25 October 2020

News Flash

बुकरायण : पुनर्वनवास..

डाएन कुक रूढार्थाने पर्यावरणवादी नाहीत. त्यांच्या लेखनात मात्र निसर्ग आणि पर्यावरण यांचे अमाप संदर्भ डोकावतात

‘द न्यू विल्डरनेस’ लेखिका : डाएन कुक प्रकाशक : हार्पर पृष्ठे : ४१६, किंमत : १,८९३ रुपये

पंकज भोसले

पर्यावरण-बदलापासून स्वत:च्या पाच वर्षांच्या मुलीला- अ‍ॅग्नेसला- वाचवण्यासाठी कादंबरीची नायिका बिआ आणि तिचा जोडीदार ग्लेन ‘न्यू विल्डरनेस’मध्ये दाखल होतात. आधी नायिकेची ही कथा पुढे मुलीची होते. पण स्वेच्छेनं स्वीकारलेल्या या वनवासात मानवी जीवन बदलतं का?

पर्यावरणाविषयी वैश्विक अनास्थेमुळे मानवी संस्कृतीच्या अध:पतनाचा भविष्यकाळ अटळ असल्याची ओरड गेल्या शतकातील साहित्यापासून उमटत आली आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांच्या आकडेवारीनुसार दरवर्षी जगभरात ७० ते ९० लाख नागरिक वायू-जलप्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांनी मृत्युमुखी पडतात. ही आकडेवारी भयकारी करोना संसर्गाच्या नऊ महिन्यांतील वैश्विक बळींशी समांतर आहे. म्हणजेच एरवी ही महासाथ नसती, तरी त्याच्या जवळपास जाणारी मृत्युसंख्या पर्यावरण ऱ्हास, वातावरणाच्या बिघाडाने गाठलीच असती अन् सालाबादप्रमाणे यंदाही आपण त्या बाबीपासून अनभिज्ञ असल्यासारखे आयुष्य जगत राहिलो असतो.

पर्यावरणाच्या हानीविषयी बोलणारी एक स्वीडिश शाळकरी मुलगी माध्यम/ समाजमाध्यमांच्या बळावर तरुणाईचे प्रेरणास्थान बनण्याच्याच काळात अमेरिकी राष्ट्राध्यक्ष आपल्या देशात सर्वाधिक स्वच्छ हवामान असल्याचे खेकसत सांगत होते. वर जगातील पर्यावरणाची हानी भारत-चीन-रशिया यांच्या बेफिकिरीतून निर्माण झाल्याचा शोध लावत होते. त्याच अमेरिकेतील न्यू यॉर्क शहराच्या दर्शनी चौकात गेल्या आठवडय़ात हवामान बदलाच्या संकटातून पृथ्वीला वाचविण्यासाठी मानवाकडे सात वर्षे शिल्लक राहिल्याची उलटगणती करणारे घडय़ाळ शास्त्रज्ञांनी लावले. सात वर्षांत ठोस पावले उचलली गेली नाही तर पूर, दुष्काळ, अतिवृष्टी, उष्मालहरी, अतिरेकी वणवे आणि मानवी विस्थापनाची साखळीच देशोदेशी पाहायला मिळणार असल्याचा इशारा या घडय़ाळाद्वारे देण्यात आला आहे.

या वर्षी जगणे बदलविणाऱ्या महासाथीची कुणकुण लागली तेव्हा सर्वच खंडांमध्ये साधारण मानवी प्रतिक्रिया होती : शहरे सोडून गावाकडे जाण्याची. गर्दीपासून लांब पळण्याची. समाजशील असण्याची व्याख्या विसरून जाण्याची. स्वत:विषयी अधिकाधिक आरोग्यदक्षता आणि दुसऱ्याप्रति नको तितका संशय बाळगण्याची. डाएन कुक यांच्या ‘न्यू विल्डरनेस’ या कादंबरीमध्ये या मानवी प्रतिक्रियांचा विस्ताराने विचार झाला आहे. शिवाय पर्यावरणविषयक समस्यांकडे आणि शास्त्रज्ञांच्या इशाऱ्यांकडे आजवर ज्या बेफिकिरीपणाने आपण दुर्लक्ष करीत आलो, त्याचे भविष्यावर किती जोरकस परिणाम होतील, याचे भयचित्र तयार करण्यात आले आहे.

डाएन कुक रूढार्थाने पर्यावरणवादी नाहीत. त्यांच्या लेखनात मात्र निसर्ग आणि पर्यावरण यांचे अमाप संदर्भ डोकावतात. हे संदर्भ ‘तोवर पूर्वेकडून सूर्य उगवला’ छापाच्या गोष्ट सांगण्याच्या मूलभूत प्रेरणांपासून खूपच भिन्न प्रकारचे असतात. वैश्विक आपत्ती, अडचणी, जगाचा अंत, भविष्यातील मानवी जगण्याची स्थिती, कृती आणि विकृतींना घडविणारा निसर्ग थेटपणे त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू बनतो. गेल्या दहा-पंधरा वर्षांमध्ये कुक यांच्या कथा महत्त्वाच्या अमेरिकी नियतकालिकांमधून गाजत आहेत. या कथांतून महाकाय तलावात जीवरक्षक नौकेत काही दिवस अडकलेल्या मित्रांच्या चर्चा (‘मॅन व्हर्सेस नेचर’), परग्रहवासी अथवा जीव घेणाऱ्या अज्ञात शक्तीच्या आगमनानंतर कॉर्पोरेट ऑफिसातील निवेदकाकडून रंगविण्यात आलेली दृश्यमाला (‘इट्स कमिंग’), प्रचंड मोठय़ा नैसर्गिक आपत्तीतून बचावलेल्या व्यक्तीकडे जगण्यासाठी साऱ्या गोष्टी असल्या, तरी सोबत कुणी तरी असावे याबाबतची अपुरी भूक ‘द वे द एण्ड ऑफ डेज शुड बी’) हे सारे दिसते. ‘द नॉट नीडेड फॉरेस्ट’ या कथेत भविष्यातील समाजासाठी निरुपयोगी ठरवून दहा वर्षांच्या मुलांना कुटुंबांतून बाहेर काढून नष्ट करण्याच्या प्रक्रियेत यंत्रणेतील अनवधानाने काही मुले बचावतात. जंगलात ती मुले विल्यम गोल्डिंग यांच्या ‘लॉर्ड ऑफ फ्लाईज’ची शतकानंतरची आवृत्ती घडवितात. ‘मॅन व्हर्सेस नेचर’ या कथासंग्रहाद्वारे या कथा संकलित झाल्यानंतर त्यांच्या लेखनातील पर्यावरणीय भयसूत्र ठळक झाले. ‘न्यू विल्डरनेस’ या कादंबरीचा बुकरच्या अंतिम लघुयादीत समावेश झाल्यामुळे आता त्यांचा द्रष्टा कथाव्यवहार सर्वदूर पोहोचला आहे.

‘न्यू विल्डरनेस’ची कथा आहे नजीकच्या भविष्यकाळात अमेरिकी शहरानजीक उरलेल्या शेवटच्या जंगल-तुकडय़ात घडणारी. जंगलाची किंचितही हानी न करता आदिमानवासारखे जगता कसे येईल, याचे दीर्घकालीन संशोधन तेथे सुरू असते. विविध कारणांमुळे या प्रयोग प्रकल्पात मानवी समूह दाखल होतो. हयातभर शहरांतील सोयी-सुविधांमध्ये घालविल्यानंतर जंगलाच्या असुरक्षित पार्श्वभूमीवर घडत जाणारे त्यांचे अ-सामाजीकरण येथे अभ्यासले जाते. त्याचबरोबर मातृत्व, कुटुंबव्यवस्था, मूल्यव्यवस्था या संकल्पनांचे नैसर्गिक आपत्तीकाळातील अस्तित्वाबाबत विस्ताराने चर्चा केली जाते.

इथली मुख्य व्यक्तिरेखा बिआ ही आधी शहरात इंटिरिअर डिझायनर म्हणून स्थिर आयुष्य जगत असते. जंगलाविषयी तिला आस्था किंवा प्रेम नसते. मात्र तिच्या शहरात अपायकारक वायूंचा शिरकाव झाल्याने अचानक आजारी पडून लहान मुलांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढते. परिणामी अ‍ॅग्नेस या आपल्या पाच वर्षांच्या मुलीला वाचविण्याचा भाग म्हणून ती शुद्ध हवा मिळू शकणाऱ्या आणि ‘न्यू विल्डरनेस’ याच नावाने ओळखला जाणाऱ्या या जंगलपट्टय़ात दाखल होते. लग्न न करता नवरा म्हणून स्वीकारलेल्या ग्लेन या प्राध्यापकामुळे तिचा प्रयोगातला सहभाग सुकर होतो. कादंबरीला आरंभ होतो, तोवर या प्रयोगाची तीन वर्षे संपलेली असतात. ‘न्यू विल्डरनेस’मध्ये दाखल झालेल्या एकंदर २० जणांपैकी ११ जण शिल्लक राहिलेले असतात. कुणाचा उष्माघाताने मृत्यू होतो, कुणाचा विषारी मशरूम खाल्ल्याने, बिबटय़ासारख्या प्राण्याच्या हल्ल्यात एक दगावतो, तर कुणी वेगळ्याच आजाराने. नदी ओलांडताना त्यांच्यातील एक महिला वाहून जाते. अन् त्या महिलेच्या मृत्यूऐवजी जंगलात अत्यंत उपयोगी ठरणारी दोरी तिच्यासोबत वाहून गेली, याबाबत सगळे हळहळ व्यक्त करतात.

न्यू यॉर्कसारखे, हे न्यू विल्डरनेस राज्यच; पण स्वघोषित. इथल्या ‘नागरिकां’वर मर्यादित प्रमाणात देखरेख करणारे मोजके वनरक्षक असतात. जे निसर्गाला हानी न पोहोचवता, स्वत:च्या कोणत्याही खुणा न ठेवता जंगलातून वावरण्यात या समुदायाला मदत करतात. बाहेरच्या जगाशी समुदायाला काही प्रमाणात पत्राद्वारे संपर्क करण्यास दुवा ठरतात. न्यू विल्डरनेसमध्ये दाखल झाल्यानंतर सुरुवातीला शहरांतून हजारो सदिच्छा, भेटी आणि वृत्तकौतुकाचा त्यांच्यावर वर्षांव झालेला असतो. मात्र लोकांचे वृत्तकुतूहल आटल्यानंतर लवकरच सामूहिक विस्मृतीत त्यांची गणना होते. नियमांनुसार त्यांना घरे किंवा तंबू उभारण्याची परवानगी नसते. मिळेल ती शिकार आणि पाणी यांच्यावर त्यांना भागवून घ्यावे लागते. मीठ या घटकाचे दुर्भिक्ष्य असल्याने त्याशिवाय अन्न पोटात ढकलणे अवगत करावे लागते.

तृतीय पुरुषी निवेदनातून कादंबरीचा पहिला भाग हा बिआच्या नजरेतून उलगडू लागतो. मृत अर्भकाला जन्म दिल्यानंतर तिच्यात दु:ख किंवा कसल्याही भावना पाझरताना दिसत नाही. ग्लेन आणि अ‍ॅग्नेस यांच्याबरोबरचा तिचा जंगल-संसार विचित्र पद्धतीने चाललेला असतो. अ‍ॅग्नेस, इतर सहकाऱ्यांपैकी कार्ल, वॉल, समुदायातच असलेला डॉक्टर, काही चांगले वनरक्षक यांच्यासह विल्डरनेस स्टेटमधील तिच्या जगण्याचा तपशील पुढे सरकत राहतो.

जुन्या जगतातील खूण म्हणून घरसजावटीची रंगीबेरंगी चित्र असलेल्या मासिकाची प्रत आणि उशी बिआने जीवापाड जपलेली असते. अ‍ॅग्नेसला आजारापासून वाचविण्यासाठी विल्डरनेस स्टेटमध्ये दाखल झालेली बिआ आपल्या आईच्या मृत्यूच्या सहा महिन्यांनंतर समजलेल्या वार्तेमुळे आपल्या मुलीला ग्लेनकडे सोपवून जंगलातून पळ काढते. पुढे कादंबरी अ‍ॅग्नेसच्या नजरेतून जंगलातील तिच्या जडणघडणीच्या घटनांनी व्यापते.

याच दरम्यान, नव्या व्यक्ती या सामुदायिक प्रयोगात सहभागी होतात. मग त्या समुदायाची एकत्र राहात असले तरी ‘ओरिजनलिस्ट’ आणि ‘न्यूकमर्स’ अशी विभागणी होते. पुढे न्यू विल्डरनेस या जंगलपट्टय़ाचे महत्त्व सरकारी यंत्रणेच्या नजरेत बदलल्याने तिथे सुरू असलेला प्रयोग बाजूला राहातो आणि एका भलत्याच लढय़ाला आरंभ होतो.

भटक्या टोळीसारखे जंगलात धनुष्य-बाणाच्या मदतीने शिकार करीत जगणाऱ्या या प्रकल्पाच्या अभ्यास-निष्कर्षांऐवजी कुक यांना येथील माणसांच्या पुनर्वनवासाची प्रक्रिया सूक्ष्म तपशिलांसह रंगविण्यात प्रचंड रस दिसतो. त्यामुळे प्रदीर्घ काळ चालणारी समुदायाची पायपीट, त्यांच्या मनात शिल्लक असलेल्या शहरातील स्मृतींचे पडसाद यांतून कथा वाचकाची पकड घेते. भविष्यात पर्यावरण ऱ्हासामुळे जगण्यासाठी किती घातक परिस्थिती आपल्यासमोर उभी राहील याचे ठोस भाकीत आत्ताच करता येणार नसले, तरी ‘न्यू विल्डरनेस’मधील काल्पनिक पसाऱ्याद्वारे त्याची एक भयावह शक्यता डाएन कुक उभी करतात.

वॉर्नर ब्रदर्सने बुकरच्या लघुयादीत शिरकाव होण्याआधीच गेल्या महिन्यात या कादंबरीवर टीव्ही मालिका तयार करण्याचे हक्क विकत घेतले आहेत. त्यामुळे या कादंबरीला बुकर मिळो किंवा न मिळो, पुढली काही वर्षे चर्चेत राहण्याची तिची तजवीज झाली आहे.

पूर्वी निसर्गदृश्यांच्या वकुबानुरूप वर्णनांमध्ये सीमित असलेल्या मराठी साहित्यात नव्वदोत्तरीनंतर काही अंशी प्रमाणात पर्यावरण बदल उतरू लागला आहे. तो टिपण्याच्या आपल्या क्षमतेत ‘न्यू विल्डरनेस’ वाढ करू शकेल.

pankaj.bhosale@expressindia.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2020 12:05 am

Web Title: the new wilderness by diane cook book review abn 97
Next Stories
1 बुकबातमी : पितळी नोंदवही!
2 धोरण-संशोधनाचा संसारपट.. 
3 बुकरायण : विद्यापीठीय कादंबरी!
Just Now!
X