वसंत माधव कुळकर्णी

पैसा आणि संपत्तीनिर्मिती यांबद्दलचे गैरसमज दूर करत आर्थिक वर्तनातील सुधारणांसाठी सल्ले देणारे हे पुस्तक यशस्वी आणि परिपक्व गुंतवणूकदार कसे बनता येईल, हेही सांगते…

आर्थिक नियोजन आणि गुंतवणुकीबाबत गाजलेली बहुसंख्य पुस्तके अमेरिकेतील लेखकांची आहेत. सर्वाधिक विक्री होणाऱ्या या पुस्तकांच्या यादीत एका नव्या पुस्तकाची भर पडली आहे. ते पुस्तक म्हणजे- मॉर्गन हाउजेल लिखित ‘द सायकोलॉजी ऑफ मनी : टाइमलेस लेसन्स ऑन वेल्थ, ग्रीड अ‍ॅण्ड हॅप्पीनेस’! मॉर्गन हाउजेल हे ‘द कॉलॅबोरेटिव्ह फंड’ या उद्यमशील फंडाचे निधी व्यवस्थापक (भागीदार) आहेत. प्रकाशनानंतर पहिल्या आठवड्यापासूनच ‘बेस्ट सेलर्स’ यादीत असलेले आणि वेगवेगळ्या भाषांत भाषांतरित झालेले त्यांचे हे पुस्तक भारतीय गुंतवणूकदारांना परिपक्व गुंतवणूकदार होण्यास नक्कीच उपयुक्त ठरेल. गुंतवणुकीच्या मानसशास्त्राशी निगडित ललित लेखांच्या वाटेने जाणाऱ्या या पुस्तकातील २० प्रकरणांतून मॉर्गन हाउजेल यांनी काही कालातीत सल्ले दिले आहेत. त्यातील बहुतांश प्रकरणे गुंतवणूकदारांच्या आर्थिक वर्तनाबाबत आहेत. पैसा, गुंतवणूक आणि संपत्तीनिर्मिती यांबद्दलचे गैरसमज दूर करत, बाजारातील सापळे व संकटांवर मात करण्यासाठी आर्थिक वर्तन सुधारण्यास हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शन करते. हे धडे कालातीत अशासाठी आहेत की, आज अनेक वर्षांनंतरही गुंतवणूकदार त्याच त्याच चुका करताना दिसतात. उदाहरणार्थ, बाजारात गुंतवणुकीची वेळ साधता येत नाही, हे सत्य अजूनही गुंतवणूकदारांच्या गळी उतरत नाही. गुंतवणूक-गुरू वॉरेन बफे म्हणतात त्याप्रमाणे, ‘बाजारात कधी गुंतवणूक केली (आणि कधी बाहेर काढली)’ यापेक्षा ‘बाजारात किती काळ गुंतवणूक केली’ हे महत्त्वाचे असते. यादरम्यान आलेल्या तेजी आणि मंदीच्या लाटांशी सामना करताना जे गुंतवणूकदार या लाटांना धैर्याने तोंड देतात तेच संपत्तीची निर्मिती करू शकतात.

चातुर्य आणि औपचारिक शिक्षण यांचा बिलकुल संबंध नसतो. प्रसिद्ध विद्यापीठाचे पदवीधर बाजारातून संपत्तीची निर्मिती करण्यात अयशस्वी ठरलेले दिसतात. परंतु अशा अपयशी लोकांच्या तुलनेत कमी शिकलेले निधी व्यवस्थापक संपत्तीची निर्मिती करण्यात कमालीचे यशस्वी झालेले दिसतात. आर्थिक वर्तनासंबंधी काही कौशल्ये आत्मसात केली तर आर्थिक शिक्षण नसलेले सामान्य लोकही श्रीमंत होऊ शकतात. परंतु आर्थिक वर्तनाचे धडे देणे खरोखरच कठीण काम. जो प्रतिभावान आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवतो तोच संपत्तीनिर्मिती करू शकतो, अशी एक युक्तीची गोष्ट लेखकाने एका प्रकरणात सांगितली आहे.

बाजारात नशीब नव्हे, तर चिकाटी आणि धैर्य हेच संपत्तीची निर्मिती करतात. गुंतवणुकीची वेळ साधण्याचे आत्मसात केलेले कौशल्य त्यासाठी उपयोगी ठरते. अनेक जण बाजाराच्या घातांकी वृद्धी (कम्पाउण्डिंग)बाबत बोलतात, परंतु प्रत्यक्षातले वर्तन हे या संकल्पनेला छेद देणारे असते. या घातांकी वाढीबाबतचा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी लेखकाने बिल गेट्स यांच्या सुरुवातीच्या काळातील एक उदाहरण दिले असून ते संपत्तीची निर्मिती का करू शकले, हे नेमकेपणाने सांगितले आहे.

लेखकाने स्वत: पाहिलेला एक धक्कादायक प्रसंग एका प्रकरणात सांगितला आहे. एका तंत्रज्ञान क्षेत्रातील लक्षाधीशाने जवळच्या दागिन्यांच्या दुकानातून मूठभर सोन्याची नाणी खरेदी करण्यासाठी हॉटेलमधील एका सेवकाला हजारो डॉलर्स रोख दिले. लहान मुले ज्याप्रमाणे एकदा सपाट खडा पाण्याच्या पृष्ठभागावर टाकतात आणि त्या सपाट खड्याच्या पाण्याच्या पृष्ठभागावरील उसळीचा आनंद घेतात, त्यासारखी ही नाणी. प्रत्येकी एक हजार डॉलर्स किमतीच्या या नाण्यांचा वापर त्या लक्षाधीशाने प्रशांत महासागरात लहान मुलाप्रमाणे फक्त मनोरंजनासाठी केला. त्याच्यासाठी सोन्याचे नाणे ही एक गंमत होती. परंतु हे सद्गृहस्थ २०१४ मध्ये वयाच्या ९२व्या वर्षी निवर्तले तेव्हा त्यांनी सहा दशलक्ष डॉलर्स इतकी रक्कम दान केली. कधी काळी एका वकिलाच्या कार्यालयात कनिष्ठ वकील म्हणून काम केलेले हे दानशूर म्हणजे मिस्टर रीड! सोन्याची नाणी उधळण्याइतकी श्रीमंती त्यांनी गुंतवणुकीतून कमावली होती. भारतात शेअर बाजार आणि त्याच्याशी निगडित राहून संपत्तीनिर्मिती करणाऱ्यांची ‘सट्टेबाज’ अशी संभावना करणाऱ्यांचे डोळे उघडणारे हे प्रकरण आहे. या पार्श्वभूमीवर लेखकाने एखाद्याने संपत्तीनिर्मिती करण्याचा प्रयत्न का केला पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला आहे. त्यातील बचत आणि गुंतवणूक का करावी, या एकाच मुद्द्यावर भारतीय वाचकांनी लक्ष दिले तर हे पुस्तक वाचण्याचा हेतू सफळ संपूर्ण झाला असे म्हणता येईल. तरुण जितक्या लवकर यातील उपदेश अंगीकारतील तितके त्यांचे उर्वरित आयुष्य सुखासीन होईल, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

वॉरेन बफे यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये गुंतवणूक केली नाही. याचे कारण बफे यांनी असे सांगितले की, ‘‘त्या (मायक्रोसॉफ्टच्या) व्यवसायाचे विश्लेषण मला करता आले नाही.’’ मात्र लेखकास प्रत्येक गोष्ट इतरांपेक्षा वेगळी दिसते. इतरांपेक्षा वेगळे पाहण्याची त्यांची सवय बफे यांच्या गुंतवणुकीतील अपयशाबद्दल बरेच काही सांगून जाते. बहुतेक गुंतवणूक विश्लेषक बफे यांना सहस्राकातील सर्वात यशस्वी निधी व्यवस्थापक समजतात. मात्र अद्वितीय विश्लेषण, कठोर परिश्रम आणि एखाद्या व्यवसायाचा विस्तृत आढावा घेण्याची क्षमता, त्या व्यवसायाची बलस्थाने अजमावून प्रचंड मोठी गुंतवणूक करण्याचे धाडस असलेल्या बफे यांनी आपली ९५ टक्के मिळकत वयाच्या पासष्टीनंतर कमावली आहे, हे ध्यानात घ्यायला हवे.

एखाद्या कंपनीच्या व्यवसायाचे विश्लेषण कसे करावे, हे मनोरंजन क्षेत्रातील ‘नेटफ्लिक्स’ माध्यम मंचाच्या उदाहरणावरून समजावून देण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. नेटफ्लिक्सने २००२ ते २०१८ दरम्यान अमाप परतावा देऊनही बऱ्याच गुंतवणूकदारांनी सर्वकालीन शिखराच्या किमतीपेक्षा कमी भावात सौदे होत असल्याने नेटफ्लिक्सला राम राम ठोकला. मात्र आपण किती भांडवली लाभाला मुकलो याचा विचार करून त्या गुंतवणूकदारांना आता पश्चात्ताप करण्याची वेळ आली आहे. प्रत्येक वेळी या कंपनीचा समभाग नवीन शिखराला स्पर्श करतो तेव्हा त्यांच्या या दु:खाची तीव्रता अधिक दाहक होते. हे वाचल्यावर वाचकांना आपल्या चुका आठवू शकतील; परंतु अशाच चुकांतून गुंतवणूकदार शिकत असतो, हे वाचून त्या चुका केल्याबद्दल दु:ख सहन करण्याचे धैर्य आपोआप प्राप्त होते. लेखक म्हणतो : ‘चुकल्यामुळे गुंतवणूकदार अशा प्रकारच्या अस्थिरतेचा विचार करतात. मोठ्या नफ्याला मुकल्याबद्दल दु:ख वाटण्याऐवजी त्यांनी ती शिकण्यासाठी दिलेली अटळ किंमत समजायला हवी. ती कितीही मोठी असली तरी आपल्याला हे माहीत असायला हवे की, संयम हे दु:ख सहन करण्यास नक्कीच शिकवेल.’ अशाच प्रकारचा आणखी एक युक्तिवाद लेखकाने केला आहे; तो असा की, चलनवाढीला सामोरे गेलेल्या १९५० दरम्यान जन्मलेल्या मंडळींनी शेअर बाजारात फारसे कमाविले नाही. १९७० दरम्यान जन्मलेल्या व्यक्तींनी सुरुवातीच्या वर्षांत साधारण नऊ टक्के परतावा मिळवला, मात्र १९९० नंतर जन्मलेल्यांनी त्यांच्या पालकांपेक्षा बाजारात खूप काही कमावले.

आर्थिक बुडबुडे कशामुळे तयार झाले, याचे वर्णन करताना लेखकाने म्हटले आहे : अल्प मुदतीत नफा कमाविणारे व्यापारी जेव्हा बाजारावर अधिराज्य गाजवतात तेव्हा समभागाची बाजारातील किंमत गुंतवणूक मूलभूत मूल्यांपेक्षा जास्त असते. उत्साही गुंतवणूकदार याकडे डोळेझाक करत उत्साही खरेदी करतात आणि भविष्यात त्या समभागाची बाजारातील किमतीपेक्षा अधिक किंमत मिळवण्याची आशा बाळगतात. त्यासाठी ते आकर्षक कथा रचतात आणि अंधानुकरण करणारे गुंतवणूकदार त्यावर विश्वास ठेवतात.

लेखक गुंतवणूकदारांना पैसा आणि संपत्तीचा कशा प्रकारे विनियोग करावा, याचा विचार करण्यास उद्युक्त करतो. लेखकाच्या मते, श्रीमंत असूनही पैसा खर्च करण्याचे स्वातंत्र्य नसणे आणि संपत्तीचा विनियोग करण्याचे स्वातंत्र्य असणे या दोन गोष्टी पूर्णपणे भिन्न आहेत. बऱ्याच श्रीमंतांना आपण किती श्रीमंत आहोत हे दाखविण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात. तुमचा अहंकार आणि उत्पन्न यांच्यातील अंतर म्हणजे श्रीमंती; कारण बहुसंख्य पैसा श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यासाठी खर्च होत असतो, हा विचार वाचकाला पैशाबद्दल विचार करण्यास उद्युक्त करणारा ठरावा. त्यामुळे एक यशस्वी गुंतवणूकदार होण्याची मनीषा बाळगणाऱ्यांनी हे पुस्तक वाचायलाच हवे.

vasant@vasantkulkarni.com