13 August 2020

News Flash

चौकटीबाहेरचे महाबळेश्वर

जगातील काही महत्त्वाच्या अतिप्राचीन अशा पर्वतरांगांपैकी एक असलेल्या सह्य़ाद्रीत महाबळेश्वर वसलेले आहे.

सुहास जोशी

महाबळेश्वरमधील जैवविविधतेबरोबरच, तेथील अनेक मंदिरे, ब्रिटिशकालीन बंगले, समाजजीवनात झालेले बदल यांवरही हे पुस्तक दृष्टिक्षेप टाकते.. या अभ्यासूपणे दिलेल्या तपशिलांपल्याडही रेखाटने आणि अनोख्या मांडणीमुळे हे पुस्तक समृद्ध दृश्यानुभव देणारे आहे..

गेल्या काही वर्षांत पर्यटन अगदी मध्यमवर्गीयांमध्येही रुजले आहे. त्यामुळे अगदीच लांबची भटकंती करता आली नाही, तरी किमान माथेरान-महाबळेश्वरला तरी जाणाऱ्यांची पूर्वापार असलेली संख्या वाढतानाच दिसते. मात्र, या सर्व पर्यटनामध्ये एक साचेबद्धपणा असतो. रिसॉर्ट, त्यामध्ये असणारी पोहायची सुविधा, लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था, साचेबद्ध जेवण.. वगैरे वगैरे. वाढत्या पर्यटनातील हीच लागण महाबळेश्वरलादेखील झाली आहेच. त्यापलीकडे जाऊन महाबळेश्वरकडे पाहणाऱ्यांची संख्या अगदीच मर्यादित आहे. मात्र, एका पुस्तकाच्या निमित्ताने महाबळेश्वरच्या चौकटीबद्ध रचनेच्या पलीकडे जायचा प्रयत्न झालेला दिसून येतो; ते पुस्तक म्हणजे- ‘द अदर महाबळेश्वर’!

रूढ पुस्तकापेक्षा एखादे ‘फील्ड गाइड’च म्हणावे असे हे पुस्तक आहे. असे असले तरी, केवळ नीरस गाइड बुकपलीकडेही त्यात अनेक रोचक बाबी आहेत. त्यामुळे ते जसे अभ्यासकांना उपयोगी पडते, तसेच ज्यांना पर्यटनाची चौकटीबद्ध रचना तोडायची आहे अशा सर्वसामान्यांनादेखील त्याचा फायदा नक्कीच होऊ शकतो.

जगातील काही महत्त्वाच्या अतिप्राचीन अशा पर्वतरांगांपैकी एक असलेल्या सह्य़ाद्रीत महाबळेश्वर वसलेले आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकाला समृद्ध करणाऱ्या कृष्णेचा उगमदेखील येथेच झाला. सुमारे ४४३९ फूट उंचीवरच्या या ठिकाणी त्या विशिष्ट अधिवासामुळे असलेली जैवविविधता हे त्याचे महत्त्वाचे वैशिष्टय़. अशा रचनेला ‘आयलंड फॉरेस्ट’ म्हटले जाते. जेव्हा येथील जंगल इतर भूभागाशी जंगलानेच जोडले होते तोपर्यंत येथील जैवविविधतेतील अनेक प्रजाती महाबळेश्वरव्यतिरिक्त इतर ठिकाणीदेखील पोहोचल्या. परंतु सध्या केवळ महाबळेश्वरमध्येच सापडणाऱ्या अनेक प्रजाती आजही आहेतच. त्याशिवाय महाबळेश्वरबरोबरच इतरत्र सापडणाऱ्या प्रजातीदेखील भरपूर आहेत. दोहोंपैकी महत्त्वाच्या अशा सुमारे ३५० प्रजातींचा धांडोळा या पुस्तकात घेतला आहे.

बहुतांशवेळा पक्षी, प्राणी, वनस्पती पाहायला जायचे म्हणजे खूप कठीण असे काम वाटू शकते. पण या पुस्तकात महाबळेश्वरच्या जैवविविधतेची जी ओळख करून दिली आहे आणि त्यासाठी मांडणीची अवलंबलेली अनोखी पद्धत यामुळे हे काम बरेच सोपेदेखील झाले आहे. सदाहरित जंगल, जंगलाच्या कडेवर असलेले गवताळ पट्टे, सडा, जंगलातील झरे आणि कडे व धबधबे अशा पाच भागांत येथील जैवविविधतेचे वर्गीकरण केले आहे. त्यामुळे या पाच अधिवासांपैकी कोणत्याही ठिकाणी गेल्यानंतर नेमके काय पाहता येईल, हे अगदी सहजपणे पुस्तकातून कळते. महत्त्वाचे म्हणजे, यासाठी दरवेळी वाकडी वाटच करायची गरज नाही. पुस्तकाच्या अखेरीस पर्यटनासाठी असलेल्या अनेक पॉइंट्सनुसार नकाशे आणि तेथे आढळणाऱ्या प्रजातींची यादी दिलेली असल्यामुळे ते सहजपणे शक्य होते. हे पुस्तक हाताळण्याची पद्धतही सुरुवातीलाच यात विशद केली असल्याने नवख्या वाचकालादेखील निसर्ग अवलोकनासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. इतकेच नाही, तर कोणती वनस्पती, प्राणी, पक्षी धोकादायक पातळीवर गणला जातो, त्याचे वैशिष्टय़पूर्ण ‘टॅग’ दिलेले आहेत.

महाबळेश्वरसारख्या ठिकाणी गेल्यावर अनेक पक्षी, फुले सहज दिसू शकतात. महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू हा तर अगदी हमखास दिसतो. तो जरूर पाहावा. ब्लॅक ईगल म्हणजे काळा गरुड हिवाळ्यात दिसतोच. किंबहुना अगदी एखाद्या तलावात नौकावहन करतानादेखील अनेक पक्षी दिसू शकतात.. फक्त चौकस डोळ्यांनी पाहता आले पाहिजे! येथे ऑर्किड्सचा तर खजिनाच आहे. ‘हॅबिनेरिया पांचगणीन्सीस’ हे फक्त पाचगणीच्या पठारावरच दिसणारे फूल. तर ‘महाबळेश्वर शील्ड टेल’ या सापाची नोंददेखील महाबळेश्वरमध्येच आहे. तो येथे खूप ठिकाणी पाहायला मिळतो. वनस्पतींच्या अनेक दुर्मीळ जातींची नोंददेखील आहे. इंडियन फ्रेरिया किंवा फ्रेरिया इंडिका म्हणजेच मराठीत शिंदळ माकडी महाबळेश्वर आणि पाचगणीला दिसते. पण तिचे अस्तित्व असते ते कडय़ांवर, त्यामुळे ती सहजपणे दिसत नाही. याशिवाय असंख्य फुलपाखरे, चतुर आणि पतंग तर आहेतच. अशा सर्व प्रजातींची अगदी पद्धतशीर माहिती आपल्याला या पुस्तकातून मिळते. आणि ते पाहण्यासाठी काय करावे, याचेदेखील सोप्या भाषेत विवेचन यात आहे.

जैवविविधतेची केवळ माहिती देऊनच हे पुस्तक थांबत नाही; तर जिज्ञासूंसाठी काही उपक्रम (अ‍ॅक्टिव्हिटी)देखील त्यात देण्यात आले आहेत. या सर्व माहितीचा फायदा नवीन काही तरी पाहायला मिळण्यात आहेच; परंतु या जैवविविधतेची माहिती झाल्यानंतर येथील पर्यावरणात काय करावे आणि काय करू नये, याचाही बोध होतो- जेणेकरून या सृष्टीचक्राला आपण धक्का लावणार नाही.

जैवविविधतेची माहिती हा या पुस्तकाचा एक महत्त्वाचा भाग नक्कीच आहे; पण त्याचबरोबर महाबळेश्वरमधील अनेक मंदिरे, ब्रिटिशकालीन बंगले, तेथील जनजीवन, समाजजीवनात झालेले बदल यावरदेखील पुस्तकात दृष्टिक्षेप टाकला आहे. महत्त्वाचे म्हणजे, येथील अनेक मंदिरांचे वास्तुशास्त्रीय रेखांकनदेखील दिले आहे. इतिहासात फार खोलवर न जातादेखील, या मंदिरांची व तेथील ऐतिहासिक घडामोडींची माहिती व्हावी हा दृष्टिकोन जाणवतो. त्याचबरोबर महाबळेश्वरमधील गेल्या सातशे वर्षांतील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती मिळते. विशेषत: ब्रिटिश अमदानीत महाबळेश्वरचे रूपडे कसे बदलले, हे वाचणे रोचक आहे. जॉन माल्कम यांच्या कारकिर्दीपासूनच्या घटनांचा धांडोळा वाचताना इतिहासाची पाने सहज डोळ्यांसमोरून सरकत जातात. हल्ली गुगलवर गेल्यानंतर अनेकदा अशा माहितींची रासच समोर येते. पण हे पुस्तक गुगलसारखी माहिती ओतत नाही. परंतु महाबळेश्वरचा हा सारा लेखाजोखा मांडताना अनेक जुनी पुस्तके, दस्तावेज, नकाशे, रोजनिशी यांचा वापर केला आहे. त्यामुळे एखाद्या वास्तूबद्दल रूढ माहिती काय आहे, याबरोबरच त्याचे खरे स्वरूप काय आहे, याचीदेखील सोप्या पद्धतीने मांडणी केली आहे. उदाहरणच द्यायचे तर, माल्कमची कबर म्हणून ओळखली जाणारी वास्तू माल्कमच्या पत्नीच्या नावे आहे की मुलीच्या, याची उकल लेखकांनी येथे केली आहे. १९३० सालचा बंगल्यांचा नकाशा या पुस्तकाला दस्तावेजाची जोड देतो.

महाबळेश्वरचा इतिहास जसा या पुस्तकात येतो, तसेच गेल्या शंभर वर्षांतील काही महत्त्वाच्या गोष्टींचे उल्लेखदेखील त्यात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे बालकवींच्या कविता! महाबळेश्वरच्या निसर्गरम्य वातावरणातच बालकवींना ‘निर्झरास’, ‘ती फुलराणी’ या कविता स्फुरल्याचे उल्लेख यात येतात. तसेच गेल्या काही वर्षांत महाबळेश्वरच्या पर्यावरण रक्षणासाठी झालेल्या कामांची माहितीदेखील मिळते. बाबुराव ढेबे आणि नलावडे यांनी जोपासलेल्या भारतातील सर्वात उंच अशा ११ मीटर निवडुंगाचा उल्लेखदेखील त्यानिमित्ताने येतो. माल्कमपेठच्या बदलाचे विश्लेषण करणारे एक स्वतंत्र प्रकरणच पुस्तकात आहे. ते छोटेखानी प्रकरण वाचकाला पर्यटन स्थळ म्हणून महाबळेश्वरचा बदल दाखवून देते. इतकेच नाही, तर अत्यंत वेगळा दृश्यानुभव देणाऱ्या ‘पाकिजा’ या चित्रपटाचे चित्रीकरणदेखील याच पेठेत झाले होते, अशी माहिती जाता जाता मिळते. पुस्तकातील आणखी रोचक भाग म्हणजे १२११ ते २०१० या काळातील महाबळेश्वरातील महत्त्वाच्या घटना दर्शविणारा तक्ता!

अर्थातच, हे सर्व काम एकाच लेखकाकडून होणे तसे कठीणच. सोनम आंबे, आनंद पेंढारकर, सीमा हर्डीकर अशा तीन लेखकांनी यासाठी लेखन केले आहे. आनंद पेंढारकर यांनी प्राणी, पक्षी, कीटक यांच्या, तर सीमा हर्डीकर यांनी वनस्पतींच्या नोंदी केल्या आहेत. सोनम आंबे यांनी या संपूर्ण प्रकल्पाचे संचालन केले असून पुस्तकातील अनेक विषयांवरचे महत्त्वपूर्ण संशोधनपर लेखनदेखील त्यांनी केले आहे. ज्येष्ठ गिर्यारोहक हरीश कपाडिया यांनी महाबळेश्वर आणि परिसरातील अनेक डोंगरभटकंतीच्या वाटांवर छोटासा लेखदेखील पुस्तकात समाविष्ट आहे. मुख्य म्हणजे, हे पुस्तक केवळ लिखाण म्हणून नाही तर एक दृश्यानुभवदेखील आहे. त्यामुळेच यातील वैशिष्टय़पूर्ण रेखाटने, अनोख्या पद्धतीने केलेली मांडणी हे खूपच महत्त्वाचे आहे. स्नेहा छत्रे यांनी केलेली रेखाटने आणि मांडणीमुळे हे पुस्तक वाचनीयच नाही, तर ‘प्रेक्षणीय’देखील झाले आहे.

चाकोरीबद्ध पर्यटनाच्या काळात महाबळेश्वरमध्ये अनेक बदल होत असताना हे पुस्तक वाचल्यानंतर नक्कीच ‘पर्यटका’च्या भूमिकेतून बाहेर पडून ‘प्रवासी’ होण्याकडची वाटचाल सुकर होण्याची दाट शक्यता आहे. किंबहुना हाच या पुस्तकाचा हेतू आहे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

‘द अदर महाबळेश्वर’

लेखन : सोनम आंबे, आनंद पेंढारकर, सीमा हर्डीकर

प्रकाशक : मेव्‍‌र्हेन टेक्नोलॉजिस्

पृष्ठे: २३७, किंमत : ४९५ रुपये

suhas.joshi@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2019 3:11 am

Web Title: the other mahabaleshwar book offers fascinating information zws 70
Next Stories
1 बुकबातमी : एडवर्ड स्नोडेनचा ‘पर्मनंट रेकॉर्ड’!
2 आंबेडकरांच्या संदर्भात गांधी..
3 सेपियन्स आणि स्थितप्रज्ञ
Just Now!
X