महाराष्ट्राविषयी जे संशोधनपर लिखाण इंग्रजी भाषेतून आणि प्रामुख्यानं पाश्चात्त्य देशांतून एकविसाव्या शतकात पुस्तकरूपानं आलं, त्याची ओळख करून देणाऱ्या लेखमालेचा हा भाग पहिला; ‘ज्ञानदेव आणि चक्रधरस्वामी यांच्याबद्दल आदर राखणाऱ्या’ पुस्तकाबद्दल..

‘‘कल्पना करा, तुम्ही भारतात आहात. इसवी सन १२९०. मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात तुम्ही, तुमचा नवरा आणि मुलं पेरणीसाठी पावसाची वाट पाहताय. तुमच्या शेताजवळच एक मठ आहे, जिथे विद्वान ब्राह्मण तुम्हाला अनाकलनीय असणाऱ्या भाषेत काही पुस्तकं लिहितात; तुमच्या जातीचे लोक सहसा ब्राह्मणांच्या भाषेशी परिचित नसले तरी त्यांच्याशी तुमचा बाजाराच्या सामान्य भाषेत संवाद होत असतो. तुमच्या जमिनीच्या उत्पन्नापैकी एक भाग राज्याला आणि काही भाग या मठाला जात असतो. दुपारचं ऊन फार वाढतं तेव्हा तुम्ही एका डेरेदार वडाच्या झाडाखाली विश्रांतीसाठी जमलेल्या लोकांच्या घोळक्यात शिरता. इथे एक माणूस बसलाय. तो एक विद्वान ब्राह्मण आहे हे तुमच्या लक्षात येतं आणि त्याला बाजाराच्या, सामान्य व्यवहाराच्या भाषेत बोलताना ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटतं. आणि जरी तो तुमच्या नेहमीच्या भाषेत बोलत असला तरीही त्याचा विषय असामान्य आहे. दु:खापासून मुक्ती आणि मोक्षाविषयी तो बोलतोय. त्याचं बोलणं ऐकताना त्या वडाच्या झाडामागच्या टेकडीआड असलेला तो मठ तुम्हाला नव्यानं जवळ आल्यासारखा भासू लागतो.’’

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

– ख्रिश्चन ली नोवेत्झ्की यांच्या ‘द कोटिडिअन रिव्होल्यूशन-  व्हर्नक्युलरायझेशन, रिलिजन अ‍ॅण्ड द प्रीमॉडर्न पब्लिक स्फीअर इन इंडिया’ या पुस्तकाची सुरुवात अशी होते. ‘कोटिडिअन’ म्हणजे दैनंदिन, सर्वसामान्य. नोवेत्झ्की हे अमेरिकेतल्या वॉशिंग्टन विद्यापीठातील ‘रिलिजिअस स्टडीज’ या विषयाचे प्राध्यापक असून वारकरी संप्रदाय आणि मराठी वाङ्मयीन संस्कृतीचे गाढे अभ्यासक आहेत. एखादा भक्तिमार्गी किंवा भाषिक समूह कसा आकार घेतो; ऐतिहासिकता आणि स्मृती यांच्यातील परस्परसंबंध कसे घडतात; वसाहतपूर्वकालीन भारतात सार्वजनिक चच्रेचं – इंग्रजीत ज्याला ‘पब्लिक स्फीअर’ म्हणतात- स्वरूप कसं होतं अशा स्वरूपाचे प्रश्न नोवेत्झ्की यांच्या विवेचनाच्या केंद्रस्थानी राहिलेले दिसतात. यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या ‘रिलिजन अ‍ॅण्ड पब्लिक मेमरी : अ कल्चरल हिस्टरी ऑफ संत नामदेव’ (२००८) या पुस्तकातही त्यांनी संत नामदेवांना केंद्रस्थानी ठेवून वारकरी भक्तीच्या माध्यमातून घडलेल्या सार्वजनिकतेच्या स्वरूपाची चर्चा केली होती. या पुस्तकात ‘ज्ञानेश्वरी’ व ‘लीळाचरित्रा’च्या बारीक वाचनातून आणि यादव राजवटीतील सांस्कृतिक पर्यावरणाच्या चिकित्सेतून मराठी ही एक ‘वाङ्मयीन भाषा’ या अर्थाने राजदरबाराबाहेर, सार्वजनिक चौकात आणि बाजाराच्या तिठय़ावर कशी आकाराला आली, याचं अतिशय वाचनीय आणि अभ्यासपूर्ण विवेचन नोवेत्झ्कींनी केलं आहे.

आधुनिक भारतीय भाषांचा विकास इसवी सनाच्या पाचव्या ते पंधराव्या शतकांदरम्यान झाला. कुठल्याही भूगोलाने नियंत्रित नसणारी, भारतव्यापी मार्गक्रमण करीत असणारी (म्हणून मार्गी) संस्कृत भाषा मागे पडून विशिष्ट भौगोलिकतेने/ देशाने बद्ध असणारी (म्हणून देशी) अशी निरनिराळ्या भारतीय भाषांची सांस्कृतिक व्यवस्था या कालखंडात विकसित झाली. देशी भाषिक व्यवस्थांतून देशी वाङ्मयीन संस्कृतींचा विकास होत गेला. नोवेत्झ्कींचं पुस्तक या देशीकरणाचा वेध घेताना, तिला बहुव्यापी प्रक्रिया मानून – म्हणजे ही प्रक्रिया केवळ वाङ्मयीन नसून सामाजिक, धार्मिक आणि बहुआयामी सांस्कृतिक प्रक्रिया होती हे ध्यानात घेऊन- दैनंदिन सार्वजनिक चर्चाविश्व आणि जातवर्णआदी विषमतांची टीका या देशीकरणाच्या केंद्रस्थानी कशी होती, हे सांगतं. मुख्य म्हणजे, हे सारे ज्ञानेश्वर व चक्रधर या दोन मराठीच्या आदिलेखकांच्या काळातल्या वाङ्मयीन, सामाजिक व राजकीय पर्यावरणाच्या चच्रेतून दाखवून दिलं आहे.

एकूण तीन भागांत, सात प्रकरणांत विभागलेल्या या पुस्तकाच्या केंद्रस्थानी वसाहतपूर्व काळातली देशीकरणाची ही बहुआयामी प्रक्रिया आहे. पहिल्या भागात यादवकालीन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व्यवस्थेची चर्चा आहे, ज्यात नोवेत्झ्की असं सुचवू पाहतात, की आधुनिक महाराष्ट्राच्या ओळखीचा, अस्मितेचा काही एक सुप्त आराखडा यादवकालीन प्रचलित असणाऱ्या ‘मराठे’ नावाच्या संज्ञेत आढळतो. अर्थात, याचा अर्थ जातवाचक नसून, मराठे म्हणजे ‘महाराष्ट्राशी संबंधित’ असा होत असे. पण हा सिद्धांत या पुस्तकाचं प्रमुख प्रतिपादन नाही आणि ते फारशा काटेकोर शिस्तीने मांडलंही गेलेलं नाही. तरीही मुद्दा रोचक आहे, विशेषत: महाराष्ट्राच्या संदर्भातले जातजाणिवेचे इतिहास एकोणिसाव्या शतकातल्या वसाहतवादी धोरणांकडे बोट दाखवणारे असतात, त्यामुळे वसाहतपूर्व काळातल्या ‘मराठेपणा’ची जाणीव निश्चितच अभ्यासण्याजोगी बाब आहे.

दुसऱ्या भागात मुख्यत: ‘लीळाचरित्रा’चं अध्ययन करून त्यातून देशीकरणाच्या प्रक्रियेचे विविध पलू मांडले आहेत. ‘लीळाचरित्र’ हे चक्रधरांचं आणि पर्यायानं तत्कालीन समाजाचं ऐतिहासिक आकलन करण्याचं साधन आहे. शिवाय तो मराठीतील एक आदिग्रंथ असल्याने तेराव्या शतकातील महाराष्ट्राच्या धार्मिक, भाषिक व सांस्कृतिक आकलनाच्या दृष्टीने ‘लीळाचरित्रा’चा अभ्यास महत्त्वाचा आहे. यातून देशीकरणाची प्रक्रिया केवळ वाङ्मयीन नसून उलट प्राथमिकदृष्टय़ा धार्मिक, सामाजिक आणि राजकीय आहे, हे नोवेत्झ्की दाखवतात.

पुस्तकाच्या तिसऱ्या भागात नोवेत्झ्की ज्ञानेश्वरीच्या उत्तरार्धाचं बारकाईनं अध्ययन करून देशीकरणाच्या प्रक्रियेतली गुंतागुंत दाखवून देतात : ज्ञानेश्वरी ही स्त्रीशूद्रादींसाठी देशी भाषेत लिहिली गेली आणि देशीकरण एकूणच विषमतेच्या विरोधात असलं तरीही ज्या संस्कृतातून ही आयात होत होती त्यातले वाक्प्रचार, भाषिक संकेत मराठीतही उतरले. त्यामुळे एका बाजूने देशीकरणामुळे मार्गी ज्ञान बहुजनांना खुलं झालं, तर दुसऱ्या बाजूनं देशी भाषेला मार्गीचं कोंदण बसलं.

दुसऱ्या सहस्रकात जो भारतीय भाषांचा आणि वाङ्मयीन संस्कृतींचा विकास झाला त्या संदर्भात राज्यसत्तेची भूमिका काय होती, हा आणखी एक प्रश्न या पुस्तकात चच्रेला येतो. गेल्या काही वर्षांमध्ये या देशीकरणाच्या प्रक्रियेबाबतचं शेल्डन पोलॉक यांचं त्यांच्या ‘द लँग्वेज ऑफ द गॉडस् इन द वर्ल्ड ऑफ मेन’ या पुस्तकातलं प्रतिपादन – ‘वाङ्मयीन देशीकरणाचा संबंध धार्मिक व्यवस्थेशी नसून, ते मुख्यत: राज्यसत्तेच्या सहकार्याने घडलं; राज्य आणि काव्य यांच्या सहयोगातून संस्कृत सौंदर्यशास्त्राच्या आधारे देशी वाङ्मयीन संस्कृतीला प्रोत्साहन मिळालं’- अतिशय प्रभावी ठरलं आहे. त्याउलट नोवेत्झ्की प्राधान्याने मराठीच्या संदर्भात ही देशीकरणाची प्रक्रिया राजदरबाराबाहेर दैनंदिन सार्वजनिक आयुष्यात-लोकभाषा, सत्ता आणि स्थानिकता या घटकांच्या संयोगातून- आकाराला आल्याचं प्रतिपादन करतात. यादव राजवट (११८९-१३१७) मराठी वाङ्मयीन संस्कृतीबाबत बरीचशी उदासीन राहिली असल्याचं दाखवून नोवेत्झ्की मराठीचा वाङ्मयीन विकास राजदरबाराबाहेर दैनंदिन व्यवहाराच्या क्षेत्रात, भक्ती किंवा धार्मिकतेच्या संवादांतून घडला असल्याचं दर्शवतात. ज्ञानदेव आणि चक्रधरांसारख्या उच्चवर्णीय लेखकांनी राजदरबार किंवा इतर तत्सम उच्चभ्रू संस्थांबाहेर सर्वसामान्य लोकांच्या भाषेत मराठी वाङ्मयीन संस्कृतीचा पाया रचला.

‘लीळाचरित्र’, ‘ज्ञानेश्वरी’तील नव्या नैतिकतेचा ओनामा आणि जातवर्णादी विषमतांवरची टीका यांतून मराठी भाषेचं सार्वजनिक चच्रेचं विश्व आकाराला आलं. ज्ञानेश्वर आपल्या गीतेवरच्या टीकेत सुरुवातीलाच ती स्त्रीशूद्रादींसाठी रचली असल्याचं सांगतात. चक्रधरांच्या लीळादेखील त्यांचा वर्णविषमतेला असणारा विरोध व्यक्त करतात. असं असूनही नोवेत्झ्की आपल्याला दाखवून देतात, की मराठी वाङ्मयीन संस्कृतीचा पाया असणारी ही दोन्ही पुस्तकं यादवकालीन दैनंदिन विश्व आणि त्यातल्या विषमतांची जाणीव बाळगून आणि त्यावर टीका करूनदेखील त्यांची काही प्रमाणात पुनरावृत्ती करतात. आणि तरीही, ही दोन्ही पुस्तकं मराठीसाठी एक नव्या देशी सौंदर्यशास्त्राचं आणि सर्वसामान्यांना खुल्या अशा नैतिक अवकाशाचं सूतोवाच करतात.

मिशेल फूको आणि मिशेल दे सर्त्यू यांच्या सत्ताविषयक प्रारूपांचा उपयोग करून, मार्गी आणि देशी व्यवस्थांचं परस्परावलंबी स्वरूप दाखवून देऊन, नोवेत्झ्की देशीकरणाच्या प्रक्रियेला नव्या इतिहासाचं सूचन असं न मानता, वाङ्मयीन इतिहासातली सलगता मानतात. शिवाय ही प्रक्रिया मूलभूत अर्थानं सामाजिक आणि सांस्कृतिक आहे आणि ज्या सामाजिक-धार्मिक व्यवस्थेद्वारे हे देशीकरण मराठीत घडून येतं त्यातही संस्थात्मक धार्मिकरचना (मठ, मंदिरे इत्यादी) या देशीकरणाला अनुकूल आहेतच असं नाही. तरीही मराठीतल्या देशीकरणाला धार्मिक/भक्ती परंपरेने चालना दिली आणि सामाजिक विषमतांना सार्वजनिक चच्रेचा विषय बनवलं असंही स्पष्ट करतात. एकंदरीत नोवेत्झ्कींची देशीकरणाची चर्चा सत्ता, भाषा आणि टीका यांच्या परस्परसंबंधांवर प्रकाश पाडताना, देशीकरण हे अनेकानेक परस्परविरोधी अशा प्रक्रियांचे फलित आहे याचं अतिशय उत्तम भान देते.

नोवेत्झ्कींच्या पुस्तकातली आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे अतिसंवेदनशील मंडळींसाठी नमनाआधीच दिलेला माफीनामा! परत परत ते सांगत राहतात, की मला ज्ञानेश्वर आणि चक्रधर यांच्याबद्दल नितांत आदर आहे आणि मला चुकूनही कुणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत. आणि आजच्या काळात हे निवेदन अप्रस्तुत आहे असं कोण म्हणेल? पण आनंदाची बाब म्हणजे, नोवेत्झ्कींचं पुस्तक अतिशय आदरपूर्वक आणि तरीही तितकंच चिकित्सक आणि सर्जक अशा समीक्षेचा उत्तम पुरावा आहे. त्यामुळे हे एक अत्यंत अभ्यासपूर्ण आणि अतिशय वाचनीय पुस्तक अधिकाधिक प्रमाणात वाचलं जायला हवं.

लेखक कोलंबिया विद्यापीठाचे विद्यार्थी असून ‘आधुनिक महाराष्ट्राची संकल्पना : वैचारिक आणि सांस्कृतिक इतिहास, १८९९ ते १९६६’ या विषयावरील पीएच.डी.चा प्रबंध लिहीत आहेत.

होय, ‘हस्तिदंती मनोऱ्यातून’;  पण..

या सदरातून येतं वर्षभरआपण गेल्या १७/१८ वर्षांत प्रसिद्ध झालेल्या महाराष्ट्रविषयक संशोधनात्मक निवडक पुस्तकांचा परिचय महिन्यातून एकदा करून घेणार आहोत. अर्थात, हे महाराष्ट्राविषयीचं समकालीन ऐतिहासिक आणि समाजशास्त्रीय संशोधन पूर्णपणे इंग्रजीत आणि बहुतकरून परदेशी विद्यापीठांत होतंय. सत्तर वा ऐंशीच्या दशकात जेव्हा महाराष्ट्रातल्या चळवळी ऐन भरात होत्या तेव्हा निव्वळ अकादमिक/ विद्यापीठीय स्वरूपाच्या चिकित्सेला किंचितशा हेटाळणीच्या सुरात ‘हस्तिदंती मनोऱ्यातली चर्चा’ मानलं जाई. हे विशेषण आजही फारसं अप्रस्तुत ठरेल असं नाही. विशेषत: केवळ इंग्रजीत आणि परदेशात चालू असलेलं भारतविषयक ऐतिहासिक आणि समाजशास्त्रीय संशोधन काळ आणि अवकाश या दोन्ही अर्थानं काहीसं खरोखरच दूरस्थ आहे आणि अर्थव्यवस्था, राज्यसत्ता, वर्ग, लिंगभाव (जेण्डर) किंवा लैंगिकता अशा जागतिक स्वरूपाच्या कोटीक्रमांचा (कॅटेगरीज) अभ्यास करताना भारतीय – आणि महाराष्ट्रीय – कालावकाशाबद्दल काही आनुषंगिक सद्धांतिक मांडणी करणं, असं या संशोधनाचं स्वरूप राहिलंय. खेरीज हे सगळं चर्चाविश्व भारतीय भाषांच्या वैचारिक अवकाशापासून पूर्णत: तुटलेलं आहे. किंबहुना, आजचं वसाहतोत्तर अकादमिक वैचारिक विश्व कधी नव्हे इतकं एकभाषिक आणि भारतीय भाषांपासून दुरावलेलं आहे. पण तरीही ते अभ्यासपूर्ण, लक्षणीय आणि मननीय आहे. दूरस्थतेमुळे ज्ञानक्षेत्रात आवश्यक असणारी एक तटस्थताही या संशोधनात काही प्रमाणात दिसून येते. त्यामुळे, या हस्तिदंती मनोऱ्यातून महाराष्ट्र कसा दिसतो, हे पाहणं उद््बोधक ठरेल.

या सदरातून महाराष्ट्रातली वारकरी परंपरा, दलित चळवळ, इतिहास संशोधनाची परंपरा, एकोणिसाव्या शतकापासून नियतकालिकं आणि वर्तमानपत्रांतून खुला झालेला सार्वजनिक चच्रेचा अवकाश, मराठी नाटक आणि सिनेमाच्या माध्यमातून झालेली लिंगभावाची जडणघडण, महाराष्ट्राच्या आर्थिक रचनेचे ऐतिहासिक आधार.. अशा अनेकानेक विषयांवरची पुस्तकं आपण पाहू. अर्थात, त्यावर साद्यंत चर्चा जरी नाही झाली, तरी त्यातून एकूण समकालीन पाश्चात्त्य अकादमिक विश्वात चालू असलेल्या महाराष्ट्रविषयक संशोधनाच्या स्वरूपाचा एक व्यापक परिचय आपल्याला होईल, अशी आशा करू या.

‘द कोटिडिअन रिव्होल्यूशन’

लेखक : ख्रिश्चन ली नोवेत्झ्की

 प्रकाशक : पर्मनंट ब्लॅक (भारतीय आवृत्ती)

 पृष्ठे : ४३२, किंमत : ८९५ रुपये

राहुल सरवटे – rahul.sarwate@gmail.com