काही बुकबातम्या भराभर पसरतात. अशी परवापासनंच पसरलेली बातमी म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन हे पुन्हा जेम्स पॅटरसन या लेखकासह थरारकथा लिहिणार आहेत. ‘द प्रेसिडेंट इज मिसिंग’ ही या क्लिंटन-पॅटरसन लेखकद्वयाची याआधीची थरारकथा. तिच्यात जशी ‘व्हाइट हाऊस’ या अमेरिकी अध्यक्षांच्या प्रासादतुल्य घर-कचेरीची वर्णनं आहेत, तशीच पुढल्या कादंबरीतही असतीलच.. कारण त्या आगामी कादंबरीचं नाव ‘द प्रेसिडेंट्स डॉटर’ असं आहे. ही बातमी गुरुवारी आली आणि शुक्रवापर्यंत जगभर झाली याला कारणं आहेत. आदल्या कादंबरीवर चित्रवाणी मालिका निघाली आणि तिचे लेखक म्हणूनच नव्हे, तर ‘कार्यकारी निर्माता’ म्हणूनही बिल क्लिंटन यांचं नाव लागलं. त्या कादंबरीच्या अडीच लाख प्रती पहिल्याच आठवडय़ात खपल्या! आता दुसरी कादंबरी जून २०२१ मध्ये येईल, तेव्हाही कदाचित तसंच होईल.

क्लिंटन यांच्यानंतरचे माजी अध्यक्ष बराक ओबामा हे तर लहान मुलांवर वाचन-संस्कार करायलाही सरसावले आहेत. त्यांच्या पत्नी मिशेल या लहान मुलांची छोटी छोटी पुस्तकं यूटय़ूबवर वाचून दाखवण्याचा उपक्रम करतात, त्यासाठी ‘पीबीएस किड्स’ आणि ‘पेंग्विन रँडम हाऊस’ या बडय़ा प्रकाशन कंपन्यांकडून मिशेलना मानधनही मिळत असावं. पण अलीकडेच (१५ मे) बराक ओबामाही या उपक्रमात आले आणि त्यांनीही ‘द वर्ड कलेक्टर’ हे पुस्तक मिशेल यांच्यासह वाचलं. म्हणजे बराक ओबामांनाही मानधन मिळालं असेल का? असेलही. पण या पैशाचा उपयोग ओबामा दाम्पत्य भल्या कामासाठी करत असावं. शिकागोत ओबामा प्रतिष्ठानतर्फे उभारल्या जात असलेल्या भव्य ‘ओबामा सेंटर’मध्ये ‘शिकागो पब्लिक लायब्ररी’ची नवी, प्रशस्त शाखा उघडणार असल्याची माहिती बराक ओबामांनी ही गोष्ट वाचण्याआधी दिली, त्यातूनही ‘बराक’ यांच्या वाचनप्रेमाचं सामाजिक दायित्व दिसून आलं.

यानंतरचा तिसरा प्रकारही असतो राष्ट्राध्यक्षांचा. जे लिहिणारे नसतात, वाचतातही कमीच.. पण तरी ते पुस्तकांमध्ये ‘असतात’! चित्रपट, नाटकं, कथा, कादंबऱ्या यांच्यात किंवा विनोदी कथा वा प्रहसनांमध्येसुद्धा ते असू शकतात. त्यांच्याबद्दल लिहिणं हा ‘बुकबातमी’चा अधिकार नाही.. पण हे तिसऱ्या प्रकारचे नेते तुम्हालाही दिसू शकतात!