या कादंबरीची नायिका सारा, तिच्या वाचनप्रेमी मैत्रिणीला भेटायला स्वीडनहून आयोवामधल्या लहानशा खेडय़ात येते आणि विचित्र योगायोगानं इथलीच होते. गावातल्या प्रत्येकासाठी त्याच्या आयुष्याशी निगडित पुस्तक शोधण्याचा चंग बांधते. कालचे ग्रंथ आमच्या गावात आलेच नाहीतअशा- जीवनसंघर्षांतच आयुष्य घालवणाऱ्या- ग्रंथअवर्षणाच्या प्रदेशात वाचनाचं बी पेरते!  विश्व पुस्तक दिन २३ एप्रिल रोजी असताना, ‘बुक्स ऑन बुक्सया प्रकारात मोडणाऱ्या या पुस्तकाची दखल घेतली जाणं आवश्यकच..

‘दि रीडर्स ऑफ  ब्रोकन व्हिल रेकमेण्ड’ कादंबरीतली प्रमुख व्यक्तिरेखा स्वीडनवरून अमेरिकेतील अतिछोटय़ा, मरणकळा अनुभवणाऱ्या खेडय़ात दाखल होते. आपल्या समकक्ष पुस्तकजीवी मैत्रिणीच्या घरात ती आत्तापर्यंत कैकदा रिचवलेली ‘ब्रिजेट जोन्स डायरी’ वाचायला घेते. खूपविके पुस्तक आणि त्यावरील बहुप्रिय चित्रपट म्हणून नाणावलेल्या या कलाकृतीबाबत तिच्या मनात क्षणकालासाठी दाटणाऱ्या भावनांचा घाऊक ऐवज मात्र मौलिक आणि ग्रंथोत्कट व्यक्तींच्या अनुभवस्मृतींची पाने उघडून देणारा आहे. ती म्हणते की, देश बदलला, शहर बदलले, भोवताल आणि तिथल्या सर्व दृश्य-गंध जाणिवांचा पट बदलला तरी पुस्तक मात्र ते आणि तसेच राहिले. त्यातून मला मिळणारे सुख पूर्वी आणि आता सारख्याच तोलामोलाचे होते. मी आधी माझ्या देशात वाचले तेच पुस्तक, तोच परमानंद मला इथेही लाभला.. बदल हा मानवी जीवनाचा स्थायीभाव असला तरी बदलाची बेदिली होऊ न देणाऱ्या ग्रंथांबद्दल व्यक्त होणाऱ्या कौतुकापासून हे पुस्तक वाचकाला कह्य़ात घेते. त्याच्या अपारंपरिक स्वरूपाला कवटाळायला लावते आणि आपल्यात दडलेल्या ग्रंथोपजीवी आत्म्याला तृप्तीची रसद पुरविते.

‘बुक्स ऑन बुक्स’ हा पुस्तकप्रकार पट्टीच्या वाचकांना आपला पल्ला विस्तारल्यानंतर सर्वाधिक आवडतो. वाचनऊर्जेने भारावलेल्या तऱ्हेवाईक समधर्मी अशा पुस्तकांमधून सापडतात. आपल्या वाचनसवयी, वाचनहट्ट, ग्रंथलोलुप अवस्थांशी अशा पुस्तकातील व्यक्तिरेखांना पडताळून पाहता येते. पुस्तकाच्या आत गेल्यानंतर ते वाचताना उलडणारे जग हे ‘वाचका’च्या भोवतालच्या जगापेक्षा वेगळे नसतेच. अन् देश-काल यांच्या सीमांच्या मर्यादांवर मात करीत त्या जगाचीच लेखकाच्या हुकमानुसार चालणारी भली-बुरी आवृत्ती आपण अनुभवत असतो. हेलन हॅन्फच्या ‘एटीफोर : चेरिंग क्रॉस रोड’, अ‍ॅन फॅडिमनच्या ‘एक्स लिब्रिस’, निक हॉर्नबीच्या ‘टेन इयर्स इन टब’ या पुस्तकवेडाच्या अकथनात्मक पुस्तकांतून किंवा जेस्पर फोर्डच्या ‘एअर अफेअर’, कालरेस मारिआ डॉमिंग्युझ या लेखकाच्या ‘हाऊस ऑफ पेपर’ या कादंबऱ्यांतून ग्रंथप्रेमाची उत्कट अवस्था प्राप्त होते. खरे तर कोणत्याही चांगल्या पुस्तकातून वाचकाला आनंदाची अवस्था प्राप्त होतच असते, पण आपल्या पुस्तकप्रेमातील हव्यासाची, हवे ते पुस्तक हस्तगत केल्यानंतर लाभणाऱ्या परमानंदाची आणि आपल्या ग्रंथव्यसनाशी समानता सांगणारी उदाहरणे देशोदेशीच्या पुस्तकांवरच्या पुस्तकांतच सापडतात. कॅटरिना बिवाल्ड हिची ‘दि रीडर्स ऑफ ब्रोकन व्हिल रेकमेण्ड’ तशी दीडेक वर्षांपूर्वी स्वीडिशमधून इंग्रजीत भाषांतरित झालेली कादंबरी आहे. रचनेच्या दृष्टीने पूर्वसुरींपेक्षा त्यात फारसे नावीन्य नाही. मात्र ग्रंथअवर्षणाच्या प्रदेशात पुस्तक या मूलभूत गरजांत कधीही प्राधान्यक्रम नसलेल्या घटकाच्या शिरकावाने होणारी इथली घुसळण लोभवून टाकणारी आहे.

कादंबरीच्या सुरुवातीलाच भेटते सारा या स्वीडनमधून अमेरिकेतल्या ‘ब्रोकन व्हिल’ या काल्पनिक गावात दाखल झालेल्या विशी-तिशीच्या सीमारेषेवरील तरुणीपासून. या ब्रोकन व्हिल नावाच्या गावाबद्दल तिला आकर्षण आहे ते तिच्यासोबत केवळ वाचनावरचा पत्राचार करणाऱ्या अ‍ॅमी या तिच्यासारख्याच पुस्तकवेडय़ा वृद्धेमुळे. आपल्या या छंदमैत्रिणीला साक्षात भेटण्यासाठी ती अमेरिकेमधील प्रसिद्ध शहरांना वगळून या खेडय़ात दाखल झालेली असते. तिच्या आगमनाच्या दिवशी ती मैत्रिणीने पत्रातून वर्णिलेल्या जागांना शोधत तिच्या घरापाशी पोहोचते आणि भीषण धक्कादायक वृत्ताने थबकते. गावातील तऱ्हेवाईक लोकांच्या जथ्याकडून तिची लाडकी पत्रमैत्रीण अ‍ॅमीवर अन्त्यविधी सुरू असतो. काही महिन्यांसाठी अमेरिकेत निव्वळ अ‍ॅमीला भेटण्यासाठी इथे येऊन तिच्याशी ऊर फुटेस्तोवर पुस्तकगप्पा करण्याची साराची संकल्पित मौज आता संपुष्टात आल्याचे तिला लक्षात येते. मात्र तेथे असलेल्या गावकऱ्यांसाठी साराचे आगमन आणि तिचा पाहुणचार अग्रक्रमाची गोष्ट बनते. अल्पावधीतच तिचा ताबा घेतला जातो. अ‍ॅमीचे घर हे तिचे राहायचे घर बनते आणि खेडय़ातला प्रत्येक जण तिची खातरदारी करण्यासाठी सज्ज होतो. कुणी तिला गावभर हिंडता येण्यासाठी गाडी घेऊन दाखल होतो, कुणी बारमध्ये तिला मोफत मद्य पुरवतो, कुणी रेस्तराँमध्ये खाण्या-पिण्याचे पैसे न घेता या परदेशी पाहुणीची सरबराई करतो. आयुष्यात माणसे आणि पुस्तक या दोहोंपैकी एरवी पुस्तकांनाच प्राधान्य देणारी सारा, या गावातला अलोट प्रेमाचा न आटणारा ओघ पाहून हरखून जाते. ती गाव आणि तिथल्या माणसांचे वाचन करू लागते. ते करताना या गावात पुस्तकाचे दुकान थाटण्याचे ठरविते. आपली काही महिन्यांची अमेरिका भेट सत्कारणी लावण्यासाठी तिच्या या उपक्रमालाही गावातून उदंड प्रतिसाद मिळतो. पुस्तकाचे वाचन कधीही न करणाऱ्या या मंडळींसाठी सारा पुस्तकालय उभारते.. प्रत्येकाला त्याच्या आयुष्याशी निगडित असणारे पुस्तक शोधून देण्यासाठी सज्ज होते आणि कादंबरी वेगवान ग्रंथप्रेमाची गाथा मांडू लागते.

कादंबरीतील नायिका ही यच्चयावत अमेरिकी लेखक, लेखिकांनी झपाटलेली आहे. अभिजात ब्रिटिश कादंबऱ्यांचे तिला वावडे नाही, पण त्यासोबत गेल्या दीड-दोन दशकांतील पुस्तक आणि लेखकांविषयीची असोशी तिच्या वाक्यावाक्यांमधून डोकावते. स्वीडनमध्ये पुस्तकांच्या दुकानात दहा वर्षांहून अधिक काळ चाकरी करणाऱ्या साराच्या नसानसांत पुस्तकांचे व्यसन भिनलेले असते. परिणामी प्रत्येकाच्या आत एक पुस्तक दडलेले असून प्रत्येकाला आवडणाऱ्या धाटणीचे एखादे तरी पुस्तक अस्तित्वात असल्याची तिची धारणा असते.

अ‍ॅमी या तिच्या लाडक्या पुस्तकमैत्रिणीचा मृत्यू झाला असला, तरी दरएक प्रकरणानंतर साराला लिहिलेल्या तिच्या पत्रांतून ती सापडत राहते. इथली साराची निवांततेमधली पुस्तकांवरची स्वगते संस्मरणीय होतात. उदा. ‘सिगारेटच्या पाकिटावर जशी घातक परिणामांची सूचना दिली जाते, तशी शोकांतिका मांडणाऱ्या पुस्तकांच्या मुखपृष्ठावरही त्यांच्या परिणामाबद्दल सूचना दिली जावी.’, ‘माणसे मर्त्य असली, तरी पुस्तके आणि त्यातला मानवी विचार मात्र जिवंतच राहतो.’

ही कादंबरी पुस्तकप्रेमावर असली, तरी त्यासोबत तिच्या कथानकाला अनेक स्तर आहेत. ही जगभरात सध्या संपत चाललेल्या खेडय़ांचीही गोष्ट सांगते. मंदीच्या काळात एकमेकांना जपत तगून राहिलेल्या दुर्मीळ अशा समुदायाची आपल्याला ओळख करून देते. आयोवा प्रांतातील ब्रोकन व्हिल या खेडय़ामधली आर्थिक स्थिती कोलमडलेली आहे. गावात सुखवस्तू दुकाने नाहीत. आहेत त्या दुकानांना, हॉटेल-रेस्तराँ-बार यांना हवी तितकी गिऱ्हाईकं नाहीत. गावात तरुण मुले नाहीत. शाळांमध्ये पुरेशी पटसंख्या नसल्याने त्याही कैक वर्षे बंद आहेत. तरुण शहरगावात नोकरीसाठी गेल्याने शेती करणारी नवी पिढी नाही, आर्थिक व्यवस्था डळमळीत आहे. केवळ एकमेकांना आधार देत दिवस कंठणारी बहुमतातील वृद्धसंख्या आणि त्यांना जगवणारी मूठभर तरुणांची उपस्थिती, अशी गावाची व्यवस्था आहे. इथे चर्चच्या विचारांनी बाधित, तरीही मदतीस तत्पर कॅरोलिन भेटते. बायको, मुलीने सोडून दिल्यानंतर आयुष्याची विपन्नावस्था झालेला पूर्वाश्रमीचा मद्यपी जॉर्ज भेटतो. त्याच्या आयुष्यातील आणि गावातील भरभराट एकाच काळात सोडून गेल्याचे दु:ख पचवत तो निर्थक जगत असतो. या साऱ्या ग्रंथविरहित जगामध्ये सारा ग्रंथनादाचा शंख फुंकते.

कादंबरीमध्ये एकोणिसाव्या-विसाव्या शतकातल्या बहुतांश लेखिकांचे आणि त्यांच्या पुस्तकांचे संदर्भ येतात. लेखिका कॅटरिना बिवाल्ड हिने ते सगळे आवडीने पचविले असल्याने त्यांच्या लेखनाची वैशिष्टय़े येतात. डॅन ब्राऊनसारख्या बहुप्रसवा बेस्टसेलर लेखकापासून पॉल ऑस्टर, जॉयस करोल ओट्स आणि कैक नव्या-जुन्या लेखकांच्या साहित्याची आवश्यक तितकी माहिती येते, पेंग्विनच्या पेपरबॅक आवृत्तीचा १९३५ पासून सुरू झालेला अल्पइतिहास येतो. अ‍ॅमीने साराला लिहिलेल्या पत्रांमधून एकूणच ग्रंथांचे वेड, पुस्तक दुकानांची गरज आणि त्यांची शोकांतिका यांचा आज सगळीकडे पाहायला मिळणारा भाग येतो. एका पत्रामध्ये सारा काम करीत असलेले स्वीडनमधील पुस्तकांचे दुकान बंद पडून तेथे कपडय़ांचे नवे दालन सुरू झाल्याबद्दलची आक्रोशयुक्त हळहळ व्यक्त होते. गेल्या काही वर्षांत पुस्तकविक्री व्यवहारात झालेल्या बदलांनी वाचकांच्या होणाऱ्या फरफटीचा इथला मुद्दा कोणत्याही देशांत, शहरांत सारख्याच प्रमाणात झोंबतो.

इथल्या खेडेगावाच्या आणि तिथल्या लोकांच्या पुस्तकविरहित जगण्यातली कमतरता आज आपल्याकडच्या कोणत्याही खेडेगावाच्या चिघळत चाललेल्या शोकांतिकेशी समरूपी बाब म्हणून जाणवू शकेल. पुस्तकांच्या आधारावर अघळपघळ चर्चेत रमणाऱ्या या लेखिकेने चितारलेला हा ग्रंथअवर्षणाचा प्रदेश आपल्यातल्या पुस्तकजीवीच्या फेरफटक्यासाठी आत्यंतिक आवश्यक आहे. लवकरच पुस्तकांच्या एका गावामुळे आपण वाचनाबाबत ‘समृद्ध वगैरे’ होण्याच्या सध्याच्या पाश्र्वभूमीवर तर आवर्जूनच!

  • ‘दि रिडर्स ऑफ ब्रोकन व्हिल रेकमेण्ड’
  • लेखिका : कॅटरिना बिवाल्ड
  • इंग्रजी अनुवाद : अ‍ॅलिस मेन्झिस
  • प्रकाशक : लॅण्डमार्क
  • पृष्ठे : ३९४, किंमत : ४५४ रुपये

 

पंकज भोसले

pankaj.bhosale@expressindia.com