News Flash

लिहित्यांचा भ्रमणअवकाश…

जागतिक साहित्यातील महानुभावांच्या लेखनातील भौगोलिक अवकाशाचा माग घेणाऱ्या पुस्तकाविषयी...

‘फूटस्टेप्स’ संपादन : मोनिका ड्रेक प्रकाशक : थ्री रिव्हर्स प्रेस, न्यू यॉर्क पृष्ठे : २९२, किंमत : ४९९ रुपये

शशिकांत सावंत

‘बुक्स ऑन बुक्स’ या प्रकारातल्या पुस्तकांची वाढ जगभर होतेच आहे. पुस्तकांवर लिहिलेली कितीही पुस्तके वाचून आणि लिहून वाचनवेड्यांचे समाधान होत नाही. लेखकांची चरित्रे, पुस्तकांची परीक्षणे- इतकेच नव्हे, तर लेखकाने कुठे बसून लिहिले किंवा लेखकाने जे काही लिहिले आहे त्यातला भौगोलिक अवकाश काय आहे, असे बारीकसारीक तपशीलदेखील वाचणाऱ्यांना महत्त्वाचे वाटतात आणि ते त्याचा शोध घेत राहतात. म्हणूनच बहुधा ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ने अशा लेखांची एक मालिकाच सुरू केली- ज्यात लेखक वाचनवेड्या रॅम्बोपासून अ‍ॅलिस मन्रोपर्यंत पोहोचले आणि हेमिंग्वेच्या मॅद्रिदपासून मार्गाराइट ड्युरासच्या व्हिएतनामपर्यंत जाऊन आले. त्या लेखांचे ‘फूटस्टेप्स’ हे पुस्तक २०१७ साली प्रसिद्ध झाले.

भौगोलिक अंतर पार करणे आज सोपे आहे. पण ही लेखकर्ती मंडळी नुसते तेवढेच करत नाहीत, तर त्या त्या लेखकाचा अवकाश आणि व्यक्तिमत्त्व त्या भूमीत कसे उतरले किंवा रुजले हे शोधतात. उदाहरणार्थ, लुइस कॅरोलने ऑक्सफर्डमध्ये बसून ‘अ‍ॅलिस इन वंडरलॅण्ड’ लिहिले, त्यातील आता दीडशे वर्षांनंतर कोणते संदर्भ दिसतात ते चार्ली लोवेटसारखा लेखक सांगतो; तर मार्गाराइट ड्युरासचे ‘द लव्हर’सारखे पुस्तक- जे खऱ्याखुऱ्या प्रेमावर आधारित आहे, त्यातल्या प्रेमिकाची दफनभूमी मॅट ग्रॉस हा लेखक गाठतो.

खरे तर यातून आपण लेखकाबद्दल, वाचनाबद्दल किती समृद्ध होतो? जी. ए. कुलकर्णी म्हणायचे की, लेखन समजून घेण्यासाठी एखाद्या लेखकाची माहिती करून घेणे म्हणजे ताजमहालऐवजी संगमरवर इराणमध्ये जाऊन पाहण्यासारखे आहे. पण इराणमध्ये संगमरवर पाहून एखाद्याला ताजमहालबद्दलची माहिती कळू शकते का, हा प्रश्नच. तो वादातीत असला, तरी त्यात किमान थोडाफार इराणही समजू शकण्याची शक्यता निर्माण होतेच ना?

अर्नेस्ट हेमिंग्वेसारखा लेखक हवानापासून पॅरिस-मॅद्रिदपर्यंत अनेक ठिकाणी राहिलेला असला, तरी त्याच्यावर लिहिणारा डेव्हिड फर्ले हा लेखक मात्र स्पेनमधील मॅद्रिदची निवड करून तिथे चार दिवस फिरायचे ठरवतो. ‘सन ऑल्सो रायझेस्’ (१९२६) या हेमिंग्वेच्या बहुचर्चित पहिल्या कादंबरीच्या शेवटी नायक व त्याची मैत्रीण दोघे तिकडे जातात आणि नंतर ‘बोतीं’ नावाच्या रेस्तराँमध्ये जेवतात. अनेकदा खुद्द हेमिंग्वे इथे राहत असे. हे रेस्तराँ १७३५ साली सुरू झाले असून ते जगातले सर्वात जुने रेस्तराँ मानले जाते. आत्ता जी मंडळी हे रेस्तराँ चालवतात, त्यांच्या आजोबांनी हेमिंग्वेची खातिरदारी केली होती. त्याला इथे ‘डॉन अर्नेस्टो’ म्हटले जात असे, अशी आठवण ही मंडळी सांगतात.

कुठलेही प्रवासवर्णन वाचण्याची एक गंमत असते. त्यामुळे ती गंमत र्हेंमग्वेवरील लेखात तर आहेच, पण इतर लेखांतही भरून राहिलेली आहे. त्यांतून, विशेषत: जी प्रचलित प्रवासवर्णनांतून येत नाहीत अशी जगभरातील वेगवेगळी ठिकाणे वाचकांसमोर येतात. पॅरिस, न्यू यॉर्कची वर्णने इतरत्र वाचायला मिळतात; पण इथिओपियाच्या हरारसारख्या शहरात जाऊन कवी रॅम्बोचा शोध घेण्याचा शहाणपणा कोण करेल? अर्थात वाचनवेडा माणूसच!

रॅम्बो हा प्रतिभावंत फ्रेंच कवी. त्याने वयाच्या १९ व्या वर्षी कविता लेखन थांबवले आणि तो इथिओपियाला गेला. त्यासाठी त्याने बोटीने आफ्रिकेपर्यंत आणि पुढे घोड्यावरून २० दिवस प्रवास केला. रॅम्बोने अनेक उद्योग केले, त्यातला एक उद्योग हा बादशहासाठी बंदुका मिळवण्याचा होता. परंतु बादशहाने त्याला फसवले, म्हणजे ठरलेले पैसे दिले नाहीत. पण या बंदुकांमुळेच तेव्हा अस्तित्वात नसलेला देश इथिओपिया अस्तित्वात आला! म्हणजे झाले असे की, त्या बादशहाने इटलीला हरवल्यावर जो तह केला, त्यात इथिओपियाला राष्ट्र म्हणून मान्यता देण्यात आली. तर… कवी काय करतो?- कवी दिलीप चित्रे यांच्या या प्रश्नाचे नेमके उत्तर अद्याप मिळालेले नसले, तरी कवी एखाद्या राष्ट्रनिर्मितीला हातभार लावू शकतो, हेही नसे थोडके!

पुस्तकाची विभागणी अमेरिका, युरोप आणि इतर अशा तीन भागांत केलेली आहे. प्रत्येक भागाच्या सुरुवातीला नकाशा आणि त्यात आलेल्या व्यक्तिमत्त्वांची चित्रे व त्यांची भौगोलिक ठिकाणे दिली आहेत. त्यात व्लादिमीर नबोकोव्ह, जॅक केरोयुअ‍ॅक, मार्क ट्वेन, राचेल कार्सन असे अनेक जणआहेत. अर्थातच, भर कथा-कादंबऱ्या लिहिणाऱ्यांवर आहे. कार्सन किंवा मेरी ऑलिव्हर हे अपवाद. याचप्रकारे युरोपच्या नकाशात रशियन कादंबरीकार अलेक्झांडर पुश्किनपासून रॅम्बो, मिलान कुंदेरापर्यंत बरेच जण भेटतात. तिसऱ्या विभागात अ‍ॅलिस मन्रो, गॅब्रिएल गार्सिया माक्र्वेझ, पाब्लो नेरुदा यांच्याशी भेट होते.

गंमत अशी की, या सगळ्यांमध्ये निवडीला भरपूर वाव आहे. म्हणजे मार्क ट्वेनवर लिहायचेच तर ‘हकलबरी फिन’ आणि ‘टॉम सॉयर’मध्ये आलेला मिसिसिपी नदीभोवतीच्या प्रदेशावर लिहिता आले असते. पण लॉरेन्स डोन्स या लेखकत्र्याने निवड केली आहे ती हवाईची. तसेच अमेरिकाभ्रमंती करणाऱ्या जॅक केरोयुअ‍ॅकबद्दल लिहिताना इथॅन टोड्रास-व्हाइटहिल या लेखकाने ती ठिकाणे पाहण्याऐवजी; जॅक ज्या डोंगरावर सात हजार फुटांवर ६६ दिवस राहिला, त्या डिसोलेशन पीक या डोंगरावर लेखकाने लिहिले आहे. कदाचित तिथे जाण्याचे आव्हान लेखकाला अधिक भावले असेल. एक दिवस पुरेल इतका पाण्याचा साठा धरून जवळपास २० किलो वजन घेऊन हा सात हजार फूट उंच डोंगर चढावा लागतो, शिवाय तिथपर्यंत जाण्याचा प्रवास हा वेगळाच. पण तिथे गेल्यावर विलक्षण लाभलेली शांतता आणि सौंदर्य याचे लेखकाने फार सुंदर चित्रण केले आहे. जॅक केरोयुअ‍ॅकची १९५७ साली ‘ऑन द रोड’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली. नंतर त्याची ‘द धर्मा बम्स’, ‘डिसोलेशन एंजल्स’, ‘लोनसम ट्रॅव्हलर’ यांसारखी अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आणि गाजली. तो आणि त्याच्या बरोबरीने अ‍ॅलन गिन्सबर्ग, ग्रेगरी कोर्सो, गॅरी स्नायडर, अलीकडे मरण पावलेला लॉरेन्स फर्लिंघेट्टी आदी कवी-लेखक मंडळींचे वर्तुळ ‘बीट’ म्हणून ओळखले जाते किंवा त्या पिढीलाच ‘बीट जनरेशन’ म्हटले जाते. तर… पुस्तकात जॅक करोयुअ‍ॅकवर लिहिणारा लेखक म्हणतो, गॅरी स्नायडरने सुचवल्यामुळेच जॅक त्या डोंगरावर राहायला गेला, ज्याचा त्याच्यावर खोलवर परिणाम झाला.

पुस्तकातील दोन लेख चांगलेच विस्तृत आहेत. एक चिलियन कवी पाब्लो नेरुदावरचा आणि दुसरा अमेरिकी कादंबरीकार जमैका किंकेड हिच्या संदर्भातला. ही जमैका किंकेड अँटिग्वॉ बेटावर जन्मली. या बेटावर एकेकाळी विविध भागांतून आलेले गुलाम राहत होते. १९८१ साली ते बेट स्वतंत्र झाले. जमैकाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती, वडील आईला सोडून गेलेले. अशा परिस्थितीत लेखन आणि अभ्यास यामुळे तगलेली जमैका ते बेट सोडून अमेरिकेला आली आणि लेखिका म्हणून प्रस्थापित झाली. जवळपास २० वर्षांनी ती त्या बेटावर परत गेली, तेव्हा तिने जे छोटेखानी पुस्तक लिहिले ते इतके खळबळजनक ठरले की त्यावर बंदी आली आणि जमैकालाही परागंदा व्हायला लागले. अर्थात, आता परिस्थिती बदललेली आहे. जमैका किंकेडनी वर्णन केलेले बेट आणि आत्ताची परिस्थिती याबद्दल तिच्यावरील लेखात तपशीलवार वाचायला मिळते.

मिलान कुंदेराच्या प्रागमध्ये प्रवास करणारा लेखक ‘द अनबिअरेबल लाइटनेस ऑफ बिइंग’ या कुंदेराच्या गाजलेल्या कादंबरीचे कथानक सांगत सांगत प्रागबद्दल लिहितो. तो फ्रांज काफ्काचे तिथे झालेले बाजारीकरणही नोंदवतो.

अनेक युरोपीय-अमेरिकी लेखक जिथे रमले त्या जागा आपल्याला या पुस्तकात पाहायला, अनुभवायला मिळतात. ‘अ‍ॅलिस इन वंडरलॅण्ड’वरील लेखाचा लेखक लुइस कॅरोलच्या साहित्याचा अभ्यासक आहे आणि चरित्रकारही. त्यामुळेच त्याने लुइसच्या लेखनामागची कळ उलगडण्याचा प्रयत्न लेखात केला आहे.

पुस्तकाचा बाज असा आहे की, लेखक पती-पत्नी किंवा एकटा लेखक वा लेखिका, एखाद्या लेखकाच्या साहित्याचा माग घेण्यासाठी अमुक ठिकाणी जायला निघतात. त्याआधी संबंधित लेखकाबद्दल थोडासा अभ्यास करतात किंवा त्याची पुस्तके बरोबर ठेवतात. त्यानंतर त्या ठिकाणी फिरस्ती करतात. लेखकाशी परिचय असलेल्या तिथल्या व्यक्तींना शोधतात, त्यांचा पाहुणचार घेतात किंवा आपणहून त्यांचा पाहुणचार करतात आणि मग परत येतात.

या प्रकारे प्रत्येक लेख लिहिला गेलेला आहे. अनेक महिन्यांच्या किंवा वर्षांच्या अंतराने प्रसिद्ध झालेले हे लेख ३८ असले, तरी याप्रकारे आणखीही अनेक लेख लिहिता येतील, हे निश्चित. मग त्यात कदाचित थोरो येईल, मिसिसिपीचा प्रवास येईल, सलमान रश्दीची मुंबई येईल… असे बरेच काही येऊ शकेल. पण हॉलीवूडच्या गाजलेल्या चित्रपटाप्रमाणेच याच्या ‘सिक्वेल’ची वाचक वाट पाहतील, हेही नक्कीच!

shashibooks@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 12:02 am

Web Title: the new york times footsteps book review abn 97
Next Stories
1 स्व-मागोवा! : ‘बुकर’नंतरचा
2 बुकबातमी : दरबारी अभिजनांचा धांडोळा…
3 अव-काळाचे आर्त : तुम्ही विन्स्टन स्मिथ आहात का?
Just Now!
X