरावा करीत त्याला कथात्मरूपात उभा करण्याचा हा प्रयोग केवळ तुरुंगाचीच नाही, तर मानवी अपकर्षांची सद्य:स्थिती समोर आणतो..

रेचल कुशनरच्या ‘द मार्स रूम’ कादंबरीविषयी बोलण्याआधी ‘नेटफ्लिक्स’ या मनोरंजन घटकाने सहा वर्षांपूर्वी तयार केलेल्या ‘ऑरेन्ज इज द न्यू ब्लॅक’ या महिला तुरुंगामध्ये घडणाऱ्या मालिकेविषयी माहिती करून घेणे महत्त्वाचे आहे. पंधरा महिन्यांच्या कैदेवरील एका आत्मकथेच्या या नेटफ्लिक्सीय रूपांतरामध्ये गजांआडच्या विश्वाचा तपशील रंजकरीत्या सादर करण्यात आला. या मालिकेच्या सहा टप्प्यांत झालेल्या ७८ भागांची दर्शकवारी पाहिली, तर नेटफ्लिक्सवरच्या सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या मालिकांमध्ये ‘ऑरेन्ज इज द न्यू ब्लॅक’ची गणना होते. गुन्हेवृत्त, गुन्हेमालिका, गुन्हेपट सर्व स्तरांतील पापभीरू प्रेक्षकांना कायमच रुचतात. मात्र, गुन्हेगारांचे तुरुंगालयातील आंतर्बाह्य़ जगणे मांडणाऱ्या या मालिकेचे बघते-भोक्ते प्रेक्षक वाढण्याची परिस्थितीच समाजाच्या रंजनमूल्यांत अलीकडच्या काळात झालेला बदल दर्शवते. मे महिन्यात बराच गाजावाजा होत प्रसिद्ध झालेल्या ‘द मार्स रूम’ची तुलना त्यातील कथानकाच्या स्थानसमानतेमुळे ‘ऑरेन्ज इज द न्यू ब्लॅक’शी केली गेली, तरी त्यात फारसे तथ्य नाही.

ही कादंबरी अमेरिकेतील सर्वात मोठय़ा महिला तुरुंगातील घटनांचे सूक्ष्म अवलोकन आहे; मात्र तिचे शीर्षक सॅन फ्रान्सिस्कोमधील ‘द मार्स रूम’ नावाच्या आधुनिक भोगालय असलेल्या स्ट्रीप क्लबवर बेतलेले आहे. यातील न-नायिकेची आयुष्यभरची तुरुंग तजवीज करणारे हे भोगालय गजांआडच्या त्राणहीन जगण्यासोबत सातत्याने नवी माहिती घेऊन कथानकात हजर राहते. शहरांमधील बदल, इंटरनेट पोर्नोग्राफीच्या उफाळत्या काळात समाजातील उन्मादी जगण्याच्या विविध तऱ्हा आणि धुतल्या तांदळासारखे कुणी भेटण्याची शक्यता नसलेल्या व्यक्तींचे आगर असलेल्या महिला गुन्हेगारांच्या सुरस भीषण धक्कादायक गोष्टींचे चलाख एकत्रीकरण म्हणजे ही कादंबरी आहे!

यातील न-नायिका आणि निवेदिका ‘रोमी हॉल’ हिच्या नावावर आपला पाठलाग करणाऱ्या विकृत व्यक्तीला थंड डोक्याने मारल्याप्रकरणी दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. ती कमी म्हणून की काय, या हत्येदरम्यान तिच्यासोबत तिचा लहान मुलगाही असल्यामुळे त्याचा जीव धोक्यात घातल्याचा आणखी एक ठपका ठेवून तिच्या कारावासात अतिरिक्त सहा वर्षे जोडण्यात आली आहेत. या रोमी हॉलचे तुरुंगात सुरू असलेल्या स्थलांतरापासून कादंबरीला सुरुवात होते. तुरुंगाकडे चाललेल्या प्रवासाच्या निवेदनातून रोमीचा गुन्हा क्षुल्लक वाटावा अशा सहधर्मी कैद्यांची ओळखपरेड व्हायला लागते आणि वाचकाची त्या वर्णनांनी पुस्तककैद अटळ ठरते.

नेटफ्लिक्स मालिकांमधील फ्लॅशबॅक-कमबॅक तंत्रासारखे यात रोमी हॉलसह इतर कैद्यांचे आतले आणि बाहेरचे आयुष्य चितारण्यात आले आहे. सॅन फ्रान्सिस्को या शहरातील गरीब वस्त्यांमधील रोमीच्या बालपणापासूनचा पट अत्यंत चपखलपणे यात आणला आहे. जगातील सारी शहरगावे नव्वदीच्या दशकात कात टाकत सुधारली, बदलली, पुढारली. प्रगतीची आणि ऐशोआरामाची परमोच्च अवस्था उपभोगून अंतिमत: तिथल्या माणसांकडून भकास आणि ओंगळवाणी बनत गेली. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये व्यसनाधीन मातेच्या पोटी आणि गरीब भवतालात वाढलेली रोमी वयाच्या अकराव्या वर्षांतच मदतीच्या बहाण्याने आलेल्या एका वृद्ध व्यक्तीची लैंगिक शिकार बनते. तो प्रसंगही अतिशय थंड डोक्याने सांगत रोमी आपल्या पोतडीतून आणखी अंगावर काटा आणणारी आठवण सांगते. तिच्या तुरुंगातील सहधर्मीमध्ये कुणी आपल्याच बाळाची हत्या करून तुरुंगात आले आहे, तर कुणी नवऱ्याचे विम्याचे पैसे मिळविण्यासाठी मारेकरी करणारी आणि त्या मारेकऱ्याकडून गुपीतफुटीच्या भीतीने नव्या मारेकऱ्याचा वापर करताना अडकलेली आहे. या तुरुंगात मृत्युदंडाच्या शिक्षा झालेल्या सेलेब्रिटी कैदीही आहेत. त्यांच्याविषयीच्या तुरुंगगप्पा या गॉसिप कॉलमहून कमी थोर नाहीत! समाजातून आणि सर्वसाधारण आयुष्यापासून तुटलेल्या येथील प्रत्येकाने गजांआडच्या सुखात जगण्याची आपली स्वतंत्र पद्धत शोधून काढली आहे. त्यांची अतितपशीलांत ओळख करून देताना रोमी ‘मार्स रूम’मधील आपल्या आठवणींना उजाळा देत राहते. तिचा ‘मार्स रूम’मधील अल्पकाळचा प्रेमी आणि त्याच्यासोबत पालथी घातलेली शहरे यांच्या आठवणींसोबत ‘मार्स रूम’मध्ये छळणारा आणि विकृतरीत्या पाठलाग करणाऱ्या व्यक्तीचीही माहिती ती देते.

तिच्याकडून घडलेल्या गुन्ह्य़ाची दुसरी बाजू सहानुभूती निर्माण करणारी असली, तरी रोमीला कुणाचीही सहानुभूती नको आहे. अमेरिकी न्यायव्यवस्थेतील फोलपणा, तुरुंगातील सुधारणा केंद्रामध्येच बिघडण्याच्या तयार होणाऱ्या संधी यांची कुशनरने आकर्षक रिपोर्ताज शैलीत मांडणी केली आहे.

वकिलांचे विस्तृत व्यक्तिचित्रण आणि रोमीला शिक्षा सुनावण्याआधीचा एक संपूर्ण खटलाच येथे एक प्रकरण बनले आहे. हे वर्णन आपल्याकडच्या खासगी आणि सरकारी वकिलांशी तंतोतंत जुळणारे आहे.

कादंबरीची रचना प्रथम पुरुषी आणि तृतीय पुरुषी अशा दोन्ही प्रकारांत पाहायला मिळते. तुरुंगातील दुसरी महत्त्वाची ‘गॉर्डन’ नावाची व्यक्तिरेखा येथे लेखिकेच्या, म्हणजेच कुशनरच्या निवेदनातून येते. हा गॉर्डन साहित्यामध्ये रुची असूनही अपघाताने आणि प्रारब्धामुळे तुरुंगातील सुरक्षारक्षकाच्या कामात जुंपला गेला. महिला कैद्यांमध्ये वाचनातून सुधारणा घडविण्याची जबाबदारी पार पाडताना त्याची अंतर्बाह्य़ घुसमट येथे चित्रित झालेली आहे.

कादंबरीचा आरंभकाळ पाहिला, तर त्या वेळी पोर्नउद्योगाचा समाजातील शिरकाव मोठय़ा प्रमाणावर झाला होता. शरीरविक्रीसाठी मानवी तस्करी जगभर जोमात सुरू होती. पुरुषी विकृती पोसणाऱ्या आणि त्याला फुलविणाऱ्या घटकांचा रोमीच्या ‘मार्स रुम’ या स्ट्रीप क्लबमध्ये वावर वाढला होता. एके ठिकाणी रशियन मुलींनी रोमीसह सर्व गोऱ्या अमेरिकी मुलींच्या रोजगाराची केलेली खोटी आणि त्यांच्या गिऱ्हाईकांची वाढती मागणी यांचा उल्लेख येतो, तर पुरुषांच्या उग्र आणि चमत्कारिक लैंगिक व्यवहारांचा तपशील सांगितला जातो. तुरुंगातील प्रेम, बलात्कार, समलिंगी शोषणाचे आणि पोषणाचे कैद्यांनी शोधून काढलेले मार्ग यांचा आवडला नाही, तरी पकडून ठेवणारा दाहक मजकूर येथे वाचायला मिळतो.

कुशनरने तुरुंगातील कैद्यांशी अभ्यासकाच्या भूमिकेतून नाही, तर मैत्रीण बनून अनेक वर्षे संवाद साधला. गेल्या सहा वर्षांपासून अनेक कैद्यांशी मैत्री करून आत घडणाऱ्या सर्व तपशिलांची ओळख करून घेतली. त्या सर्व ऐवजाचे कित्येक रिपोर्ताज घडले असते; मात्र गेल्या तीनेक वर्षांमध्ये हा सारा भाग ‘न्यू यॉर्कर’ साप्ताहिकाच्या छोटेखानी कथांमधून बाहेर पडला. ‘न्यू यॉर्कर’मध्ये या कादंबरीच्या जडणघडणीवर आणि कुशनरवर प्रदीर्घ लेख आला आहे.

तुरुंगव्यवस्थेसह केवळ अमेरिकेतीलच नाही तर जगभरातील समाजाची, शहरांची स्थिती या कादंबरीतल्या वर्णनांसारखी बनत चालली आहे. गेल्या वर्षी मुंबईत महिला तुरुंगातील कैद्याची तुरुंग अधिकाऱ्यांकडून झालेल्या हत्येसोबत भारतातील शहरांत घडणाऱ्या अनेक चमत्कारिक गुन्ह्य़ांच्या बातम्यांची आठवण यातील कित्येक प्रसंग करून देऊ शकतील. समाजाचा अपकर्ष अचूकपणे रेखाटणारी ही कादंबरी म्हणूनच ‘ऑरेन्ज इज द न्यू ब्लॅक’ या नेटफ्लिक्स मालिकेप्रमाणे तुरुंगाची किंवा स्त्रीदु:खाची कथावाहक ठरत नाही.

कुशनरच्या या आधीच्या दोन्ही कादंबऱ्या (‘टेलेक्स फ्रॉम क्युबा’, २००८ आणि ‘द फ्लेमथ्रोवर्स’, २०१३) अमेरिकेच्या ‘नॅशनल बुक अवॉर्ड’साठी केवळ नामांकित झाल्या होत्या. यंदा ‘द मार्स रूम’वर बुकर मोहर उमटली, तर त्या कादंबऱ्यांनाही नव्याने उठाव मिळू शकेल!

  • ‘द मार्स रूम’
  • लेखिका : रेचल कुशनर
  • प्रकाशक : जोनाथन केप/ व्हिन्टेज
  • पृष्ठे : ३५२, किंमत : ७९९ रुपये

pankaj.bhosale@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2018 2:18 am

Web Title: the mars room
Next Stories
1 ‘निर्बंध’योग!
2 ‘साठोत्तरी’चं काय करायचं?
3 अपुरा प्रेषित!
Just Now!
X